सिंड्रेलाची गोष्ट - भाग ७

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.
क्रमशः

रात्रीचे अडीच वाजले आणि मैथिलीला जाग आली.. तिच्या शेजारीच आराम खुर्ची घेऊन बाबा झोपलेले तिला दिसले.. तिने बाबांना आवाज दिला.. तसे ते हडबडून जागे झाले.

" काय झालं.. ठीक आहेस ना.. " विलास राव म्हणाले..

तिच्या डोक्याला हात लावून त्यांनी ताप आहे का ते तपासल.

" बाबा तुम्ही इथे कसे.. आणि असे का झोपला आहात? " मैथिलीने विचारले.

त्यांनी घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला.. आणि आता जेवून औषधं घ्यायची आहेत हे ही बजावले.. ती नकार देत होती , पण ते सुद्धा तिचे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी डिश मध्ये थोडी खिचडी आणि लोणचं घेतलं.. त्यांनी तिला घास भरवायला हात पुढे केला, तोच ती रडायला लागली.. 

" मैथिली रड तू.. मोकळी हो.. मला माहित आहे तुझा आजीवर किती जीव होता ते... पण स्वतःला त्रास नको करून घेऊस.. झुरू नकोस आतल्या आत.. ती जशी तुझी आजी होती तशी माझी आई सुद्धा होती.. आपल्या आयुष्यात तिची जागा कोणीच नाही घेऊ शकणार.." विलास राव बोलत होते.. हे बोलताना त्यांना रडू येत होतं..

" आजीला रात्री हार्ट अटॅक आला हे आनंद काकांकडून कळलं.. बाबा मी जर रात्री उठले असते तर आजी वर ही वेळ आली नसती. कदाचित आजीला त्रास होतं होता तेव्हा तिने मला आवाज दिला असेल.. मला उठवायचा प्रयत्न केला असेल.. पण मला कळलं नाही .." मैथिली म्हणाली.

" यात तुझा काही दोष नाही आहे.. कोणाचाच नाही आहे.. तिची वेळ आणि काळ दोन्ही आले होते.. त्यामुळे हे झालं.. असं आपण आता दोष देऊन किंवा दोष घेऊन नाही जगू शकत.. असं करून नाही चालणार.. आपल्याला खंबीर पणे जगावं लागेल.. चैतालीकडे पण बघ .. ती लहान आहे ना अजून.. तिला काहीच कळत नाही.. आणि आजी आपल्याला बघत असेल ना देवाच्या घरून.. तुझी आई सुद्धा बघत असेल.. आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं आहे आपण स्ट्राँग आहोत ते.. त्या दोघी खूप थकल्या होत्या म्हणून मग त्यांनी या घराची, चैतालीची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे.. आपण ती समर्थ पणे पेलवली पाहिजे ना.. त्यांना आपण नाराज नाही केलं पाहिजे.. कळतंय ना बाळा तुला.. " आधी स्वतःचे मग तिचे डोळे पुसत विलास राव हे सारं काही बोलले..

त्यांनी पुन्हा घास पुढे केला. तिने तो पाणावलेल्या डोळ्यांनी खाल्ला.. दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळत होते.. पण तरीही दोघं एकमेकांना धीर देत होते..

**********

दोन दिवसांनी मैथिलीला बरे वाटले.. ती आणि विलास राव या धक्क्यातून सावरत होते. एकमेकांना धीर देत होते. चैतालीला मध्ये मध्ये प्रश्न पडत.. 'आजी कुठे गेली.. ती कधी येणार..' सुमित्राचे आई - बाबा , विलास राव वेळोवेळी तिची समजूत काढत. दिवस जात होते. लोकं भेटायला येत होती. विलास रावांनी चैतालीला दोन दिवसातच शाळेत पाठवायला सुरुवात केली. तर पाचव्या दिवशी मैथिलीला सुद्धा शाळेत धाडले. या दिवसात त्यांचे सुमित्राकडे जराही लक्ष नव्हते. हल्ली ते मुलींसोबतच त्यांच्या खोलीत झोपत. बाबा आपल्यासोबत झोपतात म्हणून चैताली तर खूप खुश होती. मैथिलीला बरे वाटत होते.. पण हे काही दिवसच आहे हे ती समजून होती. आणि तिला ते मान्य देखील होते.. काही दिवस तर काही दिवस पण बाबांचा पूर्ण वेळ फक्त त्या दोघींचा होता.. यात सुमित्राची चीड चीड वाढत होती..

