Jan 29, 2022
कथामालिका

कॉलेज लाईफ भाग २

Read Later
कॉलेज लाईफ भाग २

कॉलेज लाईफ भाग २


मागील भागाचा सारांश: अक्षरा पुढील शिक्षणासाठी आपल्या गावावरुन पुण्यात आली, तिला तिच्या वडिलांनी होस्टेलला आणून सोडले.


आता बघूया पुढे…

अक्षराचे बाबा निघून गेल्यावर ती पाणावलेल्या डोळ्यांनी रुममध्ये आपल्या बेडवर जाऊन बसली. अक्षराची एक रुममेट तिच्याजवळ येऊन म्हणाली,

"हाय मी प्रिया, तु कुठली आहेस?"

अक्षरा तिच्याकडे बघून म्हणाली,

"मी अक्षरा कदम, माझ्या गावाचं नाव चिंचखेड आहे, ते नाशिक जिल्ह्यात येतं. तु कुठली आहेस?"

"मी सोलापूरची आहे" प्रियाने उत्तर दिले.

अक्षरा म्हणाली,

"तुला इथे येऊन किती वेळ झाला?"

प्रिया म्हणाली,

"माझे आई बाबा दुपारीचं मला सोडून गेलेत, थोडया वेळ काही वाटलं नाही पण आता खूप बोअर होत होतं ग."

अक्षरा म्हणाली,

"हो ना, बाबा निघून गेल्यावर मला सुद्धा जरा वेगळंच वाटतं आहे. मी घरापासून पहिल्यांदा एवढ्या लांब आले आहे."

प्रिया काही बोलणार इतक्यात त्यांची तिसरी रुममेट म्हणाली,

"अग मुलींनो आज तुम्हाला बोअर होत आहे पण काही दिवसांनी या सर्व वातावरणाची सवय झाल्यावर काहीच वाटणार नाही. एनिवेज मी किर्ती, माझं गाव औरंगाबाद जिल्ह्यात आहे."

"किर्ती पण तु इतकी बिनधास्त कशी राहू शकते? म्हणजे मी आल्यापासून बघत आहे की तुझ्या चेहऱ्यावर घरापासून लांब आल्याचं अजिबात दुःख दिसत नाहीये." प्रियाने विचारले

किर्ती हसून म्हणाली,

"डिटेल मध्ये माझी स्टोरी नंतर सांगेल, आता एवढंच सांगेल की मी लहानपणापासून होस्टेलला राहूनच शिकत आले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या घरचे इथपर्यंत सोडवायला तरी आले. मी तर एकटीच आले आहे."

किर्तीचं बोलणं ऐकून अक्षरा व प्रियाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले होते. अक्षरा पुढे काही बोलणार इतक्यात तिला तिच्या आईचा फोन आल्याने ती फोनवर बोलण्यासाठी रुमच्या बाहेर निघून गेली. आई सोबत बोलून झाल्यावर अक्षरा रुममध्ये आली तर किर्ती रुममध्ये नव्हती म्हणून ती प्रियाला म्हणाली,

"किर्ती कुठे गेली?"

"माहीत नाही, जाताना काही बोलून गेली नाही." प्रियाने उत्तर दिले

अक्षरा आपल्या बॅगमधील सामान कपाटात रचत होती. प्रिया अक्षरा सोबत गप्पा मारता मारता तिला मदत करत होती. काही वेळाने किर्ती रुममध्ये आली तेव्हा तिच्या हातात काहीतरी होते.

किर्ती म्हणाली,

"तुम्हाला भूक लागली असेल ना, मी गरमागरम वडापाव आणले आहेत, चला खाऊन घेऊयात."

प्रिया व अक्षरा आश्चर्याने तिच्याकडे बघत होत्या, त्यांची प्रतिक्रिया बघून किर्ती म्हणाली,

"मला भूक लागली होती म्हणून मी कॅन्टीन मध्ये गेले होते तिथे गरमागरम वडापाव होते तर मी विचार केला की तुमच्यासाठी पण घेऊन येऊयात. रात्रीच्या जेवणाला अजून बराच उशीर आहे सो आता वडापाव खाऊन घ्या आणि हे माझ्याकडून नाहीये, तुम्ही मला याचे पैसे देऊन टाका."

अक्षरा व प्रियाने हातातील काम बाजूला ठेवले व त्यांनी वडापाव खायला सुरुवात केली. वडापाव खाताना अक्षरा म्हणाली,

" कॅन्टीनचा वडापाव तर मस्त आहे."

किर्ती म्हणाली,

" काही दिवसांनी तुला हाच वडापाव खाऊन बोअर होईल."

प्रिया म्हणाली,

"का?"

किर्ती म्हणाली,

"तुला तुझ्या ह्या 'का' चे उत्तर काही दिवसांनी आपोआप मिळेल."

वडापाव खाऊन झाल्यावर किर्ती म्हणाली,

"मी जरा खाली फेरफटका मारुन येते, मला रुममध्ये बसवत नाही."

किर्ती निघून गेल्यावर प्रिया म्हणाली, 

"अक्षरा ही कशी आहे? मला हिच्या बोलण्याचा अर्थच कळत नाही."

अक्षरा म्हणाली, 

"सगळे आपल्या सारखे नसतात ना. किर्तीच्या हसऱ्या चेहऱ्यामागे नक्कीच काही तरी स्टोरी असेल."

यावर प्रिया म्हणाली,

"मलाही असंच वाटत आहे."

रात्री मेसचं जेवण करताना अक्षराला आईच्या हातच्या जेवणाची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. मेसच्या जेवणाने अक्षराचं पोट काही भरलं नसल्याने रुमवर परत आल्यावर आईने दिलेला लाडू तिने खाल्ला तेव्हा आईने लाडू दिल्याचे महत्व तिला समजले. रात्री झोपताना अक्षराने आठवणीने मोबाईलवर सकाळी लवकर उठण्यासाठी बेल लावली होती.

"अक्षरा उठ, आज पहिल्याच दिवशी कॉलेजला दांडी मारायचा विचार आहे का?" 

प्रियाच्या या बोलण्याने अक्षराला जाग आली.

अक्षरा झोपेतून खडबडून जागी होत म्हणाली,

"मी रात्री बेल लावली होती मग वाजली का नाही? शिट यार मला तर उठायला खूपच उशीर झाला."

किर्ती म्हणाली,

"बेल वाजली होती पण तु झोपेतच बंद केलीस. इतकाही उशीर झाला नाहीये. ब्रश करुन तोंडाला पाणी मारुन ये आणि कपडे घाल. आपण चहा पिऊन कॉलेजला जाऊयात. तुझ्याकडे हे सगळं करायला पंधरा मिनिटे आहेत."

अक्षरा म्हणाली,

"आणि अंघोळ, बिना अंघोळीचं कॉलेजला कसं जायचं?"

किर्ती म्हणाली,

"अक्षरा वेलकम टू होस्टेल लाईफ. कॉलेज वरुन परत आल्यावर अंघोळ कर. आता गरम पाणी असलं तरी तुझा अंघोळीला नंबर लागणार नाही. मी सकाळी लवकर उठून सुद्धा अंघोळ केली नाहीये सो एवढं वाईट वाटून घेऊ नकोस."

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी आपण अंघोळ न करता जात आहोत याचं अक्षराला खूप वाईट वाटतं होतं. अक्षरा, प्रिया व किर्ती कॅन्टीन जाऊन चहा प्यायल्या आणि कॉलेजला गेल्या. लेक्चर हॉलमध्ये गेल्यावर मोठा लेक्चर हॉल बघून अक्षराला खूप छान वाटलं. एका साईडला मुलं बसलेले होते तर दुसऱ्या साईडला मुली बसलेल्या होत्या. एक बेंच बघून ह्या तिघीजणी जाऊन बसल्या.

अक्षरा म्हणाली,

"शाळेत असताना मी नेहमी पुढच्या बेंचवर बसायचे, हे असं मागे बसायला वेगळंच वाटत आहे."

अक्षराच्या बोलण्याला दुजोरा देत प्रिया म्हणाली,

"हो ना, मी सुद्धा पहिल्याच बेंचवर बसत होते."

किर्ती म्हणाली,

" मुलींनो आपण आता कॉलेजमध्ये आहोत इथे मागे बसण्यासाठी सर्वांची धावपळ सुरु असते."

थोड्याच वेळात सर वर्गात आले तेव्हा सर्व विद्यार्थी उभे राहिले हे बघून सरांना हसायला आले, त्यांनी सर्वांना बसायला सांगितले, ते पुढे म्हणाले,

"आज तुमचा पहिला दिवस आहे म्हणून तुम्ही मला एवढा आदर देत आहात. कॉलेजची हवा लागल्यावर रस्त्याने जाताना तुम्ही माझ्याकडे बघणार सुद्धा नाहीत. एनिवेज सगळ्यांनी आपापली ओळख करुन द्या."

वर्गातील एकेक विद्यार्थ्याने आपापली ओळख करुन द्यायला सुरुवात केली तेव्हा अक्षरा व प्रियाला समजले की किर्तीला बारावीत सर्वांत जास्त मार्क्स होते आणि तिचं शिक्षण नवोदय विद्यालयात झालेले होते. किर्तीचे मार्क्स ऐकून अक्षरा व प्रियाला धक्काच बसला होता. किर्तीच्या बोलण्यावरुन, वागण्यावरुन ती एवढी हुशार असेल असं अक्षरा व प्रियाला वाटलं नव्हतं. 

कॉलेजचा पहिलाच दिवस असल्याने फक्त दोन लेक्चर होते. लेक्चर संपल्यावर अक्षरा, प्रिया व किर्ती पूर्ण कॉलेज फिरल्या. संपूर्ण कॉलेजची पाहणी केल्यावर होस्टेलच्या दिशेने अक्षरा व प्रिया निघाल्या असताना किर्ती म्हणाली,

"तुम्ही दोघी होस्टेलला जा, माझं लायब्ररीत थोडं काम आहे, मी ते करुन येते."

अक्षरा व प्रिया होस्टेलकडे निघून गेल्या. रुमवर गेल्याबरोबर अक्षराने पहिले अंघोळ केली, अंघोळीसाठी पाणी एवढं गरम नव्हतं पण त्यावेळी अक्षरासाठी अंघोळ करणं महत्त्वाचं होतं. अक्षरा अंघोळ करुन आल्यावर ती व प्रिया जेवण करण्यासाठी मेसमध्ये गेल्या. भूक लागली असल्याने समोर जे जेवण होतं ते गुपचूप करुन घेतलं.

 मेसमध्ये फर्स्ट इयरमध्ये असणाऱ्या इतर मुलींसोबत अक्षरा व प्रियाची ओळख झाली. थोड्यावेळ जुजबी गप्पा मारुन प्रिया व अक्षरा रुममध्ये परत आल्या.

किर्ती अजूनही आलेली नाही हे बघून प्रिया म्हणाली,

" अक्षरा किर्ती पहिल्याच दिवसापासून अभ्यासाला लागलेली दिसत आहे."

अक्षरा म्हणाली,

"मला तर किर्तीचं काही कळतंच नाहीये, आज आपल्याला काहीच शिकवलं नाहीये मग ती अभ्यासाला कशी काय लागेल?"

प्रिया म्हणाली,

"काय माहीत? ती आल्यावर आपण तिलाच विचारु."

ह्या दोघींच्या गप्पा चालू असतानाच किर्ती रुममध्ये येऊन म्हणाली,

"तुमच्या दोघींचं जेवण झालं का?"

"हो आमचं जेवण झालं, अक्षराची अंघोळ झाली. तुझ्या जेवणाचं काय?" प्रियाने विचारले

किर्ती म्हणाली,

"मी येतानाचं जेवण करुन आले. अक्षरा तुला अक्षू म्हटलं तर चालेल का? मला कितू म्हणत जा. दरवेळी पूर्ण नाव घ्यायला खूप वेळ लागतो."

अक्षरा म्हणाली,

"मला माझ्या घरी सर्वजण अक्षूचं म्हणतात. प्रियाला आपण पियू म्हणत जाऊयात."

प्रिया म्हणाली,

"ते सगळं ठीक आहे पण कितू तुझं लायब्ररीत काय काम होतं? तु पहिल्याच दिवशी अभ्यास सुरु केलास का?"

किर्ती म्हणाली,

"पहिल्याच दिवशी अभ्यास सुरु करायला मी इतकी अभ्यासू मुलगी नाहीये ग. कमवा व शिका ही योजना असते ना, त्याची चौकशी करण्यासाठी मी लायब्ररीत गेले होते. ऍप्लिकेशन वर प्रिन्सिपल सरांची सही घ्यायची राहिली आहे, ते आधी मिटिंग मध्ये होते आणि नंतर जेवणाची सुट्टी झाली. मी कॉलेजमध्ये जाऊन सही घेऊन येते."

अक्षरा व प्रियाच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह बघून किर्ती रुममधून बाहेर पडता पडता म्हणाली,

"मी ह्या योजनेचा फॉर्म का भरला आहे? याचं सविस्तर उत्तर आल्यावर देते."

किर्तीने कमवा व शिका या योजनेत सहभागी होण्याचे का ठरवले असेल? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now