कॉलेज लाईफ भाग १०

Story Of College Days

कॉलेज लाईफ भाग १०


मागील भागाचा सारांश: प्रिया अक्षरासोबत लायब्ररीत अभ्यास करण्यासाठी जाते, पण तिला त्यांच्यासोबत फारवेळ अभ्यासाला बसवत नव्हते, म्हणून ती रोहित सोबत कॅन्टीनमध्ये निघून जाते, याचा अक्षराला राग येतो. दुसऱ्या दिवसापासून प्रिया रोहितसोबत अभ्यास करायला सुरुवात करते. पहिल्या सेमिस्टरची फायनल परीक्षा झाल्यावर कॉलेजला पंधरा दिवसांची सुट्टी असते, तेव्हा सर्वजण आपापल्या घरी जातात. प्रसादला सुद्धा सुट्टी असल्याने तो घरी आलेला असतो, त्यावेळी अक्षरा व प्रसाद मध्ये अमृताला घेऊन चर्चा होते, तसेच अक्षरा त्याला सांगते की तु ड्रिंक्स घेत जाऊ नकोस.


आता बघूया पुढे….


सुट्टी संपल्यावर अक्षरा कॉलेजला परत गेली. यावेळी प्रिया व किर्ती या दोघी सुद्धा वेळेत होस्टेलला पोहोचलेल्या होत्या. अक्षरा सुट्टीत काय काय केलं? हे किर्ती व प्रियाला सांगत होती. प्रियाला कोणाचा तरी फोन आला म्हणून ती रुमच्या बाहेर निघून गेली, ती गेल्यावर अक्षरा किर्तीला म्हणाली,


"कितू मी आल्यापासून बघत आहे की पियूचं लक्ष सतत फोनमध्ये आहे. आपल्या बोलण्याकडे तिचं लक्षचं नव्हतं."


यावर किर्ती म्हणाली,

"हो, मलाही तसंच जाणवलं."


अक्षरा म्हणाली,

"बरं तिचं जाऊदेत. तु सुट्टीत काय केलंस? तुझी सुट्टी कशी गेली?"


किर्ती म्हणाली,

"मी घरी गेले नसते तर बरं झालं असतं. सुट्टी कधी संपतेय असं मला झालं होतं."


अक्षरा म्हणाली,

"का? काय झालं?"


किर्ती पुढे म्हणाली,

"यावेळी मी घरी गेल्यावर सुरुवातीचे दोन तीन दिवस माझे खूप चांगले गेले. माझ्या काकूने छान छान पदार्थ बनवून मला खायला घातले. माझी चुलत बहीण सुद्धा माझ्या सोबत चांगलं वागत होती. माझ्या काकूने माझ्यासाठी चांगले कपडे विकत घेतले होते. माझ्यासोबत हे सगळे चांगलं का वागत आहेत? हेच मला कळत नव्हते. 


मग हळूच तीन चार दिवसांनी काका काकूंनी मला जवळ बोलावून सांगितलं की त्यांनी माझ्यासाठी लग्नाकरिता एक मुलगा बघितला आहे, तो काकूच्या नात्यातील आहे. आता साखरपुडा करुन ठेवायचा आणि पुढच्या वर्षी लग्न करायचं, असं त्यांनी ठरवलं. पण लग्न आणि साखरपुडा करण्यासाठी लागणारा खर्च आणायचा कुठून? हा प्रश्न माझ्या काका काकूंना पडलाय. ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच शोधलं, ते असं की माझ्या वडिलांच्या वाट्याची जमीन काकांच्या नावावर करुन द्यायची, मग काका माझ्या लग्नाचा व साखरपुड्याचा खर्च करणार आहे."


अक्षरा म्हणाली,

"तुझ्या काका काकूंचा तर मोठा डाव आहे."


किर्ती म्हणाली,

"हो ना."


अक्षरा म्हणाली,

"कितू तो मुलगा काय करतो? तु त्याला भेटलीस का?"


किर्ती म्हणाली,

"तो मुलगा इंजिनिअर आहे, इथे पुण्यात एका कंपनीत नोकरीला आहे, त्याचे आईवडील आमच्या घरी आले होते. माझी व त्याची भेट झाली नाहीये."


अक्षरा म्हणाली,

"कितू त्या मुलाचे आईवडील तुला कसे वाटले?"


"ते मला प्रेमळ वाटले." किर्तीने उत्तर दिले.


अक्षरा म्हणाली,

"मग तु काय ठरवलं आहेस?"


किर्ती म्हणाली,

"अक्षू मला इतक्या लवकर लग्न करायचं नाहीये. माझ्या काका काकूंवर मला बिलकुल पण विश्वास नाहीये, ते जमिनीसाठी माझं लग्न कोणत्याही मुलासोबत लावून देऊ शकतात."


अक्षरा म्हणाली,

"कितू मला यातलं फारसं कळत नाही.मी तुझ्या काका काकूंना ओळखत नाही, पण मला असं वाटतं की एकदा तु त्या मुलाला भेटून घ्यावं. जगात सगळेच जण सारखे नसतात. त्या त्याला भेटल्यावर लग्न करायचं की नाही हा निर्णय घे. समजा तो मुलगा स्वभावाने चांगला असेल, तर तुझा विचार करणारं तुझ्या आयुष्यात कोणीतरी येऊ शकतो. समजा तुमच्या दोघांचे विचार पटले तर तु त्याला रजिस्टर कोर्ट मॅरेज करण्यासाठी तयार करु शकते किंवा कमीत कमी खर्चात लग्न करु शकतेस. तुला तुमची जमीन काकांना देण्याची गरज पडणार नाही. पुढे जाऊन तुला जेव्हा पैश्यांची गरज पडेल, तेव्हा तु ती जमीन विकू शकतेस. 

तुला लगेच लग्न करायचं नाहीये बरोबर, तसं त्या मुलाला स्पष्ट सांगून टाक. समजा त्याला तुझ्यासोबत लग्न करायचं असेल तर तो थांबेल आणि त्यामुळे तुला त्याचा स्वभाव समजायला मदत होईल."


किर्ती म्हणाली,

"अक्षू तुझं म्हणणं मला पटतंय, पण त्यामुळे माझं अभ्यासातील लक्ष विचलित व्हायला नको. आपली डिग्री पूर्ण व्हायला अजून साडेतीन वर्ष बाकी आहे."


अक्षरा म्हणाली,

"कितू तु पियू सारखी नाहीयेस. तुझं लक्ष अजिबात विचलित होणार नाही. तु एकदा त्या मुलाला भेटून तर बघ, तुला जर पटला तरचं पुढे जा, नाहीतर विषय जागच्या जागी बंद करायचा."


किर्ती म्हणाली,

"हो असंच करते. एकदा मी त्याला भेटून घेते, म्हणजे काका काकूंची भुणभुण तरी बंद होईल."


बऱ्याच वेळानंतर प्रिया रुममध्ये आली, तिला बघून अक्षरा म्हणाली,

"पियू एवढ्या वेळ कोणासोबत फोनवर बोलत होतीस?"


प्रिया म्हणाली,

"माझ्या मावस बहिणीचा फोन होता, तिचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं भांडण झालं,म्हणून तिने मला फोन केला होता."


अक्षरा म्हणाली,

"तु त्यांच्यातील भांडण मिटवण्याचं काम करत आहेस वाटतं."


प्रिया म्हणाली,

"अग तिचा बॉयफ्रेंड म्हणजे माझ्या आत्त्याचा मुलगा आहे, मग त्यांचं काही झालं की मला त्या दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागते."


अक्षरा हसून म्हणाली,

"चांगलं पुण्याचं काम करत आहेस."


दुसऱ्या दिवशी सर्व लेक्चर्स संपल्यावर निखिलने अक्षराला थांबायला सांगितले होते. कारण त्याला तिच्यासोबत काहीतरी महत्त्वाचे बोलायचे होते. किर्ती व प्रिया होस्टेलवर निघून गेल्या होत्या. अक्षरा निखीलची वाट बघत लायब्ररीत बसली होती. काही वेळाने निखिल तिथे आला. निखिल आल्यावर अक्षरा त्याला म्हणाली,


"काय झालं? निखिल तु मला थांबायला का सांगितलंस?"


निखिल म्हणाला,

"काल घरुन आल्यापासून रोहितचं माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नाहीये, तो सतत फोनमध्ये काहीतरी करतो आहे. रोहितला फोन आला की तो रुमच्या बाहेर निघून जातो. एरवी कोणाचाही फोन आला तरी तो माझ्यासमोर फोनवर बोलत बसायचा."


अक्षरा म्हणाली,

"म्हणजे तुला काय म्हणायचं आहे?"


निखिल म्हणाला,

"अग पुढचं तर ऐकून घे ना. मी काल त्याला कोणासोबत फोनवर बोलत होतास? हे विचारलं होतं, पण त्याने उत्तर देण टाळलं. आज सकाळी तो मोबाईल रुममध्ये चार्जिंगला लावून बाहेर गेला होता त्यावेळी त्याचं नेट ऑन होतं. रोहितच्या फोनची मॅसेज टोन सलग पाच ते सहा वेळा वाजली आणि त्यानंतर त्याला फोन आला म्हणून मी फोन उचलायला गेलो तर तो फोन प्रियाचा होता. मी फोन उचलण्याच्या आत फोन कट झाला. मग मला प्रियाचे मॅसेज त्याच्या फोनवर दिसले. मी ते मॅसेज वाचले नाहीत, पण मला पक्का डाऊट आहे की प्रिया व रोहित मध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे."


अक्षरा म्हणाली,

"काल प्रिया सुद्धा फोनमध्येच घुसलेली होती. मी तिला विचारल्यावर तिने तिच्या मावस बहिणीचं नाव सांगितलं. तुला त्यांच्यावर डाऊट का येत आहे?"


निखिल म्हणाला,

"एक्सामच्या आधी ते दोघे सोबत अभ्यास करायला बसत होते, तेव्हापासून मला रोहित मध्ये खूप बदल जाणवला, कारण इतरवेळी तो प्रियाची सतत उडवत रहायचा, दोघांमध्ये सतत छोटं छोटी भांडणं चालू असायची. दोघांचं एकमेकांसोबत बिलकुल पटायचं नाही. आता मात्र रोहित प्रियाबद्दल एकही चुकीचा शब्द काढत नाही."


अक्षरा म्हणाली,

"निखिल ते दोघे मित्र म्हणून सुद्धा फोनवर बोलत असतील ना?"


निखिल म्हणाला,

"आता आपलंच उदाहरण घेऊयात, आपण जेव्हा एकमेकांसोबत फोनवर बोलतो, तेव्हा किर्ती, प्रिया व रोहितला सुद्धा ते माहीत असतं. आपण त्यांच्यापासून हे लपवत नाही."


अक्षरा म्हणाली,

"हे बघ निखिल, त्या दोघांमध्ये काही चालू असेल तर ते काही दिवसांनंतर आपल्याला कळेलच. उगाच त्यावर आपण इतका विचार का करत आहोत?"


निखिल म्हणाला,

"मी फक्त कुतूहल म्हणून या सगळ्याचा विचार करत होतो. पुढच्या महिन्यात कॉलेजची गॅदरिंग असेल, त्यावेळी आपोआप सगळं बाहेर येईलच."


अक्षरा म्हणाली,

"मला जाम कंटाळा आला आहे. मी रुमवर जाते."


एवढं बोलून अक्षरा होस्टेलवर निघून गेली.


©®Dr Supriya Dighe









🎭 Series Post

View all