कॉलेज लाईफ भाग १७

Journey Of Priya And Pravin
कॉलेज लाईफ भाग १७

मागील भागाचा सारांश: अक्षराने प्रियाला खूप आग्रह केल्यावर प्रियाच्या आयुष्यात काय घडून गेलं होतं? हे तिने अक्षराला सांगायला सुरुवात केली. प्रिया व प्रविणची भेट कशी व कुठे झाली? हे प्रियाने अक्षराला सांगितले.

आता बघूया पुढे….

"प्रविणने त्याच्या प्रेमाची कबुली दिल्यापासून मला त्याच्यासोबत काय आणि कसे बोलावे? हेच कळत नव्हते. मी प्रविणला सरळसरळ माझ्या मनातील सांगूही शकत नव्हते. मला प्रविण मनापासून आवडत होता,पण घरी आमच्याबद्दल कळाल्यावर काय होईल? हा विचार करुन मी प्रविणला लगेच काहीच उत्तर दिले नाही. 

मी त्या दिवशी प्रविण समोर जाणं टाळत होते. रश्मी तिच्या मैत्रिणीच्या घरुन कधी एकदा येते असं मला झालं होतं. मी रश्मीच्या रुममध्ये बसून होते. प्रविणने दरवाजावर नॉक करुन विचारले,

"मी आत येऊ का?"

आता मी त्याच्याच घरी त्याला रुममध्ये यायला कसं नाही म्हणू शकत होते. मी नकळतपणे मान हलवून होकार दिला.

प्रविण रुममध्ये येऊन म्हणाला,
"सॉरी प्रिया. मी माझ्या मनात काय आहे? हे व्यक्त करण्याचा नादात तुझा विचारच केला नाही. तुला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ घे. तु मला नाही म्हणालीस तरी चालेल."

प्रविणच्या डोळयात त्याला झालेला पश्चाताप मला दिसत होता. मी म्हणाले,
"प्रविण तु सॉरी का म्हणत आहेस?"

मी एवढं बोलत असतानाच दरवाजावरील बेल वाजली, म्हणून प्रविण दरवाजा उघडण्यासाठी बाहेर गेला, तर प्रिया आलेली होती. प्रिया घरी आल्यामुळे आमचं बोलणं अर्धवटच राहिलं होतं. प्रविणचं माझ्यावर असणारं प्रेम मला त्याचा डोळयात दिसत होतं. घरात सर्वजण असताना सुद्धा तो माझ्याकडे टक लावून बघत बसायचा. मला त्याच माझ्याकडे बघणं आवडायला लागलं होतं. काही वस्तू हातात देताना घेताना नकळत होणारा त्याचा तो स्पर्श मला आवडत होता. 

माझी सुट्टी संपली होती. बाबांनी मला घरी यायला सांगितलं होतं. बाबांना मला घ्यायला यायला जमणार नव्हतं, म्हणून त्यांनी प्रविणच्या बाबांना सांगितलं होतं की,
" प्रियाला सोलापूरला जाणाऱ्या बसमध्ये बसवून द्या."

त्याच दिवशी प्रविणला पुण्याला जायचं होतं,म्हणून तोच मला बसमध्ये बसवून देणार, असं ठरलं होतं. 
ठरल्याप्रमाणे प्रविण व मी त्याच्या घरुन निघालो. बस स्टँडवर जाईपर्यंत प्रविण माझ्यासोबत काहीच बोलला नाही. बस स्टँडवर गेल्यावर सोलापूरची बस यायला दहा ते पंधरा मिनिटे अवकाश होता, आम्ही स्टँडमधील एका बाकड्यावर बसलो होतो. प्रविण माझ्यासोबत का बोलत नाही? हेच मला कळत नव्हते.

प्रविण काहीच बोलत नसल्याने मीच न राहवून म्हणाले,
"प्रविण तु माझ्यासोबत बोलत का नाहीये?"

प्रविण म्हणाला,
"मला जे बोलायचं होतं, ते मी बोललो. आता बोलण्याची तुझी वेळ आहे."

मी काही बोलणार इतक्यात माझी बस आली, म्हणून आम्ही बसच्या दिशेने निघून गेलो. प्रविणने बसमध्ये चढून माझ्यासाठी जागा पकडली. बसला बरीच गर्दी होती. मी सगळयात शेवटी बसमध्ये चढले. प्रविण बसलेल्या सीटवर मी जाऊन बसले.

