कॉलेज लाईफ भाग १३

Story Of College Days

कॉलेज लाईफ भाग १३


मागील भागाचा सारांश: किर्ती आदित्यला भेटण्यासाठी गेली होती. आदित्य व तिच्यात गप्पा चालू होत्या. आदित्य किर्तीला त्याची पूर्ण खरी कथा सांगतो. आदित्यची सख्खी आई त्याच्या लहानपणीच देवाघरी गेली होती. आदित्यच्या वडिलांनी दुसरं लग्न करुन सावत्र आईला घरात आणलेलं आदित्यला आवडलं नव्हतं. किर्तीला हे सगळं ऐकून मोठा धक्का बसला होता.


आता बघूया पुढे….


आदित्य म्हणाला,

"मी हे सगळं तुला सांगितलं, कारण तुला माझ्या बोलण्यामागचा हेतू कळू शकेल. माझ्या एका मित्राला असंच याबद्दल सांगत होतो, तर तो मला म्हणाला होता की, तु sympathy मिळवण्यासाठी हे अश्या पद्धतीने सांगतो, त्याच्या मते खऱ्या आयुष्यात असं काही होऊ शकत नाही.

तुला तुझ्या काका काकूंचा अनुभव असल्याने तुला माझं बोलणं खरं वाटेल, म्हणून तुझ्याकडे हे सगळं बोलून गेलो. खूप दिवसांचं मनात साचून होतं."


किर्ती म्हणाली,

"बरं झालं. माझ्यासोबत बोलल्याने तुमचं मन तरी मोकळं झालं. आपण ज्यासाठी भेटलो आहोत, त्या मुद्द्यावर आपण येऊयात. तुम्ही आत्ता सध्या लग्न करायला तयार आहात का?"


आदित्य म्हणाला,

"नाही. मला पुढील दोन वर्ष तरी लग्न करायचं नाहीये. मी काही प्लॅन्स केले आहेत, त्यानुसारच मला माझं आयुष्य जगायचं आहे."


किर्ती म्हणाली,

"मग तुम्ही मला भेटायला का आला आहात?"


आदित्य म्हणाला,

"माझे बाबा माझ्या कधीचे मागे लागले होते. मी तुला भेटायला आलो नसतो, तर सतत कटकट करत राहिले असते. तु माझ्या सावत्र आईच्या नात्यातील असल्याने ते माझ्या एवढे मागे लागले होते."


किर्ती म्हणाली,

"मग आता पुढे काय करायचं?"


आदित्य म्हणाला,

"मी बाबांना सांगतो की, मला किर्ती आवडली नाही. बाबा मला समजावण्याचा भरपूर प्रयत्न करतील, पण मी माझ्या मतावर ठाम असेल. मी नकार दिल्याने तुझे काका काकू तुला काही बोलू शकणार नाही."


किर्ती म्हणाली,

"तुमचे बाबा तुम्हाला अजून स्थळं दाखवतील, मग तुम्ही काय कराल?"


आदित्य म्हणाला,

"मी मॅनेजमेंटचा एक कोर्स करण्यासाठी पुढच्या महिन्यात अमेरिकेला जाणार आहे,हा कोर्स दोन वर्षांचा आहे. कोर्स पूर्ण होईपर्यंत मी भारतात काही परत येणार नाही. माझं सगळं काही ठरलं आहे. मी अमेरिकेत असल्याने बाबा माझ्यासाठी स्थळं कशी काय बघतील?"


किर्ती म्हणाली,

"माझी एक मदत कराल का?"


आदित्य म्हणाला,

"हो, करु शकतो ना, काय मदत करायची आहे?"


किर्ती म्हणाली,

"मला नकार देताना तुम्ही असं कारण द्या की, माझं शिक्षण पूर्ण न झाल्याने तुम्ही मला नकार देत आहात, बाकी तुम्हाला मी आवडली आहे. कदाचित तुमचं हे कारण ऐकल्यावर माझे काका काकू माझ्या लग्नाचा विषय लांबणीवर टाकतील."


आदित्य म्हणाला,

"चालेल, पण त्यासाठी तुम्हाला माझी फी द्यावी लागेल."


किर्ती हसून म्हणाली,

"फी? म्हणजे मला समजलं नाही."


आदित्य म्हणाला,

"मला एक पण मैत्रीण नाहीये. माझं लक्ष्य माझ्या डिग्रीवर असल्याने मी कधी मुलींसोबत फारसं बोललो नाही. तुझ्याशी बोलल्यावर असं वाटलं की, तुला माझं म्हणणं लवकर समजतं. मला स्पष्टीकरण द्यावे लागत नाही. माझ्याशी मैत्री करशील का?

