Login

कॉलेज लाईफ भाग २४

Story Of College Friends

कॉलेज लाईफ भाग २४


मागील भागाचा सारांश: प्रसादचं काहीतरी बिनसलं आहे, हे अक्षराला जाणवलं होतं. अक्षराने त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला उत्तर देण्यास टाळाटाळ केली. प्रविणच्या घरच्यांनी प्रियाला लग्नासाठी मागणी घातली होती. प्रियाच्या बाबांनी तिचा निर्णय विचारला होता, पण प्रविण सोबत काही बोलणं झाल्याशिवाय प्रियाला निर्णय घेता येणार नव्हता. प्रविण प्रियाचा फोन उचलत नव्हता.


आता बघूया पुढे….


दुसऱ्या दिवसापासून शेवटच्या वर्षाचे कॉलेज सुरु झाले. कॉलेजमध्ये गेल्यावर अक्षरा व निखिलची भेट झाली. निखिलच्या चेहऱ्यावरुन तो कसल्या तरी टेन्शनमध्ये असल्याचे जाणवत होते. लेक्चर्स संपल्यावर निखिल लगेच वर्गाबाहेर पडला, त्याच्या पाठोपाठ अक्षराही वर्गाच्या बाहेर पडली. अक्षराने निखिलला आवाज देऊन थांबवले.


"अक्षरा माझ्याकडे काही काम आहे का?" निखिलने विचारले.


अक्षरा म्हणाली,

"अरे निखिल, आज आपण किती दिवसांनी भेटतो आहोत. तू आमच्या कोणाशीच भेटला नाहीस. लेक्चर संपल्यावर लगेच वर्गाबाहेर पडलास."


निखिल म्हणाला,

"अक्षरा मी सध्या खूप वेगळ्या टेन्शनमध्ये आहे. मला कोणाशीच काहीच बोलण्याची इच्छा नाहीये."


"माझ्याशी पण नाही." अक्षराने विचारले.


निखिल म्हणाला,

"हो. प्लिज माझ्या सोबत जास्त काही बोलण्याचा प्रयत्न करु नकोस. मी रागाच्या भरात काही बोलून गेलो, तर तुला कदाचित ते आवडणार नाही."


एवढं बोलून निखिल तेथून निघून गेला. अक्षराला निखिलच्या वागण्याचा अर्थचं कळत नव्हता. अक्षरा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत स्तब्ध उभी होती. पुढील पाच मिनिटांनी किर्ती अक्षराच्या पाठीवर थाप मारत म्हणाली,


"अक्षू तू अशी स्तब्ध का उभी आहेस?"


यावर अक्षरा म्हणाली,

"काही नाही ग. निखिल काही न बोलता निघून गेला, तो कसल्यातरी टेन्शनमध्ये आहे."


किर्ती म्हणाली,

"संध्याकाळी तुम्ही लायब्ररीत भेटाल, तेव्हा विचार. तोपर्यंत त्याचं डोकं शांत झालेलं असेल."


"हम्मम. तुला लायब्ररीत जायचं आहे का? की होस्टेलवर येणार आहेस." अक्षराने विचारले.


"होस्टेलवर येणार आहे. या वर्षी मी लायब्ररीत काम करणार नाहीये." किर्तीने सांगितले.


"का?" अक्षराने विचारले


किर्ती म्हणाली,

"चल होस्टेलवर जाता-जाता सांगते. अग यावर्षी आपलं पुर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत करावं लागेल. भविष्याच्या दृष्टीने हे वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवर आपलं भवितव्य ठरतं. जॉब देताना आपले हेच मार्क्स बघितले जातात.

शिवाय या वर्षी प्रोजेक्ट असणार आहे, त्याचं खूप काम असतं. या वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यू सुद्धा असतील, कॅम्पस मधून सिलेक्शन झालं तर, नोकरी शोधावी लागणार नाही."


अक्षरा म्हणाली,

"आणि हे सर्व तुला आदित्यने सांगितलं असेल, बरोबर ना?"