मी म्हणाले,
"प्रविण तू आता जाऊ शकतो. तुला पुण्याला जायला उशीर होईल."

प्रविण म्हणाला,
"मी कुठेही जाणार नाहीये. मी तुझ्यासोबत सोलापूरला येणार आहे."

मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणाले,
"अरे पण का?"

प्रविण म्हणाला,
"मला तुझ्यासोबत हा प्रवास करायचा आहे. तुझ्यासोबत प्रवास करण्याची अशी संधी मला पुन्हा मिळणार नाही. मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. तुझ्या डोळयात माझ्याबद्दल ज्या भावना आहेत, त्या तुझ्या तोंडून मला ऐकायच्या आहेत."

मी म्हणाले,
"अरे पण सोलापूरच्या बस स्टँडवर बाबा मला घ्यायला येतील, त्यांनी तुला बघितल्यावर त्यांना काय उत्तर देशील?"

प्रविण म्हणाला,
"तु सर्वांत आधी बसमधून उतर, मी सगळयात उशीरा बसमधून उतरेल. आपण त्या सगळ्याचा विचार नंतर करुयात."

मी म्हणाले,
"अरे पण, तुला पुण्याला पोहोचायला खूप उशीर होईल."

प्रविण म्हणाला,
"होऊदेत."

मी प्रविणला सोलापूरला न येण्याचे बरेच कारणं देत होते,पण तो माझं काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी तो माझ्यासोबत बसमध्ये आलाच. कंडक्टर आल्यावर त्यानेच माझंही तिकीट काढलं. बसची वाटचाल सोलापूरच्या दिशेने सुरु झाली.

माझा प्रविणसोबतचा तो पहिला प्रवास होता. खरं तर मला मनापासून आनंद झाला होता. मुंबई ते सोलापूरचा प्रवास सात ते आठ तासांचा होता. 

प्रविण माझ्याकडे बघून म्हणाला,
"तुला मला काहीतरी सांगायचं आहे ना?"

मी म्हणाले,
"असं मी कधी बोलले."

प्रविण म्हणाला,
"तुझे डोळे मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत."

प्रविण अश्या प्रकारे बोलून मला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्याने मला बोलायला भागचं पाडलं. माझं त्याच्यावर प्रेम असल्याचं मी कबूल केलं.

प्रविणचा हात हातात घेऊन, त्याच्यासोबत गप्पा मारत सोलापूर कधी आले? हे मला समजलेच नाही. प्रविणकडे मोबाईल होता, त्याने मला त्याचा नंबर दिला आणि किमान पंधरा दिवसांतून एकदा तरी फोन कर, असं मला त्याने सांगितलं. 

बस स्टँडवर बाबा मला घ्यायला येणार असल्याने तो बसमध्येच बसून राहिला. मी पटकन बसमधून उतरुन गेले. मी बाबांसोबत घरी निघून गेले, त्यानंतर प्रविण कसा व कधी पुण्याला गेला? याची मला कल्पनाच नव्हती. घरात सतत कोणीना कोणी असल्यामुळे मला प्रविणला फोन करुन तो पोहोचला की नाही? हेही विचारता आले नाही.

काही दिवसांनी माझा दहावीचा निकाल लागला, निकाल विचारण्याच्या निमित्ताने प्रविणने माझ्या घरी फोन केला, त्यामुळे आम्हाला दोन तीन शब्द तरी बोलता आले.

मी अकरावी सायन्सला ऍडमिशन घेतलं. कॉलेज सुरु झाल्यावर कॉलेजच्या जवळ एक पीसीओ होता, त्यावरुन मी प्रविणला फोन करायचे. सुरवातीला पंधरा दिवसांनी एकदा फोन करायचे. हळूहळू आठवड्यातून दोनदा मी त्याला फोन करायला लागले. 

