कॉलेज लाईफ भाग २५
मागील भागाचा सारांश: शेवटचं वर्ष महत्त्वाचे असल्याने आदित्यने किर्तीला लायब्ररीत नोकरी का करु नये? हे समजावून सांगितले. प्रविण प्रियाला भेटण्यास तयार झाला होता. निखिल कोणत्या तरी कारणाने डिस्टर्ब होता. निखिल का डिस्टर्ब आहे? त्याची काळजी अक्षराला वाटत होती.
आता बघूया पुढे….
पुढील काही वेळातच निखिल गार्डनमध्ये पोहोचला. निखिलचा चेहरा अजूनही पडलेलाच होता.
"आतातरी तू माझ्या सोबत बोलणार आहेस का?" अक्षराने विचारले.
निखिल म्हणाला,
"आपण जरा निवांत जागी बसूयात का?"
अक्षराने मान हलवून होकार दर्शवल्यावर निखिल पुढे व अक्षरा त्याच्या पाठोपाठ चालू लागली. निखिलने गार्डनमधील असा कोपरा शोधला, जिथे आसपास कोणीच नव्हते. निखिल तेथील एका बेंचवर जाऊन बसला. अक्षराही त्याच्या शेजारी जाऊन बसली. निखिल खाली मान घालून बसला होता.
"निखिल काय झालंय?" अक्षराने विचारले.
निखिल म्हणाला,
"अक्षरा सगळंच बिघडलं आहे."
अक्षरा म्हणाली,
"काय बिघडलंय?"
निखिल म्हणाला,
"अक्षरा अज्ञानात शहाणपण असतं,ही म्हण बरोबर आहे. आपलेच लोक आपल्या पासून इतकी मोठी गोष्ट कशी लपवू शकतात."
अक्षरा म्हणाली,
"निखिल जरा स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगशील का? मला तुझ्या बोलण्याचा काहीच अर्थ लागत नाहीये."
निखिल म्हणाला,
"तुला तर ठाऊकच आहे की, माझे बाबा मी दहावीत असताना गेले. माझी आई प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. आम्हा दोघा बहीण भावांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून आई शिवणकाम पण करायची. शाळेतून घरी आल्यावर रात्र पहाटं करुन ती शिवणकाम करायची.
माझ्या ताईचं इंजिनिअरिंग झाल्यावर तिला चांगल्या कंपनीत नोकरी लागली. आम्ही सगळेच त्यामुळे खूप आनंदी झालो होतो. आई पुढील वर्षी रिटायर होईल. मी सुट्टीत घरी गेल्यावर आई मला म्हणाली की,
"ताईच्या लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात करावी लागेल. नातेवाईक तिचं लग्न कधी करणार? याबद्दल विचारपूस करत आहेत. आपल्या योग्यतेचं स्थळ भेटलं, तर लग्नासाठी आपण कर्ज काढूयात. पुढील वर्षी माझ्या रिटायरमेंटचे पैसे मिळाले की कर्ज फेडता येईल. तुलाही पुढच्या वर्षी एखाद्या कंपनीत नोकरी लागेलच."
यावर मी म्हणालो,
"आई आपण याबद्दल एकदा ताईसोबत बोलूयात, तिच्या मनाविरुद्ध काहीच व्हायला नको."
आईला माझं म्हणणं पटलं होतं. ताई दोन तीन दिवसांसाठी घरी आली होती, तेव्हा आईने तिच्याकडे लग्नाचा विषय काढला, यावर ताईने पुढील सहा महिने थांबण्याची विनंती केली, कारण तिला कंपनीतील कामाचं सध्या खूप टेन्शन आहे. आम्ही विचार केला की, आता एवढे दिवस गेलेच आहेत, तर अजून सहा महिने थांबल्याने काही मोठा फरक पडणार नाही.
यावेळी मला ताई खूप बदलल्यासारखी वाटत होती. ताई आमच्या पासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं मला जाणवत होतं. मी तसं ताईला विचारलं सुद्धा पण कंपनीतील कामाचं टेन्शन आहे, असं तिने सांगितलं.
परवा सकाळी ताईचा मोबाईल अचानक बंद पडल्याने मी मोबाईल रिपेअरिंग साठी मोबाईल शॉप मध्ये घेऊन गेलो. मोबाईल रिसेट करावा लागणार असल्याने त्यातील सर्व डेटा मी माझ्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर करुन घेतला. ताईचा मोबाईल रिपेअर होईपर्यंत मी माझ्या मोबाईलवर टाईमपास करत बसलो होतो. गॅलरीतील जुने फोटो डिलीट करत असताना ताईच्या मोबाईल मधील ट्रान्सफर केलेल्या फोटोजची फाईल माझ्या डोळ्यासमोर आली, म्हणून ती फाईल मी ओपन केली, तर त्यातील फोटो बघून माझा माझ्या डोळ्यांवरच विश्वास बसत नव्हता."
निखिलचे डोळे भरुन आल्याने त्याला पुढे काय बोलावं? हेच सुचत नव्हते. म्हणून अक्षरा पुढे म्हणाली,
"निखिल त्या फोटोंमध्ये काय होतं?"
निखिल आपल्या हातातील मोबाईल अक्षराच्या हातात देऊन म्हणाला,
"तूच बघ."
अक्षरा निखिलच्या मोबाईल मधील फोटो बघून म्हणाली,
"ही तुझी ताई आहे का?हिचं नाव काय आहे?"
