कॉलेज लाईफ भाग १४

Story Of College Days

कॉलेज लाईफ भाग १४


मागील भागाचा सारांश: आदित्यच्या रुपात किर्तीला एक चांगला मित्र मिळाला होता. होस्टेलवर परतल्यावर किर्तीने अक्षराला आदित्य व तिच्या मध्ये झालेल्या सविस्तर गप्पा सांगितल्या. दुपारच्या वेळी प्रिया अक्षराला काही न सांगता बाहेर निघून गेलेली होती. संध्याकाळ पर्यंत ती परत न आल्याने अक्षरा व किर्तीने तिला बऱ्याचदा फोन केला, पण प्रियाने दोघींचे फोन उचलले नाही. अक्षराला वाटले की, प्रिया रोहितसोबत असेल, म्हणून तिने रोहितला फोन करुन प्रियाची चौकशी केली तर रोहितने तिचा व प्रियाचा काहीच संबंध नसल्याचे सांगून टाकले. रोहित सोबत प्रिया नाही हे ऐकल्यावर अक्षरा व किर्तीला प्रियाची जास्त काळजी वाटू लागली होती.


आता बघूया पुढे…


रात्री आठच्या सुमारास निखिलने अक्षराला गेटवर बोलावून तिच्याकडे जेवणाचे पार्सल दिले. प्रियाचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने अक्षरा व किर्तीला जेवण जात नव्हते. निखिलने जेवण आणून दिले, म्हणून त्या थोडंफार जेवल्या. किर्ती व अक्षराची नजर घड्याळावर लागून होती. नऊ वाजता होस्टेलचे गेट बंद झाल्यावर प्रिया होस्टेलमध्ये नाही, हे रेक्टरला समजल्यावर सगळाच प्रॉब्लेम होऊन बसणार होता. पाऊणे नऊ वाजले तरी प्रिया होस्टेलला परत आली नव्हती. अक्षरा व किर्ती विचारात पडल्या होत्या. 


नऊ वाजायला पाच मिनिटे कमी असताना प्रिया रुममध्ये आली. प्रियाला बघून किर्ती व अक्षराला खूप जास्त आनंद झाला. रुममध्ये आल्यावर प्रियाने अक्षरा व किर्तीकडे साधं बघितलं सुद्धा नाही. प्रिया मोबाईलमध्ये बघत बघत आपल्या बेडवर निवांत बसली. किर्ती व अक्षराने एकमेकींकडे बघितले.


किर्ती म्हणाली,

"पियू तु इतक्या वेळ कुठे होतीस? आमच्यापैकी कोणाचाच फोन तु का घेत नव्हतीस? आम्हाला तुझी खूप काळजी वाटत होती. तु ठीक आहेस ना?"


प्रिया मोबाईलमध्ये बघत म्हणाली,

"मी तुला धडधाकट दिसत आहे ना. मी कुठे होते? किंवा कोणासोबत होते? याचं उत्तर मी तुम्हाला का म्हणून देऊ? मला तुमच्यासोबत बोलायचं नव्हतं, म्हणून मी कोणाचेच फोन उचलले नाही. समोरची व्यक्ती आपला फोन कट करत आहे किंवा ती उचलत नाही म्हटल्यावर तिला आपल्यासोबत बोलायचे नसेल, एवढं साधं तुम्हाला कळत नाही का?"


किर्ती म्हणाली,

"अग नऊ वाजता होस्टेलचे गेट बंद होते, तोपर्यंत जर तु आली नाहीस, तर तु होस्टेल मध्ये नसल्याचं रेक्टरला कळालं असतं. रेक्टरने तुझ्या घरी फोन करुन चौकशी केली असते, मग सगळा गोंधळ होऊन बसला असता."


प्रिया म्हणाली,

"मला माझी जबाबदारी कळते. तुम्ही मला शिकवण्याची गरज नाहीये. समजा मी नऊ पर्यंत होस्टेलला पोहोचले नसते, तर माझ्या आईवडिलांना किंवा रेक्टरला काय उत्तर द्यायचे? हे माझं मी बघून घेतलं असतं. तुम्ही माझी काळजी करण्याची गरज नाही."


किर्ती म्हणाली,

"पियू तु माझ्यासोबत असं कसं बोलू शकतेस. तुला नेमकं काय झालं आहे? अग आपण तिघी खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. आपण सगळं काही एकमेकींना सांगत असतो. सुट्टीवरुन परत आल्यापासून मी बघत आहे की, तु आमच्यापासून काहीतरी लपवत आहेस. तुला सांगायचं नसेल तर नको सांगू. तुझ्या खासगी आयुष्याबद्दल बोलण्याचा आम्हाला काहीच अधिकार नाहीये. तु आमच्यासोबत एक रुममध्ये राहते, म्हणून आम्हाला तुझी काळजी वाटते."


प्रिया म्हणाली,

"किर्ती आपण मैत्रिणी असलो तरी एकमेकींच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. मी तुम्हाला दोघींना स्पष्टपणे सांगून टाकते की, प्लिज मी कुणासोबत फोनवर बोलते? किंवा कुठे फिरते? हे प्रश्न मला विचारायचे नाही. हे माझं आयुष्य आहे, मला माझ्या पद्धतीने जगायचा हक्क आहे. मला माझं चांगलं वाईट समजतं."


अक्षरा म्हणाली,

"पियू तुला बोलताना काहीच कसं वाटत नाहीये. तु फोन उचलत नव्हती, तेव्हा आमच्या मनात नको ते विचार येऊन गेले. रुममध्ये आल्यावर तुम्ही मला एवढे फोन का केले? हा प्रश्न सुद्धा तुला विचारावा वाटला नाही. तुझ्या डोळ्यांवर कसली धुंदी चढली आहे? हे तुलाच ठाऊक. इथून पुढे आम्ही तुझी चौकशी करणार नाही."


प्रिया चिडून म्हणाली,

"तुम्हाला दोघींना माझं बोलणं कळत नाहीये का? मी वॉशरुम मध्ये जाऊन फ्रेश होऊन येते, म्हणजे तोपर्यंत तुमच्या दोघींची बडबड तरी बंद होईल."


एवढं बोलून प्रिया रुममधून निघून गेली. प्रिया गेल्यावर किर्ती म्हणाली,

"अक्षू ही किती बदलली आहे. आपल्या सोबत किती उर्मटपणे बोलत होती."


अक्षरा म्हणाली,

"कितू थोड्या दिवस प्रियाकडे आपण दुर्लक्ष करुयात, तिला जर आपल्यासोबत येऊन बोलायचं असेल, तर ती बोलेल. आता मी तरी तिच्यासोबत बोलणार नाहीये. प्रियावर कोणी कसली जादू केली? काही कळत नाहीये."


किर्ती म्हणाली,

"तु म्हणते ते बरोबर आहे, ती आपल्यासाठी अदृश्य आहे,असं आपण समजुयात."


प्रिया रुममध्ये परत आल्यावर किर्ती व अक्षरा तिच्या सोबत काहीच बोलल्या नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला जाताना अक्षरा व किर्ती ह्या दोघीच कॉलेजला गेल्या. प्रिया त्यांच्यानंतर कॉलेजला गेली. अक्षरा व किर्ती या दोघी एका बेंचवर जाऊन बसल्या होत्या. एरवी प्रिया त्या दोघींसोबत एकाच बेंचवर बसायची, पण त्यादिवशी ती एकटीच त्यांच्यापासून लांब जाऊन बसली. अक्षरा, किर्ती व प्रियामध्ये काहीतरी खटकाखटकी झाली आहे, हे सर्वांनाच समजलं होतं.


सर्व लेक्चर्स संपल्यावर वर्गातील मॉनिटरने सर्व विद्यार्थ्यांना वर्गातच थांबायला सांगितले. मॉनिटर सर्वांसमोर स्टेजवर चढून बोलू लागला,

"माझ्या मित्र मैत्रिणींनो, पुढील काही वेळ कृपया शांत बसा. मी जे काही बोलत ते सर्वांनी शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती.

मित्रांनो, आपण कॉलेजच्या पहिल्या वर्षात आहोत. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याआधी आपण सर्वांनी आपले कॉलेज लाईफ कसे असेल? याची अनेक स्वप्ने पाहिली असतील. आपण कॉलेजमध्ये आल्यापासून अभ्यास, परीक्षा, होस्टेलमधील वातावरणासोबत जुळून घेणे, एवढंच केलं आहे. आता खरी कॉलेज लाईफ एन्जॉय करण्याची वेळ आली आहे, कारण पंधरा दिवसांनी कॉलेजची गॅदरिंग असणार आहे. गंदरिंगच्या आधी खेळांच्या, रांगोळीच्या, मेहंदीच्या अश्या अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. 

ज्यांना डान्स, सिंगिंग मध्ये भाग घ्यायचा असेल, त्या सर्वांनी त्यांची नावे माझ्याकडे द्यावी. पुढील पंधरा दिवस आपल्या सर्वांना धमाल करायची आहे. शिवाय साडी डे, डेनीम डे, ट्रॅडिशनल डे असे भरपूर डे साजरे होणार आहेत.

कार्यक्रमांचे वेळापत्रक नोटीस बोर्डवर लावण्यात आलेले आहेत, ते सर्वांनी एकदा बघून घ्या. तुम्हाला स्पर्धेत किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल, तर त्यांनी माझ्याकडे पुढील दोन दिवसांत नावे द्या."


मॉनिटरचे बोलणे संपल्यावर वर्गात सगळ्यांची चिवचिव सुरु झाली होती. निखिलने अक्षराला वर्गाबाहेर येण्यासाठी खुणावले. अक्षरा व किर्ती वर्गाबाहेर पडल्या. निखिलला समोर बघून किर्ती म्हणाली,


"अक्षू माझं लायब्ररीत थोडं काम आहे. तु निखिल सोबत बोल, तोपर्यंत मी लायब्ररीत जाऊन येते, मग आपण मेसमध्ये जेवायला जाऊयात."


निखिल व अक्षरा कॉलेजमधील कॉरिडॉर मध्ये जाऊन उभे राहिले.

अक्षरा निखिलला म्हणाली,

"काही बोलायचं होतं का?"


निखिल म्हणाला,

"हो. प्रिया व तुमच्यात काही खटकलं आहे का?"


अक्षरा म्हणाली,

"हो. प्रियाला आमच्या दोघींच्या मैत्रीची गरज राहिलेली नाहीये. काल रात्री ती आमच्या दोघींसोबत जरा जास्तच उर्मटपणे बोलली."


निखिल म्हणाला,

"रोहित रात्री साडेनऊला रुमवर आला. मला अजूनही वाटत आहे की, रोहित आणि प्रियामध्ये नक्कीच काही तरी चालू आहे. रोहित आपल्यासोबत खोटं बोलत आहे. प्रियाला रोहितनेच फितवलं असणारं. रोहित दिसतो तेवढा साधा सरळ मुलगा नाहीये. कालपासून तो माझ्यासोबत फारसा बोलला नाहीये."


अक्षरा म्हणाली,

"मला तर प्रियासोबत काही बोलण्यात रसच उरलेला नाही. इतक्या कमी काळात इतकी ती कशी काय बदलली? हेच कळत नाहीये. प्रिया आणि रोहितचा विषय आपण सोडून देऊयात. तु कशात भाग घेणार आहेस?"


निखिल म्हणाला,

"सध्या तरी मी फक्त चेसमध्ये भाग घेणार आहे. बाकीचं अजून काही ठरवलं नाहीये. डान्स आणि सिंगिंग यापैकी मला काहीच येत नाही. तु कशात भाग घेणार आहेस?"


अक्षरा म्हणाली,

"बॅडमिंटन मध्ये भाग घेईल. ग्रुप डान्समध्ये मी भाग घेऊ शकते, पण तसा अजून विचार केला नाहीये."


निखिल व अक्षराचं बोलणं चालू असतानाच किर्ती लायब्ररीतून परत आल्यावर अक्षरा व किर्ती जेवण करण्यासाठी होस्टेलला निघून गेल्या. होस्टेलवर जात असताना किर्ती म्हणाली,

"निखिल प्रियाबद्दल काही बोलत होता का?"


अक्षरा म्हणाली,

"हो, त्याला संशय आहे की, रोहितनेच प्रियाला फितवल आहे. निखिलच्या मते रोहित दिसतो तेवढा सरळ मुलगा नाहीये."


किर्ती म्हणाली,

"जाऊदेत, आपल्याला काय करायचं आहे?"


किर्ती बोलत असतानाच तिचा फोन वाजला, म्हणून दोघींचं बोलणं अर्धवट राहिलं. नेमका त्याच वेळी अक्षराला सुद्धा तिच्या आईचा फोन आल्यामुळे दोघी आपापल्या फोनवर बोलत बाजूला झाल्या. अक्षराचं आईसोबत लवकर बोलून झाल्यामुळे ती किर्तीची वाट बघत मेसमध्ये जाऊन बसली होती. प्रिया जेवणाचं ताट घेऊन अक्षरा शेजारी जाऊन बसली. अक्षराने प्रियाकडे बघितले पण नाही. किर्ती आल्यावर अक्षरा व किर्तीने जेवायला सुरुवात केली. किर्ती, अक्षरा व प्रिया या तिघीजणी जेवण करायला शेजारी बसल्या होत्या, पण त्या तिघी एकमेकींसोबत काहीच बोलल्या नाही.


प्रिया,अक्षरा व किर्ती ह्यांची मैत्री पूर्ववत होईल का? हे बघूया पुढील भागात…

©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all