सिंड्रेलाची गोष्ट - भाग ८

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः 


दिवसा मागून दिवस जात होते. महिन्यांमागुन महिने... मैथिली आणि चैताली मोठ्या होत होत्या.चैतालीला तर तिची आई आठवत सुद्धा नव्हती आणि आजीच्या आठवणी पुसट होत चालल्या होत्या. या उलट मैथिली साठी दोघींना विसरण शक्य नव्हतं. खास करून आजी शिवाय राहणं तिच्यासाठी कठीण होत होतं.. विलास राव त्यांच्या कामात मग्न होते. घरातलं वातावरण त्यांच्या दृष्टीने नॉर्मल होतं. मुलींकडून काही तक्रार नव्हती ना सुमित्रा कडून... तर इथे सुमित्राला आई होण्याच्या विचाराने वेडे करून टाकले होते.


**********


मैथिली आधी पासूनच समजूतदार होती. आपली आई नाही आहे , त्यामुळे आपण खूप जपून, शहाण्या सारखं वागायचं, बाबांना त्रास होईल असं काहीच करायचं नाही हे तिने मनाशी अगदी लहान पणीच पक्के केले होते.. आणि आता त्यात आजी सुद्धा गेली.. त्यामुळे तिचं बालपण तिच्याकडून हिरावून घेतलं गेलं होतं. वयाच्या आधीच ती मोठी झाली होती.. ती खूप समंजस पणे वागू लागली होती. चैताली साठी आता ती फक्त तिची बहिण नाही तर आई झाली होती. चैतालीला सुद्धा आता काय चूक काय बरोबर.. कोण आपल्याशी कसं वागत आहे हे चांगलच कळू लागलं होतं.. मैथिली तिला खूप जपत असे. तिला चागल्या सवयी लावणं, तिचा अभ्यास घेणं, तिला गोष्टी सांगणं , तिच्याशी दिवसभराच्या गोष्टी शेअर करणं, तिच्या गोष्टी ऐकणं हे सारं काही करत असे.. चैताली सुद्धा दीदा, दीदा करून तिच्या मागे पुढे करत असे.. दोघींचं एकमेकींशिवाय पान हलत नव्हतं.. हे पाहून सुद्धा सुमित्राला राग येई. ' या दोघींना माझी काही गरज नाही.. यांचं माझ्याशिवाय अडत नाही ', हे पाहून तिचा तिळपापड होतं असे. मैथिली आणि चैतालीला सुद्धा हे कळतं होत पण त्या तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत. कधी त्या काही बोलत असल्या किंवा खेळत असल्या तर त्यांना विनाकारण ओरडत बसे. कधी अभ्यासाला बसल्या की त्यांना काहीही ना काही काम सांगत असे.. चैतालीला लगेच राग येई पण मैथिली तिला समजावे..

**********


सुमित्रा मुलं हवं म्हणून विलास रावांकडे सारखी हट्ट करत होती. विलास राव सुद्धा तिचं ऐकत होते. तिच्या सोबत डॉक्टरच्या फेऱ्या मारत होते. ते सांगतील त्या सर्व टेस्ट करणं असो की औषधं घेणं असो ते सर्व काही करत होते. पण तरीही सुमित्राला काही दिवस जात नव्हते. त्यामुळे ती चीड चीड करू लागली होती. ते तिला समजून घेत. समजावून सांगत. 'आपल्या दोघांचही वय झालं आहे.. त्यामुळे कदाचित काही कॅम्पलिकेशन्स असतील.. तू धीर धर... ', पण सुमित्रा काही ऐकणाऱ्या मधली नव्हती.. कुठल्यातरी भोंदु बाबाच्या ती नादी लागली. तो म्हणेल तसं सर्व करू लागली. हे काही विलास रावांना पटलं नाही आणि एके दिवशी न राहवून ते तिला म्हणाले..


