कॉलेज लाईफ भाग ३०
मागील भागाचा सारांश: प्रसादने त्याची व अमृताची इतमभूत कथा निखिल व अक्षरा समोर मांडली. अक्षरा व निखिलने त्या दोघांना स्पष्टपणे सांगितले की, आता घरच्यांपासून काहीही लपवू नका सगळं त्यांना खरं सांगून टाका. निखिल अमृता सोबत रागाने बोलून निघून गेला.
आता बघूया पुढे….
बस मधून उतरल्यावर अक्षराने निखिल सोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण निखिल तिच्या सोबत फारसं बोलायला तयार नव्हता. अक्षराने त्याला थोड्यावेळ एकटा राहू देण्याचा विचार केला. रुममध्ये गेल्यावर अक्षराने किर्ती व प्रियाला सविस्तर घटना सांगितली. अक्षराला आरामाची गरज असल्याने तिने निखिलला फोन करुन त्याची चौकशी केली नाही.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे अक्षरा किर्ती व प्रियासोबत कॉलेजला गेली. निखिल रोहितसोबत वर्गात बसलेला होता. अक्षराने निखिलकडे बघून स्माईल दिली, पण निखिलने अक्षराकडे बघून न बघितल्यासारखे केले. निखिलच्या मनात नेमकं काय चालू आहे? याचा अंदाज अक्षराला येत नव्हता. लेक्चर संपल्यावर निखिल लायब्ररीच्या दिशेने चालला होता. अक्षराने त्याच्या पाठीमागून जाऊन त्याला आवाज दिला. अक्षराने आवाज दिल्यामुळे निखिल जागच्या जागी थांबला. अक्षरा त्याच्याजवळ जाऊन म्हणाली,
"निखिल काय झालंय? तू इतका शांत का आहेस? काल तू बसमध्ये पण शांतच होता. तू मला इग्नोर का करतो आहेस?"
निखिल म्हणाला,
"अक्षरा मी तुला इग्नोर करत नाहीये. अक्षरा मला कोणासोबतच बोलण्याची इच्छा होत नाहीये. काल बसमध्ये म्हणशील,तर माझ्या डोक्यात एकाच वेळी अनेक गोष्टी सुरु होत्या. आता सुद्धा मी कोणाशीच बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. माझ्या मनातील गोष्टी मला सॉर्ट करायच्या आहेत. काही दिवस प्लिज माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करु नकोस. मला जेव्हा वाटेल, जेव्हा माझी इच्छा होईल, तेव्हा मी स्वतःहून तुझ्याशी बोलायला येईल."
एवढं बोलून निखिल तेथून निघून गेला. अक्षरा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभी होती. किर्ती तिच्या पाठीमागून येऊन म्हणाली,
"अक्षू रुमवर चल ना. मला तुला काहीतरी सांगायचं आहे."
अक्षराच्या उत्तराची वाट न बघता किर्ती तिचा हात धरुन तिला होस्टेलच्या दिशेने घेऊन गेली. अक्षरा किर्ती सोबत जात होती, पण तिच्या मनात निखिलचेच विचार चालू होते. रुममध्ये गेल्यावर किर्ती म्हणाली,
"बरं अक्षू ऐक ना. त्यादिवशी आदित्यने मला त्यांच्या पार्टीचे फोटो पाठवले होते. मी त्याबद्दल तुझ्याशी बोलले होते. काल त्याचा फोन आला होता.मी बोलता बोलता त्याला त्या मुलीबद्दल विचारले, तेव्हा त्याने ती त्याची मैत्रिण असल्याचे सहज सांगून टाकले. पण काही वेळानंतर त्याने मॅसेज केला की, 'तू फोटो मधील बाकी कोणाबद्दल एवढं कुतूहलाने विचारलं नाहीस, मग तिचीच एवढी चौकशी का केलीस? तू जेलस तर होत नाहीये ना.'
मी 'नाही' असा रिप्लाय केला. पण अक्षू त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू असेल. मी तिच्याबद्दल त्याला विचारुन काही चुकी केली का?"
अक्षरा म्हणाली,
"पियू कोणाच्या डोक्यात काय चालू आहे? हे आपण सांगू शकत नाही. तुला विचारावं वाटलं, तू त्याला विचारलं. आता त्याने यावर काय विचार करावा? हे आपण सांगू शकत नाही. तू त्याचा एवढा विचार करत बसू नकोस."
किर्ती अक्षराकडे बघून म्हणाली,
"अक्षू पण तू एवढी उदास का आहेस."
अक्षरा म्हणाली,
"निखिलला जेव्हा बोलण्याची इच्छा होईल, तेव्हा तो माझ्याशी बोलणार आहे. तोपर्यंत त्याच्याशी बोलायला जायचं नाही, असं त्याने स्पष्ट सांगितलं आहे. माझ्या भावाने आणि त्याच्या बहिणीने जो घोळ घालून ठेवला आहे, त्याचा त्रास जेवढा त्याला होत आहे, तेवढाच त्रास मलाही होत आहे. पण मी त्याचा एवढा बाऊ करत नाहीये."
किर्ती म्हणाली,
"अक्षू तू त्याच्याशी बोलायला गेली होतीस, पण त्याची बोलण्याची इच्छा नाहीये ना, तर राहुदेत. जे काही घडलं आहे, ते त्याला झेपत नसेल. एकाच प्रॉब्लेमला फेस करण्याची ज्याची त्याची पद्धत असते."
अक्षरा म्हणाली,
"निखिलचा आजचा बोलण्याचा सूर वेगळाच होता. जाऊदेत मी त्याचा विचार का करते आहे? पण कितू त्याच्या डोक्यात खूप वेगळं काहीतरी शिजत आहे हे नक्की."
तेवढ्यात प्रिया रुममध्ये आली आणि या दोघींचं बोलणं अर्धवट राहिलं. अक्षरा त्या दिवसापासून निखिलकडे दुर्लक्ष करु लागली. निखिलकडे बघायचंच नाही असं अक्षराने ठरवून टाकलं होतं.
पुढील चार पाच दिवसांनी अक्षराला तिच्या आईने फोन करुन सांगितले की, "प्रसाद दादाने आपल्याला सर्वांना येत्या शनिवार रविवारी मुंबईला बोलावले आहे. आम्ही तुला घ्यायला येऊ. आपण तिघे मिळून मुंबईला जाऊयात, तेवढीच आपली फॅमिली ट्रिप पण होईल."
आईचं बोलणं ऐकल्यावर अक्षरा मनातल्या मनात म्हणाली,
"बिचारी आई, फॅमिली ट्रिपचा विचार करत आहे. आईला कल्पना पण नाहीये की, पुढे काय वाढून ठेवलं आहे?"
दुसरीकडे निखिलला त्याच्या आईने फोन करुन सांगितले की,"अमृताने आपल्या दोघांना मुंबईला बोलावले आहे. मी पुणे स्टेशनला येते. तेथून आपण दोघे मिळून मुंबईला जाऊयात. मी कधीच मुंबई बघितली नाहीये. यावेळी मुंबई दर्शन करण्याचा विचार आहे."
आईचं बोलणं ऐकल्यावर निखिल स्वतःशीच पुटपुटला,
"आईला काय माहीत, तिला कसलं दर्शन होणार आहे ते. आईला पुन्हा मुंबईत पाऊल ठेवण्याची इच्छा सुद्धा होणार नाही."
निखिलने अक्षराला मुंबईला जाणार असल्याचे मॅसेज करुन कळवले. मग अक्षराने पण निखिलला आईचा फोन येऊन गेल्याचे सांगितले.
शनिवारी सकाळी अक्षराचे आई बाबा तिला घेण्यासाठी होस्टेलला आले. अक्षराची आई पहिल्यांदा तिच्या होस्टेलवर आली होती. अक्षराने आईला संपूर्ण होस्टेल व कॉलेज दाखवले. अक्षराने किर्ती व प्रियाची ओळख आईसोबत करुन दिली. होस्टेलवर थोड्यावेळ थांबून अक्षरा व तिचे आई बाबा मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
"बाबा आज आपल्या ड्रायव्हर काकांना सोबत का आणलं नाही? तुम्हाला एवढ्या लांब ड्रायव्हिंग करुन थकवा जाणवेल." अक्षराने विचारले.
यावर बाबा म्हणाले,
"अग तुझ्या आईला मुंबई फिरण्याची इच्छा आहे. ड्रायव्हर काकांना सोबत आणलं असतं, तर जास्त दिवस थांबता आलं नसतं, शिवाय आपल्या फॅमिली ट्रिपमध्ये बाहेरची व्यक्ती नको. अक्षू तुला माहीत नसेल, पण एवढ्या लांब आजपर्यंत मी तुझ्या आईला कधीच घेऊन आलो नव्हतो. तुझ्या आईने पुणे पहिल्यांदा बघितलं आणि मुंबई सुद्धा पहिल्यांदा बघणार आहे. तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून माझा थकवा कुठल्या कुठे पळून जाईल."
अक्षराची आई म्हणाली,
"अक्षू अग घरातील कामांमुळे मला कुठे बाहेर फिरताच आलं नाही. जास्तीत जास्त मी नाशिक जिल्ह्यात फिरली असेल. आपले सगळे नातेवाईक पण तिकडेच असल्याने पुण्याला आणि मुंबईला येण्याची कधी वेळच आली नाही. या रस्त्याला लोणावळा पण लागतो ना? मला लोणावळा बघण्याची खूप इच्छा आहे. आपण तिथे जाऊयात का?"
अक्षराचे बाबा म्हणाले,
"आता लगेच नको.येताना वेळ मिळाल्यावर जाऊ. प्रसाद आपली वाट बघत असेल."
आपल्या आई बाबांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून अक्षराच्या डोळयात पाणी येत होते. अक्षरा स्वतःला कशीबशी कंट्रोल करत होती. अक्षराला प्रश्न पडला होता की, ड्रायव्हर काका सोबत नसताना परतीच्या मार्गावर बाबांना गाडी चालवण्याची हिंमत असेल का?
पुणे-मुंबई एक्स्प्रेस रस्त्याच्या अक्षराची आई आनंद घेत होती. रस्त्यात येणाऱ्या बोगदे बघून तर तिच्या आईला खूप आनंद झाला होता. अक्षराला तिच्या आईच्या चेहऱ्यावरील भाव बघून राहून राहून भरुन येत होतं.
दुसरीकडे निखिलची आई पुणे स्टेशनला आली होती.आई पोहोचण्याआधी निखिल स्टेशनवर जाऊन तिची वाट बघत होता. आई आल्यावर निखिल आईला जवळच्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेला. आईला पोटभरुन खायला घातलं. निखिलला खात्री होती की, मुंबईला पोहोचल्यावर जेव्हा आईला सगळं खरं कळेल,तेव्हा तिच्या घशाखाली घास सुद्धा उतरणार नाही.
आई व निखिल मुंबईच्या ट्रेनमध्ये बसले. आई प्रवासाचा आनंद घेत आहे, हे बघून निखिलच्या चेहऱ्यावर समाधानही होते आणि हे हसू काही वेळातच नाहीसे होईल, हा विचार करुन वाईट सुद्धा वाटत होते.
अमृता व प्रसादच्या लग्नाची कथा अमृताच्या आईला व प्रसादच्या आई बाबांना कळल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया असेल, हे बघूया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe