सिंड्रेलाची गोष्ट - भाग ५

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः


मैथिली नाश्ता करायला बसली.


" चला आता दोघीही खाऊन घ्या पटापट... आजी कधीही येईल घरी.." सुमित्रा दोघींना उद्देशून म्हणाली.


मैथिलीची काहीही खाण्यापिण्याची इच्छा नव्हती. पण चैतालीसाठी ती खात होती. सुमित्रा त्या दोघींच्या बाजूलाच बसून होती. सुमित्रा आणि मैथिली सतत दरवाजाकडे पाहत होत्या. चैताली मात्र निरागस पणे तिच्या नाश्त्याचा आस्वाद घेत होती. खाता खाता मैथिलीने एकदा उठून घरातला लॅडंलाइन फोन नीट ठेवला आहे ना, हे सुद्धा तपासून पाहिले.. नाश्ता झाला.. तिघीही जागेवरून उठल्या. घडलेल्या प्रकारामुळे आज शाळेला दांडी मारावी लागली होती , त्यामुळे आता चैताली आणि मैथिलीकडे करायला काहीच नव्हतं. सुमित्रा स्वयंपाक घरात दुपारच्या जेवणाची तयारी करत होती. पण तीच तिथे मन लागत नव्हतं. तर इथे चैताली खेळत बसली होती तर मैथिली हातात पुस्तक घेऊन बसली होती. पण तिचं वाचनात लक्षच लागत नव्हतं. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. पण विलास राव आलेही नाहीत आणि फोन सुद्धा केला नाही.. चैतालीचा आवाज सोडला तर घरात शांतता होती.


दुपारचे दोन वाजून गेले.. सुमित्राने थोड बळजबरीनेच चैतालीला जेवणं भरवलं आणि तिला झोपवलं.. मैथिलीच्या सुद्धा ती जेवणासाठी पाठी लागली.. पण मैथिली काही जेवायला तयार नव्हती.

" तू जेवून घे.. मला भूक नाही आहे ..चैताली सुद्धा जेवून झोपली आहे ,सो प्लिज आता मला फोर्स नको करू. मी बाबा येई पर्यंत थांबते.. " मैथिली सुमित्राला म्हणाली. 

सुमित्राला सुद्धा भूक नव्हती.. तिच्या ही मनात नको नको ते विचार येत होते. "देवा काही भलत सलत घडवून आणू नकोस", अशी ती प्रार्थना करत होती.  


सुमित्रा आणि मैथिली , दोघी ही हॉल मधल्या सोफ्यावर समोरासमोर बसल्या होत्या. आज पहिल्यांदा दोघी एकमेकींसोबत एवढा वेळ बसल्या होत्या. सुमित्रा लग्न करून या घरात आल्यापासून मैथिली जास्तीत जास्त वेळ तिच्या खोलीतच असायची. सुमित्राच्या आसपास वावरण्याने सुद्धा ती अस्वस्थ व्हायची. बाबांचं सर्व ठीक व्हावं , ते आनंदात असावे हीच तिची इच्छा होती , पण तरी देखील तिने सुमित्राला स्वीकारले नव्हते. सुमित्राने सुद्धा हे अंतर कधीच कमी करायचा प्रयत्न केला नाही. या उलट तिच्या साठी हे चांगलेच झाले होते. सुमित्रा वर वर ती किती चांगली आहे हे दाखवत असली तरी ती नक्की कशी आहे हे मैथिली ओळखून होती. त्यामुळे तिच्या पासून दोन हात लांब राहणेच तिने पसंत केले होते. आज कर्म धर्म संयोगाने दोघी एकमेकींसोबत होत्या.. पण काय बोलावे हे सुद्धा त्यांना सुचत नव्हते. नजरा नजर झाल्यावर ही दोघी एकमेकींपासून नजर चुकवत होत्या. घरात स्मशान शांतता पसरली होती. घड्याळाच्या काट्यांच्या पुढे सरकण्याचा आवाज सुद्धा स्पष्ट पणे येत होता. 


दोनचे चार वाजले. सुमित्राला बसल्या जागीच झोप लागली. मैथिली मात्र जाणाऱ्या प्रत्येक मिनिटा गणीक अधीर होत होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. बेलच्या आवाजाने सुमित्रा सुद्धा ताडकन उठून बसली. बाबा आले वाटतं म्हणतं, मैथिलीने दार उघडले. तर समोर शेजारचा आनंद त्याच्या कुटुंबाला आणि आसपासच्या अजून शेजाऱ्याच्या चार लोकांना घेऊन आला होता. 