मी तुला सारखं सारखं फोन करुन त्रास देणार नाही. जेव्हा मला माझ्या मैत्रिणीसोबत बोलण्याची गरज पडली की, तुला फोन करत जाईल."


किर्ती म्हणाली,

"हो चालेल, पण माझी एक अट आहे."


आदित्य म्हणाला,

"अट? आणि ती काय?"


किर्ती म्हणाली,

"मला माझ्या शिक्षणासाठी मार्गदर्शन करायचे."


आदित्य हसून म्हणाला,

"मंजूर."


किर्ती म्हणाली,

"मग आता निघुयात का?"


आदित्य म्हणाला,

"मी तुला होस्टेलला सोडतो."


किर्तीने मान हलवून होकार दिला. आदित्यने तिला आपल्या बाईकवरुन होस्टेलला सोडले. किर्ती आदित्यला बाय करुन आपल्या रुममध्ये गेली. अक्षरा मोबाईलवर काहीतरी करत बसलेली होती. किर्तीला बघून अक्षराने आपल्या हातातील मोबाईल बाजूला ठेवला. अक्षरा म्हणाली,


"कितू मिटिंग कशी झाली? आदित्य कसा होता? तुमच्यात काय काय बोलणं झालं? तो तुला आवडला का?"


किर्ती म्हणाली,

"अक्षू अगं बोलताना जरा श्वास तर घे. मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते, पण मला एक सांग, मी गेल्यापासून पियू रुममध्ये आलीच नाही का?"


अक्षरा म्हणाली,

"तु गेल्यावर लगेच पियू रुममध्ये आली होती. तु नटूनथटून कुठे गेलीस? असं मला विचारत होती. मी तिला खरं काही सांगितलं नाही."


किर्ती म्हणाली,

"अग तिला राग आला असेल, तु तिला खरं सांगितलं असतं, तरी चाललं असतं."


अक्षरा म्हणाली,

"हल्ली ती आपल्याला कुठे काय सांगते? तिला तिची चूक समजली पाहिजे की नाही? तु तिचा विषय बाजूला राहूदेत. मला आदित्यबद्दल ऐकायचं आहे."


किर्तीने अक्षराला आदित्य व तिच्यामध्ये झालेलं सर्व बोलणं सविस्तरपणे सांगितलं. सगळं ऐकल्यावर अक्षरा म्हणाली,


"कितू बरं झालं तु आदित्यला भेटलीस, त्यामुळे तुला एक नवीन चांगला मित्र भेटला. अमेरिकेला जाण्याआधी एकदा आदित्य व माझी भेट घालून देशील का? तुझ्याकडून त्याचं वर्णन ऐकल्यापासून मला त्याला भेटण्याची इच्छा झाली आहे."


किर्ती म्हणाली,

"आदित्यचा फोन आल्यावर मी त्याला विचारुन बघेल. तसं तो नाही म्हणणार नाही. पियू कुठे गेली आहे?"


अक्षरा म्हणाली,

"माहीत नाही. तु गेल्यानंतर एक तासाने ती काही न बोलता आवरुन बाहेर निघून गेली. तिने काही सांगितलं नाही आणि मी काही विचारलं नाही."


किर्ती म्हणाली,

"मी तिला फोन करुन बघते. मला पियूचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये."


किर्तीने प्रियाला दोनदा फोन लावला, पण प्रियाने किर्तीचा फोन कट केला.


"काय झालं? फोन लागत नाहीये का?" अक्षराने विचारले.


किर्ती म्हणाली,

"पियूने फोन कट केला आणि मॅसेज केलाय की,\" मी आता बिझी आहे.\" अक्षू ही नेमकी कशात बिजी आहे. आज पियू रुमवर आल्यावर मी तिचं काय चालू आहे? हे तिला ठणकावून विचारणारचं आहे."


रविवार असल्याने मेसला फिस्ट होती. फिस्ट म्हणजे त्यादिवशी सकाळी स्पेशल जेवण असल्याने रात्री जेवण नसायचं. रविवारी अक्षरा, प्रिया व किर्ती ह्या तिघीजणी बाहेर जेवायला जायच्या. अक्षरा व किर्तीला भूक लागली होती, पण त्या प्रिया येण्याची वाट बघत होत्या. रात्री नऊला होस्टेलचे गेट बंद व्हायचे, म्हणून ह्या लवकर जाऊन नऊ पर्यंत परत यायच्या. प्रिया जर लवकर आली नाही तर ह्या दोघींना बाहेर लवकर पडता येत नव्हते आणि परिणामी बाहेर जेवायला जास्त वेळ मिळणार नव्हता. किर्ती प्रियाला फोन लावत होती, पण ती किर्तीचा फोन उचलत नव्हती. 


संध्याकाळ उलटून गेली तरी प्रिया होस्टेलला परतली नसल्याने अक्षरा व किर्तीला तिची काळजी वाटू लागली होती. अक्षराने प्रियाला बऱ्याचदा फोन केले, पण प्रियाने फोन उचलला नाही. शेवटी न राहवून अक्षराने रोहितला फोन लावला. दोन-तीन रिंगमध्ये रोहितने फोन उचलला,


"हॅलो, अक्षरा काय म्हणतेस? आज माझी आठवण कशी काय झाली?"


अक्षरा म्हणाली,

"रोहित तु कुठे आहेस?"


रोहित म्हणाला,

"माझ्या काही मित्रांना भेटण्यासाठी मी बाहेर आलो होतो. काय झालं?"


अक्षरा म्हणाली,

"प्रिया तुझ्यासोबत आहे का?"


रोहित म्हणाला,

"प्रिया माझ्यासोबत कशी काय असेल? मी माझ्या शाळेतील मित्रांना भेटायला आलो होतो. प्रियाला मी माझ्यासोबत का घेऊन येईल? प्रिया माझ्यासोबत कधी नीट बोलत पण नाही, ती माझ्यासोबत असेल, असं तुला का वाटलं?"


अक्षरा चिडून म्हणाली,

"रोहित आता मी तुला काहीच स्पष्टीकरण देण्याच्या मनस्थितीत नाहीये. प्रिया दुपारपासून बाहेर गेली आहे आणि ती आमचा फोन उचलत नाहीये, म्हणून मी तुला फोन केला होता. तुला जर प्रियाबद्दल काही माहीत असेल, तर सांग, नाहीतर मी फोन ठेवते."


रोहित सोबत बोलून झाल्यावर किर्ती अक्षराला म्हणाली,

"रोहित काय म्हणत होता?"


अक्षरा म्हणाली,

"प्रिया त्याच्यासोबत नाहीये."


किर्ती म्हणाली,

"अग प्रिया त्याच्यासोबत नाही म्हटल्यावर ती कुठे असेल? प्रिया काही अडचणीत तर नसेल ना?"


अक्षरा म्हणाली,

"माहीत नाही. मी निखिलला फोन लावून बघते."


अक्षराने निखिलला फोन लावला, तर त्याने फोन कट होता होता उचलला,

"हॅलो, बोल अक्षरा."


अक्षरा चिडून म्हणाली,

"तुम्हा लोकांना पटकन फोन उचलायला काय होतं? फोन करायला समोरचं माणूस वेडं असतं का?"


निखिल म्हणाला,

"अक्षरा काय झालंय? अग मी झोपलो होतो, म्हणून फोन उचलायला उशीर झाला."


अक्षरा पुढे म्हणाली,

"ही वेळ झोपण्याची असते का?"


निखिल म्हणाला,

"अक्षरा तुला नेमकी अडचण कसली झाली आहे? मी लवकर फोन उचलला नाही म्हणून की, मी आत्ता यावेळी झोपलो आहे म्हणून."


अक्षरा स्वतःला शांत करत म्हणाली,

"दोन्हीपैकी कसलीच नाही. निखिल प्रिया दुपारपासून रुमवर नाहीये, ती माझा व किर्तीचा फोन उचलत नाहीये. मी रोहितला फोन केला होता, तर त्याचं म्हणणं आहे की, त्याचा आणि प्रियाचा काही संबंधचं नाहीये."


निखिल म्हणाला,

"अक्षरा एकतर तु आधी शांत हो. चिडून, ओरडून यावर उपाय निघणार नाहीये. मी प्रियाला फोन करुन बघतो, तिने उचलला तर ठीक नाहीतर रोहितचे कान पकडण्याची वेळ धरावा लागेल. तु आणि किर्ती रुममध्येचं थांबा. मी तुमच्यासाठी खायला बाहेरुन काहीतरी घेऊन येतो, गेटवर येऊन तेवढं घेऊन जा. पोटात काही नसलं की अजून चिडचिड होते."


अक्षरा म्हणाली,

"ठीक आहे. प्रियासोबत काही बोलणं झालं तर आम्हाला लगेच कळव."


निखिल म्हणाला,

"हो मी लगेच कळवतो."


अक्षरा सोबत बोलून झाल्यावर निखिलने प्रियाला फोन केला, पण तिने निखीलचा फोन उचलला नाही. निखिलने त्यानंतर रोहितला फोन लावला, तर त्याने स्पष्टपणे सांगून टाकले की, प्रिया त्याच्यासोबत नाहीये. आता निखिलला प्रियाचे टेन्शन आले होते.


प्रिया खरंच काही अडचणीत असेल का? रोहित खरं बोलत असेल का? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all