कॉलेज लाईफ भाग २०

Story Of College Days

कॉलेज लाईफ भाग २०


मागील भागाचा सारांश: प्रियाच्या आयुष्यात रोहित व प्रविण मुळे उभा राहिलेला गोंधळ प्रियाने अक्षराला सविस्तरपणे सांगितला. किर्ती लायब्ररीतून परत आल्यावर अक्षराने तिला सांगितले की, आपल्याला आपली मैत्रीण परत मिळाली आहे. किर्तीने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. किर्ती व अक्षराला आदित्यला भेटायला जायचे असल्याने त्या हॉस्टेलमधून बाहेर पडल्या.


आता बघूया पुढे…


अक्षरा व किर्ती कॅफेत पोहोचण्याआधीच आदित्य तिथे पोहोचलेला होता. आदित्यला बघून किर्ती म्हणाला,

"सॉरी आम्हाला यायला थोडा उशीरच झाला."


यावर आदित्य म्हणाला,

"अरे नाही, मीच वेळेच्या आधी आलो होतो. माझं काम लवकर संपलं होतं. आपण आत बसून बोलूयात का?"


किर्तीने मान हलवून होकार दिला. किर्ती, आदित्य व अक्षरा कॅफेमध्ये जाऊन एका टेबलजवळ बसले. किर्तीने आदित्यला अक्षराची ओळख करुन दिली. आदित्यने किर्ती व अक्षराला त्यांच्या आवडीनिवडी विचारुन ऑर्डर दिली. तिघांच्या जोरदार गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात अक्षराला कोणाचा तरी फोन आला, ती फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेली. अक्षरा निघून गेल्यावर आदित्य म्हणाला,


"तुझी रुममेट मस्त गप्पा मारते. तु रुममध्ये बोअर होत नसशीलच."


किर्ती म्हणाली,

"अक्षरा एवढीही बडबडी नाहीये. आत्ता तु कॉलेज संदर्भात बोलत होतास, म्हणून ती बोलली. अक्षरा सुरवातीला एवढी मोकळी बोलत नसायची. निखिल सोबत तिची मैत्री झाल्यापासून ती जास्त बोलायला लागली, तिला मुलांसोबत बोलण्याची भीती वाटायची."


किर्ती बोलत असतानाच अक्षरा तिथे आल्यामुळे किर्तीने आपलं बोलणं थांबवलं.

"अक्षू फोन कोणाचा होता?" किर्तीने विचारले.


"सोनालीचा फोन होता. आम्ही दोघी गॅदरिंगमध्ये भरतनाट्यम करणार आहोत ना, मग त्याच्या प्रॅक्टिससाठी आम्ही दोघी रात्री भेटणार आहोत, तेच कन्फर्म करण्यासाठी तिने फोन केला होता." अक्षराने उत्तर दिले.


किर्ती म्हणाली,

"अच्छा, तुम्ही दोघी भरनाट्यम करणार आहात तर. मला वाटलं होतं की, तु आणि निखिल कपल डान्स कराल म्हणून."


अक्षरा म्हणाली,

"कितू तुझं तर काहीपण चालू असतं."


यावर आदित्य म्हणाला,

"सॉरी मी मध्येच बोलत आहे. किर्तीला तुम्ही सगळेच कितू म्हणतात वाटतं."


अक्षरा म्हणाली,

"हो, तिला आम्ही सगळेचजण कितूचं म्हणतो."


आदित्य किर्तीकडे बघत म्हणाला,

"मीही तुला कितू म्हणू शकतो का?"


किर्ती म्हणाली,

"लगेच नाही."


आदित्य म्हणाला,

"बरं मला तुझा तेवढा चांगला मित्र व्हावा लागेल. तुमची गॅदरिंग आहे का?"


किर्ती म्हणाली,

"हो, एका आठवड्याने स्पोर्टस आणि वेगवेगळे डेज चालू होणार आहेत, मग त्यानंतर गॅदरिंग होईल."


आदित्य म्हणाला,

"गुड. किर्ती, अक्षरा गॅदरिंग मध्ये फुल्ल मस्ती, मज्जा करा. कारण हे दिवस आयुष्यात पुन्हा येत नाहीत. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर आपल्यावर इतक्या जबाबदाऱ्या असतात की, ही मज्जा करायला वेळच भेटत नाही. किर्ती सगळ्या फंक्शन्समध्ये सहभागी हो."


किर्ती म्हणाली,

"हो, प्रयत्न करेल."


आदित्य म्हणाला,

"कॉलेजचे दिवस, मित्रांसोबत केलेले राडे हे काही परत येत नाहीत. नोकरी लागल्यापासून मित्रांची भेटचं झाली नाहीये. आम्ही कितीही दूर असलो ना, तरी एका हॅलोवरुन समोरच्याची मनस्थिती समजते. आपल्या भावना, आपली दुःख, स्वप्नं हे फक्त आपल्या मित्रांनाच समजू शकतं. बाकी कोणालाच हे जमत नाही. आयुष्यात खूप जास्त मित्र नसले तरी चालेल, पण जीवाला जीव देणारे, आपलं म्हणणं समजून घेणारे एक दोन मित्र तरी आपल्या आयुष्यात असावे.

इगो ही गोष्ट मैत्रीच्या आड आणू नये. तो मला फोन करत नाही, म्हणून मी कशाला त्याला सारखा सारखा फोन करायचा, हे डोक्यात आणायचे नाही. अश्याने मैत्रीत दुरावा येत चालतो."


"एखादं नातं टिकवायचं असेल तर दोघांनी ते नातं मनापासून निभावलं पाहिजे ना? एकतर्फी नात्याला आयुष्य फार नसतं, मग ते मैत्रीचं असो की प्रेमाचं? हे माझं मत आहे." किर्तीने स्पष्टपणे सांगितलं.


आदित्य म्हणाला,

"किर्ती तु म्हणते ते अगदी खरं आहे. मी तुझ्या मताचा आदर करतो. पण मला एक सांग, आता सध्या अक्षरा व तु दोघी अगदी जवळच्या, घट्ट मैत्रिणी आहात. कॉलेज संपल्यावर तुम्ही दोघी आपापल्या आयुष्यात व्यस्त व्हाल. पण जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी आनंद देणारी किंवा दुःख देणारी घटना घडली, तर ते तुम्हाला एकमेकांसोबत शेअर करावेसे वाटेलचं ना?"


किर्ती म्हणाली,

"बरोबर, पण समजा अक्षराचं माझ्याआधी लग्न झालं, ती तिच्या संसारात व्यस्त असेल, तेव्हा ती स्वतःहून मला कधीच कॉल करणार नाही, तर मी तिला एक दोनदा फोन करेल, पण दरवेळी आपणच का तिला फोन करायचा? असं मला वाटणं स्वाभाविकच आहे ना? इगो आपण मैत्रीत आणायचा नाही, हे मला मान्य, पण स्वाभिमान नावाची गोष्ट असते की नाही? 

आदित्य आम्ही मुली प्रत्येक नात्याच्या बाबतीत पजेसिव्ह असतो. आम्ही समोरच्याला जितकं महत्त्व देतो ना, तितकंच महत्त्व त्यानेही आम्हाला द्यावं, असं वाटण्यात काही चुकीचं नाहीये."


आदित्य म्हणाला,

"हे मुलांनाही वाटतं. मी माझाच एक किस्सा तुला सांगतो. हर्षल नावाचा माझा एक कॉलेजचा मित्र आहे. आम्ही चार वर्ष एकमेकांना सोडलं नव्हतं, गर्लफ्रेंड त्यालाही नव्हती आणि मलाही नव्हती, त्यामुळे जिकडे तिकडे आम्ही दोघचं एकमेकांच्या सोबत असायचो. आमचं दोघांचंही कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालं होतं. कॉलेज संपल्यावर लगेच हर्षलचं लग्न झालं. आमचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट होता, पण हळूहळू तो कमी होत चालला होता. दोन आठवड्यांपूर्वी मला रविवारी जाम बोअर झालं होतं, म्हणून मी त्याला फोन करुन भेटायला ये म्हणून सांगितलं, तर तो आजारी असल्याचं समजलं.

रुमवर बसून कंटाळा आल्याने मी एकटाच मूव्ही बघायला थिएटरला गेलो, तर महाशय आपल्या बायकोसोबत मूव्ही बघायला आले होते, त्याने मला बघितलं नव्हतं. मला हेच समजलं नाही की, मला त्याचा राग का आला असेल, एकतर तो माझ्याशी खोटं बोलला याचा की, तो त्याच्या बायकोसोबत मूव्ही बघायला गेला म्हणून. त्या दिवसापासून मला त्याला फोन करण्याची इच्छाचं झाली नाही."


अक्षरा हसून म्हणाली,

"तुम्हा मुलांमध्ये पण असे गिले शिकवे होत राहतात तर. मला वाटलं होतं की, हा आम्हा मुलींचाच आजार असेल."


आदित्य म्हणाला,

"अमेरिकेला जाण्याआधी मी त्याला फोन करणार आहे. अक्षरा एकटेपणाचा आजार माणसाला जडला की मुलगा, मुलगी बघून कोणी वागत नाही. आपण एकटे असलो की, आपल्यासोबत कोणीतरी सतत असावं, असं वाटतं असतं. मी जरा जास्तच बोललो का? तुम्ही दोघी बोअर झाल्या असतील."


किर्ती म्हणाली,

"नाही, उलट तुझ्या डोक्यात काय चालू होतं? ते बाहेर आलं. आता एक काम कर, हर्षलला भेट आणि त्याला तु त्यांना बघितल्याचं सांग, आणि वरुन हेही सांग की, इथून पुढे असं खोटं बोलू नकोस म्हणून. आदित्य गैरसमज ही नात्याला लागलेली कीड असते."


आदित्य म्हणाला,

"हो, मी अमेरिकेला जाण्याआधी एकदा हर्षलची भेट घेतो."


किर्ती म्हणाली,

"आम्ही निघुयात का?"


आदित्य म्हणाला,

"लगेच."


अक्षरा पुढे म्हणाली,

"कितू तु जरावेळ आदित्यसोबत गप्पा मारत बस. मी होस्टेलवर जाते. आदित्य अमेरिकेला गेल्यावर तुम्हाला दोघांना असं समोरासमोर बसून बोलता थोडीच येणार आहे."


किर्ती म्हणाली,

"आपण दोघी येताना सोबत आलो होतो आणि आता तु एकटीच जायचं म्हणत आहेस, ते बरोबर वाटत नाही."


अक्षरा म्हणाली,

"डोन्टवरी मी निखिलला बोलावून घेते. आम्ही दोघेजण गप्पा मारत मारत जाऊ."


किर्ती म्हणाली,

"ठीक आहे, मग पहिले निखिलला बोलावून घे आणि मगच जा."


काही वेळात निखिल कॅफेजवळ आला, मग अक्षरा त्याच्यासोबत कॉलेजवर परत गेली. किर्ती व आदित्य गप्पा मारत कॅफेत बसले. रस्त्याने चालत जाताना अक्षराने निखिलला प्रियाची संपूर्ण कथा सांगितली, तसेच रोहित प्रियासोबत कसा वागला? हेही सांगितलं. अक्षराचं बोलणं ऐकल्यावर निखिल म्हणाला,


"अक्षरा आपलं मन, शरीर हे आपल्या ताब्यात असावं. जे तु आत्ता प्रियाबद्दल सांगितलंस, त्यात एकट्या रोहितची किंवा प्रविणची चूक नाहीये, तर त्यात प्रियाही तेवढीच चुकीची आहे. रोहित हा कसा मुलगा आहे? हे मला चांगलंच ठाऊक आहे. प्रियाने वेळीच स्वतःला रोखलं पाहिजे, नाहीतर हे प्रकरण कुठच्या कुठे पोहोचून जाईल."


अक्षरा म्हणाली,

"मी तसं प्रियाला समजावलं आहे. बघू मॅडमच्या डोक्यात काही घुसतं का? शेवटी ज्याचा हात मोडेल, त्याच्या गळयात पडेल."

©®Dr Supriya Dighe







🎭 Series Post

View all