कॉलेज लाईफ भाग १२

Aditya Is Talked About His Past Life

कॉलेज लाईफ भाग १२


मागील भागाचा सारांश: प्रिया तिच्या मोबाईलच्या विश्वात दंग असल्याने अक्षरा व किर्तीचे काय चालू आहे? याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. किर्तीसाठी तिच्या काकांनी आदित्य वडनेरेचं स्थळ बघितलं होतं. किर्ती आदित्यला भेटण्याकरता तयार झाली होती. किर्ती व आदित्यची भेट झाली, त्यांच्यात बऱ्याच गप्पाही झाल्या.


आता बघूया पुढे….


आदित्यच्या बोलण्याचा अर्थ न उमगल्याने किर्ती म्हणाली,

"दिसतं तसं नसतं, असं तुम्ही का म्हणालात? मला तुमच्या बोलण्याचा हेतू लक्षात आला नाही."


आदित्य म्हणाला,

"तुला आमचं कुटुंब सुखी वाटतं, असं तु म्हणालीस ना, त्यावरुन मी हे म्हणालो."


किर्ती म्हणाली,

"तुमच्या कुटुंबाकडे बघून हे कोणीच म्हणणार नाही की, तुमचं कुटुंब हे सुखी कुटुंब नाही."


आदित्य म्हणाला, 

"किर्ती तुमच्या कुटुंबाबद्दल मला हे कळालं होतं की, तुझे काका काकू तुझा सांभाळ करत आहेत, तसेच ते तुला त्यांच्या मुलीपेक्षा जास्त जीव लावतात, पण तुझ्या बोलण्याच्या सुरावरुन मला हे जाणवलं की, तुझ्या काका काकूंचं व तुझं फारसं पटत नसेल. जसं तुमचं कुटुंब दिसतं तसं नाहीये ना, तसंच आमच्या कुटुंबाचं आहे. मी पाचवीत असताना माझ्या आईला कॅन्सर झाला होता आणि पुढील वर्षभरात ती हे जग सोडून गेली. मी आईच्या मायेला कायमचा पारखा झालो. आमच्याआयकडे बऱ्यापैकी शेती आहे, त्यामुळे आर्थिकरित्या आमचे कुटुंब अगदी पहिल्यापासूनच संपन्न आहे. आईचं वर्षश्राद्ध झाल्यावर बाबांनी दुसरं लग्न केलं. बाबांनी दुसरं लग्न केलेलं मला आवडलं नव्हतं. तु ज्या बाईला भेटलीस, ती माझी सावत्र आई आहे. मी तिला कधीच माझी आई मानू शकलो नाही. सुरवातीला काही दिवस तिने मला जीव लावण्याचं नाटक केलं, पण काही महिन्यांनंतर तिचं खरं रुप माझ्यासमोर आलं होतं. 


माझी सावत्र आई माझ्या सख्ख्या आई पेक्षा दिसायला चांगली असल्याने माझे वडील तिच्या रुपावर भाळले होते, ती जे सांगेल तेच माझे वडील करायचे, तिला खुश करण्याच्या नादात ते मला विसरुन गेले होते. माझ्या बाबांचं माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं. माझ्या मनात माझ्या सावत्र आईबद्दल अधिक द्वेष निर्माण झाला होता. घरी माझ्यासोबत बोलायला कोणी नसल्याने मी घराबाहेर अधिक काळ राहू लागलो. मित्रांबरोबर त्यांच्या घरी जाऊ लागलो. 


काही वाईट मित्रांची संगत लागली होती. मी नववीत असताना एका मित्राने मला सिगारेट प्यायला शिकवली होती. मला सिगारेट पिणं आवडतं नव्हतं, पण मित्राच्या आग्रहाखातर सिगारेटचे व्यसन माझ्या आयुष्यात डोकावू पाहत होते. एकदा मार्केटमध्ये उभा राहून एका टपरीवर सिगारेट पेटवून तोंडात टाकत होतो, तेवढ्यात माझ्या मावशीने येऊन माझ्या कानफटात जोरदार लगावली. माझे मित्र तेथून पळून गेले.


