सिंड्रेलाची गोष्ट - भाग ९

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः


" चैताली तू इथेच बस. आणि शांत हो.. मी येते बाहेरचा पसारा आवरून.. बाहेर येऊ नकोस हा आता.. थांब इथेच.." मैथिली चैतालीला त्यांच्या खोलीतल्या खुर्ची वर बसवत म्हणाली.


ती बाहेर आली तो पर्यंत सुमित्रा तिच्या खोलीत निघून गेली होती. मैथिलीने सर्व पसारा आवरला. आणि ती धावत परत खोलीत निघून गेली.


" काय झालं होतं तुला..? अशी का वागलीस तू..? " मैथिलीने चैतालीच्या समोरच्या खुर्चीत बसत तिला विचारले.


" ती का अशी वागली आधी..? " चैताली म्हणाली.


" तू का वागलीस आधी ते सांग... असं वागत का कोण आईशी..,? " मैथिली म्हणाली.


" आई... कोण ती सुमित्रा.. हाहाहा.. ती आई नाही, आहे ती चेटकीण आहे..." असं म्हणत चैताली हसू लागली..


" पुरे झालं हान आता.. काय चेटकीण चेटकीण करते आहेस.. ती आई आहे आपली.. हे चेटकीण बोलणं चुकीचं आहे.. हेच शिकवलं आहे का आपल्याला आपल्या आजीने आणि बाबांनी..? " मैथिली म्हणाली.


" नाही.." चैताली खजील होऊन मान खाली घालून उत्तरली.


" मग.. असं नको करुस.. प्लिज.. तू अशी वागशील असं नव्हतं वाटलं मला.. चेटकीण म्हणालीस तू तिला.. चावली तू तिला.. चक्क चावलीस तू.. आपण प्राणी आहोत का असं चावायला.. किती दुखलं असेल तिला.. किती विचित्र घडलं सगळं.." मैथिली म्हणाली.


" दिदा तिने तुला का मारलं मग.. ? मी चुकले.. मला नाही कळलं मी काय केलं पाहिजे ते.. मला राग आला.. मग मी तिला चावले.. ती का करते आपल्या सोबत असं..? ती कशी वागते ते तुला पण माहीत आहे ना.. मग तू मलाच का समजावते.. ? तिला का नाही बोलत काही.. तिने तुला मारालेल मला नाही आवडलं.. आणि ती आपली खरी आई नाही आहे.. ती नेहमीच माझ्या सोबत वाईट वागली आहे.. मी खूप लहान होते तेव्हा पण ती अशीच वागायची.. बाबांसमोर आणि बाहेरच्या माणसांसमोर एक आणि मी एकटी असताना काही तरी वेगळं.. मला माहित आहे ती आई नाही आहे आपली.. तिनेच तर हे किती वेळा सांगितलं आहे मला. आणि आपण स्टोरी बुक मध्ये वाचतो त्यात ती चेटकीण असते ना.. लबाड चेटकीण, जी सारखी सर्वांना त्रास देते, लहान मुलांना त्रास देते तशीच आहे ही सुमित्रा आई.. लहान असताना मी घाबरायचे तिला आता नाही घाबरत.. मी आता मोठी झाली आहे.. मी नाही ऐकणार तिचं काहीच " चैताली म्हणाली.


" ओके.. तिचं नाही ऐकणार.. माझा तर ऐकशील ना..?" मैथिलीने विचारलं.. 


चैतालीने होकारार्थी मान हलवली.


" ती आपली खरी आई नाही आहे हे बरोबर आहे.. पण ती चेटकीण नाही आहे.. खरंतर चेटकीण वैगरे असं कोणी अस्तित्वातच नसतं.. आणि जसं तू स्टोरी बुक मध्ये आपण वाचतो की सावत्र आई किती त्रास देते, त्या मुलांना कुठेतरी जंगलात सोडून येते.. तसं तर सुमित्रा आई आपल्याशी नाही वागत ना.. माझ्या क्लास मध्ये एक मुलगा होता.. त्याला पण सावत्र आई होती. त्याला त्याच्या आईने बोर्डिंगला पाठवून दिलं. तो इथे असताना ती त्याला खूप त्रास द्यायची.. अभ्यास पण करू द्यायची नाही. मारायची. जेवणं द्यायची नाही.. आणि त्यावर त्याचे बाबा सुद्धा काही बोलायचे नाहीत. आपल्याकडे तसं नाही आहे ना.. सुमित्रा आई पण तशी नाही आहे.. ती सर्वांसमोर वेगळं वागते आणि आपण तिच्या सोबत एकटे असल्यावर वेगळं वागते हे मला पण मान्य आहे. पण ती आपल्या अभ्यासाच्या मध्ये येत नाही. आपण जे पण खायला मागतो ते ती करून देते. आपण जेवलो नाही तर आपल्याला जबरदस्ती भरवते..आपल्याला कधीच उपाशी झोपू देत नाही.. ती जशी वाईट वागते तशीच ती चांगली पण वागते.. आणि आपले बाबा आपल्या सोबत काही वाईट होऊ देणारच नाहीत. त्यामुळे आपण कसं वागल पाहिजे...? छान वागल पाहिजे की नाही.. आपण आपल्यामुळे बाबांना त्रास होईल, टेन्शन येईल असं काहीच नाही केलं पाहिजे.. आणि मोस्ट इंपॉर्टन्ट पॉइंट नेहमी चागल्या गोष्टी बघायला शिकलं पाहिजे.. सर्वांमध्ये चांगले वाईट गुण असतात. आपण चांगले बघायचे आणि वाईट बाजूला ठेवायचे.. " मैथिली म्हणाली.


