Login

कॉलेज लाईफ भाग ३४

Story Of College Days
कॉलेज लाईफ भाग ३४

मागील भागाचा सारांश: प्रियाचा प्रविणसोबत साखरपुडा झाला. प्रसाद व अमृताचं लग्न त्यांच्या घरच्यांनी सर्वांच्या उपस्थितीत लावून दिलं.

आता बघूया पुढे…

अक्षरा होस्टेलला येण्याआधी प्रिया व किर्ती या दोघी आलेल्या होत्या. अक्षरा रुममध्ये आली तेव्हा फक्त प्रिया रुममध्ये होती. प्रियाला बघून अक्षरा म्हणाली,

"पियू साखरपुड्याच्या दिवशी तर एकदमचं भारी दिसत होती ग. तुझ्या मनातील आनंद चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता."

"थँक् यू. सगळेजण असेच म्हणत होते. आमच्या दोघांकडे बघून 'मेड फॉर इच आदर' असंही बरेचजण म्हणत होते. रोहित आमच्या साखरपुड्याला आला होता. तुम्ही दोघी साखरपुड्याला आल्या नाही, पण लग्नाला नक्की यायचं बरं." प्रियाने सांगितले.

अक्षरा म्हणाली,
"रोहित आला होता तर. अग दादाचं लग्न नसतं, तर मी नक्की आले असते. बरं ही कितू कुठे आहे?"

यावर प्रिया म्हणाली,
"माहीत नाही. ती आल्यापासूनचं फोनवर आहे. माझ्यासोबत औपचारिक हाय हॅलो करुन गेली. अक्षू तिला मी आवडत नाही का? म्हणजे तिच्या वागण्यावरुन तरी हल्ली मला तसंच जाणवायला लागलं आहे."

"हे बघ पियू तिला तू आवडते की नाही? किंवा ती तुझ्यासोबत फारसं बोलत का नाही? याबद्दल मला काहीच माहीत नाहीये. तसंही तू काही दिवसांनंतर इथून जाणार आहेस, सो याचा एवढा फरक पडून घेऊ नकोस. तुझं लग्न झाल्यावर तू जास्तीत जास्त वेळ प्रविण सोबत असणार आहेस, तेव्हा तुला किर्ती किंवा माझा एवढा विचार करण्याची गरज नाहीये. 
कसं असतं ना पियू, आपलं जसं आयुष्य पुढे पुढे जात असतं, तश्या प्रत्येकाच्या प्रायोरिटीज बदलत जातात. आणि त्यात चूक असं काहीच नाहीये. मी तुला सांगेल की, आता फक्त तू तुझा आणि प्रविणचा विचार कर. आता अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नकोस." अक्षराने सांगितले.

यावर प्रिया म्हणाली,
"मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळाला आहे. फक्त मला एक सांग की, ती तुझ्यासोबत नेहमीच खूप गप्पा मारते, पण मी असल्यावर ती फार काही बोलत नाही. आपल्या तिघींची ओळख एकाच वेळी झाली होती. शिवाय सुरुवातीच्या काळात आपण दोघी चांगल्या मैत्रिणी होतो आणि किर्ती व मीच एकमेकींशी जास्त बोलायचो. मग अचानक हे इक्वेशन कसं बदललं?"

"अग पियू मी तुला तेच तर सांगत आहे. वेळेनुसार जशी प्रायोरीटी बदलते, तसं नातं सुद्धा बदलूचं शकत ना. किर्ती व तू दोघी एकमेकींच्या चांगल्या फ्रेंड्स होत्या, ती तुझ्या घरीही आली होती. तू जेव्हा रोहित व प्रविण या दोघांमध्ये गुंग झाली होतीस ना, तेव्हा तू तिचा विश्वास तोडलास आणि त्याच वेळी आपल्या मैत्रीचं इक्वेशन बदललं. मला तुझ्या वागण्याने फारसा फरक पडला नाही, पण ती जरा जास्तचं दुखावली होती आणि तिने तसं स्पष्टपणे सांगितलं पण होतं." अक्षराने उत्तर दिले.

प्रिया म्हणाली,
"जाऊदेत मी पण आता याचा जास्त विचार करत नाही. जास्त विचार करुन मनात अनेक शंका येत राहतात. मला प्रविणला फोन करायचा आहे, मी जरा जाऊन येते."

अक्षरा प्रियाला थांबवत म्हणाली,
"पियू माझं आणि तिचं जास्त का पटतं? ह्याचं ताज उदाहरण देऊ का? नाही देतेच, म्हणजे तुझ्या डोक्यात चालणारी गणगण थोडी कमी होईल. आपण इतक्या वेळ झाले बोलत आहोत. पण तू एकदाही मला दादाचं लग्न कसं झालं? माझे आईवडील ठीक आहेत ना? याबद्दल विचारलं नाहीस. कितू आल्यावर लगेच पहिला प्रश्न हा विचारेल. मी तुझा स्वभाव बघता ही अपेक्षा सोडून दिली आहे, पण फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलं."

अक्षरा बोलत असतानाच किर्ती रुममध्ये येऊन म्हणाली,
"अरे अक्षू तू केव्हा आलीस? दादाचं लग्नात काही विघ्न तर आलं नाही ना? आणि काका काकू बरे आहेत ना? त्यांना बऱ्याच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असेल."

