कॉलेज लाईफ भाग ३५(अंतिम)

Last Part Of College Life

कॉलेज लाईफ भाग ३५(अंतिम)


मागील भागाचा सारांश: किर्ती व आदित्यचं लग्न ठरले होते. प्रिया व अक्षरामध्ये किर्तीवरुन चर्चा झाली. निखिल व अक्षरा दोघेही एकमेकांसोबत बोलत नव्हते. 


आता बघूया पुढे…..


एक्साम झाल्यावर किर्तीचा साखरपुडा आदित्य सोबत झाला. साखरपुड्याला अक्षरा व प्रिया गेल्या होत्या. प्रियाचंही प्रविणसोबत याच दरम्यान लग्न झालं. अक्षराच्या आग्रहाखातर आणि प्रिया किर्तीच्या साखरपुड्याला गेल्याने किर्ती प्रियाच्या लग्नाला उपस्थित राहिली.


प्रिया प्रविणसोबत फ्लॅटवर रहायला गेली होती. आता रुममध्ये किर्ती व अक्षरा या दोघीचं राहत होत्या. फायनल एक्सामला काहीच महिने बाकी राहिले होते, तसेच प्रोजेक्ट असल्याने अक्षरा व किर्ती त्याच्यात बिजी होत्या. प्रियासोबत या दोघींची कॉलेजमध्ये भेट व्हायची, त्यांच्यात तेवढ्या पुरत बोलणं व्हायचं. 


निखिल अभ्यास करण्यासाठी सतत लायब्ररीत बसलेला असायचा. कॅम्पस इंटरव्ह्यू साठी शेवट शेवट कंपन्या येऊ लागल्या होत्या. किर्ती, निखिल व अक्षरा हे तिघेही प्रत्येक इंटरव्ह्यू देत होते. तिघांचेही वेगवेगळ्या कंपनीत सिलेक्शन झाले होते. एक्साम झाल्यावर काही दिवसांतच कंपनीचे ट्रेनिंग सुरु होणार होते. 


आयुष्यातील शेवटची परीक्षा म्हणून सर्वांनीच जोमाने अभ्यास केला होता. थिअरी, प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट एक्साम या तिन्ही पार पडल्या. दुसऱ्या दिवशी सगळेजण होस्टेल सोडून आपापल्या घरी जाणार असल्याने प्रत्येकाच्या डोळयात पाणी येत होते. अक्षरा लायब्ररीतून घेतलेले पुस्तकं परत करण्यासाठी लायब्ररीत आली होती. लायब्ररीतून अक्षरा बाहेर पडत असताना निखिलने तिला आवाज देऊन थांबवले. अक्षरा जागच्या जागी थांबली, पण तिने निखिलकडे वळून सुद्धा बघितले नाही.


"अक्षरा मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. गार्डनमध्ये जाऊन बसूयात का?" निखिल तिच्याजवळ येऊन म्हणाला.


अक्षराने मानेनेच होकार दर्शवला. अक्षरा गार्डनमध्ये जाऊन एका बेंचवर बसली. निखिल तिच्याजवळ जाऊन बसला. निखिलने बोलायला सुरुवात केली,


"अक्षरा सर्वप्रथम मी तुझी मनापासून माफी मागतो. मी तुला खूप दुखावलं आहे. मी गेल्या काही दिवसांत जे वागलो आहे, ते चुकीचं होतं, त्यामागे काही कारण असलं तरी मी माझ्या वर्तनाचे समर्थन करणार नाही. आता मी तुझ्याशी बोलणं का टाळत होतो? त्याचं उत्तर मी देणार आहे. मी तुझ्याशी हे सगळं बोललो नसतो, तरी चाललं असतं, पण पुढे जाऊन जेव्हाही आपली भेट होत जाईल, तेव्हा मी तुझ्या डोळ्याला डोळे देऊन बोलू शकलो नसतो.


अक्षरा तुला आठवत असेलचं की, आपण दोघे जेव्हा मुंबईला गेलो होतो, तेव्हा तुझ्या दादाला व माझ्या ताईला आपण लग्न केल्याचे खोटे सांगितले होते. तेव्हा माझ्या मनात तुझ्याबद्दल असणाऱ्या भावना मी सांगितल्या होत्या. त्या भावना खऱ्या होत्या. मी नकळतपणे तुझ्याकडे खेचला जात होतो. अक्षरा मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. अमृता ताईच्या लग्नाबद्दल समजलं, तेव्हा मला हे रिअलाईज झालं की, तुझ्यापासून दूर होण्यातचं खरा शहाणपणा आहे. अजून काही दिवस आपली मैत्री अजून घट्ट झाली असती आणि आपल्याला एकमेकांपासून दूर होणे अवघड झाले असते. 


