कॉलेज लाईफ भाग १५

Story Of College Days

कॉलेज लाईफ भाग १५


मागील भागाचा सारांश: प्रिया रात्री उशिरा होस्टेलला परत आली होती. प्रिया किर्ती व अक्षरा सोबत व्यवस्थित भाषेत बोलली नाही. प्रियाला आपल्या मैत्रीची गरज नाहीये, हे अक्षरा व किर्तीच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रियासोबत न बोलण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी वर्गात प्रिया किर्ती व अक्षराच्या शेजारी न बसता त्यांच्यापासून लांब असणाऱ्या बेंचवर बसली.


आता बघूया पुढे....


प्रियाचं जेवण झाल्यावर ती मेसमधून निघून गेली, ती गेल्यानंतर किर्ती म्हणाली,

"अक्षू तु प्रिया शेजारी जेवायला का बसली होतीस?"


अक्षरा म्हणाली,

"मी नाही, तीच माझ्याशेजारी येऊन बसली होती."


किर्ती म्हणाली,

"प्रिया तुझ्यासोबत काही बोलली का?"


अक्षरा म्हणाली,

"नाही. प्रिया होती म्हणून मी तुला विचारलं नाही. तुला फोन कोणाचा आला होता?"


किर्ती म्हणाली,

"अग आदित्यचा फोन आला होता. संध्याकाळी तो काहीतरी कामानिमित्ताने आपल्या कॉलेज जवळच्या एरियात येणार आहे, मग तो म्हणत होता की, आपण भेटुयात का?"


अक्षरा म्हणाली,

"मग तु काय उत्तर दिलेस?"


किर्ती म्हणाली,

"मी त्याला सांगितलं की, माझ्या एका मैत्रिणीला तुला भेटायचं आहे,तिला घेऊन आलं तर चालेल का?"


अक्षरा म्हणाली,

"मग तो काय म्हणाला?"


किर्ती म्हणाली,

"आदित्य तुला भेटणार आहे."


अक्षरा म्हणाली,

"मस्तचं, आपण किती वाजता त्याला भेटायला जाणार आहोत?"


किर्ती म्हणाली,

"मी आत्ता लायब्ररीत जाऊन तिथलं काम संपवून येते. संध्याकाळी तो इकडे आल्यावर मला फोन करणार आहे, मग आपण जाऊयात."


अक्षरा म्हणाली,

"तोपर्यंत मी जरा आराम करते."


जेवण झाल्यावर अक्षरा रुममध्ये गेली तर किर्ती लायब्ररीत निघून गेली. अक्षरा रुममध्ये जाण्याच्या आधी प्रिया रुममध्ये गेली होती. प्रिया अक्षराला बघून म्हणाली,

"कितू लायब्ररीत गेली का?"


"हो" अक्षराने प्रियाकडे न बघता उत्तर दिले.


प्रिया म्हणाली,

"अक्षू माझ्याकडे बघून बोलणार नाहीयेस का?"


अक्षरा म्हणाली,

"तुलाच आमच्या सोबत बोलायचे नव्हते ना?"


प्रिया म्हणाली,

"तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावत आहात. तुम्ही माझ्या आई वडिलांप्रमाणे जी डिटेक्टिव्हगिरी करत होता ना! ती मला आवडली नव्हती, म्हणून मी रागाच्या भरात बोलून गेले."


अक्षरा म्हणाली,

"प्रिया आम्हाला तुझी काळजी वाटत होती, म्हणून आम्ही तुझी चौकशी करत होतो."


प्रिया म्हणाली,

"अक्षू मी खूप विचित्र परिस्थितीत अडकले आहे. मला तुमच्या पासून काही लपवायचे नाहीये, पण मी तुम्हाला सगळं खरं सांगूही शकत नाहीये. आज तुमच्यापासून वर्गात वेगळं बसल्यावर मला खूप वाईट वाटतं होतं. तुम्ही मला तुमच्या जवळ बसायला बोलावलं नाही."


