कॉलेज लाईफ भाग २६

Story Of College Days

कॉलेज लाईफ भाग २६


मागील भागाचा सारांश: निखिलने अक्षराला तो डिस्टर्ब असण्यामागील कारण सांगितले. निखिलने अक्षराला त्याच्या बहिणीचं अमृताचं लग्न झाल्याचा फोटो दाखवला. फोटो बघितल्यावर अक्षराला समजले की, अमृताचं लग्न तिच्या प्रसाद दादासोबत झालं. अक्षरा फोटो बघून खूपच शॉक झाली होती. प्रसाद व अमृताने आपापल्या घरच्यांपासून लपवून लग्न केलं होतं.


आता बघूया पुढे….


अक्षराने मुंबईला जाऊन प्रसादची भेट घेऊन त्याला जाब विचारण्याचे ठरवले. निखिल सुद्धा मुंबईला जाऊन अमृताला याबद्दल विचारणा करण्याचे ठरवतो. 


निखिल म्हणाला,

"अक्षरा तुझ्या दादाचा पत्ता तुला माहीत आहे का?"


"नाही." अक्षराने उत्तर दिले.


निखिल म्हणाला,

"मलाही अमृता ताईचा पत्ता माहीत नाहीये. आपण जर त्यांना फोन करुन विचारले तर ते आपल्याला उद्या तिकडे येऊ देणार नाही."


अक्षरा म्हणाली,

"तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. माझ्याकडे दादाच्या मित्राचा फोन नंबर आहे. मी त्याला फोन करुन दादाचा पत्ता विचारते."


निखिल म्हणाला,

"अग पण तो लगेच दादाला सांगेल किंवा दादाकडून पत्ता का घेतला नाही असे विचारेल. दादाच्या मित्राला त्यांच्या लग्नाबद्दल माहीत असेल, तर तो तुला पत्ता सांगायला टाळाटाळ करेल."


अक्षरा म्हणाली,

"असं काही होणार नाही. दादाचा पुढच्या आठवड्यात बर्थडे आहे,तर मी त्याच्या मित्राला सांगेल की, मला दादाला सरप्राईज गिफ्ट पाठवायचे आहे."


निखिल म्हणाला,

"तुझ्या डोक्यात तर भारीच कल्पना येतात. आपण त्यांच्या घरी न जाता दोघांना बाहेर बोलावलं तर…. आपल्याला त्यांच्यासोबत बोलणं सोपं होईल. माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आहे. ते दोघेही आपल्या पेक्षा मोठे असल्याने आपण डायरेक्ट त्यांना त्यांची चूक दाखवू शकणार नाही. मी उद्या तुला माझी कल्पना सांगतो. आपण दोघे उद्या सकाळी लवकर मुंबईला जाण्यासाठी निघुयात, म्हणजे रात्रीपर्यंत आपल्याला होस्टेलवर परतता येईल."


अक्षरा व निखिल आपापलं बोलणं संपवून होस्टेलवर निघून गेले.


–---------------------------------------------------


प्रिया प्रविणला भेटण्यासाठी कॉफी शॉपमध्ये जाते. प्रविण तिची वाट बघत बसलेला होता. प्रविणला बघितल्यावर प्रियाने स्माईल दिली. प्रविणने सुद्धा प्रियाकडे बघून स्माईल दिली. प्रिया प्रविणच्या समोरील खुर्चीत जाऊन बसली. 


"काय ऑर्डर करायचं?" प्रविणने विचारले.


"हॉट कॉफी." प्रियाने उत्तर दिले.


प्रविणने वेटरला बोलावून कॉफीची ऑर्डर दिली. 

"कशी आहेस?" प्रविणने विचारले.


प्रिया म्हणाली,

"मी मजेत आहे. तू कसा आहेस?"


प्रविण म्हणाला,

"मी पण मजेत. कॉलेज कसं चालू आहे?"


प्रिया म्हणाली,

"आता फायनल इअर सुरु झालं आहे. अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल, शिवाय यावर्षी प्रोजेक्ट असेल. तुझी नोकरी काय म्हणतेय?"