किर्ती म्हणाली,

"बरोबर. आदित्य म्हणाला की, जर तुला पैश्यांची गरज असेल,तर मी तुला पैसे देतो, पण तू आता लायब्ररीत नोकरी करायची नाही."


अक्षरा म्हणाली,

"बरं झालं. तसंही तू आमचं ऐकलं नसतंच. बरं ही प्रिया कुठे राहिली?"


किर्ती म्हणाली,

"ती सध्या वेगळ्याच विचारात आहे. प्रविण नावाचं वादळ तिच्या आयुष्यात परत येणार असल्याचं दिसत आहे."


अक्षरा म्हणाली,

"असं काय म्हणतेय ग. कितीही झालं तरी प्रविण तिचं पहिलं प्रेम होतं आणि पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही."


बोलता बोलता अक्षरा व किर्ती रुममध्ये पोहोचल्या होत्या, त्यांच्या मागून प्रिया रुममध्ये आली.


"पियू कुठे भटकत होतीस?" अक्षराने विचारले.


प्रिया म्हणाली,

"रोहितला माझ्या सोबत काहीतरी बोलायचे होते, म्हणून त्याने मला थांबायला सांगितले होते."


अक्षरा म्हणाली,

"अच्छा. रोहितने पुन्हा तुला त्रास द्यायला सुरुवात तर केली नाही ना?"


प्रिया म्हणाली,

"नाही ग, त्याने तर उलट आज माझी मदतच केली आहे. प्रविणने माझ्यासाठी त्याच्याकडे निरोप दिला होता, तो देण्यासाठी मला त्याने थांबवले होते."


"प्रविणने तुझ्यासाठी काय निरोप दिला?" अक्षराने कुतूहलाने विचारले.


प्रिया म्हणाली,

"प्रविणला मला भेटायचे आहे. फोनवर व्यवस्थित बोलता येत नाही, म्हणून त्याने माझे फोन उचलले नव्हते. आज संध्याकाळी इथं जवळच्या कॅफेमध्ये भेटायला बोलावलं आहे."


किर्ती म्हणाली,

"बरं झालं, म्हणजे काय तो सोक्षमोक्ष आजच्या आज लागून जाईल. तुझ्या डोक्याला ताण राहणार नाही."


प्रिया म्हणाली,

"हो ना. मलाही जरा रिलॅक्स वाटतंय. होकार किंवा नकार हे एकदाच फिक्स होईल."


किर्ती म्हणाली,

"प्रिया कदाचित तुला माझं बोलणं आवडणार नाही, पण एक मैत्रीण म्हणून मला राहवत नाहीये, म्हणून सांगते. प्रविण तुझं पहिलं प्रेम आहे, हे मला मान्य आहे. तुम्ही दोघे एकमेकांना आधीपासून ओळखतात, हेही मला मान्य आहे. पियू पण तुम्ही दोघे सतत सोबत राहत नव्हतात, त्यामुळे त्याच्या स्वभावाचा तुला पूर्ण अंदाज नाहीये. शिवाय गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही एकमेकांच्या संपर्कात नाही.

प्रविण सोबत भेटल्यावर मनातल्या भावना बाजूला ठेवून काहीवेळ डोक्याने विचार कर. शेवटी अफेअर आणि लग्न ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन्हींमध्ये खूप मोठी तफावत आहे. तुला एका भेटीत निर्णय घेणे अवघड होणार असेल, तर अजून त्याला भेट आणि मगच योग्य तो निर्णय घे.

एकदा लग्न जमल्यावर तुला या नात्यातून सहजासहजी मागे फिरता येणार नाही. जरी तू मागे फिरलीस तरी तुला खूप जास्त मनस्ताप सहन करावा लागेल, शिवाय या सगळ्याचा तुझ्या आईवडिलांना खूप त्रास होईल.

प्रिया प्रविण आता बराच बदललेला असेल, त्याच्या स्वभावाचा अंदाज घे आणि मगच योग्य तो निर्णय घे."