अक्षरा चिडून म्हणाली,

"प्रिया तु डोक्यावर पडली आहेस का? जी मुलगी आम्हाला काल रात्री म्हणाली की, मला तुमच्या मैत्रीची गरज नाहीये. आता तुच सांग की, ज्या मुलीला आमच्या मैत्रीची गरज नाहीये, तिला आम्ही आमच्या सोबत बसायला का बोलवू? तु स्वतःहून आली असतीस तर, आम्ही तुला लोटून दिले नसते. तु ज्या विचित्र परिस्थितीत सापडली आहेस, त्याबद्दल तुला आमच्या सोबत काही बोलायचेही नाहीये, मग आम्ही तुझी मदत पण करु शकणार नाही. तु जर काही स्पष्टपणे सांगितलं, तरंच आम्ही तुझी काही मदत करु शकतो ना?"


प्रिया काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजला. प्रिया फोन घेऊन रुमच्या बाहेर जात असताना अक्षरा म्हणाली,

"प्रिया तु आमच्या समोर फोनवर बोलणं सुद्धा टाळत आहेस, मग आम्हाला तुझा काय प्रॉब्लेम आहे हे कसं समजणार? प्रिया मी एकच सांगते की, नात्यांत बॅलन्स ठेवायला शिक. आम्ही मैत्रिणी आमच्या जागी आणि तो तुझा फोनवाला त्याच्या जागी आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुझ्याकडे माझ्यासोबत बोलायला वेळ असेल, तेव्हाच माझ्यासोबत बोलायला ये."


प्रिया काही न बोलता फोन हातात घेऊन निघून गेली. प्रिया निघून गेल्यावर सोनाली दरवाजात येऊन म्हणाली,

"अक्षरा आत येऊ का?"


अक्षरा म्हणाली,

"सोनाली, अग ये ना. काय म्हणतेस?"


सोनाली म्हणाली,

"तुमच्यात आणि प्रिया मध्ये काही खटकलं आहे का?"


अक्षरा म्हणाली,

"तु हे विचारण्यासाठी आली होतीस का?"


सोनाली म्हणाली,

"नाही ग. मी एका वेगळया कामासाठी आले होते. वर्गात तुम्ही तिघी एकत्र बसलेल्या नव्हत्या, म्हणून विचारलं."


अक्षरा म्हणाली,

"त्या विषयावर आपण नंतर बोलू. तु काय काम घेऊन आली होतीस?"


सोनाली म्हणाली,

"तुला कथ्थक, भरतनाट्यम यातील काही येतं का?"


अक्षरा म्हणाली,

"शाळेत असताना भरतनाट्यम शिकले होते. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर पण केलं होतं. पण नववीनंतर एकदाही भरतनाट्यम केलं नाहीये. का ग?"


सोनाली म्हणाली,

"कॉलेजची गॅदरिंग आहे, तर म्हटलं की भरतनाट्यम करावं. मी माझ्यासाठी पार्टनर शोधत होते. तुला भरतनाट्यमचं बेसिक नॉलेज आहेच, थोडी प्रॅक्टिस केली की जमून जाईल. मी तुला स्टेप्स शिकवते. मला गृप डान्समध्ये परफॉर्म करायला जमत नाही. आमचा पूर्ण गृप मिळून एक डान्स बसवणार आहे. मला त्यात काही इंटरेस्ट नाहीये."


अक्षरा म्हणाली,

"मला भरतनाट्यम करायला आवडेल. आपण रात्री एकदा प्रॅक्टिस करुन बघू. मला थोडंफार जमलं तर पुढे continue करु."


सोनाली म्हणाली,

"चालेल. रात्री जेवण झालं की मी तुझ्याकडे येते. अक्षरा मी तुला माझी चांगली मैत्रीण मानते, म्हणून मला तुला एक सांगायचं आहे. मला तुमच्या तिघींच्या मैत्रीत फूट पाडायची नाहीये."