" बसं झालं आता सुमित्रा... काय हे खूळ घेऊन बसली आहेस. दोन मुली आहेत आपल्याला... हे तू विसरली आहेस का.. तुला स्वतः मुल हवं, असं जेव्हा तू म्हणाली होतीस तेव्हा खरंतर वाईट वाटलं होतं मला.. पण मी विचार केला... कुठल्याही स्त्रीला हे वाटू शकत.. तो अनुभव घेणं हा प्रत्येक स्त्री चा अधिकार आहे.. आणि मला तुझा तो अधिकार हिरावून घ्यायचा नाही.. म्हणून मग मी ही तुझा हा हट्ट मान्य केला. तू माझ्या दोन्ही मुलींना सांभाळून घेशिलच, तुझ मुलं आलं तरी तू त्यांना काही कमी पडू देणार नाही हे गृहीत धरून, तुझ्यावर विश्वास ठेऊन मी तुझा हा हट्ट मान्य केला... डॉक्टरी उपायापर्यंत ठीक आहे. तू म्हणशील ते सर्व करेन मी.. पण हे बाबा वैगरे मला पटत नाही.. मला ही भोंदूगिरी चालणार नाही माझ्या घरात.. आणि तुझा हा हट्ट मला आता तुझ्या वेडात बदलत चालल्या सारखा वाटतो आहे... आणि ज्या प्रकारे तू हे सर्व करते आहेस मला तुझ्या हेतू मध्ये सुद्धा काहीतरी खोट वाटते आहे.. " 


" माझ्या हेतू मध्ये खोट... म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला...? " सुमित्रा ने विचारले.


" नक्की असं काहीही मला माहीत नाही.. काहीही असू शकतं.. मी तुला एक समजूतदार स्त्री म्हणून बघितलं होत.. मी तुला आधीही सांगितलं होतं मी हे लग्न माझ्या मुलींसाठी केलं आहे.. त्या माझ्यासाठी या जगात सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत. तुझी बाजू मी समजून घेतोय त्याचा गैर फायदा घेऊ नकोस. बघ एक गोष्ट स्पष्ट पणे सांगतो , जर तुझं कुठलंही पाऊल माझ्या मुलीच्या विरूद्ध आहे असं मला आढळला तर मला कठोर पावलं उचलावी लागतील." विलास राव म्हणाले.


" तुम्ही काहीही काय बोलतय.. मी असं का करू..त्या माझ्या सुद्धा मुली आहेत. " सुमित्रा म्हणाली.


" हो ना... मग का हे नको ते मागणं. का हा नको तो हट्ट...? त्या भोंदू बाबाला या घरी आणायचं नाही.. तूही तिथे जायचं नाही. मुलं झालं तर ठीक नाही तरी ठीक... बसं.. आता अजून मला या विषयावर काही ऐकायचं आणि बोलायचं नाही आहे." विलास राव म्हणाले.


विलास रावांच बोलणं ऐकून सुमित्रा हलून गेली होती.. 'हे असं का बोलले.. यांना आई बाबांनी तर फोन करून सर्व सांगितलं नसेल ना.. नाही नाही यांचं माझ्याबद्दलच मत नेहमीच चांगलं असलं पाहिजे.. यांना मी बिचारी वाटले पाहिजे.. माझा मुलासाठी हा अट्टाहास यांना योग्य वाटला पाहिजे.. काही तरी केलं पाहिजे. ' सुमित्रा च्या डोक्यात विचार चक्र सुरू झालं.


**********


चैताली आणि मैथिली कोलाज पेंटिंग करत बसल्या होत्या.. हॉल मध्ये बराच कचरा झाला होता.. सुमित्रा तिच्या खोलीतून तावातावाने आली. हॉल मध्ये कचरा आणि पसारा पाहून खूप चिडली..


" मैथिली... काय हे.. अक्कल नाही का गं तुम्हा दोघींना. सगळीकडे नुसता पसारा.. चैतालीला एक कळतं नाही. पण तू मोठी आहेस ना. तुझा मेंदू गुडघ्यात आहे का..? आधी ते सर्व उचल.." सुमित्रा म्हणाली.


