Jan 26, 2022
नारीवादी

वर्तुळ भाग १

Read Later
वर्तुळ भाग १


"हॅलो मालिनी? एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. लवकर कॅफे रुमा ला ये आणि फोन वर काही बोलणं नको."
मालिनी काही न बोलता फोन कट करून आवरायला घेते.
" लॅपटॉप घेतला, फोन घेतला, किल्ली घेतली…" असं स्वतःशीच बडबडत सगळं नीट घेतलं ना पाहून निघते.
" मालिनी अगं थांब कुठे निघालीस? आज काही काम नव्हतं ना? हे चालणार नाही आता. तुला पाहायला मुलाकडचे येणार आहेत आज लक्षात आहे ना?" मलिनीची आई आशा ओरडून बोलत असते.
मालिनी शांतपणे , " आई मला लक्षात आहे आणि ते संध्याकाळी येणार आहेत. माझं छोटं काम आहे पटकन करून येते आणि मला अडवू नकोस आत्ता."
" अडवून तू थांबणार आहेस का? तुझं छोटं काम मोठं होतं आणि मग उशीर.आज मी तुला जाऊन देणार नाही. मला लाज येते ती लोकं येऊन बसतात, वाट बघतात आणि निघून जातात. अशीच १० स्थळं गेली. तुला लग्नं नाही करायचं का? तसं सांग."
" आई मला लग्न करायचं आहे पण माझ्या कामाच्या वेळेनुसार थोडं सांभाळून घेणारं सासर मला हवं आहे. माझ्यासाठी थोडी वाट बघू न शकणारे नकोच मला. ते आधीचे दहा नाही थांबले ते बरंच झालं. चल निघते मी आणि येते वेळेत परत काळजी नको करुस." मालिनी निघून जाते आणि आशा ती नीट गेली हे बघून घरात येते.
" अहो बघताय ना.. असं वागते ही. तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? खूप उणीव भासते तुमची मला. पोरगी लाखात एक आहे आपली. आज ती तिच्या कामात एका वेगळ्याच उंचीवर आहे पण ते अनुभवायला तुम्ही हवा होतात. " आशा रडत मालिनीच्या वडिलांच्या फोटो कडे बघत असते.

\"मालिनी\" हुशार, शांत, समजूतदार तेवढीच कठोर आणि कडक पण. मेडिकल लॉ ह्या वेगळ्या आणि आव्हानात्मक विषयात शिक्षण आणि काम करणं.. नुकतीच स्वतःची कंपनी सुरू केली होती. काही केसेस अगदी यशस्वीरित्या मार्गी लावल्या होत्या त्यामुळे तिला बरेच जण ओळखायला लागले होते. औषध कंपन्या, विक्री करणारे, एजंट्स तर तिला जास्तच ओळखायला लागले होते. अशाच एका केसवर तिचं सध्या काम चालू होतं.
मालिनी कॅफे रूमा मध्ये जाते.
"प्रीती बोल. काय झालं? काही माहिती मिळाली का?"
" माहिती? अगं जॅकपॉट म्हण राणी जॅकपॉट. व्हिडिओ बघ हा." प्रीती तिचा लॅपटॉप समोर करते. व्हिडिओ बघून मालिनीचे डोळे चमकतात.
" प्रीती तूच करू शकतेस हे. तू ग्रेट आहेस."
" ती काही ग्रेट नाहीये हा व्हिडिओ मी काढला आहे. फुकटचा भाव खायची सवय असते काही लोकांना." ललित खुर्ची ओढून दोघींच्या समोर बसतो.
प्रीती आणि ललित. दोघंही फ्रीलान्सर म्हणजे स्वतंत्र पत्रकारिता करणारे. दोघंही वेगवेगळ्या वेळेला, वेगळ्या केस उलगडताना झालेले मित्र आणि आता पार्टनर. प्रीती चंचल, मोकळ्या स्वभावाची पण कामात एकदम चोख असते. ललित ह्या तिघांमध्ये लहान पण काम एकदम धडाकेबाज. मालिनी ने दोघांना स्वतःहून भागीदारी दिली होती.
" ए ललित मी आत गेले होते. जोखीम जास्त मी घेतली. तुला काय नुसतं व्हिडिओ काढायला.\"
" हो का. एक काम कर पुढच्या वेळेस मी आत जातो तू अशी पाइप किंवा खिडकीत चढ आणि रेकॉर्ड कर."
" तुम्ही दोघं थांबता का जरा? कामावर लक्ष द्या. ह्या व्हिडिओ मध्ये ही दोन माणसं कोण आहेत त्याचा शोध घ्यायला हवा. त्या दोघांनी काही गोळ्यांची सँपल दिली आहेत एकमेकांना आणि त्यात काहीतरी घोळ दिसतोय."
" हो आणि हा घोळ इतक्या लवकर तुम्हाला समजेल असं वाटलं नव्हतं आम्हाला.." ललित पटकन बोलून जातो.
" मी आहेच स्मार्ट."
" मॅडम पण आम्हाला सांगाल का नक्की काय कळलं आहे तुम्हाला? म्हणजे हा घोळ एकच आहे का नाही ते लक्षात येईल.." प्रीती विचारते.
" दोघंही जर व्यापार करायचा हेतूने एकत्र आले असते तर एकाने दुसऱ्याला गोळ्यांचे नमुने दिले असते म्हणजे एक खरेदी करणारा आणि एक विक्री करणारा.दोघंही एकमेकांना गोळ्या का देत आहेत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?"
मालिनीच्या उत्तरावर प्रीती आणि ललित एकमेकांकडे बघतात.
" आम्ही गोळ्या पाहिल्या. एकसारख्या आकाराच्या, रंगाच्या गोळ्या देत आहेत पण हे नव्हतं सुचलं."
" प्रीती हा पण सारखाच मुद्दा आहे की! तुम्ही जो विचार मांडला तेच मी वेगळ्या पद्धतीने सांगितलं. दोघंही एकमेकांना सारख्या रंगाच्या, सारख्या आकाराच्या गोळ्या देत आहेत. म्हणजे आपल्या कडे आलेल्या केस प्रमाणे ह्यात गडबड नक्की आहे. एक चांगल्या गुणवत्तेच्या गोळ्या आणि एक हलक्या पण दिसायला सारख्या असं असू शकतं. नफा कमविण्यासाठी चांगला मार्ग आहे हा. अश्या तीन केसेस सोडवल्या आहेत आपण. पण अजून ठोस पुरावा पाहिजे. आज मला घरी जायचं आहे लवकर. उद्या सकाळी नऊला ऑफिस मध्ये भेटू. ललित ह्या मेडिकॉम कंपनी बद्दल अजून काही माहिती मिळते का ते बघ. केस लवकरात लवकर निकालात काढू."
" हो. प्रीती चल आपण जरा आसपास चौकशी करू. एखादा त्यांचा कारखान्यात काम करणारा माणूस तरी नक्की माहिती देईल आपल्याला. चल.."
तिघे कॅफे मधून बाहेर पडतात.
मालिनी आपल्या गाडीत बसते तर तिला आरशात पाठी पांढरी गाडी दिसते. ही गाडी गेले काही दिवस सतत मालिनी जिथे जाईल तिथे तिला दिसत असते. नंबर ही सारखाच असतो. मालिनी प्रत्येक वेळेला योगायोग असेल असं म्हणून सोडून देते पण आज ती ठरवून त्या गाडीच्या दिशेने निघते. ती जवळ यायच्या आत वेगाने गाडी निघून जाते. पुढच्या वेळेला बहुतेक दिसेलच असं समजून ती घरी जायला निघते.

………...………………………………………….