प्रिया म्हणाली,

"किर्ती तुझ्या बोलण्याचा मला राग आलेला नाहीये. तू जे काही सांगितलंस ते योग्यच सांगितलंस. तू म्हणते ते खरं आहे, मला हा निर्णय घेताना मनातील भावना बाजूला ठेऊन विचार करावा लागेल."


अक्षरा म्हणाली,

"गर्ल्स मला जाम भूक लागली आहे. आपण जेवण करायला मेसमध्ये जाऊयात का?"


किर्ती व प्रियाने मान हलवून होकार दिला आणि त्या तिघीजणी जेवण करण्यासाठी मेसमध्ये गेल्या. संध्याकाळी प्रिया तयार होऊन प्रविणला भेटण्यासाठी रुमच्या बाहेर पडली, तर अक्षरा व किर्ती अभ्यास करण्यासाठी लायब्ररीत गेल्या. लायब्ररीत गेल्यावर अक्षरा किर्तीला म्हणाली,


"कितू निखिल लायब्ररीत आलेलाच नाही. नेहमी या वेळेस तो लायब्ररीत हजर असतो."


यावर किर्ती म्हणाली,

"निखिलला फोन करुन विचार."


अक्षराने लायब्ररीच्या बाहेर जाऊन निखिलला फोन लावला. तीन चार रिंगनंतर निखिलने फोन उचलला,


"हॅलो बोल काय म्हणतेस?" निखिलने विचारले.


अक्षरा म्हणाली,

"निखिल तू कुठे आहेस? लायब्ररीत का आला नाहीस?"


निखिल म्हणाला,

"लायब्ररीत येऊन अभ्यास करण्याची माझी इच्छाच होत नाहीये."


अक्षरा म्हणाली,

"निखिल तुला काय झालंय?"


"काही नाही." निखिलने उत्तर दिले.


अक्षरा चिडून म्हणाली,

"निखिल पुढील पाच मिनिटांत जर तू गार्डनमध्ये आला नाहीस, तर मी पुन्हा तुझ्यासोबत बोलणार नाही."


एवढं बोलून अक्षराने फोन कट केला. किर्तीला सांगून अक्षरा गार्डनमध्ये जाऊन निखीलची वाट पाहत बसली होती, तेवढ्यात रोहित तिथे येऊन म्हणाला,


"अक्षरा गार्डनमध्ये एकटीच काय करत आहेस?"


अक्षरा म्हणाली,

"निखीलची वाट बघत आहे."


रोहित म्हणाला,

"निखिल जरा जास्तच डिस्टर्ब आहे. कालपासून माझ्यासोबत नीट बोलला पण नाही. आज दुपारी त्याने जेवण सुद्धा केलं नाही."


अक्षरा म्हणाली,

"हो. माझ्यासोबत पण तो काहीच बोलला नाही, म्हणूनच मी त्याला इथे भेटायला बोलावलं आहे."


रोहित म्हणाला,

"काही सिरीयस असेल तर मला सांग. बरं प्रिया प्रविणला भेटायला गेली का?"


अक्षरा म्हणाली,

"हो, मघाशीच गेली. प्रविण आणि प्रियाचंही पुढे काय होईल?"


रोहित म्हणाला,

"कसं आहे ना अक्षरा. शेवटी आयुष्य त्या दोघांचं आहे. जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांनाच घ्यावा लागणार आहे. काही बाबतीत प्रियाही चुकली आहे आणि काही बाबतीत प्रविण पण चुकला आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. प्रविण व प्रिया हे दोघेही आपल्या सोबत पूर्णपणे खरं बोलत आहेत की नाही? याची मला शंका वाटत आहे, त्यामुळे आपण त्यांचा काहीच अंदाज लावू शकत नाहीये."


अक्षरा म्हणाली,

"हो, तू म्हणतो तेही खरं आहे."


एवढं बोलून रोहित गार्डनमधून निघून जातो.


निखिल डिस्टर्ब असण्यामागील कारण काय असेल? हे बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe







🎭 Series Post

View all