सुमित्राचा असा पावित्रा पाहून त्या दोघी पण चक्रावल्या.. 


" हो अगं आई.. खूप पसारा झाला आहे. मला पाच मिनिटं दे फक्त , चित्र पूर्ण होईल.. मग मी उचलते. आणि हो.. या पुढे आम्ही आमच्या खोलीतच बसू हे सर्व करायला.. सॉरी.." मैथिली म्हणाली.


" नाही आताच उचल.. तुझं काही ऐकायचं नाही आहे मला.. अती शहाणी झाली आहेस तू.." सुमित्रा म्हणाली.


" आई प्लिज असं काही ही बोलू नकोस.. आम्ही खूप पसारा केला आहे हे मी मान्य करते.. चूक झाली आमची.. पण हे असं बोलू नकोस.. पाच मिनिटं दे.. मी करते क्लीन." मैथिली म्हणाली.


" आता तू मला शिकवणार मी कसं बोलायचं आणि वागायचं ते.. बघतेच तुम्हा दोघींना.. " सुमित्रा राग रागाने मैथिली जवळ गेली.. आणि तिच्या हातात असलेलं चित्र तिने घेतलं आणि फाडून टाकलं...


" आई हे काय केलं तू... ठीक आहेस ना.. ? खूप मेहनतीने केलं होत ते.. तू का वागतेस अशी.. आम्ही कधी काही त्रास दिला आहे का तुला..? .. जाऊ देत.. तू काय सांगणार.. नाही.. नाहीच दिला आहे आम्ही तुला त्रास.. आम्ही दोघी पण प्रयत्न करतो तुला आणि बाबांना आमच्या मुळे काही त्रास नाही झाला पाहिजे.. खूप विचापूर्वक वागतो.. आता काय करू आम्ही अजून.. तुला आम्हा दोघींची प्रत्येक गोष्ट खटकते.. आम्हाला माहीत आहे. आम्ही तुझ्या वागण्याकडे दुर्लक्ष करतो.. पण हे आता जास्त झालं.. " मैथिली आवेगात म्हणाली.


" मला उलट बोलतेस.. एवढी हिम्मत झाली तुझी.." असे म्हणत सुमित्राने मैथिलीच्या कानाखाली वाजवली.. मैथिलीसाठी हे सर्व नवीन आणि आश्चर्यकारक होतं. मैथिली तिथेच स्थब्ध झाली.. 


धडलेला प्रकार पाहून चैताली गोंधळली.. तिला प्रचंड राग आला.. आणि ती पटकन जाऊन सुमित्राच्या हाताला चावली.. सुमित्रा स्वतः ला सोडवायचा प्रयत्न करत होती.. पण चैताली खूप चवताळली होती.. तिने सुमित्राचा हात घट्ट पकडून ठेवला होता. ते पाहून मैथिली पुढे आली.. " चैतू असं नाही करायचं...प्लिज थांब.." म्हणत तिने चैतालीला मागे खेचलं.. सुमित्रा चैतालीला मारायला पुढे आली तस मैथिलीने सुमित्राचा हात पकडला..

" नाही हं.. आता नाही .. तिला मारायचं नाही .." मैथिली म्हणाली.. 


" तू माझ्या दिदाला का मारलं.. तू वाईट आहेस.. तू चेटकीण आहेस.. " चैताली बोलू लागली..


" तू चल आता.. चल आत.. मला काही झालेलं नाही.. असं वागतात का चैतू.. चल तू आधी.." मैथिली असं बोलत चैतालीला आत घेऊन गेली.


" मी येते सर्व उचलायला.. परत आरडा ओरडा नको सुरू करुस.. " असं मैथिली जाता जाता सुमित्राला बोलून गेली.


**********


क्रमशः


( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )


फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )


डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.
🎭 Series Post

View all