निखिल म्हणाला,
"हो ही माझी अमृता ताई आहे. माझ्या ताईने आम्हाला काही कल्पना न देता ह्या मुलासोबत लग्न केलं. हा मुलगा कोण आहे? तो काय करतो? तो कोणत्या जातीचा आहे? हे मला काहीच माहीत नाही. अक्षरा माझ्या ताईने आमचा विश्वासघात केला. लग्नासारखी एवढी मोठी गोष्ट करताना तिला आम्हाला सांगावे सुद्धा वाटले नाही. हा फोटो बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.
असं वाटलं होतं की, त्या क्षणी घरी जाऊन ताईला या सर्वाचा जाब विचारावा, पण त्या क्षणी आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. मी माझ्या रागाला आवर घालण्याचा प्रयत्न केला. जी गोष्ट विचारताना माझी हिंमत होत नाहीये, ती गोष्ट करताना ताईला काहीच वाटलं नसेल का?
ताईचं लग्न हे माझ्या आईसाठी स्वप्न आहे. मी तिला कसं सांगू की, आई तू ताईच्या लग्नाचं स्वप्न बघू नकोस. मला काय करु? हेच कळत नाहीये. मी ताईला हे कसं विचारु? हेच कळत नाहीये."
आपलं बोलणं संपवून निखिलने अक्षराकडे बघितले, तर ती गहन विचार करताना दिसली, म्हणून निखिल म्हणाला,
"अक्षरा तुला हे सगळं ऐकताना इतकं वाईट वाटतंय. तू यावर इतका विचार करत आहे, तर माझी मनस्थिती काय झाली असेल?"
अक्षरा म्हणाली,
"निखिल हे खूप भयंकर आहे. या दोघांनीही लग्न करताना आपापल्या घरच्यांचा विचार का केला नसेल? लग्न हे फक्त दोघांचं नसतं, तर ते दोन कुटुंबांचं असतं, ही साधी गोष्ट त्यांना कळाली नसेल का? आपल्या मुलांचं लग्न हे आई वडिलांचं स्वप्न असतं.
मुलांची स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून आई वडील आपल्या जीवाचं रान करतात, तर आईवडिलांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलं काहीचं करु शकत नाही."
अक्षरा रागाने बोलत होती. निखिल तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला,
"अक्षरा रिलॅक्स पण तुला इतका राग का आला आहे? कदाचित त्या मुलाच्या घरच्यांना सगळं माहिती असेल."
अक्षरा म्हणाली,
"त्या मुलाच्या घरच्यांना माहीत असतं, तर मला नक्कीच माहीत झालं असतं."
"म्हणजे?" निखिलने विचारले.
अक्षरा म्हणाली,
"हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून माझा प्रसाद दादा आहे."
"काय!" निखिल म्हणाला.
अक्षरा म्हणाली,
"यावेळी प्रसाद दादाचं काहीतरी बिनसल्यासारखं वाटतं होतं. मी त्याबद्दल त्याला विचारणा केली सुद्धा होती, पण त्याने कंपनी स्विच करण्याचं टेन्शन आहे, असं सांगितलं. अमृता नावाची त्याला मैत्रिण आहे, हे मला ठाऊक होतं."
निखिल म्हणाला,
"आता आपण पुढे काय करायचं?"
अक्षरा म्हणाली,
"प्रसाद दादा बाबांपेक्षा आईशी खूप क्लोज होता. प्रसाद दादा आईशी सर्व शेअर करायचा. आईला हे सर्व कळाल्यावर काय वाटेल? याची मला कल्पना सुद्धा करवत नाहीये. आपल्या मुलाला दूर पाठवताना आई वडील त्याच्यावर किती विश्वास ठेवतात, पण मुलं त्यांचा असा विश्वासघात करतात. निखिल प्रसाद दादाचं अमृतावर प्रेम असणं चुकीचं नाहीये, पण त्याने कोणाला न सांगता लग्न करणं हे चुकीचं आहे. आई बाबा हे दुःख कसं पचवतील? निखिल आमच्या गावात बाबांचं खूप नाव आहे रे. आमच्या घरातील छोटीशी बातमी गावात पसरायला अजिबात वेळ लागत नाही.
दादाच्या लग्नाची बातमी गावात कळाली, तर बाबांच्या इमेजला मोठा धक्का बसेल. बाबांना हे अजिबात सहन होणार नाही. मला तर काहीच कळत नाहीये. दादाने हा निर्णय घ्यायला नको होता."
अक्षराच्या डोळयात पाणी आले होते. निखिल तिला म्हणाला,
"अक्षरा मला तुझी मनस्थिती समजत आहे. मला परवा पासून झोप लागली नाहीये. मला हे कळत नाहीये की, या दोघांनी जर आपापल्या घरी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितलं असतं तर काय झालं असतं? कोणीच लगेच होकार दिला नसता, पण कमीत कमी या दोघांनी प्रयत्न तर करायला पाहिजे होता."
अक्षरा म्हणाली,
"निखिल मी उद्याचं दादाला भेटायला मुंबईला जाते. मला सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्या कडून घ्यायची आहे."
निखिल म्हणाला,
"मीही तुझ्या सोबत येतो. मलाही ताईसोबत या विषयावर बोलावं लागणार आहे."
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा