नाग - Cobra

भारतातील किंबहुना जगातील विषारी सर्पांमध्ये सर्वात वरच्या स्थानावर असलेला हा फणाधारी साप.


४. नाग - Cobra

मित्रांनो, भारतातील प्रमुख चार विषारी सर्पांपैकी सगळ्यांत वरच्या स्थानावर असलेला साप म्हणजे नाग. नागाचे विविध प्रकार भारतामध्ये आहेत. राजनाग (king Cobra), भारतीय नाग (Spectacled Cobra), शून्य आकडी नाग (Monocled Cobra), काळा नाग (Black Cobra) हे प्रमुख नागाचे प्रकार भारतामध्ये आढळतात.

राजनाग (king Cobra) - जगातील सर्व विषारी सापांमध्ये आकाराने आणि लांबीनेही सर्वात मोठा असलेला हा साप. पृथ्वीवर अजगरानंतर सर्वात मोठा साप म्हणून राजनागाला ओळखलं जाते. याचं विष भारतीय नागाएवढं जहाल नसलं तरी दंश केल्यानंतर शरीरात सोडल्या जाणाऱ्या विषाची मात्र जास्त असते. त्यामुळेच याचा दंश फारच धोकादायक असतो. भारतीय नागापेक्षा याचा फणा रुंदीला लहान असला तरी उंचीला जास्त असतो. राजनागाचा रंग गडद हिरवा, राखाडी, पिवळट तपकिरी, काळपट असतो. संपूर्ण शरीरावर पिवळसर पांढऱ्या जाडसर आडव्या रेषा असतात. याची सरासरी लांबी दहा ते पंधरा फूट असते (तीन ते चार मीटर्स). शक्यतो माणसाच्या वस्तीच्या ठिकाणी राजनाग कधीही येत नाही. याच मुख्य वास्तव्य घनदाट जंगलामध्येच असतं. याच मुख्य खाद्य म्हणजे इतर सर्व साप आणि म्हणूनच याला राजनाग म्हणतात. खाद्य म्हणून साप न मिळाल्यास तो सरडे, सापसुरूळी, लहान पक्षीही खातो. राजनागाला वासाचं जबरदस्त ज्ञान असतं. भक्ष्याचं नेमकं स्थान आणि मिलनकाळात मादी राजनाग यांना तो वासावरून नेमकं शोधून काढतो. याचे नजर एवढी तीक्ष्ण आणि लांब असते कि, तो १०० मीटर्स अंतरावरचे देखील स्पष्टपणे पाहू शकतो. शिवाय, त्याला जमिनीमधील कंपनाचे अचूक ज्ञान असते. कंपनांच्या गतीवरून, तो शत्रू किती ताकतीचा आहे, किंवा कुठे आहे, हे तो अचूक शोधू शकतो.

राजनागाच्या एका दंशात सुमारे ०.३ मिलिलिटर ते ०.६ मिलिलिटर विष शत्रूच्या शरीरात सोडले जाते. हे प्रमाण इतर सर्व विषारी सापांपेक्षा कैक पटींनी जास्त असल्यामुळे उपचार न मिळाल्यास मनुष्य अर्ध्या तासात दगावू शकतो. नागराजाच्या दंशाने आजपर्यंत पन्नास टक्के व्यक्ती मरण पावलेले आहेत. कारण, एक तर दंश झालेल्या व्यक्तीला अर्धा ते पाऊण तासात प्रतिविषाची मात्रा दिली गेली पाहिजे. पण दवाखान्यात जाई पर्यंत, अर्धा एक तास वेळ उलटून गेलेला असतो. आणि दुसरे कारण म्हणजे नागराजाच्या विषावर जगात फक्त दोनच प्रतिविषे उपलब्ध आहेत आणि ती सुद्धा अगदी सहज उपलब्ध होत नाहीत. कारण त्यांचं उत्पादन अतिशय कमी प्रमाणात केलं जातं. थायलंड रेड क्रॉस आणि सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट, हैदराबाद या संस्थांनी हि दोन प्रतिविषे तयार केलेली आहेत.

भारतीय नाग (Spectacled Cobra) - भारतामधे आणि बहुत करून दक्षिण भारतामध्ये हा नाग जास्तकरून आढळतो. या नागाच्या फण्याच्या मागील बाजूस म्हणजे मानेवर चष्म्याचा आकार असतो. म्हणून त्याला स्पेकट्याकल्ड कोब्रा म्हणजेच चष्मेधारी नाग म्हणतात. आणि हा नाग फक्त भारतात आढळतो म्हणून त्याला भारतीय नाग म्हणतात. याचा रंग तपकिरी, काळा, राखाडी किंवा पिवळसर तपकिरी असतो. याचा फणा रुंदीला मोठा पण उंचीला लहान असतो. यांची लांबी सरासरी एक ते अडीज मीटर्स पर्यंत असते.

शून्य आकडी नाग (Monocled Cobra) - हा नाग प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळतो. याच्या फण्याच्या मागे शून्य आकडा असतो. आणि फण्याच्या खाली एक किंवा दोन पांढऱ्या पिवळ्या आडव्या रेषा असतात. बाकी पूर्ण शरीर भारतीय नागासारखं असतं.

