कॉलेज लाईफ भाग १
(नमस्कार वाचक मित्र मैत्रिणींनो, आजवर तुम्ही माझ्या सर्वच कथांना भरभरुन प्रतिसाद दिलात, याही कथेला असाच प्रतिसाद द्याल अशी मी आशा करते. माझ्या कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर कृपया हा भाग फेसबुक पेजवर आल्यावर एक लाईक द्या म्हणजे तुम्हाला माझी कथा आवडल्याचे माझ्या पर्यंत पोहोचेल आणि पुढील भाग लिहिण्यास मला प्रेरणा मिळेल.)
सामानाची आवराआवर करता करता झोपायला अक्षराला रात्रीचे ११ वाजून गेले होते. अक्षरा ह्या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होती, तिला काही केल्या झोप लागत नव्हती, कारणही तसेच होते. अक्षरा दुसऱ्या दिवशी पुढील शिक्षण घेण्यासाठी पुण्याला जाणार होती. पुढील चार ते पाच वर्षे अक्षराला घरापासून लांब रहावे लागणार होते. आपल्या माणसांपासून दूर जाताना खरं तर अक्षराला वाईट वाटतं होतं पण पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असल्याने तिला पुण्याला जावेच लागणार होते. अक्षराला आता आपली कॉलेज लाईफ सुरु होईल याचा आनंदही वाटत होता आणि आई पासून दूर जावे लागणार ह्याचे वाईट सुद्धा वाटत होते, तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. पहाटे पहाटे अक्षराला झोप लागली होती. अक्षराला आईने झोपेतून लवकर उठवले. अक्षरा उठल्यावर आई तिला म्हणाली," अक्षू उद्या पासून मी तुला झोपेतून उठवायला नसेल, रात्री झोपताना आठवणीने बेल लावून झोपायचं, नाहीतर तुला दररोज कॉलेजला जायला उशीर होईल."
अक्षरा म्हणाली," आई उद्यापासून होईल ते होईल पण त्या सगळ्याची आजच आठवण करुन देऊ नको ना. मला एकतर त्या सगळ्याचा विचार करुन मनात धडकी भरली आहे. तुझ्या शिवाय राहणं म्हणजे मला वेगळंच वाटत आहे."
अक्षराची आई तिच्या जवळ आली व तिच्या चेहऱ्यावरुन हात फिरवत म्हणाली," अक्षू बाळा काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागतेच, तुला खूप शिकायचे आहे आणि स्वतःच्या पायावर उभे रहायचे आहे हे लक्षात ठेव, इथून पुढंच तुझं आयुष्य सोपं नसणार आहे, तुझ्यापुढे अनेक संकटे उभे राहतील त्या सर्वांना तुला एकटीला तोंड द्यावं लागणार आहे. तुला माणसं ओळखता यायला हवी, इथे आम्ही तुझ्या सोबत होतो पण आता तुला तुझी स्वतःची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आता तु मोठी झाली आहेस, समोरच्या व्यक्तीसोबत बोलताना, वागताना तुला विचार करावा लागणार आहे. अक्षू तुला खूप अभ्यास करायचा आहे. तुझ्या स्वप्नातील कॉलेज लाईफ आणि वास्तविकतेतील कॉलेज लाईफ खूप वेगळी असणार आहे. शेवटी एकच सांगेल की कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आपण कुठून आलो आहोत, आपले आई वडील कोण आहेत या सर्वाचा विचार कुठलंही पाऊल उचलताना कर."
अक्षरा म्हणाली," आई तुझ्या शेवटच्या वाक्याचा हेतू मला समजला नाही."
आई म्हणाली," माझ्या बोलण्याचा हेतू, अर्थ तुला वेळ आल्यावर आपोआप समजेल. माझी व तुझ्या बाबांची मान खाली जाईल असं काही करु नकोस. खूप कष्टातून आम्ही तुला शिकवत आहोत हे लक्षात ठेव. आपण गप्पा काय मारत बसलो आहोत, चल उठ पटकन तु तुझं आवरुन घे,तुम्हाला निघायला उशीर होईल."
एवढं बोलून आई आपल्या कामाला निघून गेली. अक्षराने आईच्या बोलण्याचा विचार करता करता आपलं पटकन आवरुन घेतली. अक्षरा उरलेलं सामान आपल्या बॅगमध्ये भरत असताना तिचा मोठा भाऊ तिच्या रुममध्ये येऊन म्हणाला," अक्षू बॅग भरुन झाली का?"
