Login

कॉलेज लाईफ भाग २९

Story Of College Days

कॉलेज लाईफ भाग २९


मागील भागाचा सारांश: प्रसाद व अमृताची चूक लक्षात आणून देण्यासाठी अक्षरा व निखिलने दोघांनी लग्न केल्याचे खोटे कारण सांगितले. निखिल व अक्षराचे लग्न झाले, हे समजल्यावर प्रसाद व अमृता दोघेही खूप चिडले होते. मग निखिलने हळुवार त्या दोघांनी हिच चूक केली आहे, हे लक्षात आणून दिले.


आता बघूया पुढे….


अक्षराच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं? हे प्रसादला समजत नव्हते. पण अक्षराला उत्तर तर द्यावेच लागणार होते.


प्रसाद म्हणाला,

"अक्षू तू अजून प्रेमात पडली नाहीयेस, म्हणून तुला हे जाणवणार नाही. तू मला समजून घेशील अशी मी आशा करतो. 


अमृता व माझी पहिली भेट कॉलेजमध्येच झाली. पाहताक्षणी प्रेम होणं काय असतं? याचा अंदाज मला त्यावेळी आला. अमृतासोबत मैत्री करण्यासाठी मी धडपड करत होतो. मित्रांच्या मदतीने ते सहज शक्य झाले. अमृता डॅशिंग असल्याने ती माझ्यासोबत बोलायला कधीच घाबरली नाही. 


आमचं फर्स्ट इअर मैत्रीतचं गेलं. सेकंड इअर पासून आमच्यातील मैत्री अजून घट्ट झाली. अमृताही माझ्या प्रेमात पडू लागली, हा अंदाज हळुवार येत होता. सेकंड इअरच्या प्रपोज डे ला मी अमृताला प्रपोज केलं. अमृताने हसत होकार दिला. आमच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. त्यानंतर आम्ही दोघे सतत सोबतच असायचो. पूर्ण कॉलेजमध्ये आम्ही कपल म्हणून फेमस झालो होतो.


कॉलेजला सुट्टी असल्यावर आम्ही दोघे मूव्ही बघायला जायचो, मुंबईतील एकेक पर्यटन स्थळांना भेटी द्यायचो. समुद्र किनाऱ्यावर फिरायला जायचो. आमच्या सोबत आमची गँग कधी असायची तर कधी आम्ही दोघेच जायचो. आम्हाला एकमेकांचा सहवास आवडू लागला होता. आम्ही प्रेमात होतो, पण आम्ही आमच्या अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव होती.


अमृताला मुंबईची नाईट लाईफ बघण्याची इच्छा असल्याने आम्ही पहिल्यांदा पबमध्ये गेलो होतो, त्याचवेळी पहिल्यांदा मी ड्रिंक्स केलं होतं. पबजवळ माझ्या एका मित्राचा फ्लॅट होता, उशीर झाल्याने आम्ही सगळे त्याच्या फ्लॅटवर गेलो होतो. तू नेमका तेव्हाच मला फोन केला होतास आणि तो फोन अमृताने उचलला होता. पबमध्ये जाऊन डान्स करणं आम्हाला दोघांना आवडू लागलं होतं. अमृताही थोडंफार ड्रिंक करु लागली होती.


आम्ही दोघे आमचं आयुष्य एन्जॉय करत होतो. आम्ही दोघे सोबत असताना आम्हाला कोणाचीच कमी जाणवत नव्हती. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो. फायनल इअरला आमच्या दोघांचं कॅम्पस सिलेक्शन झाल्यामुळे आम्ही तर कुठेच मावत नव्हतो. आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की, नोकरी जॉईन केली की,आपापल्या घरी सांगायचं आणि त्यांच्या संमतीने लग्न करायचं.


फायनल एक्साम झाल्यावर आमच्या मित्रांनी अलिबागला जाऊन सेलिब्रेट करण्याचे ठरवले, पण नेमकं त्याच वेळी अमृताच्या घरुन फोन आल्याने ती लगेच घरी निघून गेली. अमृता नसल्याने मीही अलिबागला गेलो नाही. सुट्टीत आम्ही घरी असलो तरी एकमेकांच्या संपर्कात होतोच. 


रिझल्ट लागल्यावर आमच्या दोघांचं ट्रेनिंग सुरु झालं. आमच्या दोघांच्या कंपन्या लांब असल्याने आम्ही दोघे वेगवेगळ्या एरियात रहायला होतो. आम्हाला दोघांनाही विकेंडला सुट्टी असल्याने आम्ही विकेंड एकत्र घालवण्याचे ठरवले. पहिल्याच विकेंडला आम्ही अलिबागला जाण्याचे ठरवले. आम्ही दोघेच गेलो होतो, त्यामुळे आम्ही शरीराने पहिल्यांदा एकत्र आलो होतो. तो क्षण असा असतो की, आपण कितीही म्हटलं, तरी स्वतःला थांबवू शकत नाही. आम्ही दोघांनी त्या क्षणाचा आनंद घेतला.


दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे चुकीचं तर केलं नाही ना, असं मनात येऊ लागलं होतं, पण त्यावेळी एकमेकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मन प्रसन्न झालं. आता जेव्हा घरी जाऊ, तेव्हा घरच्यांना आपल्याबद्दल कल्पना द्यायची हे ठरलं होतं. आम्ही दोघेही विकेंडची वाट आतुरतेने बघू लागलो होतो. दर विकेंडला आम्ही कुठेतरी भेटायचो. विकेंड एकत्र घातल्याशिवाय आठवडाभर चैन मिळायची नाही. एकदा आम्ही दोघेही प्रोटेक्शन घ्यायला विसरलो आणि जे व्हायला नव्हतं पाहिजे, तेच झालं. अमृताला प्रेग्नन्सी राहिली. आम्ही त्यावेळी जाम घाबरलो होतो. 


लग्न करण्यासोडून त्यावेळी कोणताच पर्याय नव्हता. घरी जरी सांगितलं असतं, तरी घरच्यांच्या त्यावेळी प्रतिक्रिया काय असतील? याची कल्पना नव्हती. लग्न केलं तर अमृताचं टेन्शन कमी होईल, हा विचार मी केला होता. आम्ही दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं. लग्न केल्यानंतर आम्ही या फ्लॅटमध्ये रहायला आलो. इथून आमच्या दोघांच्या कंपन्या जवळ आहेत. दोघांनाही सारखाच वेळ लागतो.


लग्न केल्यापासून आम्ही दोघेही मनातून अपराधी होतो. आपण आपल्या घरच्यांना न सांगता लग्न केलंय, हे पचतच नव्हते. अमृताने तर या गोष्टीचा अतिताण घेतला होता. अतिस्ट्रेस घेतल्याने पुढील पंधरा दिवसांत अमृताचे miscarriage झाले. आम्हाला दोघांनाही मोठा मानसिक धक्का बसला होता. अमृताला सावरण्याचे काम मला करावे लागले.


मी घरी आलो होतो, तेव्हा मी डिस्टर्ब असल्याचे तुला बरोबर जाणवले होते. तू रुममध्ये आली होती, तेव्हा अमृताचा मला फोन आला होता, म्हणूनच मी तुला रुमबाहेर जायला सांगितले होते. 


आमच्या हातून मोठी चूक झाली आहे, हे आम्हाला दोघांनाही मान्य आहे, पण ही चूक सुधारायची कशी? हेच कळत नाहीये. मी आई बाबांना कुठल्या तोंडाने हे सर्व खरं सांगू."


प्रसादचं सर्व बोलणं ऐकल्यावर अक्षरा म्हणाली,

"दादा कमीत कमी तू एक चांगल्या जोडीदाराची भूमिका तरी चांगली निभावलीस. तू मुलाचं कर्तव्य विसरलास, पण जिच्यावर तू प्रेम केलंस, तिला अर्धवट वाटेत सोडलं नाहीस, याबद्दल मला तुझा अभिमान वाटतो.


दादा मला जे सांगितलं, ते सर्व घरी जाऊन अतिशय शांततेने आई बाबांना सांगायचं. आई बाबा जे काही रिऍक्ट होतील, ते सगळं काही सहन करायचं. दादा चूक तर तू केली आहेसच, पण त्याची शिक्षा सुद्धा तुला भोगावी लागणार आहे."


निखिल म्हणाला,

"मला अक्षराचं म्हणणं पटतंय. ताई तू पण घरी जाऊन आईला सर्व खरं सांग. आईचा त्रागा तुला सहन करावाच लागेल. ताई स्वतःवर तुम्हाला थोडासा सुद्धा ताबा राहिला नाही. प्रेम करणं हा गुन्हा नाहीये, पण त्यात वाहवत जाणं चुकीचं आहे. ताई ह्या सगळ्या गोष्टींचा आईला किती त्रास होईल? सगळे नातेवाईक आईला टोमणे मारतील. असो मला यापुढे काहीच बोलायचे नाहीये. 


तू जे काही बिघडवून ठेवलं आहे, ते तूच निस्तर. मी यात तुझी काहीच मदत करणार नाहीये. घरी जाण्याआधी मला सांग, म्हणजे मीही त्यावेळी घरी येईल. मला माझ्या आईला सांभाळावे लागेल. तुला तिची गरज उरली नसेल, तरी मला तिची गरज आहे. आईला जर काही झालं, तर ताई मी तुला आयुष्यात माफ करणार नाही. अक्षरा मी खाली थांबतो, तू तुझं बोलणं उरकून लवकर ये. मला इथे जास्त वेळ थांबवणार नाहीये. ज्या बहिणीला मी माझा आदर्श मानलं होतं, ती या थराला जाईल, असं वाटलं नव्हतं."


निखिल रागाने दरवाजा उघडून निघून गेला. निखिलचे बोलणे ऐकून अमृताच्या डोळयात पाणी आले होते. 


प्रसाद म्हणाला,

"अमृता निखिल रागात असल्याने असं काही बोलला. एक भाऊ म्हणून मी त्याची बाजू समजू शकतो."


अक्षरा म्हणाली,

"दादा मी पण निघते. घरी जाताना मला सांग. अशावेळी मी घरी असणं योग्य ठरेल."


प्रसाद म्हणाला,

"अक्षू माझ्यावर रागावली नाहीस ना?"


अक्षरा म्हणाली,

"दादा यावर मी काय बोलू? हेच कळत नाहीये. मी बहीण आहे, म्हणून थोडी हळवी आहे. निखिल सारखं पटकन मला बोलता येणार नाही. एवढंच सांगेल की, आई बाबांना जर या सगळ्याचा जास्त त्रास झाला, तर मलाही ते सहन होणार नाही. दादा तुझ्याबद्दल मनात एक आदर होता, तो आदर कुठेतरी कमी झाल्यासारखा वाटतो आहे. दादा मी निघते."


परतीच्या प्रवासात निखिल अक्षरा सोबत काहीच बोलला नाही. निखिलचे मौनच त्याची मनस्थिती सांगत होते.


प्रसाद व अमृताच्या लग्नाची बातमी त्यांच्या घरी समजल्यावर काय होईल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all