गुणी सुना - भाग १

प्रस्तुत कथेत मी सासूबाईंनी आपल्या सुनांना गुणी असणे म्हणजे नेमके काय हे कसे पटवून देतात हे सांगितले आहे.


" अगं बाई आवर ना तेजल लवकर! हे बघ आता तात्या येतील.त्यांना नीट वाढ.घाई करू नकोस."

" हो सुजातावहिनी. ऐका ना या वाटीत वरण,नंतर इथे भात,अन् मग भाजी .."

"अगं बाई राहू दे.मीच वाढते त्यांना आल्यावर."

" बर वहिनी चालेल! मी तोवर खोल्या झाडून घेते."

तेवढ्यात सासूबाई किचन मध्ये आल्या.

" नको अग.तुला नाही जमणार ! सुजाता खूप छान झाडते.अगदी फरशी पुसल्यासारखी स्वच्छ वाटते."

तेजल मनोमन खचते.संध्याकाळी मनीष ( तेजलचा नवरा) घरी आला.

" तेजल जरा चहा ठेव ना!"

" हो ठेवते."

तेजलने मनिषला चहा दिला.

" काय चहा केला आहेस हा? तुझ्यापेक्षा वहिनी छान करतात ! वहिनी जरा माझ्या बायकोला ट्रेनिंग द्या हो चांगल स्वयंपाकाचं! बिचारीला काही येत नाही."

" हो ना भावजी! काय करणार? तिला सर्वच शिकवावं लागणार ! आपल्या घरातील प्रत्येकाच्या खाण्याच्या सवयी,मसाल्याचे प्रमाण,अगदी सारच शिकवीन मी. काळजी करू नका तुम्ही. "

" ओके! तेजू सुजाता वहिनी शिकवतील तुला सगळ. डोन्ट वरी!"

" हो नक्कीच शिकेन मी त्यांच्याकडून!"

रात्री जेवण झाल्यावर तेजल व मनीष बेडरूम मध्ये आले.

" मनीष तुला मला एक गोष्ट सांगायची आहे."

" हो बोल ना! अरे घरात आल्यापासून सुजाता वहिनी मला स्वयंपाकात मदत करूच देत नाहीत.नेहमी' मी करते तुला जमणार नाही ' असे बोलून स्वतःच सर्व स्वयंपाक करतात.एवढच काय तर सासूबाईंनी सुद्धा मला खोल्या झाडू दिल्या नाहीत; का तर म्हणे सुजाता चांगली झाडते; अगदी फरशी पुसल्यासारखी वाटते."

" बर मग?"

" अरे मग काय? असे काय विचारतोस?"

 तेजल ला हळूच जवळ घेत मनीष म्हणाला,

" अग माझी राणी तू घरात अजून नवीन आहेस. जमेल तुला हळूहळू.नको लोड घेऊस ! सद्ध्या तरी माझ्याजवळ ये."

दुसऱ्या दिवशी सकाळी,

तेजल जरा लवकर म्हणजे सुजाता वहिनीच्या आधी उठून सर्वांचा नाष्टा बनवते.

सासूबाई म्हणतात,

" अरे वाह तेजल! पोहे छान झालेत."

" काय हे आई? तेजल ने पोह्यात मीठ जास्त टाकले आणि तुम्ही पोहे छान केलेत असे म्हणताय? मी उठायच्या आत हिने पोहे केले अन् नाष्टा बिघडला."

" बेटा तेजल,जरा मोजून मापून टाकायचं ना मीठ! सुजाता तू करत जा बर नाष्टा नेहमी सारखं.हिला हळूहळू शिकव स्वयंपाक. हा तात्या स्वयंपाकात कसूर माफ करत नाही बरं का तेजल!"

"तेजल तुला येत नाही तर कशाला करतेस स्वयंपाक ? माझा मुडच खराब झाला असे पोहे खाऊन! " मनीष म्हणाला. 

सर्वांनी पोह्यांना नावे ठेवली.मग तेजल ने पोहे खाल्ले तेव्हा समजले की तिने मीठ जरा जास्तच टाकले होते.

पण तरीही सासूबाई मात्र पोहे छान झाले असे का म्हणाल्या? नक्की काय म्हणायचे आहे सासूबाईंना? खर तर सासूबाईंनी वहिनी आणि तेजलला तिच्या लग्नात,' तुम्ही माझ्या गुणी सूना म्हणून कायम मिळून मिसळून रहा' असे म्हंटले होते.पण सुजाता वहिनी वागतील का तेजलशी चांगलं?त्या शिकवतील का तेजलला स्वयंपाक? सासूबाईंच्या शब्दाला त्यांचा या दोन्ही सूना खरंच जागतील का?वाचा पुढील भागात!

भाग १ समाप्त. 

फोटो :साभार गुगल

 ©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

🎭 Series Post

View all