त्या जागेवर पडलेला मृतदेह पाहून दोघे अजूनही सुन्न होते. काय करायचं त्यांना सुचत नव्हते. त्यांनी आधी आजूबाजूला पाहिले पण ती जागा एकदम निर्जन होती. अंधारात त्या पडलेल्या व्यक्तीचा बॅटरीचा प्रकाश कमी असल्याने अर्धाच कळून येत होता. उजाडायला अजून बराच अवकाश होता. पण इतक्या वेळ या भागात थांबून काय करायचे आणि दोघे निघून गेले तर एखादं जंगली जनावर असलं तर ते हा मृतदेह घेऊन जाण्याची शक्यता होती.
जंगलातील वातावरण बाहेरच्या वातावरणापेक्षा खूपच थंड होते. त्या जंगलात वाऱ्याचा फक्त प्रवेश असावा , इतर प्राण्यांचे आवाज त्या दोघांना ऐकू आले नाही खूप वेळ उलटून गेला तरीही दोघांना ऐकू आला नाही. त्या मंदिरात बसायला अपुरी जागा होती म्हणून दोघे कसरत कशी तरी करत बसले होते. डोळे झोपेची आवर्तने करत होती पण कोणतंही संकट अचानक आल्यास तर बेसावध राहून चालणार नव्हते म्हणून दोघेही झोपेला परतून लावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.
वातावरणातील ती शांतता दोघांना असह्य होत होती, काही वेळाने त्या समई मधील तेल संपून गेले आणि प्रकाश टिकवण्यासाठी संघर्ष करणारी ती वात हळूहळू शांत झाली.मोबाईल च्या बॅटरीचा प्रकाशच त्यांना धीर देत होता.चार्जिंग भरपूर असल्याने त्या दोघांना तशी विशेष चिंता नव्हती. त्या माणसाला मरून बराच वेळ झाला होता, तो मृतदेह हळूहळू सडू लागल्यामुळे त्यांची दुर्गंधी सुटू लागली. दोघांच्या पोटात त्यामुळे ढवळू लागले. ते दोघे तिथून उठले आणि थोडेसे मागे गेले. पुढे गेलो तर अंधारात हरवण्याची भिती जास्त होती म्हणूनच ते मागे आले.
"संजीत, तु माघारी जा आणि आपल्या टीमला इथे घेऊन ये. सकाळ व्हायला आता थोडाच वेळ आहे असे मला वाटत तोपर्यंत मी इथेच थांबतो. या मृतदेह ला काही होऊ नये म्हणून ओजस म्हणाला."
"पण सर, इथे तुम्हाला काही धोका झाला तर...आपण इथे संरक्षणाच्या दृष्टीने काहीच आणले नाही व जंगली जनावर नसले तरी साप सारख्या प्राण्यांचा धोका आहे त्यामुळे मी तुम्हाला नाही सोडू शकत संजीत म्हणाला."
"संजीत असे काही नाही होणार, तु गेलास तर लवकर इथे टीम पोहचेल आणि आपल्याला आज काय होणार हे पण माहित नाही तर अशावेळी बेसावधपणे राहणं परवडणारे नाही त्यामुळे तु लगेच पुढे जा ओजस त्याला समजावत म्हणाला."
"ठीक आहे सर! पण तुम्ही माझी बंदुक जवळ ठेवा, मला यांची आवश्यकता नाही. मी काही तासांतच येतो संजीत म्हणाला."
"ठीक आहे, ओजस त्यांच्या हातातून बंदुक घेत म्हणाला."
संजीत पुढे निघून गेला आणि ओजस तिथेच बसून राहिला. त्या मंदिरात जायची त्यांची इच्छा होती पण त्या मृतदेह मधून येणाऱ्या दुर्गंधी मुळे त्याला जावे असे वाटत नव्हते. हळूहळू अंधार कमी होत होता आणि सूर्य उगवण्याची चिन्हे आकाशात दिसू लागली. एवढा कालावधी उलटून ही ओजस झोपला नव्हता. त्यांच्या डोळ्यांत प्रचंड झोप दिसून येत होती, डोळे ताठरून गेले होते व त्यात लालसरपणा दिसून येत होता.सूर्याची किरणे काही क्षणानंतर दिसू लागली पण तरीही इथला परिसर मध्ये असलेली नीरव शांतता ने तो आश्चर्य चकित झाला. सकाळी तरी कोणता पक्षी अथवा प्राणी दिसेल अस त्याला वाटले पण कोणीच दृष्टीस न पडल्याने तो गोंधळून गेला. तेवढ्यात संजीत तिथे आला.
"सर आपली टीम आली आहे संजीत म्हणाला."
त्या आवाजाने ओजस भानावर आला.
"ठीक आहे, त्यांना ही बॉडी कलेक्ट करायला सांगून पोस्टमॉर्टम साठी पाठवून द्यायला सांग."
"हो! सर, ॲम्ब्युलन्स आली आहे पण सोबत काही पत्रकार ही आले आहेत.... संजीत सावकाश म्हणाला."
"पत्रकार आणि इथे..? ही गोष्ट आता तरी समजायला नको होती संजीत अजून यांची ओळख नाही पटली व ही गोष्ट बाहेर पडताच न जाणो आपण मुख्य गुन्हेगार पासून दूर जाऊ ओजस चिडून म्हणाला."
"सर तुमचा राग समजू शकतो, पण हा गुन्हेगार नसेल किंवा त्या टोळीचा सदस्य नसून कोणी दुसरा असेल तर... स्वतःला याने मारले म्हणजे नक्कीच प्रकरण काही वेगळं असावं असं मला वाटत संजीत म्हणाला."
