सिंड्रेलाची गोष्ट - भाग ६

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः

रात्रीच्या जेवणासाठी विलास राव मैथिलीला उठवायला गेले. त्यांनी तिला आवाज दिला तरी ती उठली नाही.. म्हणून मग ते तिच्या बेड जवळ गेले. तिला झोपेतून उठवण्यासाठी हलवायला म्हणून त्यांनी तिला हात लावला.. त्यांच्या हाताला चटकाच बसला.. जळत्या निखाऱ्या प्रमाणे तिचं अंग तापलं होतं. ते घाबरले..

" मैथिली.. मैथिली.. ए बाळा.. उठ.. डोळे उघड..." त्यांनी तिला गदागदा हलवला.. पण तरीही ती काही उठेना.. त्यांनी घाबरून सूमित्राला हाक मारली.. सुमित्रा ,आणि तिचे आई बाबा ही त्यांच्या हाके सरशी खोलीत धावत गेले.. मैथिलीला ताप आल्याचं विलास रावांनी त्यांना सांगितलं.. 

" तू इथे बस.. मी डॉक्टरांना फोन करतो.." विलास राव सुमित्राला म्हणाले.. 


ते अगदी धडपडतच फोन जवळ पोहोचले.. जणू काही त्यांच्या अंगातल त्राणच निघून गेल होत. आई आजच गेली.. आणि आता मैथिलीची अशी अवस्था... एका खंबीर पुरुषाच्या पाठी असलेला बाप घाबरला होता.. आपल्या पोटच्या गोळ्याला अशा अवस्थेत पाहून हादरून गेला होता. 


*******


" डॉक्टर पंधरा मिनिटात येतील.." विलास राव खोलीत उपस्थित असलेल्या सगळ्यांना म्हणाले.


" डॉक्टर येई पर्यंत आपण तिच्या डोक्यावर पाण्याच्या घड्या ठेऊया.." सुमित्राची आई म्हणाली.


विलास राव तडकच किचन मध्ये गेले आणि घडी ठेवण्यासाठी हव्या असलेल्या सर्व गोष्टी घेऊन आले.. बेड वर बसले आणि मैथिलीच डोकं त्यांनी स्वतःच्या मांडीवर घेतलं.. ते तिच्या डोक्यावर घड्या ठेऊ लागले. सुमित्रा, तिचे आई बाबा तिघेही तिथेच होते... तिघांना काही कळायच्या आत विलास राव मैथिलीच्या डोक्यावर घड्या ठेवता ठेवता खूप रडू लागले.. त्यांना असं रडताना पाहून तिघही गोंधळले. सकाळ पासून इतका खंबीर वाटणारा माणूस आता लहान मुलाप्रमाणे ओक्साबोक्शी रडत होता. सुमित्राचे वडील विलास रावांच्या जवळ गेले. त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. 

"असा धीर सोडू नका.. काही होणार नाही तिला.. मी समजू शकतो.. आजच्या दिवशी बरंच काही घडलं आहे तुमच्या आयुष्यात... असे खचू नका.. डॉक्टर येतच असतील.."


इतक्यात दारावरची बेल वाजली.

"डॉक्टर आले वाटतं.. "सुमित्रा म्हणाली आणि दरवाजा उघडायला निघून गेली. 

विलास रावांनी सुद्धा अश्रू पुसले.. डॉक्टरांनी मैथिलीला तपासले..


"आजीच्या अचानक जाण्याने तिच्या बाल मनावर ताण आला असावा आणि त्यातच काही नीट काही खाल्लं नाही त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.. शारीरिक दृष्ट्या काही काळजी करण्याचे कारण नसले तरी मानसिक स्वास्थ जपावे लागेल.. इंजेक्शन दिले आहे.. बरं वाटेल तिला.. तापामुळे ग्लानी आहे. ताप उतरल्यावर शुध्दीवर येईल ती. तेव्हा काही तरी हलकं फुलकं खाऊ द्या तिला. औषध देतोय , ती वेळेवर द्या.. काही वाटलच तर आहेच मी. उद्या पर्यंत पण ताप नाही उतरला तर बघू पुढे काय करायचे ते. " असे डॉक्टर म्हणाले . मग थोडं विलास रावांशी बोलून ते निघून गेले..


" सर्वजण थोडं खाऊन घ्या.." सुमित्राची आई म्हणाली.


" नाही , नको.. मला नको आहे.. तुम्ही बसा जेवायला.. आणि चैताली कुठे आहे..?" विलास राव म्हणाले.


" चैतालीला मी भरवून घेतलं आहे.. ती आपल्या खोलीत बसून खेळत होती. थोड्या वेळात झोपेल ती.." सुमित्रा म्हणाली.


" नाही म्हणून कसं चालेल जावई बापू.. अहो थोडं खाऊन घ्या.. तुम्ही कमजोर झालात तर मुली काय करतील.. अजून त्या कोवळ्या जीवना यातना नका देऊ.." सुमित्राचे वडील म्हणाले..


'कोवळ्या जीवना यातना..' ही कल्पनाच विलास रावांना असह्य झाली.. ते पटकन जागे वरून उठले.. आणि म्हणाले.. 

"चला लवकर जेवून घेऊ.. "


हे चौघ जण जेवायला बसले. थोडं फार जेवून विलास राव उठले.. आणि सुमित्राला म्हणाले.. 

" मऊ खिचडी करून ठेव.. मैथिलीला जाग आली की भरवेन मी. आणि मी आज तिथेच थांबतो तिच्या सोबत.." 


" अहो त्याची काही गरज नाही.. आई थांबेल ना.. तुम्ही चला आपल्या खोलीत झोपायला.." सुमित्रा म्हणाली..


" मी ठरवलं आहे.. आता त्यावर चर्चा नको पुन्हा.. मी मैथिली सोबत आहे. आई तुम्ही आमच्या बेडरूम मध्ये झोपा. आणि बाबा तुम्ही..." विलास राव बोलता बोलता थांबले..


" माझी काळजी नका करू.. मी इथे हॉल मध्ये झोपेन.. मला काही प्रोब्लेम नाही.. " सुमित्राचे बाबा म्हणाले.


" पण इथे नीट बेड नाही.." विलास राव म्हणाले..


" अहो बेडच काय घेऊन बसलात.. तुमच्या हॉल एव्हढ पण घर नाही आहे आमचं.. तिथे थोडीच पलंग आहे.. आणि मला चटई आणि गोधडीवर झोप छान लागते.. सकाळी सुद्धा लवकर उठायची सवय आहे मला.. तर मी इथेच झोपतो.. तुम्ही काळजी नका करू. उलट तुम्हाला काही हवं असेल तर मला आवाज द्या.. जा तुम्ही मैथिली कडे.. " सुमित्राचे बाबा म्हणाले.


"ठीक आहे मग.." असे म्हणून विलास राव मैथिलीच्या बेडरूम मध्ये गेले.. सुमित्रा आणि तिची आई सुद्धा स्वयंपाक घरात गेल्या.. तिचे बाबा चैतालीकडे गेले..


इथे स्वयंपाक घरात सुमित्राची थोडी चीड चीड होत होती.. तिच्या हावभवावरून तिच्या आईने हे हेरले..

" काय झालं ग सुमे.. काही त्रास होतोय का..?" आईने सुमित्राला विचारले.


" त्रास नाही ग.. काय बोलू मी आता तुला... मला ना या माणसाचं काही कळतंच नाही.. स्वतः ची आई गेली.. एका कोपऱ्यात शांत बसून होते.. काही बोलले नाही.. एकटे जाऊन रडत होते.. सर्वांसमोर डोळ्यांतून तसू भर पाणी सुद्धा नाही आलं.. म्हणजे इतका कठोर आहे हा माणूस.. आणि आता लेकीला फक्त ताप आला आहे तर एव्हढ रडू आलं... समोर स्वतः चे सासू सासरे आहेत, त्याच ही भान नाही राहिलं त्यांना.. म्हणजे रडले ते काही चुकीचं नाही... पण फक्त तापच आला आहे ना.. त्यात काय एवढं... आणि तुला सांगू , त्या मैथिलीची पण नाटकं काही कमी नाही.. जेवून घे.. जेवून घे म्हणून पाठी लागले होते तिच्या.. गप्प खाऊन घ्यायचं ना... आणि ह्यांना पण बोलले ना मी, तू थांबशील तिच्याजवळ.. मग... त्यांना बसायची काही गरज आहे का.. ते पण थकले आहेत दिवसभर.." सुमित्रा म्हणाली.