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी प्रविणने कॉलेज बाहेर येऊन मला सरप्राईज दिले. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पहिल्यांदा मी प्रविणला मिठी मारली होती. माझी सोनल नावाची मैत्रीण होती, तिला प्रविणबद्दल सर्व काही माहीत होतं. प्रविण तिला भेटलाही होता. सोनल नेहमी मला एकच सल्ला द्यायचा की, 

"तु प्रविण पासून दूर राहत जा. असं लांब राहून कोणी कोणावर प्रेम करत नाही, तो तुझ्यासोबत फक्त टाईमपास करत आहे." 

मी सोनलच्या बोलण्याकडे कधी लक्ष द्यायचे नाही, पण तिचं बोलणं मनात कुठेतरी खोलवर रुजून बसत होतं. प्रविण मला भेटण्यासाठी दोन तीन महिन्यातून एकदा तरी सोलापूरला यायचा. प्रविण शक्यतो शनिवारी यायचा. शनिवारी मला कॉलेजला निम्म्या दिवस सुट्टी असायची. घरी मी मैत्रिणींसोबत अभ्यास करणार असल्याचं निमित्त सांगायचे.

दिवसामागून दिवस जात होते. आमच्यातील प्रेम फुलत चालले होते. दररोज प्रविण आपल्या डोळ्यासमोर असावा अशी इच्छा होत होती. मी स्वतःहून प्रविणला भेटण्यासाठी फोन करुन बोलावून घ्यायचे.

मी बारावीत असताना माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं. मी बारावीत असल्याने मला माझे आई बाबा लग्नाला यायला नको म्हणाले होते. मला तर प्रविणला भेटायचे होते, म्हणून काही झालं तरी मला लग्नाला जायचंच होतं. मी लग्नावरुन आल्यावर अजिबात टाईमपास करणार नाही, असं मी बाबांना प्रॉमिस केल्यावर मला लग्नाला जाण्याची परवानगी मिळाली होती.

आम्ही जाण्यापूर्वीच रश्मी, प्रविण व त्यांचे आईबाबा मावशीच्या घरी आलेले होते. प्रविण व मला आम्हाला दोघांना एकमेकांशी बोलायला एकांत मिळतंच नव्हता, त्यामुळे प्रविणची खूप जास्त चिडचिड होत होती. प्रविणला सतत कोणीतरी काहीना काही काम सांगत होते.

अखेर एक काम असं निघालं की, त्यासाठी प्रविण व मला आम्हाला दोघांना जावं लागणार होतं. अखेर आम्हाला आमचा क्षण मिळाला होता. प्रविण व मी मावशीच्या घरुन काकांच्या गाडीत बसून निघालो. थोडं पुढे गेल्यावर प्रविणने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि मला कडकडून मिठी मारली. पुढील दहा ते पंधरा मिनिटे आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो. 

मी म्हणाले,
"प्रविण आपल्याला जायला हवं, नाहीतर सगळेजण आपल्या नावाने ओरडत बसतील."

प्रविण माझा हात हातात घेऊन म्हणाला,
"प्रिया मी आलो त्यादिवसापासून या क्षणाची वाट बघत होतो. प्रिया तु मोबाईल का घेत नाही? म्हणजे आपल्याला हवं तेव्हा फोनवर बोलता येईल."

मी म्हणाले,
"बारावी झाल्याशिवाय मोबाईल मिळणार नाही, अशी बाबांनी सक्त ताकीद दिली आहे."

माझं बोलणं पूर्ण होण्याच्या आतच प्रविणला घरुन कोणाचा तरी फोन आला होता. आता आम्हाला पटकन निघावं लागणार होतं. फोन ठेवल्यानंतर प्रविणने जे केलं, तेव्हा तो असं काही करेल, असं मला वाटलंही नव्हतं.

आजपर्यंत जेव्हा जेव्हा माझी व प्रविणची भेट व्हायची, तेव्हा तो माझा हात हातात घेऊन बसायचा किंवा फारतर फार एखादी मिठी मारायचा. त्यादिवशी मात्र त्याने चक्क मला किस केलं. मी त्याच्याकडे आश्चर्याने बघतच होते. तो माझ्याकडे बघून म्हणाला,
"तुला आवडलं नाही का?"

मी काहीच बोलले नाही. आम्ही गप्पा मारत मारत काम करुन मावशीच्या घरी परत गेलो. पुढील दोन दिवसांनी दादाचं लग्न झाल्यावर आम्ही आपापल्या घरी निघून गेलो.

©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all