गुणी सुना - भाग ५ ( अंतिम)

प्रस्तुत कथेत मी सासूबाई आपल्या सुनांना गुणी असण्याचीखरी परिभाषा काय असते हे कसे शिकवतात याचा उलगडा केला आहे.

मागील भागात आपण पाहिले की सुजाता वहिनी तेजलला घरातील कामांवरून हिडीसफिडिस करतात.

तेजलला समजत नाही तिचे काय चुकते आहे ते.ती हिरमुसून जाते आणि त्यांचे बोलणे निमूटपणे सहन करते. आता बघुया पुढे..

आज मनीष भलताच खुश होता.तेजलला काहीतरी सांगण्यासाठी तो बेडरूममध्ये येतो,

" तेजल ,मी आज खूप आनंदात आहे.माझे ना आज प्रमोशन झाले आहे.ज्या पोझिशन ची इतक्या दिवसांपासून मी वाट पाहत होतो,ती मला आज शेवटी मिळालीच! आय हॅव डन इट! "

असे म्हणून तो तिला जवळ घेतो.

" तेजल तुला काय झालं एवढं तोंड पाडून बसायला? तुला आनंद नाही झाला माझी गुड न्यूज ऐकून?"

" हो रे मला खूप आनंद झाला तुझी गुड न्यूज ऐकून . माझं जरा डोक दुखतय म्हणून मी जरा बेडरूम मध्ये आराम करत होते." 

" बर मी फ्रेश होतो.कर तू आराम. अग आज एवढ्या दिवसांनी वहिनींनी मला ऑफिस मध्ये फोन केला आणि मला ऑनलाईन शॉपिंग,बिल्स कशी भरायची हे आजपासून रोज शिकवा असे म्हणत होत्या. तू ही सारी बाहेरची कामे करतेस मग त्यांना का शिकायचे आहे हे सारे? जाऊदे तू घरी असतेस ना, मग त्यांना तू शिकव हे सगळं. चल आराम कर!" 

" बर!"

मनीष बेडरूम मधून निघून जातो.

आता कुठे तेजल ला वहिनींच्या अचानक अशा वागण्याचा अर्थ समजू लागला होता. खर तर ती खूप दुखावली गेली होती.म्हणून कोणाकडे तरी मन मोकळे करावे असे तिला वाटत होते.तिला काय करावे ,कोणाकडे जावे काहीच कळत नव्हते.तेवढ्यात सासूबाई तिला आवाज देतात,

" तेजल.."

" आले आले.."


ती धीर धरून सासूबाईंकडे जाते.

" ऐक ना मला जरा मोबाईल मध्ये मेसेज कसे करायचे ते शिकवते का?"

" हो शिकवते ना.."

सासूबाई तेजलच्या मनातील घालमेल ओळखतात व काय झाले आहे असे विचारतात.न राहवून शेवटी, घरात त्यांच्या गैरहजेरीत मागील दोन दिवसांत काय घडले ते तेजल सांगते.

" सुजाता ए सुजाता.."

" आले आले .."

" सुजाता आणि तेजल मी तुम्हा दोघींना सांगते की उगीच एकमेकांशी तुलना करत,एकमेकींची कामे शिकण्याचा अट्टाहास करू नका.मान्य आहे मला की परफेक्शन सर्वांना हवे असते,पण त्याचा अतिरेक कधीच चांगला नसतो.नाहीतर मग उगाच अशी वादावादी होते.माझ्या दोन्ही सूना मला सारख्याच आहेत,आपापल्या कामांत तरबेज आहेत,म्हणून त्या गुणी आहेत.प्रत्येकाची कामाची पद्धत, आवड वेगवेगळी असते.तुम्हाला नवीन काही शिकायचे तर बिनधास्त शिका,फक्त घराचे घरपण जपून,एकमेकींची मने सांभाळून! हीच माझी गुणी सूनांची परिभाषा आहे.समजले?"

तेजल आणि सुजाता एकमेकींकडे बघतात आणि सासूबाईंना म्हणतात,

" हो आई . यापुढे आम्ही कधीही घरात भांडणे होऊ देणार नाही,मने दुखावणार नाहीत."

सासूबाई दोघींना जवळ घेत आलिंगन देतात आणि म्हणतात,

" माझ्या गुणी सूनांना खूप खूप आशीर्वाद!"

तेजल च्या मनात आज " गुणी सूना " याविषयी सासूबाईंची व्याख्या ऐकून लख्ख प्रकाश पडला होता.ती आज खूप मोठ्या दडपणातून मुक्त झाली होती.


वाचकहो, या सासूबाईंनी गुणी असणे म्हणजे नेमके काय असते हे अगदी परफेक्ट समजून सांगितलं आपल्या सुनांना. हो ना!

समाप्त..

फोटो: साभार गुगल 

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

🎭 Series Post

View all