कॉलेज लाईफ भाग २२
मागील भागाचा सारांश: गॅदरिंगमध्ये अक्षरा सोनाली सोबत भरतनाट्यम सादर करते. निखिल मैत्री या विषयावर भरभरुन बोलतो.
आता बघूया पुढे....
गॅदरिंगचा समारोप झाल्यावर अक्षरा निखिल जवळ जाऊन म्हणाली,
"निखिल मैत्रीवर एकच नंबर बोललास. कविता तर अप्रतिम होती. मला नव्हतं माहीत की, तू एवढी छान कविता करत असशील. तू कविता करायला कसा काय शिकलास?"
यावर निखिल हसून म्हणाला,
"चला माझं बोलणं कोणाला तरी आवडलं. मनातून शब्द येतात, ते कागदावर उमटवले की, आपोआप शब्द जुळून कविता तयार होते. शाळेत असल्यापासून मला कविता करण्याचा छंद जडला आहे."
अक्षरा व निखिल मध्ये बोलणं चालू असतानाच किर्ती तेथे येऊन म्हणाली,
"अक्षरा मॅडम नृत्य करुन पाय दुखले नाहीत का?"
"तुम्ही टाळ्यांच्या स्वरुपात दिलेल्या प्रोत्साहनामुळे पायदुखी आपोआप बरी झाली." अक्षराने उत्तर दिले.
किर्ती निखिलकडे बघून म्हणाली,
"निखिल तू खूप भारी बोलतो रे. आज मी जाम आनंदी आहे. माझ्या दोन्ही मित्रांनी आज स्टेज फोडून टाकलं. अक्षू चल आता रुमवर जाऊयात. बराच उशीर झाला आहे."
निखिल म्हणाला,
"अक्षरा किर्तीचं म्हणणं बरोबर आहे. उद्या सकाळी आपण ब्रेकफास्टच्या वेळी भेटूयात आणि उरलेल्या गप्पा पूर्ण करुयात."
अक्षरा व किर्ती निखिलला बाय म्हणून होस्टेलवर परतल्या. प्रिया आधीच रुममध्ये गेलेली होती. अक्षराला बघून प्रिया म्हणाली,
"अक्षू तुझा डान्स एकच नंबर झाला."
"थँक्स." अक्षराने आपलं आवरता आवरता उत्तर दिले.
प्रिया पुढे म्हणाली,
"निखिल पण भारी बोलला."
"हो." अक्षराने प्रियाकडे न बघता उत्तर दिले.
यावर प्रिया म्हणाली,
"अक्षू तुला माझ्यासोबत बोलायचं नाहीये का?"
अक्षरा म्हणाली,
"अग बाई, मी खूप दमले आहे. पटकन आवरुन झोपायचं आहे. आपण या विषयावर उद्या बोलूयात का?"
"हो चालेल." प्रियाने उत्तर दिले.
पुढील काही वेळातच अक्षरा व किर्ती आवरुन झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी अक्षरा सर्वांत उशीरा झोपेतून उठली. ती बेडवर लोळत पडली होती.
"अक्षरा मॅडम आज तुम्हाला झोपेतून उठायचं नाहीये का? अंघोळीला सुद्धा नंबर लागला नाही." किर्तीने विचारले.
अक्षरा म्हणाली,
"कितू पाय खूप दुखत आहे. अंघोळ कॉलेजवरुन आल्यावर करेल."
किर्ती हसून म्हणाली,
"अक्षू तुला कॉलेजचा पहिला दिवस आठवतोय का? त्यादिवशी अंघोळ नको करुस म्हटलं, तर तुला किती कसंतरी वाटलं होतं आणि आज बिनधास्तपणे अंघोळ न करता कॉलेजला जायला तयार झालीस."
अक्षरा म्हणाली,
"हॉस्टेल लाईफची सवय लागली आहे ग. बरं ते जाऊदेत ह्या रोहितचा सकाळी सकाळी मॅसेज आला आहे की, 'अकरा वाजता स्वामी मिसळ सेंटर ला किर्ती व तू ये.' आता ह्याने आपल्या दोघीना मिसळ सेंटरला का बोलावले असेल?"
किर्ती म्हणाली,
"आपण जर मिसळ सेंटरला गेलो तर आपलं पहिलं लेक्चर मिस होईल."
"आणि नाही गेलो तर, रोहितने आपल्याला का बोलावले असेल? हेच डोक्यात चालू राहील" अक्षरा म्हणाली.
मग थोड्यावेळ विचार करुन किर्ती व अक्षराने ठरवले की, एक लेक्चर बुडवून रोहितला भेटायला मिसळ सेंटरला जाऊयात. अक्षरा झोपेतून उठून फ्रेश झाली. किर्ती व अक्षरा आपापलं आवरुन स्वामी मिसळ सेंटरला पोहोचल्या तर या दोघींआधी रोहित, प्रिया व निखिल तेथे पोहोचलेले होते.निखिल व प्रियाला बघून अक्षरा म्हणाला,
"तुम्हा दोघांनाही रोहितने बोलावलं होतं का? मला वाटलं होतं की, आमच्या दोघींनाचं बोलावलं की काय?"
यावर प्रिया म्हणाली,
"मला तर वाटलं होतं की, मला एकटीलाच बोलावलं असेल."
निखिल म्हणाला,
"तुम्ही सगळ्याजणी आपापलं वाटणं आपल्या जवळ ठेवा. रोहित आम्ही सगळे लेक्चर सोडून इथे आलो आहोत, तर पटकन तू आम्हाला इथे का बोलावलं? हे सांगून टाक."
रोहित म्हणाला,
"अरे पण घाई काय आहे? मिसळ सेंटरला आला आहात आणि मिसळ न खाण्याचा विचार आहे की काय? आज तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे मिसळ पार्टी. (मिसळ सेंटर मधील मुलाला आवाज देऊन म्हणाला) ये छोटू पाच मिसळ आण रे."
किर्ती म्हणाली,
"रोहित आम्ही सगळेजण मिसळ खाऊ, पण तू आम्हाला इथे का बोलावलं आहे? याचं कारण तर सांग."
रोहित म्हणाला,
"सर्वप्रथम मला तुमच्या सर्वांची माफी मागायची आहे. कॉलेजच्या पहिल्या काही दिवसांत आपली सर्वांची किती छान मैत्री झाली होती. मुलांशी न बोलणारी अक्षरा निखिल व माझ्याशी मोकळेपणाने बोलत होती. आपल्या सर्वांचं चांगलं चालू होतं, पण आता आपल्यातील मैत्रीचं समीकरण मोडलं आहे. प्रिया बिचारी एकटी पडली आहे, निखिल माझ्यासोबत फारसा बोलत नाही. काल गॅदरिंगच्या वेळी प्रिया एकटीच एका कोपऱ्यात बसलेली होती, तर किर्ती व अक्षरा वेगळ्या ठिकाणी होत्या. निखिल आणि माझा विचार न केलेलाच बरा. आपल्या सर्वांचा ग्रुप तुटण्याचं कारण एकमेव मी आहे. माझ्यामुळे तुमचं हे त्रिकूट उध्वस्त झालं. तुमच्या तिघींची आपापसात किती छान मैत्री होती.
मी प्रियाला बराच मानसिक त्रास दिला आहे. प्रविण व तिच्या नात्याबद्दल मला असलेल्या माहितीचा मी चुकीचा वापर केला. मी प्रियाचा खूप मोठा गुन्हेगार आहे. अक्षरा, किर्ती तुमच्यात व प्रियात फूट पडण्यामागील एकमेव कारण म्हणजे मी आहे.
मी काही चुकीचं करु नये म्हणून निखिल वेळोवेळी मला मार्गदर्शन करत होता, पण मी त्याचे काहीच ऐकले नाही. मी निखिलसोबत संवाद कमी करुन टाकला.
काल निखिल जेव्हा मैत्रीबद्दल भरभरुन बोलला, तेव्हा मला जाणवले की, आपण किती चुकीचं वागत आहोत. कॉलेजमधून बाहेर पडताना चांगल्या आठवणी मला सोबत घेऊन जायच्या आहेत. प्लिज तुम्ही सर्वांनी मला माफ करा."
निखिल म्हणाला,
"रोहित तुला तुझी चूक कळाली, याचं मला छानच वाटत आहे. अरे पण मित्रा एवढं चुकीचं वागणं बरं नाही. आपल्या दोघांची मैत्री तुटली, ह्याचं मला फारसं वाईट वाटलं नाही, पण तू या तिघींची मैत्री तोडण्याचा प्रयत्न केलास, हे फार चुकीचं केलंस. काल प्रियाच्या उदास चेहऱ्याकडे बघवत नव्हतं. मी तर म्हणेन की तीच मूर्ख की जी तुझ्यासारख्या मुलाला भुलली.( प्रियाकडे बघून) प्रिया मी काल जे बोललो ना की, आपण आपल्या भावनांवर ताबा ठेवायला हवा. हे तुझं स्वतःच आयुष्य आहे. तुला कोणाशी मैत्री करायची? कोणाशी बोलायचं? काय बोलायचं? हे ठरवण्याचा सर्वस्वी तुला अधिकार आहे.
समजा पुढील काही वर्षांत तुझं लग्न झालं आणि तू तुझ्या नवऱ्याच्या सांगण्यावरुन तुझ्या सर्व मैत्रिणींसोबत मैत्री तोडून टाकलीस. मग पुढे जाऊन जेव्हा तुला तुझं दुःख जर कोणाशी शेअर करायचं असेल तर तू ते कोणासोबत करशील?
आपल्या आयुष्यातील निर्णय आपण घ्यायला पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या हातातील कटपुतल्या व्हायचं नाही. मला तर आज रोजी रोहितपेक्षा तुझा जास्त राग आला आहे."
प्रिया डोळयात पाणी आणून म्हणाली,
"निखिल मला तुझं म्हणणं पटतंय रे, पण त्यावेळी मी जरा जास्तच वाहवत गेले. त्यावेळी चूक आणि बरोबर यातील फरक ओळखणेच मला जमत नव्हते. मी इथून पुढे असं वागणार नाही."
अक्षरा म्हणाली,
"तुम्हाला दोघांना तुमच्या चुका कळल्या, यातच सर्व काही आलं. तुम्ही दोघांनी आपापल्या आयुष्यात खुश रहावं, हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. रोहित फक्त एवढंच सांगेल की, दुसऱ्यांच्या भावनांसोबत खेळणे चांगलं नाही. इथून पुढे कोणाच्याही भावनांसोबत खेळताना विचार कर, विशेषकरुन मुलींच्या भावनांसोबत खेळू नकोस. यावेळी मी तुला माफ करत आहे, पण पुढच्या वेळी असं काही घडलं, तर मी तुझ्यासोबत कधीच बोलणार नाही."
रोहित म्हणाला,
"हो ग बाई इथून पुढे मी कोणाच्याच भावनांसोबत खेळणार नाही. किर्ती तू काहीच का बोलत नाहीयेस?"
किर्ती म्हणाली,
"रोहित मला मनापासून काही बोलावसं वाटतंच नाहीये. तुम्ही तुमची चूक सुधारत आहात ते चांगलंच आहे, पण प्रिया तू आणि रोहित एक गोष्ट लक्षात ठेवा, नातं कोणतंही असुद्यात, पण जेव्हा आपण त्यांना ठिगळं लावून जोडण्याचा प्रयत्न करतो ना, तिथेच आपण चुकतो. नात्यांमध्ये एक तर दरी पडूच द्यायची नसते. नात्यातील ठिगळं पुन्हा फाटू शकते.
मला तुमच्या दोघांसोबत मैत्री करायची नाही, असं काही नाहीये. पण मला पटकन हे सगळं विसरुन पूर्ववत वागता येणार नाही. मला थोडा वेळ लागेल, तेव्हा तुम्ही दोघेही याचा चुकीचा अर्थ काढू नका."
अक्षरा, किर्ती, प्रिया, रोहित व निखिल मधील मैत्री पूर्ववत होईल का? बघूया पुढील भागात..
©®Dr Supriya Dighe