" काय बोलते आहेस तू सूमे.. तुला काय वाटतं, त्यांना आईच्या जाण्याचं दुःख नाही झालं का..?" सुमित्राच्या आईने तिला विचारलं..


" अगं तसं नाही.. दुःख झालं ना.. पण ते सुद्धा त्यांनी धैर्याने पचवल.. शांत होते.. कुठलाही आरडा ओरडा नाही.. गोंगाट नाही.. नाही तर माझ्या ननंदांना पाहिलं ना तू.. किती तो आक्रोश.. एरव्ही कधी आईला साधा फोन सुद्धा करायच्या नाहीत.. भेटणं तर दूरच... आणि आज एवढा गोंधळ घातला.. पण हे आईसाठी सर्व काही करायचे.. आई जे म्हणेल ती पूर्व दिशा .. पण तरी आज खूप खंबीर होते... पण आता ह्या एवढ्याश्या प्रसंगाने असे खचले.. ते मला काही समजलं नाही.." सुमित्रा म्हणाली.


" सुमित्रा एक पुरुष त्याच्या इतर नात्यात किती खमका वाटतं असला, कठोर वाटतं असला ना तरी तो बाप म्हणून खूप हळवाच असतो.. आणि मैथिलीला फक्त ताप आला म्हणून ते असे रडले नाहीत.. तर आज दिवस भर जे झालं आणि त्यानंतर तिची ही अशी अवस्था त्यामुळे त्यांना हे सगळं असह्य झालं असावं आणि त्यांचा बांध फुटला... अशा वेळेला त्या व्यक्तीला आधाराची, समजून घेण्याची गरज असते. आता असे का वागले, त्यावेळी तसे का वागले हे सर्व हिशोब नसतात ग ठेवायचे. आणि मैथिली बद्दल तू जे बोललीस ते तर मला अजिबात आवडलं नाही.. सुमित्रा तू सावत्रपणा तर नाही ना दाखवत त्या मुलींना...? " आईने विचारले.


" काही पण आई तुझं.. मी आहे का तशी.. काहीही काय बोलतेस.." सुमित्रा म्हणाली.


" तुझ्या बोलण्यातूनच हा प्रश्न पडला आहे मला.. सुमित्रा तसं नसावच ही अपेक्षा आहे माझी पण तसं असेल तर ते तुलाच भविष्यात भारी पडेल.." आई म्हणाली.


" आई अगं तसं काही नाही आहे..तू विनाकारण टेन्शन नको घेऊ. " सुमित्रा म्हणाली.


" हम्मम.. खूप चांगली माणसं आहेत ग ही.. आणि दोन्ही मुली लहान आहेत.. त्यांना तू जेवढी माया देशील ना त्या दुप्पट तुला परत मिळेल.. हे लक्षात ठेव.. आणि आता या संपूर्ण घराची , या माणसांची जबाबदारी तुझ्यावरच आहे. तू जसं वळण लावशील तस होईल हे घर... बस.. आई म्हणून आणि बाई म्हणून हेच सांगू शकते मी तुला.. बाकी तू शहाणी आहेसच." आई म्हणाली.


' आता या संपूर्ण घराची जबाबदारी तुझ्यावरच आहे ', या वाक्यावर सुमित्राच सारं लक्ष केंद्रित झालं..

' म्हणजे आता या घराची मी मालकीण.. आता मला हवं तस मी करू शकते.. मला हवं ते सारं होणार आता.. सासू बाई गेल्या ते वाईट झालं. पण माझ्यासाठी तर चांगलच झालं म्हणावं लागेल..' सुमित्राच्या मनात असुरी विचार येऊ लागले.. इतक्यात कुकरची शिट्टी वाजवली आणि सुमित्राची तंद्री तुटली..


" खिचडी झाली ... गॅस बंद कर.. " सुमित्राची आई म्हणाली.


**********


क्रमशः


( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )


फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )


डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.🎭 Series Post

View all