कॉलेज लाईफ भाग २८
मागील भागाचा सारांश: अक्षराने किर्ती व प्रियाला प्रसादने निखिलच्या बहिणी सोबत लग्न केल्याचे सांगितले. अक्षरा व निखिल मुंबईला जाऊन प्रसाद व अमृताला एका कॅफेमध्ये बोलावून घेतात.
आता बघूया पुढे….
अक्षरा प्रसादच्या प्रश्नाचं काहीच उत्तर देत नाही, हे बघून अमृता निखिलकडे बघून म्हणाली,
"निखिल हा सगळा काय प्रकार आहे? ही काहीच बोलत नाहीये आणि तुही शांत बसलाय. आम्ही तुमच्या शांततेचा काय अर्थ लावायचा?"
निखिल म्हणाला,
"ताई हिचं नाव अक्षरा आहे. आम्ही दोघे क्लासमेट आहोत. फर्स्ट इअर मध्ये असताना आमची ओळख झाली. अक्षरा लाजरी बुजरी असल्याने माझ्या सोबत कधी फारशी बोलली नाही. कदाचित याच गोष्टीकडे मी ओढला जात होतो. काही दिवसांनी आमच्या दोघांमध्ये मैत्री झाली.
मी हळूहळू अक्षरामध्ये गुंतत चाललो होतो. मी तिच्या प्रेमात पडलो होतो. अक्षरा खूप साधी सरळ असल्याने मला आवडायला लागली होती. अक्षराला मी एकदा प्रपोज पण केले होते, पण तिने स्पष्टपणे नकार दिला होता. अक्षरा आई वडिलांच्या भीतीने माझं प्रेम स्विकारु शकत नव्हती. अक्षराला पण मी आवडायचो, पण तिने ते कधीच स्पष्टपणे सांगितलं नाही.
आम्ही दोघे मित्र म्हणून एकमेकांसोबत वावरत होतो, पण कुठेतरी आमच्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेमाच्या भावना होत्या. आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे? हे एकमेकांच्या डोळयात बघून जाणवत होतं.
मागच्या आठवड्यात अक्षरा लायब्ररीच्या बाहेर एका मुलासोबत बराच वेळ हसून गप्पा मारत होती. मी ते बघितलं आणि माझं डोकचं सटकलं. दुसऱ्या दिवशी मी अक्षराला आमच्या कॉलेजच्या मंदिरात बोलावून घेतलं, तिथे तिला मी स्पष्ट सांगितलं की," हे मैत्रीचं नाटक करायला मला जमणार नाही. तुझं माझ्यावर प्रेम आहे, याची कल्पना मला आहे. तू जर आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत लग्न केले नाहीतर मी पुन्हा कधीच तुझ्यासोबत बोलणार नाही. माझा आणि तुझा कायमचा संबंध संपला."
अक्षराला तिच्या आयुष्यात मी हवा होतो, पण आईवडिलांना न सांगता माझ्यासोबत लग्न करणे तिला मान्य नव्हते. शेवटी माझं प्रेम जिंकलं. बराच वेळ विचार करुन ती लग्नाला तयार झाली. आम्ही दोघांनी मंदिरात लग्न केलं. मी त्यावेळी तसा का वागलो? हे माझं मलाच कळत नाहीये. अक्षरा सोबत मी इतर मुलाचा विचारच करु शकत नाही.
मी अक्षराला सांगितले की, आपलं हे वर्ष संपल्यावर आपापल्या घरी लग्न केल्याचं सांगूयात. पण अक्षराचं मन मानायला तयार होत नव्हतं. अक्षराला तिच्या दादाला हे सगळं सांगायचं होतं, म्हणून आम्ही दोघे आज इथे आलो आहोत. मी विचार केला की, मुंबईला आलो आहोच, तर तुलाही सर्व खरं सांगून टाकावं. "
निखिलचं बोलणं संपल्यावर लगेच अमृताने थाडकन त्याच्या कानाखाली मारली. आजूबाजूचे लोकं बघायला लागल्यावर प्रसाद म्हणाला,
"आपण या विषयावर घरी जाऊन बोलूयात का? उगाच लोकांसमोर तमाशा नको."
