कॉलेज लाईफ भाग ३३

Story Of College Days

कॉलेज लाईफ भाग ३३


मागील भागाचा सारांश: प्रसाद व अमृताच्या लग्नाबद्दल अमृताच्या आईला व प्रसादच्या आई बाबांना खूप मोठा धक्का बसला होता. प्रसादच्या बाबांनी विचार करुन ठरवले की, समाजासाठी आपण या दोघांचं लग्न पुन्हा लावून देऊयात. अमृताच्या आईने पण याला दुजोरा दिला. 


आता बघूया पुढे….


निखिल पुढील आठवडाभर कॉलेजला न आल्यामुळे अक्षराने त्याला फोन केला, पण निखिलने अक्षराचा फोन उचलला नाही. त्याने तिला मॅसेज केला की, "प्लिज मला फोन करु नकोस, मी तुझ्यासोबत बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये."


निखिलचा मॅसेज बघून अक्षराला त्याचा खूप राग आला होता. अक्षराच्या चेहऱ्यावरील राग स्पष्टपणे जाणवून येत होता, म्हणून किर्ती म्हणाला,


"अक्षरा डोक्यावर इतक्या आठ्या का आणल्या आहेस? कोणाचा इतका राग आला आहे?"


"निखीलचा." अक्षराने उत्तर दिले.


"आता त्याने काय केलं?" किर्तीने विचारलं.


अक्षराने किर्तीला निखिलचा मॅसेज दाखवला. यावर किर्ती म्हणाली,

"अग पण तू त्याला फोन का केला होतास?"


"कितू मुंबईला हे घडलं, ते मी तुला सांगितलं आहेच. एक आठवडा झाला, तरी तो कॉलेजला आला नाही, म्हणून मला त्याची काळजी वाटत होती. शेवटी न राहवून मी फोन केला होता. पण तो इतका ऍटीट्यूड का दाखवत आहे? हेच कळत नाहीये." अक्षराने सांगितलं.


यावर किर्ती म्हणाली,

"एक मित्र म्हणून तुला त्याची काळजी वाटणे स्वाभाविक आहे, पण त्याला तुझ्यासोबत सध्या बोलायचं नाहीये. आता का बोलायचं नाहीये? हा त्याचा प्रश्न राहिला. आपण त्यावर न बोललेलंच बरं. मी तुला याआधीही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगते, तू आता स्वतःहून त्याच्याशी बोलायला जाऊ नकोस."


"हो. मीही हेच ठरवलंय. ही पियू हल्ली कुठे गायब असते ग." अक्षराने विचारले.


"हल्ली मॅडम प्रविणमध्ये परत गुंतल्या आहेत. सतत दोघांचे फोन चालू असतात." किर्तीने उत्तर दिले.


तेवढ्यात प्रिया रुममध्ये आली.

"तुमच्या दोघांचं काही ठरलंय का?" अक्षराने विचारले.


प्रिया मोबाईलमध्ये बघूनचं म्हणाली,

"माझ्या आणि प्रविणबद्दल विचारते आहेस का?"


"मग कोणाबद्दल विचारेन?" अक्षरा म्हणाली.


प्रिया म्हणाली,

"मी बाबांना प्रविणसाठी होकार सांगितला आहे. माझ्या व प्रविणच्या बाबांमध्ये अजून रीतसर बोलणी व्हायची आहे. येत्या रविवारी माझ्याघरी सगळेजण जमणार आहे. मलापण जावं लागणार आहे, प्रविण सुद्धा येणार आहे. साखरपुडा व लग्न कधी करायचं? हे तेव्हाचं ठरेल. प्रविणचं म्हणणं आहे की, आत्ता साखरपुडा करुयात आणि सेमिस्टर एक्साम झाली की, लग्न करायचं. एक सेमिस्टर राहील तर त्यासाठी तो म्हटलाय की, कॉलेजजवळ एखादा फ्लॅट भाड्याने घेऊयात."


"एवढं सगळं झालं आणि आम्हाला एका शब्दानेही सांगितलं नाहीस." किर्तीने विचारले.


प्रिया म्हणाली,

"अग अजून पक्के काहीच ठरत नव्हतं. रविवारचा कार्यक्रम तर आज दुपारी समजला. आता त्यावरचं आमच्या दोघांमध्ये बोलणं सुरु होतं. बरं तुम्हाला दोघींना साखरपुड्याला यायचं आहे. मला कुठल्याही सबबी चालणार नाही."


"तुझा साखरपुडा कधी असेल, यावर सगळं अवलंबून असेल. पंधरा दिवसांत दादाचं लग्न ठरवत आहे, सो मला यायला जमेल की नाही यात शंकाचं आहे." अक्षराने सांगितले.


किर्ती म्हणाली,

"आणि माझं म्हणशील तर, माझ्या एका नातेवाईकाचं लग्न आहे. एरवी मी कोणत्याही नातेवाईकांच्या इथे लग्नाला जायला नकार देते, पण यावेळी लग्नाला आदित्य येणार आहे. मी लग्नाला यावं ही त्याची इच्छा आहे. आता ते लग्न आणि तुझा साखरपुडा एकत्र नाही आला म्हणजे झालं."


"म्हणजे तुम्ही दोघी साखरपुड्याला येणार नाही तर." प्रिया रागाने म्हणाली.


अक्षरा म्हणाली,

"एक मिनिटं कितू आदित्य भारतात आला आहे का? तू काही सांगितलंच नाही."


यावर किर्ती म्हणाली,

"अग बाई तो पुढच्या आठवड्यात येणार आहे. आदित्यच्या मते मी लग्नाला गेलेली असेल तर त्याला तेवढीच कंपनी मिळेल, तो बोअर होणार नाही." 


प्रविणचा फोन आल्याने प्रिया बाहेर निघून गेली. 

"तू आणि आदित्य एकाच लग्नात गेल्यावर तुमच्या दोघांच्याही घरचे पुन्हा लग्नाबद्दल बोलतील, त्याचा विचार केला आहेस की नाही?" अक्षराने विचारले.


"तुला एक खरं सांगू का? माझ्या नातेवाईकाचं लग्न नाहीये. मला पियूच्या साखरपुड्याला जायचं नाहीये, म्हणून मी खोटं कारण सांगितलं." किर्तीने सांगितले.


"अग पण का?" अक्षराने आश्चर्याने विचारले.


किर्ती म्हणाली,

"तू सोबत असती तर एकवेळ मी गेले असते. पण माझ्या मनातून प्रिया उतरुन गेली आहे. मला तिचं बरंच वागणं खटकतं. ती स्वतःच्या आयुष्याबद्दल क्लिअर नाहीये. स्वतःहून गोंधळ घालवून ठेवत आहे. तू मुंबईला गेली होती तेव्हा कॉलेजच्या गार्डनमध्ये रोहितसोबत जवळपास दोन तास गप्पा मारत बसलेली होती. तिचं काय चाललंय हे तिलाच माहीत."


"रोहित आणि ती एकमेकांचे चांगले मित्र आहेत, सो गप्पा मारत बसले असतील, त्यात इतकं मोठं काय आहे?" अक्षराने विचारले.


किर्ती थोडी चिडून म्हणाली,

"अक्षू तू खूप साधी आहेस. तुला अजून एवढा अनुभव नाहीये. प्रिया आणि रोहित बेंचवर एकमेकांच्या शेजारी हातात हात घालून बसले होते. जेव्हा प्रिया आणि रोहित एकमेकांसमोर येतात, तेव्हा ते एकमेकांकडे कोणत्या नजरेने बघतात, ह्याचं कधी तू निरीक्षणचं केलं नाहीये. त्यात तुझा दोष नाहीये. तुझा स्वभाव तसा नाहीये. मी पहिल्यापासून होस्टेलमध्ये राहत आल्याने माझा अश्या मुलींच्या बाबतीत चांगलाचं अभ्यास होऊन गेला आहे. असो हे तिचं आयुष्य आहे, ती तिच्या पद्धतीने जगू शकते. आपण याबाबत काही न बोललेलंच बरं. कॉलेज संपल्यावर माझा व तिचा काही संबंध उरणार नाही."


अक्षरा म्हणाली,

"तू जे म्हणते ते खरंही असेल. जाऊदेत आपण तिच्याबद्दल बोलायला नको. उगाच वातावरण निगेटिव्ह होऊन जातं. आदित्य पुढच्या आठवड्यात खरंच येणार आहे का?"


"हो. आदित्यने ऑनलाईन एका कंपनीत इंटरव्ह्यू झालाय. चांगलं पॅकेज मिळालं आहे. दोन दिवसांसाठी तो घरी जाऊन येणार आहे. मग कंपनीत जॉइनिंग आहे आणि त्यानंतर आम्ही दोघे भेटणार आहोत. प्रियाच्या साखरपुड्याच्या वेळी दोन तीन दिवस घरी जाऊन येईल." किर्तीने सांगितले.


एका आठवड्याने प्रिया व प्रविणचा साखरपुडा झाला. किर्ती त्यावेळी गावी निघून गेली होती. प्रसाद व अमृताचं लग्न असल्याने अक्षरा आपल्या घरी निघून गेली होती. 


सर्व नातेवाईकांसमोर प्रसाद व अमृताचं अरेंज मॅरेज दाखवण्यात आलं होतं. लग्नात निखिल अक्षरासोबत एक शब्द पण बोलला नाही. अक्षराला निखीलचे वागणे खटकत होते. अक्षराचे आईवडील पाहुण्यांसमोर खोटा आनंद चेहऱ्यावर घेऊन मिरवत होते. एकदाचं दोघांचं लग्न पार पडल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. लग्न झाल्यावर आठ दिवसांनी प्रसाद व अमृता मुंबईला जाणार होते. अक्षराही पुण्याला जाणार होती. सर्वजण हॉलमध्ये बसलेले होते.


"अक्षू बेटा, कॉलेजचे शेवटचे वर्ष आहे. मन लावून अभ्यास कर. सहा महिन्यांनी मी तुझ्यासाठी मुलं बघायला सुरुवात करणार आहे. तुझ्या इच्छेविरुद्ध काहीच होणार नाही. प्रसादच्या लग्नात खोटा आनंद चेहऱ्यावर घेऊन मिरवताना माझ्या मनाला खूप यातना झाल्या आहेत. आता तुझ्याबाबतीत मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण बाळा पाय घसरायला एक क्षण सुद्धा लागत नाही. मी तुझ्यायोग्य मुलगा शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. तुझ्या काही अपेक्षा असतील, तर तसं सांगून ठेव." अक्षराच्या बाबांनी विचारले.


यावर अक्षरा म्हणाली,

"बाबा तुमच्या मनातील यातना मला कळत आहेत. तुम्ही माझ्यासाठी जे योग्य असेल, असंच स्थळ शोधाल, याची खात्री मला आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त बाबा माझं हे शेवटचे वर्ष संपल्यावर लग्नाचा निर्णय घ्या, कारण उगाच माझं अभ्यासावरील लक्ष भरकटेल. बाकी दुसरं काही कारण नाहीये. बाबा मी तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही."


बाबा प्रसादकडे बघून म्हणाले,

"प्रसाद अधूनमधून घरी येत जा. आम्हाला भेटायला नाहीतर लोकांच्या नजरेस पडायला म्हणून,निदान अक्षूचं लग्न होईपर्यंत."


प्रसाद म्हणाला,

"बाबा मी येत जाईन. अक्षूच्या लग्नाची घाई करु नका. तिचं कॉलेज पूर्ण होऊद्यात. तिला नोकरी करायची असेल तर तीपण करुद्या. माझ्या चुकीची शिक्षा तिला देऊ नका."


बाबा काही न बोलता त्यांच्या रुममध्ये निघून गेले. दुसऱ्या दिवशी प्रसाद व अमृता मुंबईसाठी रवाना झाले. अक्षरा पण पुण्याला निघून गेली.


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all