"मालिनी आलीस? चहा घेणार?"
" नको आई मी कॉफी घेतली आहे आणि आता मला बघायला येतीलच ना तेव्हा होईल चहा. किती वाजता येणार म्हणालीस?"
" सहा. तू आवर पटकन. साडी काढून ठेवली आहे. "
" मी आज ड्रेस घालणार आहे. मला आज कंटाळा आलाय साडीचा. लग्नानंतर काय मी साडीच नेसणार नाही ना रोज?"
आशा जरा चिडून बघते तिच्याकडे.
" रिलॅक्स आई. सण, समारंभ असेल तेव्हा नेसेन आणि नेसते मी साडी. वकील म्हणून कोर्टात नाही का नेसत ? पण आज ड्रेस प्लिज.."
आशा तिच्या कामाला लागते. मालिनी तयार होऊन आशाला मदत करायला येते. तेवढ्यात बेल वाजते.
"मालिनी थांब मी बघते. बाहेर येऊ नकोस."
" मी पण येते. मी त्याला फोटो मध्ये पाहिलं आहे आणि माझाही फोटो पाहिला असेलच. ही कसली औपचारिकता आई? चल."
दोघी दाराजवळ जातात. आशा दार उघडते.
" या या आम्ही तुमचीच वाट बघत होतो."
राजे परिवाराचा आत प्रवेश होतो. सुपुत्र विपुल राजे आणि आई वडील - कल्याणी व मुकुंद राजे..
मालिनी आणि विपुल ची नजरानजर होते.
" या बसा मी पाणी घेऊन येते." आशा आत जाते.
मालिनी सुध्दा बसते..
" मालिनी किती गोड दिसतेस. फोटोत फार नीट नाही कळत." कल्याणी स्वतःहून विषय काढते.
" तुझं कामाचं स्वरूप खूप छान आहे मालिनी. चॅलेंजिंग! मला फार ज्ञान नाही त्यातलं पण वेगळं आहे." मुकुंद तिचं कौतुक करतात.
" काम कुठलंही कठीणच असतं पण आवडलं पाहिजे. माझ्या बाबांनी आवड निर्माण केली ह्या विषयाची." मालिनी शांतपणे सांगते. तेवढ्यात आशा पाणी घेऊन येते.
"मालिनी पाणी दे सगळ्यांना."
" हो तू बस इथे." मालिनी सगळ्यांना पाणी देते आणि थेट विपुलला विचारते, " तुम्ही काय करता?"
त्याला ठसकाच लागतो.
" काय झालं? मालिनी जरा दमाने. आत्ताच आलेत ते थोडं आरामात होऊ दे सगळं.." अशा मालिनीला दटावते.
" मी माझी माहिती आधीच पाठवली होती. मला वाटलं वकील आहात तर आधीच वाचून घेतली असेल."
विपुलच्या उत्तराने मालिनी जरा गोंधळातच पडते. इतकं सरळ उत्तर देणारा विपुल तिला त्या वेळेला तरी आवडला होता.
" हो बरोबर आहे पण मला वेळच नाही मिळाला. फोटो बघितला .माझी एक केस चालू आहे त्याचच वाचन आणि माहिती इतकी असते की मी विचार केला तुम्ही भेटल्यावर सगळं वन टू वन होईलच."
" वकील स्मार्ट असतात ऐकलं होतं आज प्रत्यक्ष अनुभवलं. तुम्ही बोलण्यातही स्मार्ट आहात आणि दिसण्यातही."
विपुल च्या ह्या वाक्याने खरंतर मालिनी इंप्रेस होते.
"वाह आपण ह्यांना बोलतं करायचा आधी पोरांचं बोलणं सुरु पण झालं. नवी पिढी! आपल्या वेळेला बोलणं सोडा बघणं पण दूरच.. आय जस्ट लाईक धिस जनरेशन. "
सगळे मोकळेपणाने हसतात.
मालिनी च लक्ष विपुलकडे जातं तर तो तिलाच न्याहाळत असतो.


क्रमशः

© स्वराली सौरभ कर्वे

( ही कथा काल्पनिक पात्र आणि काल्पनिक मुद्दे घेऊन लिहिली आहे. कुठल्याही पात्राचा, केस चा ह्या कथेशी संबंध नाही. तसा संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swarali Saurabh Karve

Business

लिखाणाचा प्रयत्न करत राहणे हे आपल्या हातात आहे.