अमृताला प्रसादचे म्हणणे पटल्याने तिने घरी जायला होकार दिला. घरी जाईपर्यंत कोणीच एक शब्द सुद्धा बोलले नाही. घरात गेल्यावर अमृता म्हणाली,
"अरे निखिल तुला काही अक्कल आहे की नाही. लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ आहे का? माझं सोड पण तुला आईचा विचार सुद्धा आला नाही का? आईला जेव्हा हे खरं कळेल, तेव्हा तिची अवस्था काय होईल? याची कल्पना तरी तुला आहे का? निखिल आपल्या आईने आपल्यासाठी किती कष्ट केले आहेत. तिला या वयात हे दुःख देणार आहेस का?"
बोलताना अमृताच्या डोळयात पाणी आले होते. निखिल खाली मान घालून शांत बसला होता. अमृताचं बोलणं संपल्यावर प्रसाद अक्षराकडे बघून म्हणाला,
"अक्षू तू मंद आहेस का? कॉलेज सुरु झालं, तेव्हाच मी तुला मुलांपासून दूर रहायला सांगितले होते. मित्र असण्यापर्यंत ठीक आहे ग, पण लग्न….
अक्षू हा मुलगा तुला इमोशनली ब्लॅकमेल करत होता आणि तू त्याच्या शब्दांमध्ये फसत होतीस. अक्षू हे वय तुझं लग्न करण्याचं आहे का? एकदा फोन करुन मला विचारायचं होतं ना.
अक्षू आई बाबांचं हे सर्व ऐकून काय होईल? बाबा आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही. आईला किती मनस्ताप होईल. अक्षरा हा मुलगा अजून काहीच कमवत नाही. हा तुला कसा खुश ठेवेल?
अक्षू जगण्यासाठी फक्त प्रेम महत्त्वाचे नाहीये, तर पैसाही लागतो. अक्षू तुझ्या या निर्णयामुळे आपले आई बाबा दुःखी होतील आणि ते दुःखी असल्यावर तू सुखी राहशील का? अक्षू तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती."
अक्षरा म्हणाली,
"दादा माझी पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती."
प्रसाद चिडून म्हणाला,
"म्हणजे मी हे सगळं हसून स्विकारायला पाहिजे आहे का? अक्षरा ते कोणत्याच मुलीच्या भावाला शक्य नाहीये. हे बघ अक्षू झालं ते झालं. यातून आपण एक मार्ग काढू शकतो. तुमचं लग्न झालंय, हे तुम्ही दोघे विसरुन जा. तसही या लग्नाचे काहीच पुरावे नसतील आणि अश्या लग्नाला कोणीच मान्य करत नाही. मी आईबाबांना काहीच सांगणार नाही. सगळं विसरुन जा. तू या मुलापासून दूर रहा. तुझ्यासाठी आपण एकसे बढकर एक मुलगा शोधू आणि तेही आपल्या योग्यतेचा."
अमृता प्रसादची री ओढत म्हणाली,
"निखिल अक्षराच्या भावाचं म्हणणं मलाही पटतंय. तुमचं लग्न कधी झालं होतं, हेच आपण विसरुन जाऊयात. निखिल आयुष्यात लग्न सोडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुला तर अजून भरपूर काही करायचं आहे."
निखिल म्हणाला,
"हिच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितली तर….."
"म्हणजे?" अमृताने विचारले.
निखिल म्हणाला,
"तुला अक्षराच्या भावाचं म्हणणं पटलं ना. तुमच्या दोघांच्या मते आम्ही आमचं लग्न विसरुन जायचं, बरोबर ना?
मग आमची अशी इच्छा आहे की, तुम्हीही तुमचं लग्न विसरुन जा."
