कॉलेज लाइफ भाग ३

Story Of Hostel Plus College Life

कॉलेज लाईफ भाग ३

मागील भागाचा सारांश: अक्षराची ओळख तिच्या दोन्ही रुममेट सोबत झाली, एकीचं नाव प्रिया व दुसरी किर्ती. प्रिया अक्षरा सारखीच होती पण किर्ती त्या दोघींपेक्षा वेगळीच होती. होस्टेलची पहिली सकाळ अक्षराला अनुभवायला मिळाली. कॉलेजच्या पहिल्या दिवशी अक्षरा व प्रियाला समजले की किर्तीला बारावीत सगळयात जास्त मार्क्स होते. किर्तीच्या बोलण्याचा, वागण्याचा अर्थ अक्षरा व प्रियाला काही उमगत नव्हता.

आता बघूया पुढे….

होस्टेलच्या समोर एक मैदान होते, मैदानाच्या चारी बाजूला झाडे लावलेली होती. संध्याकाळी तिथे हवेशीर वाटायचे. होस्टेल मधील मुली संध्याकाळी त्या मैदानात फिरायच्या. मैदानाच्या बाजूला सिमेंटचे बाकडे बनवलेले होते, तिथे काही मुली येऊन गप्पा मारत बसत होत्या.

संध्याकाळी पाचच्या सुमारास प्रिया झोपलेली होती तर किर्ती अजून लायब्ररीतून आलेली नव्हती. अक्षराला रुममध्ये बसून कंटाळा आला होता म्हणून ती खाली फेरफटका मारण्यासाठी गेली होती. अक्षराची अजून इतर मुलींसोबत फारशी ओळख झालेली नव्हती म्हणून ती एकटीच एका बाकड्यावर जाऊन बसली, तेवढ्यात तिला तिच्या भावाचा म्हणजेच प्रसाद दादाचा तिला फोन आला,

"हॅलो अक्षू, कशी आहेस?"

"होस्टेलच्या वातावरणात रुळते आहे" अक्षराने उत्तर दिले.

प्रसाद म्हणाला,

"अक्षू तुझा आवाज तर खूप सॅड वाटत आहे. सगळं काही ठीक आहे ना? रुममेट चांगल्या आहेत ना?"

अक्षरा म्हणाली,

"दादा माझ्या रुममेट चांगल्या आहेत. दुपारी कॉलेजवरुन आल्यापासून खूप बोअर झालं आहे. घराची आठवण येत आहे."

प्रसाद म्हणाला,

"अग अक्षू घरापासून लांब राहणं एवढं सोपं नसतं. सुरवातीला याचा त्रास होतो पण हे बघ एकटी बसत जाऊ नकोस. वर्गातील इतर मुलींसोबत ओळख करुन बोलत जा म्हणजे तुला कंटाळा येणार नाही."

अक्षरा म्हणाली,

"दादा आज सकाळी मी अंघोळ न करता कॉलेजला गेले होते."

प्रसाद हसून म्हणाला,

"अग त्यात एवढं विशेष असं काही नाही. मी दररोज कॉलेजला अंघोळ न करताच जातो. होस्टेलला रहायला लागलं की या सगळ्या सवयी आपोआप लागतात."

अक्षरा म्हणाली,

"दादा वाटलं तेवढं हे सगळं सोपं वाटतं नाही."

प्रसाद म्हणाला, 

"हे बघ अक्षू तुला वाटतं तितकं हे अवघड नाहीये. रेग्युलर लेक्चर चालू झाल्यावर अभ्यास करायला सुरुवात कर. हा पहिला आठवडा तुला थोडा जडच जाईल. मेसचं जेवण आवडलं नाहीतरी खात जा कारण जर तु जेवण नाही केलं तर आजारी पडशील. मी तुला नंतर फोन करतो बाय."

प्रसाद सोबत फोनवर बोलल्यामुळे अक्षराला जरा बरे वाटत होते. अक्षरा रुममध्ये जाण्यासाठी निघणार तेवढ्यात किर्ती तिच्या जवळ येऊन बसत म्हणाली,

"अक्षू जरावेळ बस ग, मोकळया हवेत जरा बरं वाटतं."

अक्षरा म्हणाली,

"मी बऱ्याच वेळापासून इथं बसलेली आहे."

किर्ती म्हणाली,

"पियू तुझ्यासोबत आली नाही का?"

अक्षरा म्हणाली,

"नाही ती झोपलेली होती. मला रुममध्ये बसून कंटाळा आला होता म्हणून मी एकटीच इथे येऊन बसले तेवढ्यात दादाचा फोन आला मग दादासोबत बोलण्यात वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही."

किर्ती म्हणाली,

"तुला मोठा भाऊ आहे का?"

अक्षरा म्हणाली,

"हो,प्रसाद दादा पुण्यात असतो. तु इतक्या वेळ कुठे होतीस?"

किर्ती म्हणाली,

"अग मी लायब्ररीत होती. कमवा व शिका या योजनेअंतर्गत लेक्चर्स संपल्यावर लायब्ररीत जाऊन काम करावे लागणार आहे."

"कितू पण हे सगळं कशासाठी?" अक्षराने विचारले.

किर्ती म्हणाली,

"आपण ह्या विषयावर रुममध्ये जाऊन बोलूयात म्हणजे पियूच्या मनात ज्या काही शंका असतील त्याही मिटतील."

अक्षरा व किर्ती रुममध्ये गेल्या तर प्रिया झोपेतून उठलेली होती. अक्षरा व किर्तीला सोबत बघून प्रिया म्हणाली,

"अक्षू तु किर्ती सोबत कशी काय आलीस?"

अक्षरा म्हणाली,

"अग मला रुममध्ये बसून कंटाळा आला होता म्हणून मी खाली गेले होते तर कितू मला तिकडेच भेटली."

या दोघींच्या गप्पा चालू असतानाच त्यांच्या रुमच्या दरवाजाला नॉक करुन एका मुलीने विचारले,

"मी आत येऊ का?"

किर्ती तिच्याकडे बघत म्हणाली,

"ये ना"

किर्ती, अक्षरा व प्रिया तिच्याकडे शंकेने बघत होत्या. ती म्हणाली,

"हाय मी सोनाली, मी तुमच्याच वर्गात आहे. मला आपली एक सिनिअर भेटली होती, तिने मला सांगितलं की फर्स्ट इयर च्या सर्व मुलींना रात्री नऊ वाजता त्यांच्या एका रुममध्ये जमायला सांगितलं आहे. मी तोच निरोप देण्यासाठी आले आहे."

किर्ती म्हणाली,

"आपण त्यांच्या रुममध्ये का जमायचं?"

सोनाली म्हणाली,

"त्यांना आपल्या सगळ्यांसोबत ओळख करुन घ्यायची आहे."

किर्ती म्हणाली,

"सोनाली त्यांना आपल्या सोबत ओळख करुन घ्यायची असेल तर त्यांनी आपल्या रुममध्ये यावं, त्यांचा रॅगिंग घेण्याचा प्लॅन असेल. माझं तर असं म्हणणं आहे की आपण कोणीच जायला नको. आपल्यातील युनिटी दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण जर सगळे एकत्र असू तर आपली कोणीच रॅगिंग घेऊ शकणार नाही."

सोनाली म्हणाली,

"आपलं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे."

किर्ती म्हणाली,

"नक्कीच ऐकतील. तु सगळ्यांना निरोप द्यायला जात आहेच तर मी आठ वाजता माझ्या रुममध्ये सगळ्यांना बोलावलं आहे असं सांग."

सोनाली मानेने होकार देऊन निघून गेली. सोनाली गेल्यावर प्रिया किर्तीला म्हणाली,

"कितू आपले सिनिअर आपली रॅगिंग घेणार म्हणजे काय करणार?"

किर्ती म्हणाली,

"काही विशेष नाही ग, ते त्यांची सिनिअर गिरी दाखवण्यासाठी काहीतरी करत असतात. आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात."

अक्षरा म्हणाली,

"रॅगिंग करण्यास बंदी आहे ना?"

किर्ती म्हणाली,

"आपल्या देशात कोणत्याही कायद्याचं कठोरपणे पालन केलं जातं का?"

प्रिया म्हणाली,

"तुझ्या डोक्यात काय प्लॅन चालू आहे?"

किर्ती म्हणाली,

"आपण त्यांचं म्हणणं ऐकायचंच नाही. आपण सगळ्यांनी एकजूट दाखवली तर आपल्या सिनिअर आपल्याला काहीच करु शकणार नाही."

रात्री आठच्या सुमारास फर्स्ट इयरच्या सर्व मुली किर्तीच्या रुममध्ये जमल्या. किर्तीने सर्व मुलींना काय करायचे? काय नाही करायचे? हे सर्व सांगितले. किर्ती त्यांच्या सोबत बोलत असतानाच एक सिनिअर किर्तीच्या रुममध्ये येऊन म्हणाली,

"सोनाली मी तुला काय सांगितले होते? तुम्हाला सर्वांना मी आमच्या रुममध्ये जमायला सांगितले होते ना? तु माझा निरोप सगळ्यांपर्यंत पोहोचवला नाहीस का?"

किर्ती म्हणाली,

"दीदी आम्हाला तुमचा निरोप मिळाला होता पण तुम्ही आम्हाला का बोलावले? ह्याचे कारण न समजल्याने आम्ही येऊ शकलो नाही."

सिनिअर किर्तीकडे रागाने बघत म्हणाली,

"आम्हाला तुमच्या सर्वांसोबत ओळख करुन घ्यायची होती."

किर्ती म्हणाली," दीदी मग तुम्ही सगळे इथेच या ना. आम्ही सगळे इथं जमलो आहोतच तर तुमची आणि आमची ओळख होऊन जाईल."

ती सिनिअर किर्तीकडे रागाने बघत निघून गेली. सोनाली पुढे म्हणाली,

"किर्ती आपला त्यांना खूप जास्त राग आला आहे, त्या नक्कीच कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्यावर राग काढण्याचा प्रयत्न करतील."

किर्ती म्हणाली,

"हे बघा आपल्याला कॉलेजमध्ये टिकून रहायचे असेल तर आपला अभ्यास आपल्यालाच करावा लागणार आहे. आपण सगळे एकजुटीने राहुयात. आपल्याला कोणीच सिनिअर काहीच करु शकत नाही. समजा आपल्यापैकी कोणी जरी घाबरुन त्यांना शरण गेलं तर मग आपल्या सर्वांचीच वाट लागेल."

किर्तीचं बोलणं झाल्यावर सर्व मुली आपापल्या रुममध्ये निघून गेल्या. सोनाली मात्र तिथेच थांबून होती, ती किर्तीकडे आश्चर्याने बघत होती म्हणून किर्ती तिला म्हणाली,

"तु माझ्याकडे अशी का बघत आहेस?"

सोनाली म्हणाली,

"तुझ्यात एवढी हिंमत कुठून आली आहे? तु त्या सिनिअर सोबत बोलताना अजिबात घाबरलेली नव्हती."

किर्ती म्हणाली,

"कसं असतं ना सोनाली जेव्हा आपल्याला स्वतःला आपली जबाबदारी उचलायची असते ना तेव्हा आपोआप आपल्यात हिंमत येते. मी लहानपणापासून होस्टेलला राहत असल्याने मला या सर्वाची आधीपासूनच माहिती आहे."

सोनाली म्हणाली,

"तुला तुझी जबाबदारी उचलावी लागते म्हणजे मला समजलं नाही."

किर्ती म्हणाली,

"खूप मोठी स्टोरी आहे नंतर कधीतरी सांगेल. आता सध्या मला खूप भूक लागली आहे. आज जेवायला मेसमध्ये काय आहे? हे जाऊन बघावे लागेल. पियू, अक्षू तुम्ही जेवायला येताय की मी एकटी जाऊन जेवण करुन येऊ."

अक्षू म्हणाली,

"नाही आम्ही पण येतो."

अक्षरा, किर्ती व प्रिया या तिघीजणी जेवण करण्यासाठी मेसमध्ये गेल्या तर तिथे त्यांच्या सिनिअर जेवण करत होत्या. किर्तीकडे त्या रागाने बघत होत्या. किर्ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन आपलं जेवणाचं ताट घेऊन सिनिअर बसल्या होत्या त्यांच्या शेजारच्या टेबलावर जाऊन बसली. एक सिनिअर मुलगी उठली व किर्ती शेजारी जाऊन बसली व तिने तिला विचारले,

"तु स्वतःला काय समजतेस? तु जर लीडर होण्याचा प्रयत्न करत असेल तर ते ताबडतोब बंद कर."

किर्ती म्हणाली,

"दीदी मी स्वतःला कोणीच समजत नाहीये आणि मला लीडर होण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. मी लहानपणापासून होस्टेलला राहत असल्याने तुम्ही सिनिअर रॅगिंग कशी घेतात? याची कल्पना मला आहे. मी इतकी खंबीर आहे की तुमच्या रॅगिंगने मला काहीच फरक पडणार नाही. पण तुमच्या रॅगिंगमुळे एखाद्या मुलीचा जीव जावू नये ही माझी इच्छा आहे."

ती सिनिअर म्हणाली,

"कोणाचा जीव जाईपर्यंत आम्ही रॅगिंग घेऊ असं तुला वाटतं आहे का?"

किर्ती म्हणाली,

"तुम्ही काय करणार हे मला माहित नाही पण ह्याच रॅगिंगमुळे मला माझी एक जवळची मैत्रीण गमवावी लागली आहे, तेव्हा मी काही करु शकले नव्हते पण आता हे होऊ देणार नाही."

किर्तीचं बोलणं ऐकून ती सिनिअर तेथून उठून गेली मग अक्षरा व प्रिया किर्ती शेजारी जेवण करण्यासाठी जाऊन बसल्या.

©®Dr Supriya Dighe







🎭 Series Post

View all