कपड्यांची फॅशन वाढवी पृथ्वीचे प्रदूषण

Is Fashionable Clothes Responsible For The Earth's Pollution?

कपड्यांची फॅशन वाढवी पृथ्वीचे प्रदूषण



      आज कधी नव्हे ते प्रिया तिचं कपाट आवरत होती. तास दोन तास ती सारखे तिचे अनेक ड्रेस काढून पलंगावर ठेवत होती. खोलीतल्या मोठ्या आरशासमोर वारंवार स्वतःच्या खांद्यावर ते कपडे टाकून, ट्रायल घेऊन बघत होती. पण एकही ड्रेस तिच्या पसंतीस उतरत नव्हता.


             एखादा खूपच सैल होता तर एखादा फारच तंग. तर एखाद्या ड्रेसचा रंग तिला आवडत नव्हता. आणि तो रंग बघुन ती मनातल्या मनात विचार करत होती की आपण ह्या रंगाचा ड्रेस का विकत घेतला? अनारकली, शरारा, पटियाला, प्लाझो , चनिया-चोली असे अनेक पारंपारिक कपडे असूनही तिचं मन मात्र असंतुष्टच होतं. शेवटी कपड्यांचा तो ढीग तसाच ठेवून , ती स्वयंपाक घरात आईजवळ गेली आणि लडिवाळपणे म्हणाली…


प्रिया -"आई माझ्या कॉलेजमध्ये 'सेंड ऑफ पार्टी' आहे . मला ना एक नवीन ड्रेस घ्यायचा आहे प्लीज पैसे दे ना!"


             प्रियाची आई पोळ्या करत होती . पण प्रियाच्या या वाक्यासरशी पोळ्या लाटणारे तिचे हात तिथेच थांबले. आणि ती काहीच न बोलता रियाकडे फक्त आश्चर्याने बघत होती. तिला आईचं निशब्द बोलणं कळलं होतं.


प्रिया -"आई मला माहिती आहे माझ्याकडे बरेच कपडे आहेत. सगळे लेटेस्ट फॅशनचे आणि अगदी ट्रेडिशनल सुद्धा. पण त्यातल्या काही ड्रेसची फिटिंग मला आता व्यवस्थित बसत नाही. काही अगदी ढगळ आहे, तर काही अगदीच घट्ट. काहींचे रंग मला आवडत नाहीये आणि काही पॅटर्न आता ओल्ड फॅशन झाले आहेत. सो प्लीज मला नवीन ड्रेस घ्यायला पैसे दे ना!"


आई -"एवढ्या पोळ्या करून झाल्या की देते तुला पैसे."


               प्रियाची आईने भराभर पोळ्या केल्या. गॅसचा ओटा आवरला आणि ती तिच्या खोलीकडे गेली. प्रियाच्या खोलीत सगळीकडे नुसता कपड्यांचा पसारा होता. सोफा , खुर्च्या , पलंग , ड्रेसिंग टेबल , लिखाणाचं टेबल , जिथे जागा मिळेल तिथे सगळे कपडे छान ए.सी.ची हवा खात होते आणि मोकळा श्वास घेत होते.


आई - "प्रिया अगं इतके कपडे असुनही तुला अजून ड्रेस घ्यायला पैसे हवे आहेत! कमाल आहे बाई तुझी!"


प्रिया - "आई प्लीज फक्त याच वेळी पैसे दे ना नंतर वर्षभर मी अजिबात कपडे घेणार नाही प्रॉमिस." प्रिया आर्जवी स्वरात म्हणाली.


आई -"बर ठीक आहे पण मला एक सांग फ्रेंडशिप डे, ॲन्युअल डे, न्यू ईअर सेलिब्रेशन , फेअरवेल पार्टी आणि याशिवाय दिवाळी - दसरा ,तुझा स्वतःचा वाढदिवस, मग मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस असा प्रत्येक इव्हेंट वेगळा, मग त्यानुसार कपड्यांच्या आणि ड्रेसच्या वेगवेगळ्या थीम आणि आणखी ढीगभर कपडे. त्याशिवाय वेगवेगळे सेल, एकावर एक फ्री , दोन कपड्यांवर एक फ्री , अशा वेगवेगळ्या ऑफर दिसल्या की , तू लगेच निघते बॅग घेऊन कपडे खरेदीला ! या कपड्यातले काही तर तू फक्त एकदाच घातले आहेस. याशिवाय कॉलेजमध्ये घालण्याचे वेगळे कपडे , ट्युशन क्लासचे वेगळे ड्रेस, घरात घालायचे कॅज्युअलस , रात्री झोपताना घालायचे नाईट ड्रेस आणि बर्मुडाज , प्लाझो, लेगिन्स, ट्युनिक्स , ट्त्रा नुसते कपडेच कपडे. तू स्वतः एकदा बघ , खोलीभर सगळीकडे नुसते कपडे पसरले आहेत. दोन कपाटं ओसांडुन वाहत आहेत तुझ्या कपड्यांनी आणि आता तिसरं आणावी लागेल. किती पैसे खर्च झाले याचा काही हिशेब? ह्या कपड्यांमुळे जे प्रदूषण होतं ते वेगळंच!


