सिंड्रेलाची गोष्ट भाग १७

ही कथा परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः

विलास रावांनी सुमित्राच्या कानशिलात लावताच सर्वच शांत झाले. असं काही घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. सुमित्रा तर गालावर हात ठेवून तशीच उभी होती.

" आता मला एकही खोटं नको आहे. मैथिली आणि चैताली तुम्हाला जे जे काही माहित आहे ते सर्व मला ऐकायचं आहे. ही तुमच्याशी कशी वागते ते मला सांगा.. आज काय ते एकदाच कळू देत. " विलास राव म्हणाले.

" मी सांगते बाबा.. सर्व सांगते.. मला तर ही चेटकीण वाटते. ती कधीच आमच्याशी चांगलं वागली नाही. दीदा नेहमीच हिच्या वागण्यात चांगल्या गोष्टी शोधत राहिली. पण हिने नेहमी तिलाच टार्गेट केलं. " चैताली बोलत होती.

" चैताली प्लिज तू थांब.. मला बोलू दे . " मैथिलीने चैतालीला मध्ये अडवल. आणि तिने विलास रावांना अगदी सुरुवतीपासून सर्व सांगायला सुरुवात केली. आजी सोबतच तिचं बोलणं, आजी गेल्यानंतर सुमित्राच्या वागण्यात आलेला मोठा बदल, मैथिलीच्या मनावर असलेलं दडपण, शाळेत त्या मुली सोबत झालेलं बोलणं.. सर्व काही तिने विलास रावांना सांगितलं. विलास राव सगळं काही ऐकून अवाक् झाले..आपल्या पाठी हे एवढं सारं सुरू होत याची त्यांना पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती. ते सुमित्राच्या दिशेने वळले. आणि म्हणाले, " आता तरी सांगशील का खरं..? "

आता खूर सांगण्यावाचुन सुमित्रा कडे पर्याय नव्हता. ती बोलू लागली.." हो भेटते मी एका पुरुषाला… पण त्याचा माझ्या वर्तमानाशी काहीही संबंध नाही…आणि भविष्याशी सुद्धा असणार नाही.. " ती बोलता बोलता थांबली.

" सुमित्रा आता हे कोड्यात बोलणं बंद कर. माझ्याने अजून हा सस्पेन्स सहन होत नाही आहे.. नीट काय ते सांग.." विलास राव म्हणाले.

" सांगते.. तो राहुल आहे.. कधी काळी प्रेम होत माझं त्याच्यावर.. मला लग्न करायचं होत त्याच्याशी. तो श्रीमंत.. मोठ्या घरातला.. देखणा.. आणि मी.. ही अशी.. दिसायला साधारण.. शिक्षण सुद्धा जेमतेम.. घरो घरी कामं करायचे. मला तो आवडायचा.. प्रेमाने वागवायचा , रेस्पेक्ट द्यायचा. एके दिवशी म्हणाला मला आवडते तू.. माझ्यासाठी आकाश ठेंगणं झालं होत. त्याला मी का आवडते, कशी आवडू शकते, आमच्यातला फरक.. वगैरे, वगैरे गोष्टींचा विचार सुद्धा मनात नाही आला.. बसं.. त्याला मी आवडते ही गोष्ट खास होती माझ्यासाठी. आम्ही भेटू लागलो.. आपण लग्न करू , अस वचन दिलं त्याने मला.. तो व्यसनी होता. खूप दारू प्यायचा.. पण मला त्या गोष्टीचा काहीच प्रोब्लेम नव्हता. माझी पण स्वप्न होती.. कदाचित राहुल माझ्या आयुष्यात आल्यावर मी स्वप्न पाहू लागेल होते. देखणा , माझ्यावर प्रेम करणारा नवरा, मोठं, श्रीमंत घर.. सारं काही मला हवं होत.. माझ्या घराची परिस्थिती वाईट होती त्यात माझा काही दोष नव्हता. मला शिकायची इच्छा होती, पण मी शिकू शकले नाही यात माझा काही दोष नव्हता. माझ्या आई वडिलांनी माझ्या भावाची कुवत नसताना ही त्याला सारं काही दिलं, आणि माझी कुवत असतानाही मला जे हवं , जे माझ्या हक्काचं होत ते मिळालं नाही. राहुल सोबत लग्न करून मी सुखी होईन, आणि या पाशातून निघेन असं मला वाटलं होत.. मी त्याच्या प्रेमात वेडी झाले होते. भावी आयुष्याची स्वप्न पाहत होते.. माझ्यासाठी येणाऱ्या स्थळांना नाकारत होते. आपण लवकरच लग्न करू या त्याच्या आश्वासनाला मी भुलले होते. माझ्या आयुष्यातली महत्त्वाची वर्ष ही अशीच सरली. त्यातच मला दिवस सुद्धा गेले.. हे ऐकताच राहुल घाबरला. मुलं नको म्हणून मला कुठल्यातरी गोळ्या त्याने जबरदस्ती दिल्या.. माझा गर्भपात झाला.. एवढं काही झालं पण आपण कधीतरी लग्न करू हे आश्वासन तो देत राहिला. काही दिवसांनी भेटणं ही बंद झालं. तू माझ्या घराची सून होणार आहेस आता या घरात काम नको करू ,म्हणून त्याने त्याच्या घराचं काम मला कधीच सोडायला लावलं होतं. पण त्या व्यतिरिक्त त्याने अजून काही केलं नाही.. शेवटी मीच वैतागून त्याच्या घरी जाऊन सारं काही सांगितलं.. आधी वाटल त्याचे घराचे माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.. पण झालं उलट, त्यांना विश्वास तर बसला पण त्यांनी जे सांगितलं मला त्यामुळे मला धक्का बसला.. मी अशी त्यांच्या घरी राहुलचे कारस्थान सांगणारी पहिली मुलगी नव्हते, अशा कितीतरी सुमित्रा त्याच्या आयुष्यात होत्या.. त्याने मला शरीर सुखासाठी फसवल, हे कळलं मला त्यादिवशी.. स्वतःचा जीव द्यावा की त्याचा जीव घ्यावा हे कळत नव्हतं मला.. एकदा तरी त्याला भेटायचं आणि जाब विचारायचा. मी वाट बघत राहिले.. पण तो भेटलाच नाही.. तो गावी निघून गेला आहे असं समजल. वर्ष भराने आला तो.. पण तेव्हा लग्न करून आला होता.. त्याच्या आई वडिलांनी त्यांच्या ओळखीतल्या, त्याच्या तोला मोलाच्या मुली सोबत त्याच लग्न लावून दिलं होत. पुढे मी काय बोलणार.. मी फसवले गेले होते.. आता जे होईल , आपल्या समोर जे येईल ते पवित्र मानून जगायचं असं ठरवलं होत. साधारण दीड वर्षांनी तुमचं स्थळ आलं. तुमच्याशी लग्न करताना राहुलचा विचार कुठेही नव्हता माझ्या मनात. तुमच्याशी लग्न झाल्यावर मी पूर्णपणे तुमची आणि या घराची झाले. राहुल, माझा भूतकाळ मी विसरून गेले होते.. पण अचानक एके दिवशी तो समोर उभा राहिला.. त्याच्या व्यसनामुळे त्याच्या बायकोने त्याला सोडलं.. घरच्यांनी पैसे देणं बंद केलं.. तो माझ्या कडे पैसे मागत होता.. मी नकार दिला. त्याच्या कडे आमचे जुने काही फोटो आहेत, ते तो तुम्हाला दाखवेल असं म्हणून तो मला त्रास देऊ लागला…नाईलाज म्हणून मी त्याला पैसे देत होते. त्यासाठीच त्याला भेटत होते. मला तुम्हाला , या घराला गमावयच नव्हतं.. म्हणून मी हे करत होते.. या व्यतिरिक्त माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही…" सुमित्राच बोलून झालं.. डोळे पुसत ती विलास रावांकडे गेली.. त्यांचा हात हातात घेऊ लागली.. तोच त्याची तिच्या हातातून स्वतः हात खेचून घेतला.. तिला बाजूला सारत ते स्वतः च्या खोलीच्या दिशेने निघून गेले.