अमृता म्हणाली,
"निखिल तू कोणाच्या लग्नाबद्दल बोलत आहेस? मला तर काहीच कळत नाहीये."
अक्षरा म्हणाली,
"तुम्हाला कळत नाहीये की, न कळण्याचं नाटक करत आहात. प्रसाद तू जे मला बोललास, तेच सर्व काही स्वतःशी कधी बोलला आहेस का?"
प्रसाद म्हणाला,
"अक्षू तू काय बोलते आहेस? आता विषय तुमच्या लग्नाचा चालू होता ना. या सगळ्यासोबत आमचा काय संबंध?"
निखिल म्हणाला,
"तुम्ही जसं मघाशी म्हणालात ना की, कोणत्याच मुलीचा भाऊ हे सहन करु शकत नाही, ते अगदी खरं बोललात. मलापण हे सहन होत नाहीये."
निखिल आपल्या मोबाईल मधील प्रसाद व अमृताच्या लग्नाचा फोटो दाखवून म्हणाला,
"आतातरी काही आठवलं का?"
"तुझ्याकडे हा फोटो कुठून आला?" अमृताने विचारले.
निखिल म्हणाला,
"ताई ते एवढं महत्त्वाचे नाहीये. ताई लग्न तुला खेळ वाटला होता का? तुला आपल्या आईच्या कष्टांची जाणीव नाहीये का? लग्न करताना एकदाही आमचा विचार तुझ्या डोक्यात आला नाही का?"
अमृता म्हणाली,
"निखिल माणूस प्रेमात असलं की, या सगळ्याचा विचार करत नाही. तूही त्याच प्रेमामुळे अक्षराशी लग्न केलं ना."
निखिल म्हणाला,
"ताई ते आम्ही सगळं खोटं सांगितलं. अक्षरा माझी चांगली मैत्रीण आहे, त्यापलीकडे आमच्यात काहीच नाहीये. मी हा फोटो बघितल्यापासून खूप डिस्टर्ब होतो. मला कोणाशी तरी हे सगळं शेअर करायचं होतं, म्हणून मी या विषयावर अक्षरा सोबत बोललो, तेव्हा तिने हा फोटो बघितला आणि मग आमच्या असे लक्षात आले की, अक्षराच्या भावाने माझ्या बहिणीसोबत लग्न केले आहे.
आम्ही तुम्हाला सरळसरळ विचारले असते,तर तुम्ही खरं कधीच सांगितलं नसतं, म्हणून आम्हाला हे नाटक करावं लागलं. तुम्हाला दोघांनाही सगळ्या गोष्टीची जाणीव असताना सुद्धा तुम्ही हे पाऊल का उचललं? हे तुम्हालाच ठाऊक."
अक्षरा म्हणाली,
"दादा तू माझ्यापेक्षा मोठा आहेस, त्यामुळे मी जास्त काही बोलू शकणार नाही. तू लग्न केलंस, स्वतःच्या बायकोसोबत इथे ह्या घरात राहत आहेस. तुला जसं पटतंय, तसं तू वागत आहेस. तुला हवं ते तू कर. पण ह्या सगळ्यामुळे माझ्या आईवडिलांना काही झालेलं मी सहन करु शकणार नाही. पुढच्या काही दिवसात घरी जाऊन या सर्वाची कल्पना आई बाबांना द्यायची. आता त्यांना कसं आणि काय सांगायचं? हे तुझं तू ठरव.
हे सगळं मी फार काळ आई पासून लपवू शकणार नाही. मला एवढंच सांग की, तू आम्हाला कोणालाही कल्पना न देता लग्न का केलं? मला यामागील कारण कळालं की, मी पुण्याला जायला मोकळी. मला खरं कारण कळल्याशिवाय माझ्या मनाला शांतता लाभणार नाही."
प्रसाद अक्षराला काय कारण सांगेल? हे बघूया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा