कॉलेज लाईफ भाग २१
मागील भागाचा सारांश: किर्ती व अक्षरा आदित्यला भेटण्यासाठी कॅफेत जातात. मैत्री या विषयावरुन तिघांमध्ये बरीच चर्चा होते.
आता बघूया पुढे…..
अक्षरा निखिलचा निरोप घेऊन होस्टेलवर जाते. प्रिया रुममध्ये बसलेली असते. अक्षरा एकटीच आलीय हे बघून प्रिया नजरेनेच किर्ती कुठे आहे? असं अक्षराला विचारते, पण अक्षरा प्रियाकडे फारसं लक्ष देत नाही. आपण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहोत, असं प्रियाला वाटायला नको म्हणून अक्षरा म्हणाली,
"प्रिया तु गॅदरिंग मध्ये भाग घेणार आहेस का?"
प्रिया म्हणाली,
"माझ्या आयुष्यात चालू असणाऱ्या गोंधळामुळे मी त्यावर फारसा विचारच केला नाही."
"तुला भरतनाट्यम येतं का?" अक्षराने विचारले.
"नाही" प्रियाने उत्तर दिले.
अक्षरा म्हणाली,
"नाहीतर तु मला आणि सोनालीला जॉईन झाली असतीस."
प्रिया म्हणाली,
"भरतनाट्यम करणं हे तुमच्या सारख्या महान लोकांचं काम आहे. किर्ती कशात भाग घेणार आहे?"
अक्षरा म्हणाली,
"तिचं अजून काही ठरलं नाहीये."
अक्षरा व प्रियाचं बोलणं चालू असताना अक्षराला सोनालीचा फोन येतो आणि ती भरतनाट्यमची प्रॅक्टीस करण्यासाठी निघून जाते. काही वेळांनंतर किर्ती रुममध्ये जाते. अक्षरा रुममध्ये न दिसल्यामुळे किर्ती हिरमुसते. किर्तीला प्रियासोबत काहीही बोलण्याची इच्छा नसल्याने ती अक्षराला फोन लावते, पण तिचा मोबाईल रुममध्येच वाजत असल्याने ती स्वतःशीच बडबडते,
"ही मुलगी रुममध्येच मोबाईल ठेऊन कुठे गेली, काय माहीत?"
किर्तीचं बडबडण ऐकून प्रिया म्हणाली,
"अक्षरा सोनाली सोबत भरतनाट्यमची प्रॅक्टिस करायला गेली आहे. मोबाईलची चार्जिंग कमी असल्याने मोबाईल चार्जिंगला लावून ती गेली."
किर्तीने यावर काहीच रिप्लाय दिला नसल्याने प्रिया पुढे म्हणाली,
"किर्ती कमीत कमी तुझ्यापर्यंत माझं बोलणं पोहचलं की नाही, हे तर मला कळूदेत."
किर्ती म्हणाली,
"मी तुला काही विचारलं होतं का?"
प्रिया म्हणाली,
"किर्ती तू माझ्यासोबत अशीच बोलणार आहेस का? मला मान्य आहे की, मी चुकले आहे. गेल्या काही दिवसांपासून मी तुम्हा दोघींसोबत चांगलं वागले नाहीये, पण त्याला काही कारणे होती."
किर्ती म्हणाली,
"हे बघ प्रिया, मला तुझी कोणतीही कारणे जाणून घ्यायची नाहीये. मला तुझ्यासोबत नॉर्मल व्हायला थोडा वेळ लागेल, तेवढा वेळ मला दे. सध्यातरी मला तुझ्यासोबत बोलण्यात कुठलाच इंटरेस्ट वाटत नाहीये."
एवढं बोलून किर्ती रुममधून निघून गेली. पुढील बरेच दिवस किर्ती प्रियासोबत तुटकपणे बोलत होती. अक्षरा आपल्या भरतनाट्यमच्या प्रॅक्टिस मध्ये व्यस्त असल्याने तिने किर्ती व अक्षरामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही. गंदरिंगच्या आधी डेनीम डे, सारी डे, ट्रॅडिशनल डे, ग्रुप डे यासारख्या डेज साठी लागणारे कपडे अक्षरा व प्रियाने घरुन मागवले होते, तर काही कपडे विकत घेतले होते. अक्षराने तिच्या आयुष्यात पहिल्यांदा आई सोबत नसताना कपड्यांची शॉपिंग केली होती. किर्तीने थोडेफार कपडे विकत घेतले होते.
अक्षराने बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेतला होता, तर किर्तीने वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला होता. निखिलने चेस मध्ये भाग घेतला होता. रोहित व प्रियाने मात्र कोणत्याच स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. प्रियाला आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला होता.
बोलता बोलता गॅदरिंगचा दिवस येऊन ठेपला होता. अक्षरा आपल्या भरतनाट्यमच्या costume मध्ये तयार होऊन बसली होती. तेवढ्यात तिथे निखिल अक्षरासाठी खायला काहीतरी घेऊन गेला.
अक्षरा म्हणाली,
"मला भूक लागली आहे, हे तुला कसं कळलं?"
निखिल म्हणाला,
"अग गेल्या दोन तासांपासून तू तयार होत आहेस. अजून तुमचा परफॉर्मन्स व्हायला बराच वेळ लागणार आहे. एवढ्या वेळात तुला भूक लागणार नाही, असं होऊच शकणार नाही."
अक्षरा म्हणाली,
"तुच माझा खरा मित्र आहेस."
निखिल म्हणाला,
"दोस्ती की हैं तो निभानी पडेगी."
अक्षरा म्हणाली,
"हो ना. मला प्रियाकडे बघून खूप वाईट वाटतंय रे. बिचारी एकटी पडल्यासारखी झाली आहे. किर्ती तिच्यासोबत फारसं बोलत नाहीये आणि मी भरतनाट्यमच्या प्रॅक्टिस मुळे निम्मा दिवस सोनाली सोबतच होते."
निखिल म्हणाला,
"आता यावेळी तू या सगळ्याचा विचार करु नकोस. दोन तीन दिवसांनी आपण दोघींसोबत बोलूयात. मीही रोहित सोबत फारसा बोलत नाहीये. मला त्याच्यासोबत बोलण्याची इच्छाच होत नाहीये."
अक्षरा म्हणाली,
"तू आज कोणत्या विषयावर बोलणार आहेस?"
निखिल म्हणाला,
"ते एक सरप्राईज आहे. चल तुला परफॉर्मन्ससाठी ऑल द बेस्ट."
काही वेळाने अक्षरा व सोनालीचा भरतनाट्यमचा परफॉर्मन्स झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून अक्षरा व सोनालीचे कौतुक केले. सगळे डान्स झाल्यावर निखिलकडे माईक सुपुर्द करण्यात आला.
निखिलने आपल्या थोड्या हटके अंदाजात बोलायला सुरुवात केली,
"हॅलो दोस्तलोग, आप कैसे हो? सब कुछ मजेमे चल रहा है ना. ( उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून निखीलच्या बोलण्याला प्रतिसाद दिला)
हाय फ्रेंड्स, तुम्ही मला ओळखलं असेलच, त्यामुळे मला माझी ओळख करुन देण्याची गरज नाहीये. मी ज्या विषयावर आज तुमच्या सर्वांसोबत बोलणार आहे, तो विषय आपल्या सर्वांच्या मनाच्या जवळचा आहे. तुम्हाला कोणाला अंदाज आला असेलच ना की मी कोणत्या विषयावर बोलणार आहे?
बरोबर ओळखलंत, आज मी 'मैत्री' या विषयावर बोलणार आहे. आज आपण सगळेजण ज्या एका धाग्याने बांधले गेले आहोत, तो धागा म्हणजे मैत्रीचा. आपण सगळेचजण वेगवेगळ्या ठिकाणाहून आलो आहोत. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून आपण आपले मित्र कोण होतील? याचा विचार करत होतो. सगळ्यांच्या कम्फर्ट झोननुसार आपापले मित्र-मैत्रिणी तयार होतात, पण आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे की, मैत्री म्हणजे काय? ती कशी टिकवायची असते?
सर्वप्रथम मैत्री करताना तुमचा एकमेकांवर दृढ विश्वास असला पाहिजे. दोन मित्रांच्या विचार करण्याच्या पद्धती नक्कीच वेगवेगळ्या असू शकतात, पण आपला मित्र आपल्या चांगल्यासाठी, मायेपोटी हे सर्व बोलतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे.
मी असं ऐकलंय की, दोन विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींमध्ये खूप छान मैत्री होते, त्यांची मैत्री शेवटपर्यंत टिकते. आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मनात काय चालू आहे? हे त्याच्या एका शब्दावरुन ज्याला कळते, तोच खरा मित्र किंवा मैत्रिण. आपल्या मित्राबद्दल असणारी काळजी त्याच्या डोळ्यात दिसली पाहिजे.
आपल्या आयुष्यात असा एखादा प्रसंग घडतो, त्यावेळी आपल्याला आपल्या मित्राचं बोलण, वागणं पटत नाही. अशावेळी आपल्या दोघांमध्ये मतभेद, वादविवाद होण्याचे चान्सेस असतात. त्यावेळी आपण एकमेकांना, त्यांच्या विचारांना समजून घेतलं पाहिजे. उगाच मनात गैरसमज निर्माण करुन घेऊ नका.
आपलं कॉलेज संपेल आणि खरं आयुष्य काय असते? हे आपल्या समोर येऊन उभे राहील. आयुष्य जगताना अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागेल, अशावेळी आपलं मन मोकळं कळायला, आपली आपल्या हक्काचा मित्र किंवा मैत्रिण आपल्यासोबत असायला पाहिजे.
एक सॉरी न बोलल्याने जर आपली मैत्री तुटत असेल, तर प्लिज तसं होऊ देऊ नका.
शेवटच्या वर्षी कॉलेजमधून जाताना आपण सोबत फक्त एक डिग्री नाहीतर ह्या कॉलेज, होस्टेलमधील आठवणी सोबत घेऊन जाऊ आणि त्या आठवणीत आपल्या सोबत आपले मित्र मैत्रिणी कायम राहतील. इथे जे मित्र मैत्रिणी आपल्याला भेटतील त्यातील काही जणांसोबत आपला संपर्क शेवटच्या श्वासापर्यंत राहील.
कदाचित मी जे पुढे काही बोलणार आहे, ते तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आवडणार नाही, पण राहवत नाहीये म्हणून बोलतो. मैत्री आणि प्रेम यातील अंतर ओळखा. प्रेमाच्या नादाला लागून चांगले मित्र मैत्रिणी गमावू नका. आपण अश्या वयात आहोत की, इथे आपले हार्मोन्स आपल्याला शांत बसू देणार नाही, पण आपल्याला आपले हार्मोन्स कंट्रोल करावे लागतील. प्रेम जिंकण्याचा प्रयत्न करा, पण मैत्रीत हरु नका.
मैत्री ही कधी होते ऑक्सिजन
तर कधी होते औषध
कधी होते तलवार
तर कधी होते ढाल
कधी होते राग
तर कधी होते प्रेम
कधी होते भांडण
तर कधी होते आठवण
निखिल, रोहित, अक्षरा, प्रिया व पुजा या तिघांमधील मैत्री कशी बहरत जाईल? हे बघूया पुढील भागात…
©®Dr Supriya Dighe
(जे वाचक कॉलेज लाईफ कथेच्या पुढील भागाची वाट पाहत होते, त्यांची सर्वांची मी माफी मागते. गेले काही दिवस मला ह्या कथेचे भाग लिहायला जमले नाही. घाईघाईत कथा पूर्ण करायची म्हणून काहीतरी लिहायचं, हे माझ्या मनाला पटत नाही. इथून पुढे आठवड्यातून कमीत कमी दोन भाग मी पोस्ट करत जाईल.)