Login

कॉलेज लाईफ भाग ३१

Story Of College Days

कॉलेज लाईफ भाग ३१


मागील भागाचा सारांश: निखिलला कोणासोबतच बोलण्याची इच्छा नसल्याचे त्याने अक्षराला स्पष्टपणे सांगितले. प्रसादने त्याच्या आई वडिलांना आणि अमृताने तिच्या आईला मुंबईला येण्यास सांगितले. अक्षराही तिच्या आईबाबांसोबत मुंबईला जाणार असते, तिचे आई बाबा तिला घेण्यासाठी तिच्या होस्टेलवर येतात. अक्षराची आई पुणे पहिल्यांदाच बघत होती. निखिल त्याच्या आईसोबत मुंबईला जाणार असतो. अक्षराची आई व निखिलची आई मुंबई बघण्यासाठी खूपच उत्सुक झालेल्या होत्या.


आता बघूया पुढे….


मुंबईची हद्द सुरु झाल्यावर अक्षराची आई मोठं मोठ्या इमारती न्याहाळत होती. एखादी लहान मुलगी नवीन गोष्ट बघितल्यावर कशी आनंदून जाते, अगदी तसाच अक्षराच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद होता. 


"आपण राणीची बाग बघायला जाऊयात बरं का?" अक्षराची खिडकीतून बाहेर बघत म्हणाली.


यावर अक्षरा म्हणाली,

"आई आता अचानक तुला राणीची बाग का आठवली?"


"अग आमच्या शेजारी एक भाडेकरु रहायचे, त्यांना एक मुलगी होती. ती दर सुट्टीत मामाच्या गावाला मुंबईला यायची, ती घरी परत आली की, कुठे कुठे फिरली ते सांगायची. राणीच्या बागेचं वर्णन तिच्याच तोंडून ऐकलंय. अगदी लहानपणापासूनच राणीची बाग बघण्याची इच्छा आहे." अक्षराच्या आईने उत्तर दिले.


"अक्षू प्रसादने दिलेला पत्ता गुगल मॅपवर टाक ग, म्हणजे पत्ता शोधण्यात आपला वेळ जाणार नाही." अक्षराच्या बाबांनी सांगितलं.


अक्षराने गुगल मॅपवर प्रसादच्या घराचा पत्ता टाकला. 

"आपल्याला प्रसादचा पत्ता शोधणे अवघड जाणार नाही का? मी ऐकलंय की, मुंबईतील रस्ते भुलभुलैया सारखे असतात म्हणून. आपण चुकणार तर नाही ना?"


अक्षरा म्हणाली,

"जोपर्यंत स्मार्टफोन आणि गुगल मॅप नव्हता, त्यावेळी नवीन माणसाला मुंबई फिरणे अवघडच जात असेल. आता गुगल मॅपमुळे हे खूप सोपे झाले आहे. आपण रस्ता जरी चुकलो तरी आपल्याला बरोबर कळतं."


"गुगल मॅप लईचं भारी आहे म्हणायचं." अक्षराची आई आश्चर्याने म्हणाली.


अक्षरा आईसोबत बोलतं तर होती, पण तिचं मन मात्र आईबाबांना खरं कळल्यावर काय होईल? याकडे लागून होतं. पुढील काही वेळातच अक्षरा व तिचे आई बाबा प्रसादच्या बिल्डिंग जवळ पोहोचले. बाबांनी प्रसादला ते खाली आल्याचे सांगितल्यावर प्रसाद त्यांना घेण्यासाठी पार्किंग मध्ये आला. 


"बाबा घर शोधतांना काही त्रास झाला नाही ना?" प्रसादने विचारले.


"गुगल मॅपमुळे सहजासहजी पत्ता सापडला. टेक्नॉलॉजी खरंच खूप पुढे गेली आहे." बाबांनी सांगितले.


