कॉलेज लाईफ भाग २३
मागील भागाचा सारांश: रोहित अक्षरा, निखिल, प्रिया व किर्तीला मिसळ सेंटरमध्ये बोलावून घेतो. रोहित त्या सर्वांची माफी मागतो आणि आपली सर्वांची मैत्री पूर्ववत व्हावी ही इच्छा दर्शवतो. किर्ती स्पष्टपणे सांगून टाकते की, तिला इतक्या लवकर सगळं विसरुन नीट वागायला जमणार नाही.
आता बघूया पुढे....
किर्ती प्रिया व रोहित सोबत जरा तुटकपणेच वागायची. अक्षरा प्रियासोबत नॉर्मल वागायची, पण रोहितसोबत बोलताना जरा सांभाळूनच बोलायची. कालांतराने त्या पाच जणांची मैत्री पूर्ववत आणि अधिकच घट्ट झाली. किर्ती व प्रियामध्ये सुद्धा पहिल्यासारखी मैत्री झाली.
आपले मित्र मैत्रिणी सोबत असले कॉलेजचे दिवस किती भुर्रकन निघून जातात याचा अंदाज कोणालाच येत नाही. बघता बघता कॉलेजचे तीन वर्षे संपून चौथ्या वर्षाची सुरुवात झाली होती.
पंधरा दिवसांच्या कॉलेजच्या सुट्टीनंतर अक्षरा होस्टेलला परत जाणार होती. अक्षराला घेऊन जाण्यासाठी तिची आई चिवडा तयार करत होती. अक्षरा किचनमध्ये येऊन म्हणाली,
"आई माझी बॅग भरुन झाली आहे. सर्व खाऊ दुसऱ्या बॅगेत टाकावा लागेल. कपड्यांची बॅग फुल्ल भरली आहे."
आई म्हणाली,
"प्रसाद त्याच्या रुममध्ये काम करत बसला आहे, त्याला गरम चिवडा खूप आवडतो, त्याला जरा नेऊन देते का?"
अक्षरा म्हणाली,
"आई मी प्रसाद दादाला चिवडा नेऊन देते. आई प्रसाद दादाला घरी येऊन दोन दिवस झाले, तो उद्या परत जाणार आहे, पण यावेळी तो माझ्यासोबत फारसा बोलला नाही. प्रसाद दादाचं काही तरी बिनसल्यासारखं वाटत आहे."
आई म्हणाली,
"अक्षू असं काही नाहीये, त्याला त्याच्या कामाचं टेन्शन आहे. माझं त्याच्या सोबत बोलणं झालं आहे. प्रसादला कंपनी बदलायची आहे, त्याच्या डोक्यात तेच चालू आहे."
अक्षराला आईचं म्हणणं फार मनापासून पटलेलं नव्हतं. अक्षरा चिवडा घेऊन प्रसादच्या रुमच्या बाहेर जाऊन दरवाज्यावर टकटक करुन म्हणाली,
"प्रसाद दादा आत येऊ का?"
"हो ये ना." प्रसादने उत्तर दिले.
अक्षरा रुममध्ये जाऊन म्हणाली,
"आईने तुझ्यासाठी गरम चिवडा दिला आहे."
प्रसाद म्हणाला,
"माझी आवड आईला माहीत आहे ना. बरं तुझी पॅकिंग झाली का? आता काय मॅडमचं शेवटचं वर्ष राहिलं आहे. आता फक्त एकच वर्ष अभ्यास करायचा."
अक्षरा म्हणाली,
"दादा कॉलेजचं आयुष्य छान असतं की त्यानंतरचं?"
प्रसाद म्हणाला,
"अक्षू ह्या आपल्या आयुष्याच्या फेजेस असतात. आपण त्या फेजकडे कसे बघतो? यावरुन ती फेज कशी आहे? हे समजते. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर आपली खरी लायकी समजते. नोकरी मिळवण्यासाठी आणि ती टिकून राहण्यासाठी अतोनात कष्ट घ्यावे लागतात. प्रत्येक क्षेत्रात हल्ली कॉम्पिटिशन खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे."
अक्षरा म्हणाली,
"दादा तुला कसलं टेन्शन आहे का?"
प्रसाद म्हणाला,
"नाही का?"
अक्षरा म्हणाली,
"दादा मी तुला आल्यापासून बघत आहे की, तू गहन विचार करत बसलेला असतो. तू माझ्यासोबत फारसा बोलला सुद्धा नाही. दादा सगळं ठीक आहे ना?"
प्रसाद म्हणाला,
"अग वेडाबाई, मी ठीक आहे. मला कंपनी स्विच करायची आहे. माझा निर्णय बरोबर आहे की नाही? याचं विचारात सध्या मी आहे."
तेवढ्यात प्रसादचा मोबाईल वाजला. प्रसाद अक्षराला म्हणाला,
"अक्षू जरा कामाचा फोन आहे. आपण थोड्यावेळाने बोलूयात."
अक्षरा मानेने होकार देऊन निघून गेली. प्रसाद सांगत नसला तरी त्याचं काहीतरी बिनसलं आहे, हे अक्षराच्या लक्षात आलं होतं. दुसऱ्या दिवशी अक्षरा आपलं सामान घेऊन होस्टेलला निघून गेली. प्रिया, किर्ती या दोघीही आपल्या घरुन होस्टेलवर परतल्या होत्या. किर्तीला बघून अक्षरा म्हणाली,
"मग कितू ही सुट्टी कशी काय गेली?"
किर्ती म्हणाली,
"माझी ही सुट्टी एकदम भारी गेली. माझ्या काकूने माझं खूप छान आदरातिथ्य केलं. चक्क यावेळी कोणीच माझ्याशी भांडलं नाही."
अक्षरा म्हणाली,
"अरे बापरे, हा तर मोठा चमत्कार झाला. हा चमत्कार घडण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल."
किर्ती म्हणाली,
"हो मी घरी असताना आदित्यचा मला फोन आला होता. आमचं फोनवरील बोलणं ऐकून माझ्या काकूला वाटतंय की, आमच्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे."
अक्षरा म्हणाली,
"काकूला वाटतंय म्हणजे तुमच्या दोघांत काही चालू नाहीये का?"
यावर किर्ती म्हणाली,
"आमच्या दोघांमध्ये काय आहे? काय नाही? हे तुला चांगलंच माहीत आहे ना."
अक्षरा म्हणाली,
"कितू आदित्य भारतात केव्हा परत येणार आहे?"
"चार महिन्यांनी." किर्तीने उत्तर दिले.
अक्षरा म्हणाली,
"कितू तोपर्यंत तुझ्या मनात त्याच्याबद्दल काय आहे? हे तू स्वतः समजून घे. मी काही सांगायला गेले, तर तुला ते खोटं वाटेल. आदित्य व तुझ्यात खूप चांगली मैत्री आहे, हे मला ठाऊक आहे, पण तुमच्यात मैत्रीपेक्षाही जास्त काहीतरी आहे, असं मला वाटतं."
किर्ती म्हणाली,
"अक्षू मला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये. पियू तू इतकी शांत का बसली आहेस?"
अक्षरा म्हणाली,
"हो ना. पियू तू काहीच का बोलली नाहीस? मला वाटलं किर्तीची खेचण्यात तू माझी काही मदत करशील."
प्रिया म्हणाली,
"नशिबाने माझीच खेचली आहे. मी किर्तीची काय खेचू."
"म्हणजे?" किर्तीने विचारले.
प्रिया म्हणाली,
"प्रविणचे आई वडील काल आमच्या घरी आले होते, त्यांनी प्रविणसाठी मला मागणी घातली."
अक्षरा म्हणाली,
"मग पुढे काय झालं?"
प्रिया म्हणाली,
"माझ्या आई बाबांनी मला प्रविण बद्दल विचार करायला सांगितला आहे. दोन दिवसांत माझे उत्तर कळवायचे आहे."
"म्हणजे प्रविणचा होकार आहे?" किर्तीने विचारले.
"माहीत नाही." प्रियाने उत्तर दिले.
अक्षरा म्हणाली,
"तू त्याला विचारलं नाहीस का?"
प्रिया म्हणाली,
"तो माझा फोनच उचलत नाहीये."
किर्ती म्हणाली,
"मग तू काय निर्णय सांगणार आहेस?"
प्रिया म्हणाली,
"तेच तर कळत नाहीये. प्रविण फोन उचलत नाहीये, त्यामुळे मी होकार किंवा नकार यातील काहीच देऊ शकत नाहीये."
अक्षरा म्हणाली,
"तुझ्या आई बाबांचं यावर काय मत आहे?"
"आई बाबांना प्रविण आवडला आहे." प्रियाने उत्तर दिले.
किर्ती म्हणाली,
"उद्या बाबांचा फोन आला की, त्यांना सांग. मला पहिले प्रविण सोबत भेटून लग्न या विषयावर चर्चा करावी लागेल, मगच तू निर्णय घेऊ शकते."
अक्षरा म्हणाली,
"पियू, कितू म्हणते ते बरोबर आहे. बाबांच्या मार्फत तुझी प्रविण सोबत भेट होऊ शकेल."
प्रिया म्हणाली,
"हो, मी हेच बाबांना सांगते."
अक्षरा म्हणाली,
"पियू पण मला एक सांग, तुझ्या मनात प्रविणबद्दल काही आहे का? म्हणजे तू त्याच्यासोबत लग्न करण्यात इंटरेस्टेड आहेस का?"
प्रिया म्हणाली,
"मला तेच तर कळत नाहीये. प्रविण सोबत एकदा बोलणं झाल्याशिवाय त्याच्याबद्दल माझ्या मनात काय आहे? हे कळणार नाही."
प्रियाचा मूड ठीक करण्यासाठी किर्ती म्हणाली,
"पियू ही अक्षरा आपल्या बाबतीत एवढे सल्ले देत असतात. आपलं कोणासोबत काय रिलेशनशिप आहे, याबद्दल नेहमी सांगत असते, पण स्वतःच काय चालू आहे? याबद्दल कधीच काही बोलत नाही."
प्रिया म्हणाली,
"हो ना. अक्षू घरी असल्यामुळे तू निखिलला खरंच मिस केलं असेल ना? एकदम खरं सांग."
अक्षरा म्हणाली,
"आता तुम्ही दोघी मिळून माझी खेचणार आहात का? मी तुम्हाला दोघींना मिस करत होते, बाकी कोणाला नाही."
एवढं बोलून अक्षरा रुममधून बाहेर निघून गेली. किर्ती म्हणाली,
"पियू निखिलचं नाव घेतलं की, ही काहीच बोलत नाही, पण अक्षूच्या मनात निखिल बद्दल सॉफ्ट कॉर्नर नक्कीच आहे. अक्षूच्या घरी लव्ह मॅरेज अलाउड नसल्याने ती यावर फारसं काही बोलत नाही."
प्रिया म्हणाली,
"हो. मला तर फुल्ल डाऊट आहे की, निखिलच्या मनात सुद्धा अक्षू बद्दल नक्कीच काहीतरी असेल."
किर्ती म्हणाली,
"जाऊदेत, हा त्या दोघांचा पर्सनल मॅटर आहे. आपण यात न पडलेलंच बरं."
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा