कॉलेज लाईफ भाग ३२

Story Of College Days

कॉलेज लाईफ भाग ३२


मागील भागाचा सारांश: अक्षरा व तिचे आई बाबा प्रसादच्या फ्लॅटवर जातात, त्यावेळी अमृता तिथे नसते. काही वेळानंतर अमृता, निखिल व तिच्या आईला घेऊन फ्लॅटवर येते. आता सगळे एकमेकांसमोर असतात, पण अमृताच्या आईला व प्रसादच्या आई बाबांना हे कोण? असा प्रश्न पडतो. प्रसादच्या आईने त्याला अमृता कोण आहे? हे विचारल्यावर ही तुझी सून आहे. अशी ओळख तो करुन देतो.


आता बघूया पुढे….


"काय?" प्रसादची आई जोरात ओरडते. 


"प्रसाद हे तू काय बोलतो आहेस? ही मुलगी आमची सून कशी काय होऊ शकते? ती आमची सून होण्यासाठी तू पहिले लग्न करायला हवे ना." प्रसादच्या बाबांनी विचारले.


प्रसाद खाली मान घालून म्हणाला,

"बाबा काही महिन्यांपूर्वी मी व अमृताने लग्न केलंय."


"अमृता हे मी काय ऐकत आहे? तू खरंच लग्न केलंस का?" तिच्या आईने विचारले.


अमृता खाली मान घालून म्हणाली,

"हो आई."


"तू हे सांगण्यासाठी आम्हाला इकडे बोलावून घेतलं का?" प्रसादच्या आईने विचारले.


प्रसादने होकारार्थी मान हलवली. 


"अग पण का?" अमृताच्या आईने विचारले.


अमृता म्हणाली,

"आई परिस्थिती अशी निर्माण झाली होती की, आमच्यापुढे दुसरा पर्यायचं उरला नव्हता."


यावर प्रसादची आई चिडून म्हणाली,

"प्रसाद ही गरोदर राहिली होती का?"


"हो." प्रसादने उत्तर दिले.


अमृताच्या आईच्या डोळयात पाणी आले होते. 

"निखिल बाळा मला इथून घेऊन चल. मी इथे दोन सेकंद पण थांबू शकत नाही. बरं झालं, हे सगळं बघायला तुझे बाबा या जगात नाहीत. ज्या मुलीवर इतका विश्वास ठेऊन शिक्षणासाठी इतकं लांब पाठवलं, त्याच मुलीने असा विश्वासघात करावा का?"


"आई प्लिज असं बोलू नकोस ना. माझ्या हातून खूप मोठी चूक घडली, हे मी मान्य करते. तू मला हवं ते बोल, रागावं, चार शिव्या दे. मारायची इच्छा असेल तर मार. पण अशी निघून जाऊ नकोस ना." अमृता पाणावलेल्या डोळ्याने हात जोडून म्हणाली.


"कितवा महिना चालू आहे?" प्रसादच्या आईने विचारले.


"आई अमृताचं मिसकॅरेज झालं." प्रसादने सांगितलं.


प्रसादने घडलेली सर्व कथा सविस्तरपणे सर्वांसमोर मांडली. अक्षरा व निखिलला हे माहीत होतं, याबद्दल त्याने काहीच सांगितलं नाही. प्रसादचं बोलणं संपल्यावर त्याचे बाबा म्हणाले,


"प्रसाद तुला हे सगळं करताना आमचा जराही विचार डोक्यात आला नाही का? आपल्या गावाकडे या सगळ्या गोष्टी चालत नाहीत, याची कल्पना तर होती ना. आपल्या नातेवाईकांना जेव्हा हे कळेल, तेव्हा ते आमच्या दोघांच्या तोंडात शेण घालतील. तुझ्या आईशी तू तासनतास गप्पा मारत रहायचा, तेव्हा तिला ही गोष्ट सांगावी, असं तुला एकदाही वाटलं नाही का?"


यावर प्रसादची आई म्हणाली,

"अहो त्याला जर आपल्याबद्दल काही वाटत असतं, तर त्याने हे पाऊल उचलले असते का? आपला प्रसाद इतका स्वार्थी असेल, असं कधीच वाटलं नव्हतं."


अमृताची आई म्हणाली,

"निखिल आपण निघूयात का? की तुला अजून तुझ्या बहिणीने कसं काळं तोंड केलं, हे ऐकायचं आहे."


इतक्या वेळ सगळं काही ऐकत असलेला निखिल म्हणाला,

"आई तुला जेवढा ताईचा राग आलाय, त्यापेक्षा जास्त मला तिचा राग आला आहे. ताईने खूप मोठी चूक केली आहे. माझ्या नजरेतून ती पूर्णपणे उतरली आहे. ताई तू प्रेमात पडलीस, यात तुझी चूक नसेल, पण त्यानंतर क्रमाक्रमाने ज्या गोष्टी घडत होत्या, तिथे तू चुकतं होतीस. तू फक्त मला दुखावलं असतं, तर त्याचं मला फार वाईट वाटलं नसतं. पण तू माझ्या आईला दुखावलं आहेस, याबद्दल मी तुला कधी माफ करु शकेल की नाही? हे मी आत्ता सांगू शकणार नाही. प्रसाद सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की, हे सगळं जर तुमच्या बहिणीच्या बाबतीत घडलं असतं, तर तुमची काय प्रतिक्रिया असती? इथे फक्त तुम्हालाच माझ्या वेदना कळू शकतील. 

असो आई आपण इथून जाणार आहोत, पण त्याआधी आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आई आपले सगळे नातेवाईक ताईच्या लग्नाबद्दल बोलत आहेत, तिच्यासाठी स्थळं सुचवत आहेत. आपल्याला त्या सगळ्यांना काहीतरी उत्तर द्यावे लागणार आहे."


"अरे पण निखिल आपण त्यांना हिने काय केलं? हे कसं सांगू शकतो?" निखिलच्या आईने विचारले.


अक्षराचे बाबा म्हणाले,

"अमृताच्या आई निखिल म्हणतो ते खरं आहे, त्याच्या बोलण्याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो. ताई खरंतर आपली आज ही अशी भेट व्हायला नको होती, पण नशिबात असल्यावर ते घडतंच. प्रसाद व अमृताला आपण ज्या समाजात राहतो, त्याच्याशी काही देणंघेणं नसलं, तरी आपल्याला आहे. काही गोष्टींची आपल्याला त्यांना उत्तरे द्यावी लागणार आहे. आपल्याला आपलं उर्वरित आयुष्य त्यांच्यासोबतचं काढायचं आहे. 


मी तुमची मनस्थिती समजू शकतो, पण आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. मला वाटतं की, आपण ह्या दोघांचं लग्न लावून देऊयात. निदान समाजात आपल्याला मान वर तरी काढून फिरता येईल. आता हे कसं आणि काय करायचं? याबद्दल मी थोडा विचार करुन कळवतो."


निखिलची आई म्हणाली,

"दादा तुम्ही बरोबर म्हणालात, पण एवढी हिंमत माझ्यात येणार नाही. मला तर हिचं तोंड सुद्धा पुन्हा बघण्याची इच्छा होणार नाही."


यावर अक्षराची आई म्हणाली,

"ताई तुमच्या मनात जे चालू आहे, तेच माझ्या मनात सुद्धा चालू आहे, पण आपल्याला थोडं खंबीर व्हावं लागेल. तुम्हाला तुमच्या मुलासाठी धीराने घ्यावं लागेल. ह्या दोघांच्या कर्माची शिक्षा अक्षरा व निखिलला मिळता कामा नये."


"आई काका बरोबर बोलत आहेत. आपण मिळून प्लॅन करुयात. आपल्याला सर्वांसोबत खोटं बोलावं लागणार आहे, पण त्याला दुसरा काही पर्याय नाहीये." निखिलने सांगितले.


अक्षराचे बाबा म्हणाले,

"अक्षू बाळा गुगल वर इथे जवळपास कुठे चांगलं हॉटेल आहे का? ते शोध बरं."


"बाबा हॉटेल का शोधताय?" प्रसादने विचारले.


"मला ह्या घरात एक रात्रही काढायला जमणार नाही. एकतर रागात मी काहीतरी बोलेल किंवा काहीतरी चुकीचं करुन बसेल. तसंही सर्वांसमोर तुझं लग्न झाल्यावर मला तुझ्यासोबत काहीच संबंध ठेवायचा नाहीये." अक्षराच्या बाबांनी सांगितलं.


प्रसाद डोळयात पाणी आणून म्हणाला,

"बाबा तुम्ही मला रागवा, हवंतर मारा, पण मला स्वतःपासून तोडू नका. मी चूक केलीयं, हे मला मान्य आहे. मी तुम्हाला खूप दुखावलंय हेही कळतंय, पण बाबा आज इथेच रहा ना. बाबा आईला मुंबई फिरायची आहे ना? तर मग चला आपण आसपास फिरुन येऊयात."


यावर आई म्हणाली,

"ज्या मुंबईने माझ्या मुलाची बुद्धी फिरवली, ती मुंबई मला मुळीच बघायची नाहीये. अक्षू तू हॉटेल शोध, आपण आजची रात्र तिथे काढूयात आणि उद्या सकाळी आपल्या घरी जाऊयात."


अक्षराचे बाबा म्हणाले,

"तुला राणीची बाग बघायची आहे ना, ती बघून मगचं घरी जायचं. आजवर या मुलांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, म्हणून आपण आपल्या इच्छांना आवर घालत आलो, पण आता नाही. ज्या मुलासाठी एवढा त्याग केला, त्याने आज काय दिवस दाखवला. आपण केलेले सगळे कष्ट आज मातीमोल झाल्यासारखे वाटत आहेत."


अक्षराने गुगल वर एक हॉटेल शोधले. प्रसादने आई बाबांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत. अक्षरा व तिचे आई बाबा प्रसादच्या घरातून निघून गेले. निखिल व आईला अमृताने बळजबरी तिथेच रहाण्याची विनंती केली. निखिल अमृता व प्रसादसोबत एक शब्द सुद्धा बोलला नाही.


दुसऱ्या दिवशी अक्षराच्या बाबांनी तिच्या आईला जमेल तेवढी मुंबई दाखवली. संध्याकाळी उशिरा ते पुण्यात जाण्यासाठी निघाले. रात्री अक्षराला होस्टेलवर सोडवले, ते दोघे एका हॉटेलवर थांबले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्या घरी निघून गेले.


निखिल व त्याची दुसऱ्या दिवशी सकाळीच ट्रेन पकडून आपल्या घरी निघून गेले. निखिलने पुढील काही दिवस आईसोबतचं रहाण्याचे ठरवले होते. आईची मनस्थिती बघता त्याने हा निर्णय घेतला होता.


©® Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all