यावर आई लगेच म्हणाली,

"हो ना. मला वाटलं होतं की, आम्हाला काही तुझा पत्ता लवकर सापडणार नाही. प्रसाद ही बिल्डिंग किती मजली आहे? आणि तू कितव्या मजल्यावर राहतोस?" 


"आई ही बिल्डिंग एकूण १२ मजल्यांची आहे. मी सातव्या मजल्यावर राहतो. डोन्ट वरी आई बिल्डिंगला लिफ्ट असल्याने पायऱ्या चढण्याचं काहीच टेन्शन नाहीये." प्रसादने उत्तर दिले.


आई म्हणाली,

"बरं प्रसाद, मला सगळी मुंबई फिरायची आहे."


यावर लगेच बाबा म्हणाले,

"अग अशी एक दोन दिवसात मुंबई सगळी थोडीच फिरता येणार आहे का? सुनबाई आली की, काही दिवस इथे येऊन राहत जा, मग हळूहळू सगळी मुंबई फिरुन होईल."


बाबांच्या या बोलण्यावर अक्षरा व प्रसादने एकमेकांकडे बघितले. अक्षराच्या डोळयात प्रसादबद्दल राग दिसून येत होता, तर प्रसादच्या डोळयात टेन्शन दिसून येत होते. प्रसादने आई बाबांच्या बॅग हातात घेतल्या, त्यांना तो लिफ्टजवळ घेऊन गेला. प्रसादने आईला लिफ्ट कशी काम करते? याबद्दल सांगितले. आईसाठी हे सगळंच नवीन असल्याने ती त्याच्याकडे कुतूहलाने बघत होती.


सातवा मजला आल्याबरोबर लिफ्ट थांबली. सगळेजण प्रसादच्या मागोमाग लिफ्टमधून बाहेर पडले. अक्षराला प्रसादचं घर माहीत असताना सुद्धा ती सर्वांत शेवटी होती. घरात जाण्याआधी भीतीने अक्षराच्या पोटात गोळा आला होता. अक्षराला वाटलं होतं की, गेल्याबरोबर अमृता जर आई बाबांना घरात दिसली, त्यांच्या सगळ्या मूडचा बेरंग होईल. घरात गेल्यावर अक्षराला समजले की, अमृता घरात नाहीये. 


आई बाबा, अक्षरा घरात गेल्यावर फ्रेश झाले. प्रसादने सर्वांसाठी चहा बनवला. अमृताचं सर्व सामान त्यांनी लपवून ठेवले होते. प्रसादने बनवलेल्या चहाचे आई बाबांनी भरभरुन कौतुक केले. सातव्या मजल्यावरुन खाली कसं दिसतं? हे आई खिडकीतून न्याहाळत होती. अक्षराच्या आईने फ्लॅट सिस्टीम मधील राहणीमान पहिल्यांदाचं बघितले होते.


सर्व घर बघून झाल्यावर आई म्हणाली,

"प्रसाद घर मस्त ठेवलंय रे. तुला इतकं छान आवरता येतं, हे मला पहिल्यांदाचं समजलं. घराकडे कोणी बघून म्हणणार नाही की, इथे एकटा मुलगा राहतो म्हणून. घरात एखादी बाई राहत असेल, असंच वाटतंय."


यावर प्रसाद म्हणाला,

"आई एवढं कौतुक करु नकोस. घरातील कामं आवरण्यासाठी एक कामवाल्या मावशी येतात. एवढं सगळं स्वच्छ करणे, मला एकट्याला कसं जमेल?"


इकडे आल्यापासून अक्षरा शांत असल्याने बाबा म्हणाले,

"अक्षू बाळा तुला बरं नाहीये का? तू आल्यापासून खूपचं शांत आहेस. दादाच्या घरावर तू काहीच बोलली नाहीस."


अक्षरा चेहऱ्यावर बळजबरी हसू आणून म्हणाली,

"बाबा माझं जरा डोकं दुखतंय, म्हणून मी शांत बसलेय. तसंही आई व दादाच्या गप्पा चालू असताना आपण त्यांच्यामध्ये न बोललेलंच बरं."


इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या. अक्षरा वाट बघत होती की, प्रसाद आई बाबांना खरं कधी सांगेल? म्हणून. प्रसादला आई बाबांना सगळं कसं सांगावं? हेच कळत नव्हतं. 


"प्रसाद दादा जेवण बाहेरुन ऑर्डर करणार आहेस की, स्वयंपाक बनवायला पण शिकलास." अक्षराने विचारले.


प्रसादला अक्षराचा टोमणा समजला होता. आई बाबांनी जेवण केल्यावरचं त्यांना खरं सगळं सांगावं, हा विचार प्रसादच्याही मनात आला होता.


"तेवढं नाही जमतं आपल्याला. मी बाहेरुन जेवण मागवलं आहे, एक पाच ते दहा मिनिटांत येईलचं." प्रसादने उत्तर दिले.


पुढील काही वेळातच ऑर्डर केलेलं जेवण आलं. सगळ्यांनी मिळून जेवण केलं. जेवण करताना आई म्हणाली,

"प्रसाद मला किराणा आणि भाजीपाला आणून दे. रात्रीचा स्वयंपाक मीच करते. या बाहेरच्या जेवणाला घरच्या जेवणाची सर थोडीच येणार आहे."


प्रसाद म्हणाला,

"आई घरी असताना पण तू किचनमध्ये काम करत असते. निदान माझ्याकडे आल्यावर आराम करत जा."


"आता लवकरात लवकर सूनबाई घेऊन येऊ, म्हणजे मला निवांत आराम करता येईल." आईने सांगितले.


आईच्या या बोलण्यावर काय बोलावे? हे काही प्रसादला सुचले नाही. जेवण झाल्यावर प्रसाद, अक्षरा व आईने मिळून सर्व पसारा आवरुन ठेवला. 


"प्रसाद आम्हाला असं अचानक का बोलावून घेतलंस? आजवर कधी बोलावलं नाहीस." बाबांनी प्रसादला विचारले.


तेवढ्यात दारावरची बेल वाजली. प्रसाद दरवाजा उघडण्यासाठी उठला आणि सर्वांचं लक्ष तिकडे गेलं. दरवाजात अमृता, निखिल व त्यांची आई उभी होती, त्यांना आलेलं बघून प्रसादला भीतीने घाम फुटला होता. प्रसाद दरवाजातून बाजूला होत त्यांना आत येण्यास जागा दिली.


"अमृता हा मुलगा कोण आहे? अमृताच्या आईने आत येत विचारले.


अक्षरा व तिच्या आई बाबांना समोर पाहून अमृताची आई अजून संभ्रमात पडली. अमृता, निखिल व त्यांच्या आईला बघून अक्षराच्या आई बाबांना 'हे कोण?' हा प्रश्न पडला. अमृता एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली,


"आई, निखिल तुम्ही बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते."


अमृता किचनमध्ये जाऊन निखिल व आईसाठी पाणी घेऊन येते. अमृता तिचं घर असल्यासारखी वावरतेय, हे समजायला अक्षराच्या आई बाबांना थोडाही वेळ लागला नाही. 


"अमृता तू तर मुलींसोबत राहतेस ना? मग हा मुलगा आणि हे लोकं कोण आहेत? मला तर काही समजतचं नाहीये." अमृताच्या आईने विचारले.


यावर लगेच अक्षराची आई प्रसादकडे बघून म्हणाली,

"प्रसाद ही मुलगी तिचं घर असल्याप्रमाणे घरात वावरते आहे. नेमका हा सगळा काय प्रकार आहे?"


प्रसादने एक दीर्घ श्वास घेतला, तो खाली मान घालून म्हणाला,

"आई ही तुझी सून आहे."


प्रसादच्या आई वडिलांची व अमृताच्या आईची यावर काय प्रतिक्रिया असेल? हे बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all