काळा नाग (Black Cobra) - हा प्रामुख्याने पाकिस्तान आणि राजस्थानमध्ये आढळतो. भारतीय नागापेक्षा लांबीने लहान असतो, शिवाय याचा फणा देखील लहानच असतो.

नागाचे विष "न्यूरोटॉक्सीक" आणि "सायटोटॉक्सिक" (Nuerotoxic / Cytotoxic) प्रकारचे असते, म्हणजेच चेतासंस्थेवर आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणारे. विषाचा चेतासंस्थेवर तात्काळ परिणाम होतो. चाव्यानंतर काहीच मिनिटांत तीव्र वेदना जाणवायला लागतात. चक्कर यायला लागते आणि पक्षाघाताची लक्षणे दिसू लागतात. दंश केलेला अवयव काहीच मिनिटांत अचेतन व्हायला सुरुवात होते. म्हणजेच त्यातील संवेदना कमी होतात. लवकर उपचार न केल्यास हळू हळू पूर्ण शरीर असंवेदनशील होऊन जातं आणि मनुष्याची शुद्ध हरपते. हृदयक्रिया बंद पडून मनुष्य दगावतो. दंश झाल्यानंतर त्वरित उपचार न मिळाल्यास एक ते दीड दोन तासांत मनुष्य दगावतो.

दरवर्षी भारतामध्ये हजारो लोक नागाच्या दंशाने मृत्युमुखी पडतात. एक तर साप चावला आहे, आणि त्यातही नाग चावला आहे, म्हणून भीतीने रक्तदाब वाढतो आणि शरीरामध्ये रक्ताभिसरण वेगाने होते. विष शरीरामध्ये लवकर पसरते आणि मनुष्य लवकर दगावतो. त्यामुळे शक्य तेवढा स्वतःवर संयम ठेवावा आणि लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत. नाग किंवा कोणताही साप स्वतःहून कधीच माणसावर हल्ला करत नाहीत. त्याला जर धोका जाणवला तरच तो स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो. जर अनायासे तुमच्या समोर नाग आलाच किंवा आमने सामने गाठ पडलीच तर शक्य तेवढं स्वतःला शांत आणि अचल ठेवलं पाहिजे. हळुवारपणे तिथून पाठीमागे संथपणे काढता पाय घेणे कधीही फायदेशीर असतं.

भारतीय संस्कृतीमध्ये नागाला देव म्हणून पुजले जाते. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी साजरी केली जाते. नैवैद्य आणि दुधाचा प्रसाद दिला जातो. तरीही नाग किंवा साप कुठेही दिसला कि, पहिला विचार त्याला मारायचाच हा असतो. मित्रांनो, नाग किंवा कोणताही साप दूध कधीच पित नाहीत. कधीही गारुड्याच्या पुंगीच्या आवाजावरून डुलत नाही. कारण सापांना कानच नसतात तर त्यांना ऐकू कुठून येणार ! नागाला कधीही आणि कसलाही नागमणी नसतो. नाग कधीही डूख धरत नाही. नागाच्या पोटाकडचा भागातून स्रवणाऱ्या तेलग्रंथींच्या वासावरून नर किंवा मादी त्यांच्या मागावर जात असतात. आधीच सांगितल्याप्रमाणे नागाला गंधाचं जबरदस्त ज्ञान असतं. त्यामुळे तो आपल्या साथीदाराचा माग अचूक शोधून काढू शकतो. जर कुठे नागाला मारले असेल तर त्याच्या वासावरून दुसरा नाग, नर किंवा मादी तिथपर्यंत पोहोचतात. आणि आपल्याला वाटतं नाग डूख धरतो. आणखी एक, नर आणि मादी यांचे मिलन चालू असताना जर त्यांच्यावर धोतर पांघरले तर आपल्या घरात संपन्नता येते. हे असले काहीही खरे नसते. मनापासून आणि प्रामाणिकपणे कष्ट केले कि, सुबत्तता आणि संपन्नता आपोआप येत असते. त्यामुळे चित्रपटांमध्ये आणि युट्युब वर दाखवलेले सगळे धादांत खोटे आणि थोतांड असते. थोडा डोळसपणे विचार केला कि, गोष्टी समजायला लागतात.

थोडंसं भारतीय इतिहास आणि पुराणात डोकावून पाहिलं तर नागाची नऊ नावे, नऊनाग स्तोत्रात उल्लेखलेली आहेत. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालीया अशी नऊ नावे नागांची नावे आहेत. तर भारतामध्ये नाग जमातीचे लोक नागालँड राज्यामध्ये जास्त प्रमाणात राहतात. महाराष्ट्रातील नागपूर हे सातवाहन राजांचे मुख्य प्रशासकीय केंद्र होते. सातवाहन हे नाग वंशाचे होते. आणि त्यामुळेच कि काय, नागापुरी, नागापूर, नागपूर असे त्यांच्या राजधानीचे नामकरण करण्यात आले असावे.

पुढील भागात आपण भारतातील इतर विषारी आणि बिनविषारी सापांबद्दल आणि सर्पदंशानंतर घ्यावयाची काळजी / प्रथमोपचार याबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊ.

- धन्यवाद
- ईश्वर त्रिंबक आगम

🎭 Series Post

View all