कॉलेज लाईफ भाग २७

Story Of College Days
कॉलेज लाईफ भाग २७

मागील भागाचा सारांश: प्रविणने आजवर केलेल्या सर्व चुका प्रियासमोर मांडल्या. प्रविणने प्रियपासून काहीच लपवून ठेवलं नाही. अमृता व प्रसादच्या नकळत मुंबईला जाऊन त्यांची भेट घ्यायची असे अक्षरा व निखिलने ठरवले.

आता बघूया पुढे….

प्रविणचं बोलणं संपल्यावर प्रिया म्हणाली,
"प्रविण मला होस्टेलला सोडवशील का?"

प्रविणने मान हलवून होकार दर्शवला. प्रविणने प्रियाला होस्टेलच्या गेटबाहेर सोडवले. प्रिया रुममध्ये गेली तर किर्ती कसला तरी विचार करत बसलेली होती. प्रियाही आपल्याच विचारात बेडवर जाऊन बसली. तेवढ्यात अक्षरा रुममध्ये आली. अक्षरा पण आपल्याच विचारात मग्न होती. किर्तीकडे बघून अक्षरा म्हणाली,

"कितू मी तुला लायब्ररीत बघायला गेले होते. तू मला न सांगता रुमवर का निघून आलीस?"

किर्ती म्हणाली,
"असंच, बराच वेळ मी तुझी वाट बघितली, मग रुमवर निघून आले. (प्रियाकडे बघून म्हणाली) अरे पियू तू कधी आलीस?"

प्रिया म्हणाली,
"जेव्हा तू विचारमग्न मुद्रेत होतीस तेव्हा."

"कितू काही झालंय का?" अक्षराने विचारले.

किर्ती म्हणाली,
"काही नाही. तुझा चेहरा इतका उतरलेला का दिसत आहे?"

अक्षरा म्हणाली,
"ज्या मुलीच्या भावाने कोणालाही न सांगता लग्न केले, हे तिला समजल्यावर तिचा चेहरा कसा राहील?"

"काय? म्हणजे अक्षू तुझ्या प्रसाद दादाने लग्न केलंय का?" कितूने आश्चर्यचकित होऊन विचारले.

"हो." अक्षराने उत्तर दिले.

किर्ती म्हणाली,
"पण तुला कसं कळालं?आईबाबांना माहीत झालं का?"

अक्षरा म्हणाली,
"आईबाबांना अजून तरी काहीच माहीत नाही. ज्या मुलीसोबत त्याने लग्न केलंय, तिच्या भावाकडून मला समजलं."

"तिचा भाऊ तुला कसा काय ओळखतो?" किर्तीने विचारले.

अक्षरा म्हणाली,
"तिचा भाऊ म्हणजे निखिल. निखिल त्याचमुळे डिस्टर्ब होता."

किर्ती म्हणाली,
"अरे बापरे म्हणजे निखिलच्या बहिणीने तुझ्या भावासोबत लग्न केलंय तर. निखिलला पण यातील काहीच माहीत नव्हते का?"

अक्षरा म्हणाली,
"नाही. निखिलने त्याच्या बहिणीच्या मोबाईलमध्ये फोटो बघितला, म्हणून त्याला समजले. आम्ही दोघे उद्या मुंबईला जाऊन त्या दोघांशी बोलणार आहे."

किर्ती म्हणाली,
"अक्षू जास्त टेन्शन घेऊ नकोस. थोडी रिलॅक्स हो. सगळं काही ठीक होईल."

अक्षरा म्हणाली,
"हम्मम. बरं पियू तू प्रविणला भेटलीस ना, मग तुमच्यात काय बोलणं झालं?"

प्रियाने प्रविणचं बोलणं सविस्तरपणे किर्ती व अक्षराला सांगितलं. प्रियाचं बोलणं झाल्यावर अक्षरा म्हणाली,

"हे तर अजून गंभीर आहे. प्रविण तुला चक्क फसवत होता."