अक्षराने प्रियाकडे एक कटाक्ष टाकला, ती खाली मान घालून रुममधून निघून गेली. प्रिया निघून गेल्यावर किर्ती म्हणाली,

"ही अशी का गेली? तुमच्या दोघींमध्ये काही झालंय का?"

अक्षरा म्हणाली,
"तिला प्रश्न पडला होता की, आपल्या दोघींमध्ये इतकी छान मैत्री कशी होऊ शकते? कॉलेजच्या सुरुवातीला तर तू तिची चांगली मैत्रीण होतीस. मग आता असं काय झालंय की, तू तिच्यासोबत फारसं बोलत नाही. मी तुला तुझ्याबाबत एक उदाहरण दिलं होतं आणि तू आल्याबरोबर तेच बोललीस, म्हणून ती ओशाळून निघून गेली असेल. तिचं सोड. 
दादाचं लग्न व्यवस्थित पार पडलं. आईबाबा दोघांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावेच लागले.
मला स्थळ बघण्यासाठी बाबांनी माझी परवानगी घेतली. बाबांना आता पुन्हा रिस्क घ्यायची नाहीये. दादा बोलला आहे की, "माझ्या चुकीची अक्षूला शिक्षा देऊ नका म्हणून." 
माझा कॉलेज संपल्यानंतरचं लग्न करणार आहेत, पण थोडं त्याआधी मुलं बघायला सुरुवात करणार आहे. बाबा त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. एकदा जीभेला चटका बसल्यावर माणूस ताकही फुंकून पितो."

यावर किर्ती म्हणाली,
"हम्मम काका त्यांच्या जागेवर एकदम बरोबर आहेत. तू त्यांना समजून घेतलंय, हे महत्त्वाचे आहे."

"बरं आदित्य व तुझी भेट झाली का?" अक्षराने विचारले.

"हो, तो त्याच्या आई वडिलांसोबत घरी आला होता. माझ्यासाठी ते एक मोठे सरप्राईज होते. घरी येऊन सर्वांसमोर आदित्यने मला प्रपोज केले. मला विचार करायला त्याने वेळ दिला होता. मी दोन तीन दिवसांतचं त्याला होकार दिला. आदित्यची कंपनी जरी इथं पुण्यात असली, तरी त्याचे ट्रेनिंग बंगलोरच्या ब्रॅंचला आहे. त्याने माझ्या काका काकूंना स्पष्ट सांगितले की, दिवाळीत साखरपुडा होईल आणि ट्रेनिंगनंतर लग्न, तोपर्यंत आपलं कॉलेजही पूर्ण होईल. आदित्य पुण्यात नसेल तर माझं लक्षही डायव्हर्ट होणार नाही." किर्तीने सांगितले.

अक्षरा हसून म्हणाली,
"वाव ही तर मोठी गुडन्यूज आहे. तू आदित्यला इतक्या पटकन होकार कसा काय दिला?"

"हे बघ अक्षू. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही एकमेकांसोबत फोनवर बोलत होतो. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो आहोत. आदित्यला माझा स्वभाव माहीत झाला आहे. माझ्या मनात माझ्या काका काकूंबद्दल काय भावना आहेत? याचीही त्याला कल्पना आहे. मी त्याला आता पूर्णपणे ओळखायला लागले आहे. मग हे सगळं असताना मी त्याला नकार का म्हणून देऊ? मी कोणाच्या दबावात येऊन हा निर्णय घेतला नाहीये. 
आदित्यने पुण्यात 3 बी एच के फ्लॅट पण बुक केला आहे. त्याला चांगला पगार सुद्धा आहे आणि मुख्य म्हणजे तो एक माणूस म्हणून खूप चांगला आहे. माझा कॅम्पस मध्ये सिलेक्शन झालं, तर लाईफ सेट झालीच समज. अश्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आहेत." किर्तीने सांगितले.

अक्षरा म्हणाली,
"आदित्यला होकार देऊन तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस. कितू आता आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. यावर्षी निखिल अभ्यास करायला माझ्यासोबत नाहीये. तू माझ्यासोबत अभ्यास करायला बसणार आहेस."

किर्ती म्हणाली,
"हो चालेल. आपण दोघी मिळून अभ्यास करुयात. निखिल लग्नात तुझ्यासोबत बोलला नाही का?"

"एक शब्द पण नाही." अक्षराने उत्तर दिले.

किर्ती म्हणाली,
"अच्छा. उद्यापासून संध्याकाळी आपण लायब्ररीत जाऊन अभ्यास करुयात. आपल्या दोघींना चांगले मार्क्स मिळायला हवेतच, पण कॅम्पस सिलेक्शन सुद्धा झालं पाहिजे."

अक्षराने मान हलवून होकार दिला. दुसऱ्या दिवसापासून अक्षरा व किर्ती जोमाने अभ्यासाला लागल्या. प्रिया अक्षरा व किर्तीसोबत कामापुरतं बोलायची. निखिल अक्षरा व किर्तीसोबत बोलणं टाळतं होता. अक्षराने निखिलकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं.

बोलता बोलता सेमिस्टर एक्साम आली होती. सगळ्यांनीच म्हणजे अक्षरा, किर्ती, निखिल, प्रिया व रोहितने सगळ्या गोष्टी बाजूला ठेऊन जोमाने अभ्यास केला होता.