            आईच्या तोंडून प्रदूषण हा शब्द ऐकून प्रिया एक क्षण उडालीच.


प्रिया - "आई कपड्यांमुळे कुठे प्रदूषण होतं ग? काहीतरी बोलतेस तू !"


आई - "थांब ! हे बघ!हे जर्नल वाच. जागतिक प्रदूषण मंडळाकडून हे काढलं आहे. यात स्पष्टपणे नमूद केला आहे की आजकालच्या कपड्यांच्या स्वस्त फॅशनमुळे जागतिक तापमान वाढीत म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यात भर पडते आहे."


            प्रियाने ते जर्नल तिच्या हातातून जवळजवळ हिसकावून घेतलं आणि वाचायला लागली…….


          अन्न , वस्त्र , निवारा या खरं पाहिलं तर मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. पण नागरी संस्कृतीचा उदय याबरोबर या तीनही बाबी मूलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन माणसाच्या आयुष्याचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग बनलेल्या आहेत आणि त्याचा अतिरेक होत आहे. आपल्या गरजेपेक्षा जास्त वापरण्याची हाव निर्माण झाली आहे. त्यामुळे पराकोटीची विषमता उदयाला आली आहे. पण त्यातही अतिशय भयंकर परिस्थिती वस्त्रांच्या अतिरेकाने निर्माण होत आहे आणि ती केवळ अतिरेक करणाऱ्यांचे आयुष्यात निर्माण होत नसून त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. सातत्यानं कपडे खरेदी करायचे. ते वापरून किंवा न वापरता ,थोडेसेच वापरून , फेकून द्यायचे ही जणू नवी संस्कृती निर्माण झाली आहे.


          कपडे किंवा फॅशन ही त्यातल्या त्यात सहज परवडण्याजोगी चैन असल्यामुळे जगाच्या पाठीवरची खूप मोठी लोकसंख्या सातत्याने मोठ्या प्रमाणावर कपडे खरेदी करत असते. त्यातही युरोप आणि अमेरिकेत सतत बदलणाऱ्या फॅशनच्या कपड्यांचे मार्केट खूप मोठं आहे.


           फास्ट फॅशनसाठीचे हे कपडे प्रामुख्याने चीन आणि बांगलादेशात तयार केले जातात. तिथून हे कपडे युरोप आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत पाठवले जातात. एजन्सी फ्रान्स प्रेस यांच्या निरीक्षणानुसार तिथे जे कपडे विकले जात नाहीत ते 59 हजार टन कपडे चिली देशाच्या 'इकिक' बंदरात दरवर्षी आणले जातात. तिथून हे कपडे लॅटिन अमेरिकन देशांमध्ये म्हणजे मुख्यतः दक्षिण अमेरिका खंडात विकायला पाठवले जातात. परंतु त्याही बाजारपेठेत हे सगळे कपडे विकले जाऊ शकत नाहीत. असे कुठेच विकले न गेलेले कपडे मग चिलीच्या वाळवंटात टाकून दिले जातात. असे फेकून दिलेले हे कपडे असतात तरी किती?


             दरवर्षी 29 हजार टन नवीन , कुठेही विकले न गेलेले कपडे असे चिलीच्या आटाकामा वाळवंटात टाकून दिले जातात. एक टन म्हणजे एक हजार किलो असा विचार केला तर हे कपडे किती प्रचंड जागा व्यापत असतील हे आपल्या लक्षात येऊ शकतं. चिली देशात असलेल्या वाळवंटाचा कितीतरी भाग आता या टाकून दिलेल्या कपड्यांनी व्यापला आहे. वाळवंटात या कपड्यांची नीट विल्हेवाट न लावता ते असे का टाकून दिले जातात? तर हे कपडे तयार करताना त्यात हानिकारक रसायने वापरलेली असतात आणि त्या कपड्यांचा जैविक घटक होऊ शकत नाही. म्हणजेच त्यावर प्रक्रिया करून त्यांचं खत तयार करणं किंवा मातीत मिसळून टाकणं असं काही करता येऊ शकत नाही. त्यामुळे कुठल्याही महानगरपालिकेचा कचरा डेपो ते कपडे आपल्या हद्दीत येऊ देत नाही.