'मला लवकरच काहीतरी पावलं उचलावी लागणार , नाही तर मी या घरात मोलकरीण बनुनच राहणार.. मोलकरीण नाही.. मी या घरची मालकीण आहे. या मुली आज ना उद्या जाणारच आहेत.. या घरात अधिकार गाजवण्यासाठी मला माझं मुल हवं आहे.. लवकरात लवकर.. मी मला हव्या तश्या गोष्टी वळवणार आहे ... ' सुमित्रा मनोमन काहीतरी ठरवत होती.

सुमित्राच्या आईला मात्र सुमित्राच वागणं पटत नव्हतं.. ती उघड उघड बोलत नसली तरी तिच्या मनात मुलींसाठी सावत्रपणा आहेच.. हे तिच्या आईला जाणवत होतं. मैथिली सुमित्राच्या आसपास असण्याने सुद्धा किती अस्वस्थ होते हे त्यांना कळतं होते.. या उलट काल पर्वा आलेल्या या दोघां सोबत मात्र ती मनमोकळे पणे बोलत होती. आजी आजोबा करत मागे पुढे करत होती.. पण सुमित्रा सोबत तिचं नातं तसं नाही आहे, हे त्यांच्या चाणाक्ष नजरेने हेरले होते. चैताली तर लहानच आहे.. पण ती सुद्धा थोडी दबकुनच वागते सुमित्रा सोबत हे सुद्धा कळायला त्यांना वेळ लागला नव्हता. सुमित्राशी निघायच्या आधी सविस्तर बोलायचं हे त्यानी ठरवलं होतं. 

**********

सर्व कार्य विधी पार पडले. लगेच दुसऱ्याच दिवशी विलास रावांना कामावर रुजू व्हायचं होतं. त्यांनी सुमित्राच्या आई बाबांना अजून काही दिवस राहायची विनंती केली. त्या दोघांच्या असण्यामुळे विलास रावांना थोडा आधार वाटतं होता. घरात कोणीतरी वडीलधारी व्यक्ती असल्यावर घराचं घरपण टिकून राहत ह्या वर त्यांचा विश्वास होता. चैताली तर आजी आजोबा करत त्यांच्या मागे पुढे उड्या मारत राहायची आणि ते दोघे ही तिचं मनापासून सर्व करत होते. मैथिलीला सुद्धा त्यांच्या असण्यामुळे आजीच्या दुःखातून बाहेर यायला मदत होतं होती. त्या दोघां सोबत मैथिलीच छान जमत होतं. विलास रावांच्या विनंतीचा मान ठेऊन ते दोघे थांबले सुद्धा.. 
' अजून दहा दिवस राहू. यांची घडी नीट बसली की आपण आपल्या घरी जाऊ , ' सुमित्राचे बाबा तिच्या आई ला म्हणाले.

सर्वांचं रूटीन लाईफ सुरू झालं होतं. पण सुमित्राच्या आयुष्यात काहीच ठीक सुरू नव्हतं. विलास राव जास्तीत जास्त वेळ मुलींसोबत घालवत होते आणि ते झालं की सुमित्राच्या आई बाबां सोबत ते गप्पा मारत बसत. सुमित्राला त्यांच्या सोबत एकांत हवा होता जो तिला मिळत नव्हता. 

**********

एके दिवशी चैताली ,'आई मला खाऊ देना ', म्हणून सुमित्राच्या पाठी लागली होती. सुमित्रा आधीच वैतागलेली , तिने सर्व राग चैताली वर काढला. इतके दिवस चैताली वर दमदाटी करणारी सुमित्रा आता काही पावलं पुढे सरकली. तिने एवढ्याश्या कारणावरून तिला सरळ कानाखाली लगावली..
" काय सारखं सारखं आई आई.. काही तरी सतत मागतच असतेस.. मी तुझी आई नाही आहे.. आलं का लक्षात.. मला त्रास देत जाऊ नकोस.. " 
चैताली हुंदके देत रडू लागली.. त्या दोघींचे आवाज ऐकून सुमित्राचे आई बाबा दोघे ही तिथे आले.. चैताली एक हात गालावर ठेऊन हुंदके देत रडत होती..

" काय झालं सुमित्रा..? का ओरडते आहेस तिच्यावर..? किती तो आवाज..एवढ्या लहान मुलीशी असं बोलतात ...? " सुमित्राचे बाबा म्हणाले.

चैताली धावत जाऊन सुमित्राच्या आईला जाऊन बिलगली.. तिच्या आईने तिचे डोळे पुसले.. तिच्या गालावर सुमित्राची पाची बोटं उठली होती.. ते पाहून आईला कळले सुमित्राने हिला मारलं आहे ते..ते पाहून आई खूप चिडली.

" सुमित्रा तू हिला कानाखाली लगावली ? तुला कळतंय का तू काय वागते आहेस ते..? " आई म्हणाली.

" काही कानाखाली मारली नाही आहे मी.. फक्त ओरडले.. ती उगीचच रडतेय.. हल्ली छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच रडू येत या पोरींना.." सुमित्रा बोलत होती.. पण तिच्या आईने तिला मध्येच अडवले.. चैतालीचे डोळे पुसले.. सुमित्राच्या बाबांना तिला आत घेऊन जायला सांगितलं.

" बस झालं आता.. खूप ऐकलं आणि पाहिलं सुद्धा .. या घरात आल्यापासून बघते आहे मी तुझं वागणं.. माझ्याशी खोटं बोलूच नकोस.. तुला जर हे जमणार नव्हतं तर हे लग्न का केलं तू.. कोणी तुझ्यावर जबदस्ती नव्हती केली ना.. विलास राव आणि त्यांच्या आईनी तुला आधीच स्पष्ट केलं होतं, मुलींसाठी ते हे लग्न करत आहेत म्हणून.. हे असं करण्यापेक्षा तू आजन्म अविवाहित राहिली असतीस तर बरं झालं असतं.. " आई बोलत असताना सुमित्राला मध्येच बोलली.

" हो तुला बरच झालं असतं.. आयती मोलकरीण मिळाली असती तुला.. आजन्म अविवाहित रहा म्हणून सांगायला काय जात तुझं .. लोकं म्हणायचे कोणाचा तरी हात धरून पळून जा.. पण मी नाही केलं असं काही.. तुमचा विचार केला. तुम्ही काय केलं माझ्यासाठी...? मला सुद्धा अधिकार आहे सुखात जगण्याचा.. ऐशोआरमात राहण्याचा.. माझ्या नशिबाने मला ते मिळालं देखील आहे , मग त्याचा उपभोग घेऊ नको मी.. सर्व छान आहे इथे.. फक्त या दोन मुली सर्व घाण करतात.. सतत आपलं आई बाबा... काहीतरी हवंच असतं त्यांना.. नाही तर काही तर होतंच असतं.. मी होते ना त्यांची आई.. देते त्यांना वेळेवर जेवणं.. त्यांना लागणाऱ्या वस्तू, शाळेत पण पाठवते वेळेवर.. सावत्र आहे म्हणून जेवणं, शाळा हे सर्व बंद नाही केलं मी त्यांचं.. काही काम पण करायला सांगत नाही.. अजून काय हवं...? कुकुल बाळं आहेत का त्या, की त्यांना सतत कडेवर घेऊन नाचल पाहिजे.. सर्वांना सतत त्यांच्याच पुळका.. मी इथे किती आणि काय काय करते आहे त्याच कोणालाच काही नाही.. बस अजून काही दिवस … माझं मुलं या जगात येऊ देत ... सगळं चित्र बदलेल..." सुमित्रा म्हणाली.