" दिदा तू म्हणतेस ते सर्व राईट आहे.. पण आपण एवढं काही केलं नव्हतं ना.. तिने तुला का मारलं मग..आणि आपण हे असंच मार खायचा का..? कदाचित ती आता काही करत नाही आपल्या सोबत पण तिने नंतर काही केलं तर..? मला तिच्या सोबत एकटीला राहायला नाही आवडत.. असं वाटत ती काहीही करेल माझ्यासोबत.." चैताली म्हणाली.


" तू म्हणतेस ते बरोबर आहे.. कदाचित तिचा मूड खराब असेल. कदाचित तिचं बाबांसोबत भांडण झालं असेल. किंवा तिला तिच्या आई बाबांची आठवण येत असेल म्हणून ती असं काहीतरी वागली असेल.. ती जर नेहमी आपल्याशी असं वागली तरी आपण असं शांत बसून बघणार थोडीच आहोत. आपण बाबांना सांगू. आपण स्वतः सुद्धा आपल्यासाठी स्टँड घेऊ शकतो.. पण असं लगेच कोणा बद्दल वाईट मत बनवणं चुकीचं आहे.. " मैथिली म्हणाली.


" दिदा तुझं तिच्या बद्दलच मत काय आहे..?" चैतालीने विचारले..


" माझं.... मममम.. खरं सांगू तर काहीच नाही.. तिला जे हवं ते तिला करू देत.. आपल्याला हवं ते आपण करू.. आपण नेहमी चांगलच वागायचं.. कोणाच्याही चुकीच्या वागण्यामुळे आपण चुकीचं नाही वागायचं .. एवढं मला कळत.." मैथिली म्हणाली..


" दिदा मला तर आई आठवत सुद्धा नाही . आजीने काय काय शिकवलं आपल्याला ते मला माहित नाही.. पण मी जे काही छान छान शिकते आहे ना ते तुझ्याकडून शिकते आहे.. यु अर द बेस्ट... " चैताली मैथिलीला मिठी मारत म्हणाली..


" हो का बाई साहेब.. मग आता असं वेड्या सारखं वागू नकोस या पुढे. नाही तर सर्व म्हणतील तुझा दिदा ने तुला हेच शिकवलं का...!!., आणि काय गं.. आता खूप मोठी झाली आहेस का तु.. तू आता कोणालाच घाबरत नाही का..." मैथिली चैतालीला गुदगुल्या करत म्हणाली..


" दिदा थांब .. नको.. ना.. नको .. नको.. बास झालं.. पोटात दुखेल.." चैताली खाली लोळण घेत हसत हसत म्हणाली..


त्यांच्या बेडरूम मध्ये त्या दोघींचा मोठं मोठ्याने हसण्याचा आवाज घुमत होता..


**********


सुमित्रा खूप खुश झाली होती.. ती मुद्दामूनच मैथिली आणि चैताली सोबत अशी वागली होती. त्या दोघींनी हायपर होऊन काही तरी रिॲक्ट करावं अशीच तिची ईच्छा होती. चैताली अशी चावेल हे तिला अपेक्षित नव्हतं.. पण जे झालं ते तिच्या पथ्यावर पडणार होत. विलास रावांना झालेली गोष्ट कशी फिरवून सांगायची आणि त्यांची सहानुभूती कशी मिळवायची याचाच ती विचार करत होती.


**********


सातच्या सुमारास विलास रावांनी घराच्या लॅंडलाईन वर फोन करून सांगितलं की त्यांना यायला उशीर होणार आहे आणि ते बाहेरूनच जेवून येणार आहेत..


सुमित्राने मुलींना त्यांच्या वेळेत जेवणं वाढलं. स्वतः सुद्धा जेवली. ती आवरा आवर करायला गेली आणि मुलींना तिने झोपायला जायला सांगितले. थोडा वेळ टीव्ही बघून मग चैताली आणि मैथिली झोपायला त्यांच्या खोलीत गेल्या. नेहमी प्रमाणे एक गोष्ट वाचून चैताली झोपली. मैथिलीने चैतालीला कितीही समजावले असले तरी आज घडलेल्या प्रकारामुळे ती खूप अस्वस्थ होती. आता पर्यंत तिच्या वर कोणीच कधीच हात उचलला नव्हता. तिच्या साठी सुमित्राच हे वागणं धक्कादायक होतं आणि परत त्यात चैतालीची त्यावरची रिअँक्शन अजून हादरवून टाकणारी होती. काहीही झालं तरी चैतालीच्या मनात वाईट विचार किंवा आसपास घडणाऱ्या गोष्टींचा तिच्या मनावर वाईट परिणाम झाला नाही पाहिजे याच प्रेशर सुद्धा मैथिली वर आलं होतं. आजी सोबत झालेलं बोलणं सुद्धा मैथिलीच्या चांगलच लक्षात होतं. त्याचाच विचार करून तिने ठरवलं की आज काहीही झालं तरी बाबांशी बोलायचं.. त्यांना आज झालेली घटना तसेच या आधी झालेल्या गोष्टी शेअर करायच्या. ' त्यांच्या कानावर या सर्व गोष्टी पडलेल्या बऱ्या.. म्हणजे पुढे काही विपरीत होऊ नये. ' असे विचार तिच्या मनात सुरू होते. विलास राव यायची वाट पाहत ती तिच्या खोलीत जागीच होती.


**********


क्रमशः


( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )


फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )


डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.





🎭 Series Post

View all