मला वाटलं होतं की, मावशी एवढ्यावरचं थांबेल,पण नाही तिच्या डोळयात माझ्याबद्दल प्रचंड राग दिसत होता, ती माझा हात धरुन मला ओढत घरी घेऊन आली. मावशी मला घरी घेऊन आली, तेव्हा माझे आई बाबा दोघे गप्पा मारत जेवण करत होते, ते दृश्य बघून मावशीच्या रागाचा पारा अजून चढला होता. मावशीला अचानक आलेलं बघून बाबा म्हणाले,


"अग कुसुम तु आज अशी अचानक कशी काय आलीस? आणि तु एवढी रागात का दिसत आहेस?"


मावशी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाली,

" दाजी मी इथं जवळचं एका गावात लग्नाला आले होते, तुमची व आदित्यची भेट घेऊन जावी, म्हणून मी आले होते."


बाबा पुढे म्हणाले,

"बरं झालं आलीस. ये जेवायला बस, आमचं जेवण चालूच आहे."


मावशी म्हणाली,

"नाही नको, मी लग्नातून जेवण करुन आले आहे."


बाबा म्हणाले,

"बरं ठीक आहे. आमचा हा पठ्ठ्या तुला कुठे भेटला?"


"मार्केटमध्ये" मावशीने रागातच उत्तर दिले.


बाबा म्हणाले,

"कुसुम तु एवढी रागात का दिसत आहेस?"


मावशी माझ्याकडे बघून म्हणाली,

"आदित्य तु जेवण केलंस का?"


मी मान हलवून नाही म्हणालो. माझी सावत्र आई पुढे म्हणाली,

"बरं झालं ताई तुम्ही आला आहात. आदित्य दुपारी घरी जेवायलाचं येत नाही."


 हे ऐकून मावशीच्या डोळ्यातील राग कमी झाला. मावशी माझ्याकडे बघून म्हणाली,

"आदित्य फ्रेश होऊन ये."


मी फ्रेश होण्यासाठी माझ्या रुममध्ये गेल्यावर मावशी हॉलमध्येच एका खुर्चीत बसली. मी फ्रेश होऊन येईपर्यंत माझ्या बाबांचं जेवण झालं होतं. माझ्या अपरोक्ष मावशी आणि बाबांमध्ये काही बोलणं झालेलं नव्हतं. मी आल्यावर मावशीने मला तिच्यासमोर बसायला सांगितले.


मावशी बाबांकडे बघून म्हणाली,

"दाजी आदित्य दुपारी जेवायला घरी का येत नाही?"


बाबा म्हणाले,

"मी त्याला याबद्दल अनेकदा विचारलं तर त्याचं ठरलेलं उत्तर असायचं की, मित्राकडे जेवण केलं, सकाळी पोटभर नाश्ता केल्याने त्याला भूक लागत नाही. सलग एक आठवडा हेच उत्तर असल्याने मी त्याला विचारणं सोडून दिलं."


यावर मावशी म्हणाली,

"आपला तरुण मुलगा दुपारी घरी जेवायला येत का नाही? याची तुम्ही स्वतः जाऊन कधी पाहणी का केली नाही? दाजी या वयात मुलांना वडीलधाऱ्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज असते. सकाळी शाळेतून आल्यावर हा दिवसभर गावात काय करतो? याची शहानिशा करणे तुम्हाला गरजेचे वाटले का नाही? 

दाजी ताई गेल्यामुळे आता आदित्यची जबाबदारी तुमच्या एकट्यावर आहे, हे तुम्हाला कळत कसं नाही."


बाबा चिडून म्हणाले,

"कुसुम तुला म्हणायचं तरी काय आहे? मला माझी जबाबदारी कळत नाही का? मला दुसरं लग्न करायचं नव्हतं, पण आदित्यला आईची माया मिळावी म्हणून मी मालती सोबत लग्न केलं. आदित्य मालतीला आई सुद्धा म्हणत नाही. तु आदित्यची कानउघाडणी करायची सोडून मला माझ्या जबाबदाऱ्या का सांगत आहेस?"


मालती म्हणाली,

"आदित्यला वाईट वाटू नये, म्हणून आम्ही बाळ पण होऊ दिलं नाही. आदित्यच्या आवडीचं जेवणं मी दररोज बनवते, पण तो दुपारी घरी जेवायला येत नाही, यात आमचा दोष नाहीये. दोष असेल तर तो फक्त तुमच्या भाच्याचा आहे."


मावशी म्हणाली,

"एकतर मी आता माझ्या दाजींसोबत बोलत आहे. मला तुमच्यासोबत बोलण्यात काहीच रस नाहीये. तुमचं आदित्यवर किती जीव आहे? याचा मला काही वेळापूर्वी अंदाज आलाच आहे. तुम्ही दोघे जेवत असताना आम्ही दोघे आलो, तेव्हा तुम्ही त्याला साधं जेवण करतो का? हे सुद्धा विचारलं नाही. एक आई आपला मुलगा समोर असताना एकटी कधीच जेवत नाही आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला मुलं झालं नाही, म्हणून तुम्ही होऊ दिलं नाही. मी लांब राहते म्हटल्यावर माझ्या पर्यंत तुमच्या बातम्या पोहोचत नाही, हे तुम्ही समजू नका. पुढचा काहीवेळ आमच्या तिघांमध्ये काहीच बोलू नका."


बाबा म्हणाले,

"कुसुम तुला आदित्यने काहीतरी चुकीचं भरवलं असणार आहे."


मावशी म्हणाली,

"आदित्यने जर मला काही सांगितलं असतं, तर मी यापूर्वी कधीच इथे येऊन तुमची कानउघाडणी केली असते. आदित्य तु दुपारी घरी जेवायला का येत नाही? मला खरं कारण ऐकायचे आहे."


मी म्हणालो,

"मावशी बाबांनी दुसरं लग्न केल्यापासून ते माझ्यासोबत फारसं बोलत नाहीत, या दोघांमध्ये सतत काहीतरी गप्पा चालू असतात. बाबांनी दुसरं लग्न केलेलं मला आवडलं नव्हतं. बाबा अनेकदा या बाईसोबत एकटे फिरायला निघून जातात. घरी आल्यावर माझ्यासोबत बोलायला कोणीचं नसतं, म्हणून मी घराबाहेर मित्रांसोबत जास्त वेळ घालवायला लागलो. माझ्या काही गोष्टी चुकल्या आहेत, हे मी मान्य करतो, पण मावशी घरात आल्यावर मला एकटेपणा जास्त जाणवतो."


यावर मावशी म्हणाली,

"आदित्य मला तुझ्या बाबांसोबत काही बोलायचं नाहीये, त्यांना त्यांची कर्तव्ये माहीत आहेत,त्यांनी ती पार पाडावीत. तुला आता इतका मोठा झाला आहेस की, तुला तुझं चांगलं वाईट कळतं. आज माझ्या जागी तुझ्या आईने जर तुला सिगारेट पिताना बघितलं असतं, तर तिला किती यातना झाल्या असत्या, याचा विचार तु कर. तुझ्या बाबांच्या हातून काही चुका घडल्या असतील पण तु त्याच चुका का करत आहेस? 

तुझ्या बाबांनी मालती सोबत लग्न केल्याने ती तुझी आई आहे, तु तिला मान द्यायलाच पाहिजे. तुला माझ्या ताईची शप्पथ आहे, इथून पुढे दोन वेळ घरात जेवण करायचं. घराबाहेर मित्रांसोबत उनाडक्या करायच्या नाही. कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही. आपला अभ्यास करायचा आणि खूप खूप शिकायचं. हे सर्व तुला तुझ्या आईसाठी करायचं आहे."


मी मान हलवून होकार दिला. त्या दिवसापासून मी एकदम सरळ रेषेत चालत राहिलो. जे मित्र वाईट होते, त्यांची संगत कायमची सोडून दिली."


किर्ती म्हणाली,

"बापरे, हे तर भयानकचं आहे. मला एक प्रश्न पडला आहे की, तुम्ही मला हे सर्व का सांगितलं? कारण आपली तर ही पहिलीच भेट आहे. आपण दोघे एकमेकांना फारसं ओळखत पण नाही, मग तुम्हाला मला हे सांगावं का वाटलं?"


आदित्य किर्तीच्या प्रश्नाचं काय उत्तर देईल? हे बघूया पुढील भागात...


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all