" मला खरंच लाज वाटते तुला माझी लेक म्हणायला.. मला खूप अभिमान होता तुझा.. पण तू... खूप नालायक निघालीस.. आम्ही काय दिलं विचारते आहेस... नाही देऊ शकलो आम्ही काही.. आम्ही शिकलेले नव्हतो.. खूप कष्ट करून मुंबई गाठली.. जे मिळेल ते काम केलं.. तुम्ही दोघांनी शिकावं ही इच्छा होती आमची.. मोठ्या शाळेत घालायला पैसे नव्हते , पण अनुदानित शाळेत तर पाठवत होतो ना तुम्हाला.. पण तुम्हा दोघांना पण शिकायचं नव्हतं.. तुझ्या भावाला तर लवकरच व्यसन लागलं.. त्याचं व्यसन सोडवण्यात आमची कमाई संपली.. पण तोही राहिला नाही.. आणि तू.. आमच्यासाठी लग्न केलं नाहीस... खरंच...? का त्या बंगल्यातल्या राहुलने तुला फसवल.. लग्न करतो म्हणून आश्वासन देत राहिला.. आणि तू भुललीस.. " 

" आई बस झालं .. हा विषय नको आता.. बस झालं.. मला नाही ऐकायचं आता काहीच.." सुमित्रा आईला मध्येच थांबवून कानावर हात ठेऊन मोठं मोठ्याने ओरडुन बोलू लागली..

" का बसं झालं.. तुला ऐकावंच लागेल.. तुला ऐशोआरम, सुखी आयुष्य देऊ शकलो नाही तरी संस्कार करायचा एक प्रामाणिक प्रयत्न केला होता आम्ही.. कुठे तरी आम्हीच कमी पडलो.. ते काही नाही मी तुझे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही.." आई म्हणाली.

" खूप ऐकलं तुझं.. आता तू निघ इथून.. " सुमित्रा म्हणाली..

हे ऐकताच तिच्या आईच्या चेहऱ्यावर आश्चर्यचे भाव उमटले..

" हो बरोबर ऐकलं आहेस तू.. तू आणि बाबा निघा इथून .. हे घर माझं आहे.. पुरे झाला तुमचा पाहुणचार ... आपल्या घरी जा.." सुमित्रा अगदी त्वेषाने म्हणाली. 

" हे असे सर्व तू बोलशील असं कधीच वाटलं नव्हतं.. पण ठीक आहे.. जातो.. आजच जातो आम्ही.. पण एवढं लक्षात ठेव.. देव आहे.. तो बघतोय.. त्या मुलींना प्रेम दिलंस तर तुलाही प्रेम , आदर मिळेल.. नाही तर तुझ्या पदरी सुद्धा निराशाच येईल.. ज्या असुरी विचारांनी तुला तुझं मुलं या जगात आणायचं आहे ना.. ते विचार कधी सत्यात उतरू नये यासाठी मी प्रार्थना करेन.. तुझ्यासारख्या कपटी बाईच्या पदरी निराशाच पडोही पार्थना करेन मी.. अजून पण वेळ गेलेली नाही , पदरी जे पडलं आहे ते दान स्वीकारून त्याचा आदर कर.. बाकी तू आता खूप हुशार झाली आहेस.." आई म्हणाली आणि तिथून निघाली.. 

सुमित्राचे आई बाबा आपलं सामान भरून निघाले.. निघताना चैतालीला मिठी मारून दोघंही खूप रडले. पण आता काहीही झालं तरी या घराची पायरी चढायची नाही याची त्यांनी शपथ घेतली. 

**********

मैथिली शाळेत तर विलास राव ऑफिसला गेले होते. त्यामुळे त्यांना या सर्वांची काहीच कल्पना नव्हती. घरी आल्यावर त्यांनी त्यांच्या बद्दल चौकशी केली असता ,' कुठले तरी नातेवाईक वारल्यामुळे त्यांना असं अचानक , घाई घाईत निघाव लागलं..' असे सुमित्राने त्या दोघांना सांगितले. चैताली काही बोलणार नाही याची तिने आधीच खबरदारी घेतली होती. तिने आधीच चैतालीला ' कुठेच काही बोलायचं नाही ' अशी सक्त ताकीद दिली होती.


क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

🎭 Series Post

View all