मैथिली आणि चैताली तिथेच उभ्या होत्या.. चैतालीला काही गोष्टींचा अर्थ कळलं नव्हता, पण आता आपल्या घरात पूर्वी सारखं काहीच नसणार आहे एवढं तिला समजल होत. सुमित्राची गोष्ट ऐकून मैथिलीला तिच्यासाठी वाईट वाटत होत.. पण खरंच ही गोष्ट खरी आहे का हा प्रश्न सुद्धा तिच्या मनात होता. सुमित्राने त्यांच्या घरात आल्यापासून एवढी नाटकं केली होती की आता कुठली सुमित्रा खरी आणि कुठली खोटी हेच तिला कळत नव्हतं. बाबा आता काय करतील हा प्रश्न त्या दोघींच्या मनात होताच.

सुमित्रा काही वेळ रेंगाळून विलास रावांच्या पाठी , त्यांच्या खोलीत गेली. " अहो काही तरी बोला.. प्लिज.. अस नका करू.." सुमित्रा म्हणाली.

" काही बोलण्यासारखं आहे का.. तुझं कोणावर तरी प्रेम होतं.. तुझे शारीरिक संबंध होते, तुला दिवस गेले होते, तुझा गर्भपात झाला होता.. एवढा मोठा भूतकाळ.. तुला एकदा ही मला सांगावस वाटलं नाही.. तू अजून हि त्या माणसाला भेटते.. मी मेहनतीने कमावलेले पैसे तू त्याला दारू प्यायला देतेस.. ग्रेट आहेस तू.. एवढं करून वर माझ्या मुलींना छळतेस.. माझ्या समोर चांगुलपणाचा नाटकं करतेस.. शी.. काय करून बसलो मी.. माझ्या अनुची जागा तुला दिली.. तुम्हाला काही कमी पडतंय का.. काही त्रास होतोय का हे कधीच मुलांना विचारलं नाही.. तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. आणि तूच माझा विश्वास घात केला. नाही नाही… चूक तुझी नाही माझी आहे. मी माझ्या अनुला फसवल.. तुझ्यावर प्रेम करून.. त्याचीच शिक्षा झाली आहे मला…माझ्या मुलींनी काय केलं होतं ग तुझं..? तू त्यांच्या सोबत सुद्धा.. तू निघ या खोलीतून प्लिज.. मला काही सुचत नाही आहे. प्लिज मला जरा एकटं सोड.. नाहीतर मी तुला काही तरी करीन. मला असं काहीही वावग वागायचं नाही आहे. प्लिज जा तू.." विलास राव म्हणाले.

" नाही.. मी नाही जाणार कुठेच.. प्लिज बोला तुम्ही. हवं तर मारा … पण मी नाही जाणार कुठेच.. " सुमित्रा म्हणाली.

" तू ऐकणार नाहीस ना… ठीक आहे.. मीच जातो.." असं म्हणून विलास राव तावातावाने रूम बाहेर पडले. गाडीची चावी घेऊन घरा बाहेर निघाले. सुमित्रा त्यांच्या पाठोपाठ धावत आली. तिने त्यांचा हात धरण्याचा प्रयत्न केला , पण ते इतके रागात होते की त्यांनी तिला झिडकारले आणि ते निघून गेले.

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.



🎭 Series Post

View all