प्रविण म्हणाला,

"माझी नोकरी चांगली चालू आहे. पुढच्या महिन्यात कंपनी स्विच करणार आहे. पॅकेज चांगलं भेटतं आहे."


प्रिया म्हणाली,

"गुड."


तेवढ्यात वेटरने कॉफी आणून दिली. पुढील पाच मिनिटे दोघेही एकमेकांसोबत काहीच बोलले नाही.


प्रविण म्हणाला,

"सॉरी मी तुझे फोन उचलले नाही. तुझ्यासोबत फोनवर काय बोलावं? हेच कळत नव्हतं. काही वर्षांपूर्वी आपल्या घरच्यांनी आपल्या लग्नाचा विचार केला असता तर आपण लगेच हो म्हणालो असतो, पण आजरोजी आपलं नातं अश्या टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे की काय निर्णय घ्यावा हेच कळत नाहीये?" 


यावर प्रिया म्हणाली,

"आपल्यात काही बोलणंच झालं नाहीतर आपण काहीच निर्णय घेऊ शकत नाही. मला बाबा माझा निर्णय विचारत होते, म्हणून मला तुझ्यासोबत एकदा बोलायचे होते."


प्रविण म्हणाला,

"माझ्या ते लक्षात आलं होतं. प्रिया आज मला तुला खूप काही सांगायचं आहे. मी अनेक चुका केल्या आहेत, त्याची शिक्षा मला मिळाली. प्रिया तू ज्या प्रविणला ओळखते, तो खरा प्रविण नाहीये."


प्रिया म्हणाली,

"म्हणजे? मला जरा सविस्तरपणे सांगशील का?"


प्रविण म्हणाला,

"हो, त्यासाठीच मी तुला भेटायला बोलावले आहे. मी तुला पहिल्यांदा जेव्हा बघितलं, तेव्हा तू मला अजिबात आवडली नव्हती. घरातील सर्वजण माझं जेवढं कौतुक करायचे, त्या कौतुकासाठी मी कधीच पात्र नव्हतो. मी अत्यंत वाया गेलेला मुलगा होतो. मी नेहमी टवाळ मुलांच्या संगतीत रहायचो.


आमच्या गँगमध्ये राजू नावाचा मुलगा होता, तो आमच्या पेक्षा वयाने मोठा होता. आम्ही बिघडण्यामागे त्याचा सर्वांत जास्त हात होता. राजूने आम्हाला कमी वयात adult मुव्ही बघण्याची सवय लावली होती. मुव्ही बघितल्यापासून आपण असं एका मुलीसोबत करावं, हे नेहमी वाटत रहायचं. शाळेतील एखादी मुलगी आपल्याला भाव देईल, या आशेने मी आणि माझे मित्र सतत मुलींच्या घोळक्यामागे घुटमळत असायचो. मी अनेक मुलींसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच मला भाव दिला नाही. शाळेत असताना गर्लफ्रेंड असण्याचं स्वप्न पूर्ण होईल, असं काही वाटतं नव्हतं. 


अशातच तुझी आणि माझी भेट मामाच्या घरी झाली. तुझ्याकडे बघून ही मुलगी आपल्याला पटेल, अशी खात्री झाली होती, कारण घरी माझी इमेज खूपच चांगली होती. मामाच्या घरी बरेचजण असल्याने मला तुझ्यासोबत बोलता आलं नाही. तुला स्पर्श करण्याचं स्वप्न त्यावेळी राहून गेलं.


तू आमच्या घरी आली असताना माझं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली होती. माझं तुझ्यावर प्रेम नसताना सुद्धा मी तुला खोटं सांगितलं होतं. तुझ्या सहवासात रहायला मिळेल, तुला स्पर्श करता येईल, हाच त्यामागील हेतू होता. तू सुद्धा माझ्या प्रेमात पडली आहे, हे कळल्यावर तर माझा मार्ग सोपा झाला होता.


मी तुला जेव्हा भेटायला यायचो, त्यावेळी कॉलेजमध्ये आधीच माझी एक गर्लफ्रेंड होती. आठवडा तिच्यासोबत घालवायचो आणि विकेंड तुझ्यासोबत घालवायचो. मला एक प्रकारचा असुरी आनंद मिळत होता. एक काळ असा होता की, मला कोणतीच मुलगी भाव देत नव्हती आणि तेव्हा एकाच वेळी दोन मुली माझ्यावर प्रेम करत होत्या. प्रिया मी तुझ्यासोबत खरंतर टाईमपास म्हणून प्रेमाचं नाटक सुरु केलं होतं, पण कालांतराने मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. कॉलेजमध्ये असणाऱ्या गर्लफ्रेंड पेक्षा मला तुझ्यासोबत बोलणं अधिक आवडू लागलं होतं. काही दिवसांनी माझं आणि तिचं ब्रेकअप झालं.


माझा अपघात झाला आणि आपल्या नात्याला वेगळंच वळण मिळालं. तू जेव्हा पुण्यात आलीस, तेव्हा तुला नक्कीच अपेक्षा असेल की, मी तुझ्यासोबत बोलायला पाहीजे होतं, पण त्यावेळी मी तुला टाळत होतो, कारण मी एका वेगळ्याच दुनियेत होतो. मी सिगारेट, दारु प्यायला लागलो होतो. बाटली आली की काही दिवसांनी तिथे बाई येतेच. माझ्या सोबत या सर्व गोष्टी खूप पटपट घडू लागल्या होत्या. मी केव्हा त्या जगात वाहवत गेलो, हे माझं मलाच कळलं नाही.


काही महिन्यांनी त्या जगात माझ्यासोबत वावरणाऱ्या माझ्या एका मित्राचा मृत्यू झाला, त्याच्या घरच्यांची अवस्था बघून मला आई बाबांची आठवण झाली. मी त्या जगातून बाहेर पडण्याचे ठरवले. तेथून बाहेर पडणं, इतकं काही सोपं नव्हतं. मला बाहेर पडण्यासाठी मदत झाली, ती माझ्या एका मैत्रिणीची, शाल्मली तिचं नाव. शाल्मली माझ्यावर खूप प्रेम करायची. माझं तिच्यावर प्रेम नाहीये, हे तिला ठाऊक होतं. शाल्मली व मी सोबत एका कंपनीत काम करत होतो, तिथेच आमच्या दोघांची भेट झाली होती.


रोहित मार्फत जेव्हा आपली भेट झाली, तेव्हा मी दोलायमान स्थितीत होतो, त्यावेळी मी तुला हे सगळं सांगू शकत नव्हतो आणि मनात हे सर्व साठवून तुझ्यावर प्रेम सुद्धा करु शकत नव्हतो. मी तुझ्यापासून लांब रहायचं ठरवलं. सहा महिन्यांपूर्वी शाल्मलीला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला, तोही दुसऱ्या स्टेजचा. मागच्या महिन्यात शाल्मली हे जग सोडून गेली.


प्रिया शाल्मली जाताना मला एक गोष्ट सांगून गेली की, प्रियाची माफी माग, तिला सगळं खरं सांगून टाक. गेल्या महिन्यापासून तुझ्यासोबत बोलण्यासाठी हिंमत करतो आहे. अशातच बाबांनी तुझ्याबद्दल विचारलं.


प्रिया हे सगळं ऐकून जर तुला माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर करु शकतेस. नकार दिलास तरी चालेल. सुरवातीला मी तुझ्यावर प्रेम केलं नसेल तरी हळुवार मी तुझ्या प्रेमात पडलो आणि अजूनही मी तुझ्यावर प्रेम करतो आहे.


प्रिया तुझ्यात आणि रोहितमध्ये काय होतं? हे मला जाणून पण घ्यायचं नाहीये. माझ्या चुकांपुढे ती चूक काहीच मोठी नसेल, याची खात्री मला आहे. आज माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं आहे. मी तुझ्या उत्तराची वाट पाहिलं."


प्रिया प्रविणला होकार देईल का? बघूया पुढील भागात…..

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all