किर्ती म्हणाली,
"पण मुलींनो आज रोजी प्रविणने सगळं काही खर सांगितलं आहे. त्याने जर काहीच सांगितलं नसतं, तरी चाललं असतं. पण प्रविणने प्रियापासून काहीच लपवलं नाहीये. या गोष्टीचा विचार करुन प्रियाला निर्णय घ्यावा लागेल."

प्रिया म्हणाली,
"हो. मी लगेच माझा निर्णय देणारचं नाहीये. एक दोन दिवस जरा विचार करते,मग बघू. पुन्हा एकदा प्रविणशी भेटून मगच निर्णय घेईल. मला घाईघाईने काहीच निर्णय घ्यायचा नाहीये."

"बाबांसोबत काही बोलणं झालं का?" अक्षराने विचारले.

प्रिया म्हणाली,
"हो, मी बाबांकडून थोडा वेळ मागून घेतला आहे."

तेवढ्यात प्रियाला तिच्या आईचा फोन आला, म्हणून ती फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून गेली.

अक्षरा म्हणाली,
"कितू प्रसाद दादाने आमच्यापासून लपवून लग्न का केलं असेल?"

किर्ती म्हणाली,
"हे तोच सांगू शकेल. निखिल रागात आहे का? कारण जेव्हा आपल्या बहिणीच्या बाबतीत असं होतं, तेव्हा मुलांना खूप राग येतो म्हणे."

अक्षरा म्हणाली,
"निखिल रागात कमी पण दुःखात जास्त वाटत होता. निखिलला बाबा नाहीये ग. आता सगळी परिस्थिती त्यालाच हाताळावी लागणार आहे. निखिल हतबल वाटला. नेमका त्यात त्याच्या बहिणीने माझ्या भावाशी लग्न केलंय म्हटल्यावर तो फारसा काही बोलला नाही."

किर्ती म्हणाली,
"हम्मम, त्याला तुझ्या समोर काय बोलावं? हे कळलं नसेल. अक्षू यामुळे तुझी व निखिलची फ्रेंडशीप बिघडणार तर नाही ना."

अक्षरा म्हणाली,
"काय माहित यार. कधी काहीही संकट येऊन समोर उभं राहतं. दादाने लग्न केलंय हे घरी कळल्यावर आई बाबांची काय परिस्थिती होईल? याचाच विचार माझ्या डोक्यात घोळत आहे."

किर्ती म्हणाली,
"अक्षू आता जे होईल ते फक्त उघड्या डोळ्याने बघत राहण्या सोडून तुझ्या हातात काहीच नाहीये. एवढंच सांगेल की, जास्त टेन्शन घेऊ नकोस. रिलॅक्स."

अक्षरा म्हणाली,
"बरं माझं जाऊदेत. तुला काय झालंय? हे पटकन सांग. मघाशी प्रिया होती, म्हणून मी तुला जास्त फोर्स नाही केला."

किर्ती म्हणाली,
"काल आदित्यच्या एका कलीगची बर्थडे पार्टी होती. मी आग्रह केला, म्हणून त्याने बर्थडे पार्टीचे फोटो पाठवले. जवळपास सगळ्याच फोटोंमध्ये आदित्यच्या शेजारी एक मुलगी आहे, ती भारतीयच वाटतेय. ती मुलगी आदित्यच्या खूप क्लोज उभी आहे. मला ते फोटो बघून डोक्यात सणकचं निघाली. मला असं का होतंय? हेच कळत नाहीये."

अक्षरा हसून म्हणाली,
"तू आदित्यच्या प्रेमात पडली आहेस. तू सोडून त्याच्या शेजारी दुसरी कोणीतरी मुलगी उभी असणे, तुला सहन झाले नाही. एवढा विचार करत बसण्यापेक्षा आदित्यला फोन करुन ती मुलगी कोण आहे? हे विचार, म्हणजे तुझ्या डोक्यातील हे वादळ शांत होईल."

किर्ती म्हणाली,
"अग पण असं कसं विचारणार?"

अक्षरा म्हणाली,
"फोटोंबद्दल जनरल चर्चा करायची, मग हळूहळू त्याला तिच्याबद्दल विचारायचं."

किर्ती म्हणाली,
"बघते विचारुन आणि तू काय म्हणालीस, मी त्याच्या प्रेमात पडली म्हणून, तर असं काही नाहीये समजलं."

अक्षरा म्हणाली,
"हो समजलं. मला उद्या सकाळी लवकर मुंबईला जायचं आहे. बरं ऐक, माझ्या आईकडे तुझा फोन नंबर आहे, जर तिने तुला फोन केला तर, मी मुंबईला गेले, हे आईला सांगायचं नाही."

किर्तीने मान हलवून होकार दर्शवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता निखिल व अक्षरा मुंबईला जाणाऱ्या बसमध्ये बसले. पुणे ते मुंबई हा प्रवास साधारण दोन ते अडीच तासांचा होता. बसमध्ये प्रवासादरम्यान निखिलने अक्षराला त्याच्या डोक्यात असलेला प्लॅन सांगितला. अक्षराने प्रसादच्या मित्राकडून प्रसादचा पत्ता घेतला होता. बसस्टँडवर उतरल्यावर टॅक्सीवाल्याला पत्ता दाखवून अक्षरा व निखिल टॅक्सीने त्या एरियात पोहोचले. 

प्रसाद राहतो त्या बिल्डिंगपासून जवळच एक कॉफी शॉप होते, तिथे जाऊन निखिल व अक्षरा एका टेबलजवळ बसले. निखिलच्या प्लॅनप्रमाणे अक्षराने प्रसादला व निखिलने अमृताला ताबडतोब त्या कॉफी शॉपमध्ये येण्यास सांगितले. 

पुढच्या पाच मिनिटांत अमृता कॉफी शॉपमध्ये आली, ती निखिलच्या जवळ येऊन म्हणाली,

"निखिल या वेळेला तू इथे काय करतो आहेस? आणि तुझ्यासोबत ही मुलगी कोण आहे? निखिल हा काय प्रकार आहे? मी ऑफिसला निघाले होते, नशीब लोकलमध्ये बसण्याआधी तुझा फोन आला."

निखिल म्हणाला,
"ताई माझ्यामुळे तुला घाईत यावं लागलं, त्यासाठी खरंच सॉरी. ताई पण गोष्टच अशी आहे की, मला तुला त्रास द्यावा लागला. ताई दोन मिनिटं इथं खुर्चीत शांत बस. मग मला काय सांगायचं? ते शांतपणे ऐक."

निखिल व अमृताचं बोलणं चालू असतानाच प्रसाद तिथे आला, अमृताला तिथे बघून तो थोडा दचकलाच. अमृताने प्रसादला बघून न बघितल्यासारखे केले. प्रसाद अक्षराकडे बघून म्हणाला,

"अक्षू तू इथे काय करते आहेस? आणि हा मुलगा कोण आहे? तू याच्या सोबत इथे काय करतेस? आज माझी ऑफिसमध्ये अर्जंट मिटिंग होती. आता मला बॉसचा जाम ओरडा खावा लागणार."

अक्षरा म्हणाली,
"दादा तू थोडा शांत होशील प्लिज. मला मान्य आहे की, मी अचानक कॉल केल्यामुळे तुझी धावपळ झाली असेल. दादा माझ्या हातून अशी एक गोष्ट झाली आहे की, ती जर मी तुला सांगितली नाही, तर जाम गोंधळ होईल."

प्रसाद चिडून म्हणाला,
"अक्षू तू काय चूक केली आहेस? आणि तू या मुलासोबत का आली आहेस? तुझा आणि याचा काय संबंध?"

अक्षरा प्रसादच्या प्रश्नाचं काय उत्तर देईल?हे बघूया पुढील भागात...
©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all