"वेगळ प्रकरण काय असावे असे तुला वाटते संजीत...? याने एकतर आत्महत्या केली असावी किंवा यांच्या जीवाला कदाचित त्यांच्याच लोकांकडून धोका असावा म्हणून त्याने भितीने स्वतःच जीवन संपवले हे इतक साधं असू शकत नाही ओजस ठामपणे म्हणाला."
"कदाचित... पण मग त्याने मंदिरात येऊन ते ही अश्या निर्जन ठिकाणीच येऊन आत्महत्या करावी सर... कदाचित त्याने मंदिरात जे काही असावे त्याला प्रसन्न करण्यासाठी बळी दिला असावा किंवा स्वतःच्या वाईट इच्छापूर्ती साठी.... संजीत म्हणाला."
यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे ओजस ला समजेना आधी कमिशनर आता हा संजीत काय झाले आहे सर्वांना. गावातील या अश्या अशक्य असलेल्या, काही पुरावे नसलेल्या गोष्टींवर यांचा विश्वास कसा बसतो, या सगळ्या निरर्थक, खुळचट कल्पना आहेत हे त्यांना सांगून ही पटणार नाही... कदाचित गावातील या सर्वांची जडणघडणच तशी असावी पण मला तरी या अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं कधीच शक्य नाही होणार.... मला माझ्या पद्धतीनेच हे सर्व पहाव लागेल ओजस स्वतःशीच विचार करत होता.
"सर बॉडी नेली त्या व्यक्तीची" एक हवालदार पुढे येत म्हणाला.
"ओके, तुम्ही सर्व जा पुढे आणि त्या पत्रकारांना ही बाहेर काढा येथून.नाही नाही त्या गोष्टी पसरवतील हे ओजस करड्या आवाजात त्या हवालदाराला म्हटला."
"होय सर" असे बोलून तो हवालदार निघून गेला.
"संजीत आपण त्या मंदिरात जाऊ चल... रात्री तर काही दिसला कदाचित आत्ता कळेल त्या मंदिरात काय आहे, कोणती अशी मूर्ती आहे जिला अशा निर्जन ठिकाणीच प्रस्थापित केली ओजस म्हणाला."
"चला सर संजीत म्हणाला."
ते दोघे पुढे गेले. मंदिराचा न दिसलेला भाग सकाळच्या प्रकाशात संपूर्ण दिसून येत होता. मंदिराची बांधणी पूर्ण पणे विचित्र होती. ओबडधोबड दगडी बांधकाम दिसून येत होत.मंदिराला एक ठराविक आकार नव्हता. पूर्ण काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर खूप विचित्र, आकर्षणहीन वाटत होते. मंदिराला या पायऱ्या ही दिसून येत नव्हत्या. मंदिराच्या वरच्या भागावर कळस ही नव्हता न काही ध्वज. मंदिराच्या आजूबाजूला मनाला अस्वस्थ करणारी शांतता होती.
ते दोघे तसेच पुढे गेले. मृतदेह त्या व्यक्तीचा नेऊन ही थोडी दुर्गंधी त्या वातावरणात तशीच होती. ते दोघे मंदिराच्या आत गेले. आत मध्ये जाताच दोघांना लालभडक रंगात रंगवलेली मूर्ती दिसून आली. त्या लालभडक रंगामुळे ती मूर्ती नेमकी कशाची दोघांनाही कळत नव्हते. ते दोघे तसेच पुढे गेले. ओजस ने आपल्या मोबाईल मधील टॉर्चचा प्रकाश त्या मूर्तींवर टाकला आणि ते पाहून दोघे थक्क झाले. त्या मुर्तीच्या चेहऱ्यावरील ठेवण जोकरच्या चेहऱ्याशी साम्य दाखवत होती. ओजस आणि संजीत थक्क झाले.
जी गोष्ट फक्त कल्पनाच मानत तो होता ती त्याच्या समोर होती. एका जोकर ची मूर्ती ती पण या अशा निर्जन ठिकाणी, हे मंदिर कोणी बांधले आणि ते ही असे विचित्र बांधणीत ओजस ला काही सुचेना पण संजीतचा मात्र मनाचा थरकाप उडाला. कधीतरी यांचे साम्राज्य पुन्हा येईल, त्यावेळी जी हिंसा होईल ती खूप भयानक होईल, सगळीकडे फक्त रक्तपाताची दृश्य असतील अशी जी गोष्ट त्यानें आपल्या आजोबा कडून ऐकली होती ती खरी असल्याची त्याला जाणवयाला लागली. त्यानें त्या मुर्तीला स्पर्श केला आणि तो दचकला. त्या मुर्तीचा रंग लालभडक नसून त्याला थंडगार वाटला. नुकतीच कोणी तरी रक्ताने स्वतःच्या ती मुर्ती रंगवली असावी असं वाटतं होतं. त्याला तो व्यक्ती आठवला नक्कीच त्याने स्वतःचा नरबळी दिला संजीत ची खात्री झाली.
संजीतच्या मनात प्रचंड उलथापालथ झाली, ही घटना सामान्य नाही त्याला वाटू लागले. त्यांच्या मनाभोवती भीतीच वलय दाटून आले. ओजस मात्र आश्चर्य चकित होता. ज्याला ती फक्त एक कल्पना वाटत होती ती त्याच्या समोर वास्तव उभारून होती. त्या मुर्तीला पाहून त्याला भिती नाही पण एक धक्का बसवून गेली त्यांच्या काही तर्काच्या भिंतींना यामुळे तडा गेला होता.
क्रमशः