अक्षरा म्हणाली," हो दादा, थोडं सामान राहिलं होतं तेच बॅगमध्ये भरत होते. दादा तु होस्टेलला जात असताना आई तुला काही बोलली होती का?"
दादा म्हणाला," हो तुला बोलून झालेलं दिसतंय. मलाही आई बरंच काही बोलली होती,त्यांच्या अनुभवाचे बोल असतात ते, आपण आपल्या डोक्यात ते सेव्ह करुन ठेवायचे असतात. अक्षू मी तुला एवढंच सांगेल की सुरवातीला होस्टेलला राहताना खूप ऍडजस्टमेंट कराव्या लागतात, तिकडे गेल्यावर चार घरच्या चार वेगळ्या मुली तुला भेटतील, त्या सर्वजणी वेगळ्या वातावरणात वाढलेल्या असतील, त्यांचे विचार तुझ्या विचारांपेक्षा वेगळे असतील तेव्हा तुझे सगळ्यांशी जमेलच असे होणार नाही पण तुला त्यांच्या सोबत जमवून घ्यावे लागणार आहे कारण पुढील चार ते पाच वर्ष तुला त्यांच्या सोबत काढावे लागणार आहे. अक्षू आपली वाढ एका खेडेगावात झाल्याने आपलं बोलणं, वागणं थोडं वेगळं असतं तर त्यावरुन जर तुझी कोणी उडवली तर त्याचं फारसं वाईट वाटून घ्यायचं नाही, आपल्या अभ्यासातून आपण त्यांच्या पेक्षा वरचढ आहोत हे दाखवून द्यायचे आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट आजपर्यंत तु आपल्या इथल्या शाळेतील मुलांसोबत फारशी बोललेली नसशील पण कॉलेजमध्ये गेल्यावर तुझा मुलांशी संपर्क येईल तेव्हा सगळ्यांसोबत बोलायचे पण त्यांच्यापासून ठराविक अंतर दूर रहायचे. तुला कुठलीही अडचण आली, काही शेअर करावंसं वाटलं तर मला बिनधास्त फोन करायचा."
अक्षरा म्हणाली," दादा आपण दोघेही पुण्यात असतो तर किती बरे झाले असते ना, तु मुंबईत आणि मी पुण्यात."
दादा म्हणाला," तुला माझी आठवण आली की मला फोन कर, मी तुला भेटायला येत जाईन, आपल्या गावपेक्षा मुंबई पुणे जवळ आहे."
अक्षराने मान हलवून होकार दिला. तेवढ्यात आई तिच्या रुममध्ये येऊन म्हणाली," अक्षू आवरायला किती वेळ लावणार आहेस, तुझे बाबा निघण्याची घाई करत आहेत, अग पाच ते सहा तासांचा प्रवास आहे, तुला सोडून बाबांना घरी परत यायचे आहे आणि प्रसाद तु काय यावेळी अक्षू सोबत गप्पा मारत बसला आहेस, ती नाश्ता करेपर्यंत तु तिच्या बॅगा गाडीत ठेव बरं."
पुढच्या अर्ध्या तासात अक्षरा नाश्ता करुन पुण्याला जाण्यासाठी घराबाहेर पडत होती तेव्हा अक्षराची आई म्हणाली," अक्षू बाळा मी जे सांगितलं ते सर्व लक्षात ठेव, तुला भूक लागेल म्हणून मी चिवडा व लाडू दिला आहे, ते खाऊन घे. व्यवस्थित रहा, स्वतःची काळजी घे. फोन करत जा."
अक्षरा आईच्या पाया पडली, आईला मिठी मारली तेव्हा दोघींच्याही डोळ्यात पाणी होते तेव्हा प्रसाद म्हणाला," आई अक्षू होस्टेलला चालली आहे, सासरी नाही."
आई म्हणाली," गप रे, तुला आईची माया कळणार नाही."
अक्षरा आईचा व प्रसाद दादाचा निरोप घेऊन गाडीत बसली. अक्षराला सोडायला फक्त तिचे बाबा जाणार होते. गाडी पुण्याकडे रवाना झाल्यावर बाबा तिला म्हणाले," अक्षू बाळा सर्व काही घेतलं आहेस ना?"
"हो बाबा" अक्षराने उत्तर दिले.
बाबा गाडी चालवत असल्याने त्यांचं पूर्ण लक्ष गाडी चालवण्याकडे होते. अक्षरा आपली खिडकीतून बाहेर बघत होती तेव्हा तिच्या मनात अनेक विचार येत होते, मूव्हीमध्ये दाखवता तसेच कॉलेज लाईफ असेल का? माझ्या मित्र मैत्रिणींचा मोठा ग्रुप असेल का? माझ्या रुममेट कोण व कश्या असतील? माझी एखादी बेस्ट फ्रेंड असेल का? मेसचं जेवण चांगलं असेल का? अश्या प्रकारचे अनेक प्रश्न अक्षराच्या मनात येत होते, या सगळ्याचा विचार करुन तिच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता. थोडं पुढे गेल्यावर जेवण करण्यासाठी बाबांनी गाडी एका हॉटेल समोर थांबवली. जेवण केल्यावर बाबा लगेच पुण्याच्या दिशेने निघाले.
पुण्याची सीमा सुरु झाल्यावर अक्षरा आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती, ती पहिल्यांदाच पुणं बघत होती. अक्षरा विचार करत होती की आता हे नवीन वाटणार शहर काही दिवसांनी एकदम आपलंसं होऊन जाईल. रस्त्याच्या आजूबाजूला मॉल बघताना अक्षरा तिथे येऊन शॉपिंग करण्याचं स्वप्न बघत होती. सुरवातीला कॉलेज जवळ गाडी थांबवून बाबा म्हणाले," अक्षू कॉलेज बंद होण्याच्या आत आपण तुझं ऍडमिशन करुन घेऊयात म्हणजे मला आजच्या आज निघून जाता येईल."
अक्षरा व तिचे बाबा कॉलेजच्या ऑफिसमध्ये गेले. अक्षरा कॉलेजची भव्यदिव्य इमारत बघून भारावून गेले होती. उद्यापासून आपणही ह्या कॉलेजचा एक भाग असू हा विचार करुनच तिला भारी वाटत होते. कॉलेज मधील इतर विद्यार्थ्यांना अक्षरा न्याहाळत होती. ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बाबांनी गाडी होस्टेलच्या दिशेने घेतली, कॉलेज व होस्टेल जवळ जवळच होते. होस्टेलला जाऊन अक्षराच्या बाबांनी रेक्टरकडे जाऊन तिच्या तेथील ऍडमिशनची निश्चिती करुन घेतली. रेक्टरने अक्षराचा रुम नंबर सांगितला. रेक्टरची परवानगी घेऊन अक्षराचे बाबा तिच्या रुममध्ये सामान ठेवायला गेले, त्या रुममध्ये अक्षराच्या आधीच दोन मुली येऊन बसलेल्या होत्या, त्यातील एकजण शांत बसलेली होती तर दुसरी मोबाईल मध्ये काहीतरी बघत बसलेली होती. अक्षरा व तिचे बाबा रुममध्ये गेल्यावर दोघी मुलींनी त्यांच्याकडे बघून स्माईल दिली. सामान ठेऊन अक्षराचे बाबा लगेच होस्टेलच्या खाली गेले, त्यांच्या पाठोपाठ अक्षराही गेली.
बाबा म्हणाले," अक्षू मी निघतो आता. तुझ्याकडे जे ए टी एम कार्ड दिलेलं आहे ते सांभाळून ठेव, पैश्यांची गरज लागली की थोडे थोडे काढत जा. अजून कसली आवश्यकता असेल तर मला फोन कर. स्वतःची काळजी घे, नीट रहा.मन लावून अभ्यास कर.मी येतो "
एवढं बोलून अक्षराचे बाबा निघून गेले. बाबा गेल्यावर अक्षराच्या डोळयात पाणी आले होते. पाणावलेल्या डोळयांनी अक्षरा रुममध्ये गेली.
अक्षराच्या कॉलेज लाईफची सुरुवात कशी होईल, तिच्या स्वप्नातील कॉलेज लाईफ व वास्तविकतेतील कॉलेज लाईफ सारखंच असेल का? बघूया पुढील भागात...
©®Dr Supriya Dighe