अमृता ताईच्या बाबतीत आईला खूप मनस्ताप झाला. मी अगदी जवळून आईचा त्रास बघितला होता. मला पुन्हा त्याच वेदना आईला द्यायच्या नव्हत्या. तुझ्याशी बोलणे टाळताना मलाही खूप वेदना होत होत्या. तुझ्याशी हे सगळं बोलून मैत्री तोडली असती, तर तुलाही खूप त्रास झाला असता. तुझ्या नजरेत व्हिलन बनूनचं आपल्यातील हे नातं संपवायचं मी ठरवलं."


अक्षरा बेंचवरुन उठत म्हणाली,

"निखिल तुला जे वागायचं ते तू वागलास. आता त्यावर मला काहीच बोलायचं नाहीये. आपल्या दोघांमध्ये मैत्रीच्या पलीकडे काहीतरी होतं, हे मलाही जाणवत होते. खंत एवढीच वाटते की, आपली एवढी चांगली मैत्री तुटली. कॉलेजच्या शेवटच्या दिवसांत आपल्या मैत्रीच्या आठवणी असाव्यात असं नेहमी वाटायचं. 


एनिवेज तुझ्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा."


अक्षरा एवढं बोलून सरळ तेथून निघून गेली. किर्ती रुममध्ये सामानाची आवराआवर करता करता फोनवर बोलत होती. अक्षराच्या डोळ्यातील पाणी बघून किर्तीने फोन कट केला. किर्ती तिच्याजवळ जाऊन म्हणाली,


"अक्षू काय झालं?" 


अक्षरा किर्तीच्या गळ्यात पडून खूप रडायला लागली. किर्तीच्या डोळ्यातही पाणी आले होते. पुढील पाच मिनिटांनंतर अक्षरा शांत झाली, मग तिने निखिल व तिच्यामधील बोलणं किर्तीला सांगितले.


"अक्षू तू निखिलच्या प्रेमात पडली होतीस ना?" किर्तीने विचारले.


अक्षरा डोळे पुसत म्हणाली,

"हो, मला तो आवडू लागला होता. दादाच्या लग्नामुळे मी त्या भावना तेव्हाच दाबून ठेवायच्या ठरवलं होतं. निखिलमुळे ते सहजासहजी शक्य झालं. पण किर्ती मी एक चांगला मित्र गमावल्याचे दुःख जास्त वाटत आहे."


किर्ती म्हणाली,

"हम्मम. मला जी भीती वाटत होती, तेच झालं. तुमच्या दोघांच्या बहीण भावामुळे तुमची मैत्री तुटली. असो झालं गेलं विसरुन जा. काही दिवसांनी ट्रेनिंग सुरु होणार आहे. आपण दोघी कॉन्टॅक्ट मध्ये राहुयात. काही दिवसांतून भेटण्याचा प्रयत्न करत जाऊ. तुझे बाबा तुझ्यासाठी योग्य असा मुलगा शोधतीलचं. आपल्या दोघींचं आयुष्य पुढे जात आहे, ते एन्जॉय करुयात."


अक्षरा म्हणाली,

"बाकी नात्यांचं काही होऊदेत, पण आपली मैत्री कधीच तुटणार नाही.


'मी तुला विसरणार नाही

आणि तू मला विसरशील

हे मी होऊ देणार नाही.'


अक्षराने किर्तीला कडकडून मिठी मारली. दुसऱ्या दिवशी अक्षराचे बाबा तिला घ्यायला आले होते, तर किर्तीचे काका तिला घ्यायला आले होते. होस्टेल मधील सर्व मैत्रिणींचा निरोप घेऊन अक्षरा गाडीत बसली. डोळयात उद्याच्या भविष्याचे स्वप्न आणि मनात कॉलेज लाईफच्या आठवणी घेऊन ती कॉलेजच्या गेटबाहेर पडली. 


कॉलेजमध्ये आली तेव्हा कॉलेज लाईफबद्दल खूप स्वप्नं डोळयात घेऊन आली होती, त्यातील काही पूर्ण झाली तर काही अपूर्णच राहिली, पण शिकायला खूप काही मिळालं होतं. आयुष्यभरासाठी एक जिवाभावाची मैत्रीण तिला मिळाली होती.


तर अशी होती ही कथा. आपणा सर्वांना ही कथा कशी वाटली? हे कमेंट करुन कळवा. काही दिवसांनी नवीन कथामालिकेतून आपली पुन्हा भेट होईलचं. तुम्हाला नवीन कथा वाचायला आवडेल का? कमेंट करुन कळवा,म्हणजे मी लवकरच आपल्या सर्वांसाठी नवीन कथा घेऊन येईल.

धन्यवाद.


©® Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all