         याचाच अर्थ असा की , हे टाकून दिलेले कपडे पुढील कित्येक वर्ष तसेच त्या वाळवंटात पडून राहणार इतकच नाही तर त्यांनी व्यापलेली जागाही उत्तरोत्तर वाढत जाणार. कडक उन्हाने हे कपडे कालौघात खराब होतील, चिंध्या होतील, त्यांचे अगदी बारीक कण होतील, पण ते कधीही खऱ्याअर्थाने मातीत मिसळणार नाहीत. फॅशन उद्योगाने पर्यावरणाचा कसा आणि किती नाश होतोय याचं हे एक उदाहरण आहे.


           फॅशन उद्योगामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा एकूण जागतिक उत्सर्जन आतील वाटा आठ ते दहा टक्के आहे. असं संयुक्त राष्ट्र संघाचे म्हणणे आहे. 2018साली असं लक्षात आलं होतं की , जगातील हवाई मार्ग आणि समुद्र मार्गावरील एकूण वाहतुकीने एकत्रितपणे जेवढी ऊर्जा वापरली त्याहुन जास्त ऊर्जा एकट्या फॅशन उद्योगात वापरली गेली.


            ब्रिटनमधील अॅलंन मॅक आर्थर फाऊंडेशनच्या अभ्यासानुसार 2004 ते 2019 या काळात कपड्यांचे उत्पादन दुप्पट झालं आहे . 2000 साला पेक्षा 2014 साली ग्राहक कपड्यांची खरेदी 60 टक्के जास्त करत होते . आणि अर्थातच त्यात तयार झालेल्या , वापरल्या गेलेल्या आणि न वापरलेल्या प्रत्येक कपड्याने पर्यावरणाचा काही ना काही र्हास केलेला आहेच.


          जर्नल वाचून प्रिया चे डोळे खाडकन उघडले. प्रियाची आई प्रिया ला कपड्यांच्या फॅशनमुळे होणारी पर्यावरणाची हानी याबद्दल अगदी जीव तोडून सांगत होती आणि शेवटी आईने प्रियाला काही प्रश्न विचारले..


    आई -" फॅशन इंडस्ट्रीला आर्थिक फायदा करून देण्यासाठी आपण दुहेरी किंमत मोजतोय. पैसे ही देतोय आणि पर्यावरणाचं नुकसान ही करतोय. त्यातला खरा दैवदुर्विलास हा आहे की, ही किंमत जगातला प्रत्येक माणूस मोजतो आहे , मोजणार आहे. ज्याला अंग झाकायला पुरेसे कपडे मिळत नाहीत अशी ही माणसं या अतिरिक्त कपड्यांच्या उत्पादनाची किंमत मोजणार आहेत. पण उपभोगाची ही अधिकाधिक वेगाने फिरणारे चक्र थांबवणं आणि उलटी फिरवणं हे सोपं नाही. त्यासाठी गरज , हौस आणि चैन यातल्या सीमारेषा नव्याने आखण्याची गरज आहे. माणसांनी खरेदी कमी केली तर उत्पादन कमी करावच लागतं. प्रश्न असा आहे की माणसं स्वतःच्या गरजा कमी करतील का? हौस तरी कमी करतील का? किमान हाऊस भागल्यानंतरची चैन तरी कमी करतील का? त्याहून मोठा प्रश्न हा आहे की,  ती चैन कमी न करण्याची चैन माणसांना आता परवडणार आहे का?"


        आईच्या या प्रश्नांनी आणि जागतिक प्रदूषण मंडळाकडून प्रकाशित जर्नल मधल्या माहितीने प्रिया अंतर्मुख झाली आणि तिने मनोमन ठरवलं की यानंतर गरजे आणि आवश्यकतेपेक्षा जास्त कपडे खरेदी करायचं नाही.


***********************************************


           वाचकहो दर वर्षीचा उन्हाळा मागल्या वर्षीपेक्षा जास्त गरम होत आहे . दहा वर्षापूर्वी 40 डिग्री सेल्सिअस असलेलं मे महिन्याचं तापमान आता मार्च महिन्यातच 45 ते 46 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे. आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की , कमीत कमी प्रदूषण करणाऱ्या इको-फ्रेंडली वस्तूंचा वापर आपण दैनंदिन जीवनात करायला हवा त्यामुळे वातावरणात उत्सर्जित होणाऱ्या कार्बनचे प्रमाण कमी होईल आणि ओझोन चा थर वाचेल आणि येणार्‍या पिढ्यांना आपण निदान स्वच्छ आणि शुद्ध हवा तरी देऊ शकू.


*********************************************     



  वरील कथा कशी वाटली ते नक्की कळवा तुमच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत…….



फोटो - साभार गुगल


जय हिंद

🎭 Series Post

View all