अक्षरा म्हणाली,

"सांग ना."


सोनाली म्हणाली,

"सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजला माझी एक चुलत बहीण आहे. काल मी तिला भेटण्यासाठी तिच्याकडे गेले होते, तर तिथे मला प्रिया एका मुलासोबत दिसली, तो मुलगा माझ्या बहिणीचा क्लासमेट आहे. सुरवातीला प्रिया आणि तो मुलगा एकटेच कॅन्टीनमध्ये बसलेले होते. काही वेळाने रोहित तिथे आला, त्यानंतर त्या तिघांमध्ये बऱ्याच वेळ बोलणं चालू होतं. जसे काही ते तिघेजण एकमेकांना खूप आधीपासून ओळखत असल्यासारखे ते गप्पा मारत होते. काही वेळानंतर प्रिया रोहितच्या गाडीवर बसून निघून गेली.

हल्ली प्रिया तुमच्या सोबत जास्त दिसत नाही, याचं कारण रोहित किंवा तो मुलगा असू शकतो,असं मला वाटतं आहे. तुला जर त्या मुलाबद्दल काही माहिती हवी असेल, तर मी माझ्या बहिणीला विचारु शकते. "


अक्षरा म्हणाली,

"थँक्स सोनाली. तु मला हे सांगून आमची खूप मोठी मदत केली आहे. मला अजून काही माहिती लागली, तर मी तुला नक्की विचारेल. सोनाली प्रिया आमची चांगली मैत्रीण आहे, पण ती हल्ली आम्हाला काहीच सांगत नाही. शेवटी हे तिचं आयुष्य आहे, तिला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा हक्क आहे. प्रिया कुठल्या अडचणीत सापडू नये. एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे."


सोनाली म्हणाली,

"ते तर आहेच. अक्षरा मी तुला हे सांगितलं, हे प्रियाला सांगू नकोस. मला त्यामुळे फारसा फरक पडणार नाही, पण त्यामुळे माझ्या बहिणीला त्रास व्हायला नको, तो मुलगा कसा व कोण आहे? याबद्दल आपल्याला काही माहीत नाही."


अक्षरा म्हणाली,

"डोन्ट वरी, मी प्रियाला तुझं नाव कळू देणार नाही. मला तुझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला आहे."


सोनाली म्हणाली,

"रात्री भेटुयात मग. मी जाते."


सोनाली रुममधून बाहेर पडल्यावर प्रिया रुममध्ये आली.

प्रिया अक्षराला म्हणाली,

"काल तु माझी चौकशी करण्यासाठी रोहितला फोन केला होतास का?"


अक्षरा म्हणाली,

"हो."


प्रिया म्हणाली,

"पण का? तू त्याला फोन का केला होता?"


अक्षरा म्हणाली,

"रोहित आपल्या ग्रूपमधील आहे आणि तुझा जवळचा मित्रही आहे, म्हणून मी त्याला फोन केला होता. मी रोहितला फोन केल्याचा तुला एवढा राग का आला आहे?"


प्रिया म्हणाली,

"रोहितने मला आत्ता फोन केला होता आणि तो मला विचारत होता की, तु काल कोणाबरोबर फिरत होतीस म्हणून? मला त्याचं बोलणं खूप विचित्र वाटलं."


अक्षरा म्हणाली,

"प्रिया तुला खरं बोलायचं नसेल तर नको बोलूस, पण खोटं तरी बोलू नकोस. मांजर डोळे मिटून दूध पीत असली की तिला वाटतं, आपल्याला कोणीच बघत नाहीये."


प्रिया रागाने म्हणाली,

"अक्षू तुला काय म्हणायचं आहे?"


अक्षरा म्हणाली,

"प्रिया मला कोड्यात बोलता येत नाही, म्हणून डायरेक्ट विचारते, काल रोहित सोबत तु सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजवर काय करत होती?"


अक्षराच्या प्रश्नाचं प्रिया काय उत्तर देते? बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all