" काय झालं आनंद काका..? बाबा कुठे आहेत..? आणि तुम्ही सर्व इथे का आलात...? काय झालं...?" मैथिली गहिवराल्या आवाजाने म्हणाली. मैथिली समोरच दृश्य पाहून काय ते समजून गेली होती. असंच काहीस तिने तिच्या आईच्या वेळेला पाहिलं होत.. पण आपल्याला जे वाटतं ते खोटं असावं , या वेळी तरी तसं होऊ नये हेच तिच्या मनात सुरू होतं.


" मैथिली तू आधी शांत होत.. आनंद भाऊ या सर्व आता.." सुमित्रा मैथिलीला बाजूला करत म्हणाली.


" काय झालं आहे..? हे कुठे आहेत.. ? आणि आई..? ". सुमित्राने आनंदला विचारले.


" वहिनी ... " आनंद बोलता बोलता थांबला.. त्याने मैथिलीकडे पाहिले.. आई नंतर मैथिलीसाठी आजीच तिचं सर्वस्व आहे हे आसपासच्या सर्वांनाच ठाऊक होते. तिच्या समोर कसं बोलावं हा विचार करून तो थांबला.


" आनंद भाऊ प्लिज बोला .. काय झालं आहे..? " सुमित्रा म्हणाली.


" वहिनी तुम्ही मैथिलीला आता पाठवता का..? " आनंद म्हणाला." नाही.. मी कुठेच जाणार नाही.. मी इथेच थांबणार.." मैथिली आवेगात म्हणाली.


" ठीक आहे.. वहिनी आजी नाही राहिल्या आपल्यात. हॉस्पिटलला नेण्या आधीच त्यांनी प्राण सोडले होते. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर म्हणाले. पोस्टमोरटम रिपोर्ट नुसार त्यांना रात्रीच हृदय विकाराच तीव्र झटका आला होता आणि त्यातच त्या..... विलास दादा सर्व फॉर्मलिटी पूर्ण करून त्यांचं शव घेऊन येतील अर्ध्या तासात. आपण तयारी..." आनंद बोलता बोलता थांबला. हे सर्व ऐकून मैथिली जगाच्या जागीच कोसळली.


*****


मैथिलीला शुद्ध आली तेव्हा ती तिच्या बाबांच्या खोलीत होती. बाहेरून तिला रडण्याचा , आक्रोश करण्याचा आवाज येत होता. आजी बद्दल जे ऐकलं ते स्वप्नंच असावं असं तिला वाटतं होतं. पण तिच्या वाटण्याला आता काही अर्थ नव्हता. ती बेड वरून खाली उतरली आणि हॉलच्या दिशेने धावत गेली. बाहेर माणसांची खूप गर्दी झाली होती. गर्दीतून वाट काढत ती पुढे आली. समोर आजी निपचित पडून होती. बाबा खूप शांत बसून होते. चैताली त्यांच्या मांडीवर बसली होती. अगदी त्यांना बिलगून.. घरातलं वातावरण, समोर आजीच शव पाहून घाबरून गेली होती ती कदाचित... सुमित्रा एका कोपऱ्यात बसून रडत होती. दोन्ही आत्यां मोठं मोठ्याने ओरडुन रडत होत्या. बरीच मंडळी घरात जमली होती.. काही ओळखीची तर काही अनोळखी... पण आजी सोडून मैथिली साठी सारी परकीच होती. ती सुन्न झाली होती. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. हे सत्य आहे की स्वप्नं हेच तिचं तिला कळतं नव्हत.. खूप रडाव, ओरडव असं तिला वाटतं होतं . पण कोणी तरी तोंड दाबून धरल्या सारखी तिची अवस्था झाली होती. इतक्यात तिचे बाबा तिच्या जवळ आले. मैथिली..म्हणून त्यांनी तिला हाक मारली. त्यांच्या हाके सरशी तिने त्यांच्या कडे पाहिले. त्यांना पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. काहीही न बोलता, कसलाही आक्रोश न करता, फक्त अश्रू तिच्या डोळ्यातून बाहेर पडून गालांवरून घरांगळून वाहत होते. बाबांनी तिच्या केसातून हात फिरवला आणि तिला जवळ घेतले. तिने ही बाबांच्या कमरेला घट्ट मिठी मारली. काही क्षण ते दोघेही तसेच थांबले. 


" बाळा आजीला आता न्यावे लागेल... तिला नमस्कार करून घे..." जड अतः कारणाने विलास राव मैथिलीला म्हणाले. 


काहीही न बोलता, ती तशीच पुढे गेली. आजीच्या चरणांना तिने स्पर्श केला.. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते.. पण चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. आसपास असलेली बाकीची मंडळी सुद्धा शेवटचं चरण स्पर्श करण्यासाठी पुढे आली. तशी मैथिली पाठी झाली. सर्वांचं झाल्यावर चार पुरुष मंडळी पुढे आली आणि ' राम नाम सत्य है ' म्हणतं त्यांनी आजींच्या पार्थिवाला खांदा दिला.. समोरच दृश्य मैथिलीला सहन होतं नव्हतं. राम नामाचा तो असा गजर तिला हवालदिल करून सोडत होता. तिने कानावर हात ठेवला... आणि धावत स्वतःच्या खोलीत गेली. आणि खोलीचे दार तिने बंद करून घेतले.


********


सर्व क्रियाकर्म आटपून विलास राव घरी आले. ते आल्यानंतर घरात जी काही थोडी माणसं त्यांची वाट पाहत होती ती सुद्धा त्यांचा निरोप घेऊन निघाली. त्यांच्या बहिणी सुद्धा निघाल्या.. " दादा उद्या येतो आम्ही.. प्रथेप्रमाणे आजची रात्र इथे राहिलो तर तेरा दिवस इथेच राहावं लागेल.. तस करून चालणार नाही आम्हाला..", म्हणतं त्यांच्या बहिणींनी निरोप घेतला.. सुमित्राच्या आई बाबांना मात्र अशा परिस्थितीत या चौघांना एकटं सोडून जाणं योग्य वाटलं नाही..

" तुमची हरकत नसेल तर आम्ही दोघं थांबतो इथे ... ", सुमित्राचे बाबा म्हणाले..


" माझी काहीच हरकत नाही.. उलट तुम्ही थांबलात तर खूप बरं होईल.." विलास राव सुमित्राच्या बाबांना म्हणाले. 


" ठीक आहे मग.. सर्व विधी होईपर्यंत आम्ही थांबतो इथेच.. तुम्ही एकटे कुठे कुठे बघणार.. आमची थोडीफार मदत होईल. मी घरी जाऊन कपडे घेऊन येतो फक्त दोघांचे.." असे बोलून सुमित्राचे बाबा निघाले.


विलास राव सुद्धा स्नान करायला निघून गेले.. साधारण तासाभराने ते हॉल मध्ये येऊन सोफ्यावर बसले.. त्यांचा चेहरा पडला होता.. डोळे थकल्या सारखे वाटतं होते. 'अंघोळ करता करता खूप रडले असावेत बहुदा...' असा विचार त्यांना पाहून सुमित्राच्या मनात आला.. ती त्यांच्याशी बोलावं म्हणून त्यांच्या आसपास घुटमळत होती. बराच वेळ त्यांच्या आसपास फेऱ्या मारल्या नंतर ती त्यांच्या जवळ जाऊन बसली.


" अहो ऐका ना.. तुम्ही गेल्यापासून मैथिली खोलीत जाऊन बसली आहे.. मी एकदा जाऊन पाहिलं , तेव्हा ती बेड वर शांत बसून होती. तुम्ही बघून येता का जरा.." सुमित्रा विलास रावांना म्हणाली.


" हो बघतो..." म्हणत विलास राव सोफ्या वरून उठले आणि मैथिलीच्या रूम मधे गेले..


त्यांनी पाहिलं तर ती झोपली होती. चेहरा ओशाळलेला होता. रडता रडता तिला झोप लागली असावी असा त्यांनी अंदाज बांधला..

"थोडा वेळ झोपू दे तिला , नंतर उठवूया.." विलास राव बाहेर येऊन सुमित्रा ला म्हणाले.  


त्यांनी चैतालीची विचारपूस केली. सकाळ पासून मुलींनी काय काय केलं.. काही खाल्लं आहे का ते विचारलं.. चैताली आता सुमित्रा च्या आई सोबत होती. ती लहान असल्याने तिला गोष्टी नीट कळतं ही नव्हत्या , त्यामुळे तिला त्या गोष्टींचा विशेष त्रास सुद्भा होत नव्हता. पण या उलट मैथिलीच्या मनावर या सर्वाचा विपरीत परिणाम झाला होता.


**********


क्रमशः


( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )


फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )


डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


🎭 Series Post

View all