क्रमशः
" अनु अगं का अर्ध्यावर डाव सोडून गेलीस.. बघ हे काय झालं आहे घराचं.. मुलीचं.. काय चूक काय बरोबर तेच कळतं नाही आहे... असंख्य प्रश्न आहेत मनात.. तुम्ही प्रेम विवाह केला म्हणून तुझ्या माहेरच्यांनी पाठ फिरवली. मला वाटलं होतं, निदान तू गेल्यावर मुलींसाठी तरी ते येतील, पण नाही.. ते नाही आले.. ना तुझ्या अंत्यविधीसाठी आले , ना मुलींना भेटायला.. माझ्या दोन्हीं लेकी त्यांच्या संसारात रमल्या आहेत. त्यांच्याकडून काही अपेक्षा करणं सुद्धा चुकीचंच आहे. माझ्या जवळ काहीच पर्याय नव्हता ... अनु विलासच लग्नं लावून दिलं ती चूक केली का गं मी.. ? मला सांग ना.. उत्तर दे ना.. " आजींना खूप रडू आले.. त्यांच्या छातीत कळ आली... जीव घाबरा घुबरा झाला.. त्या मैथिलीला हाक मारण्यासाठी वळल्या पण त्यांना वाचाच फुटेना.. त्या जमिनीवर कोसळल्या.. त्यांनी आरडा ओरडा करायचा खूप प्रयत्न केला.. पण त्याचा काही उपयोग नव्हता..
सकाळ झाली.. नेहमीप्रमाणे सुमित्रा तिच्या कामाला लागली. विलासराव ऑफिसच्या तयारीला लागले. नेहमी प्रमाणे आजी त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या नाहीत म्हणून विलास रावांनी सुमित्रा कडे विचारनी सुद्धा केली.
सुमित्रा त्यावर म्हणाली," मी सुद्धा त्यांचीच वाट पाहते आहे. देव पुजेची सर्व तयारी सुद्धा करून ठेवली आहे. एवढा वेळ झोपत नाहीत त्या.. "
" हो, म्हणूनच विचारलं मी तुला.. तब्बेत ठीक होती ना तिची काल? काही बोलली का तुला?" विलास राव म्हणाले
" नाही हो.. काल तरी असं काही म्हणाल्या नाहीत त्या.. एक काम करते. हे एवढा डब्बा भरते तुमचा आणि मीच जाऊन बघून येते त्यांच्या खोलीत. " सुमित्रा तिचं हातातलं काम आवारत म्हणाली.
" हो.. बघून ये. " विलासराव म्हणाले.
इथे बेडरूम मध्ये सकाळचा सातचा अलार्म वाजला. नेहमी प्रमाणे मैथिली म्हणाली, "आजी अलार्म बंद कर ना.. पाच मिनिटं अजून झोपते."
अलार्म बराच वेळ वाजत होता. शेवटी मैथिली उठून बसली. असं पहिल्यांदा झालं होतं, की अलार्म वाजला आणि मैथिलीला उठवायला आजी खोलीत आली नाही. अलार्म वाजला की आजी मैथिलीला उठवायला येणार. मग अलार्म बंद करणार. पाच मिनिटं आजीच्या मांडीवर डोकं ठेऊन मैथिली झोपणार आणि मग आजी नेहमी प्रमाणे , ' बाळा उठ गं , उशीर होईल ' , म्हणत तिच्या केसात मायेने हात फिरवत तिला उठवणार. आज असं काहीच झालं नाही.
मैथिली डोळे चोळतच बेड वर बसून इथे तिथे पाहू लागली. शेजारी चैताली झोपली होती. तिने अंगावरची चादर बाजूला केली बेडवरून खाली उतरली. आणि समोरचं दृश्य पाहून ती हादरून गेली... आजी जमिनीवर निपचित पडून होती. मैथिली धावत आजी जवळ गेली. तिने आजीला हलवले... ' आजी, आजी उठं ' म्हणून आजीला उठवून सुद्धा पाहिले पण आजी काही उठली नाही..
मैथिली घाबरली आणि मोठं मोठ्याने ओरडू लागली..." बाबा, बाबा... लवकर या... बाबा... आजी... बाबा .. आजी... लवकर या... "
मैथिलीचा असा घाबरलेला स्वर कानावर पडताच विलास राव धावत मैथिलीच्या बेडरुम कडे गेले . त्यांच्या पाठोपाठ सुमित्रा सुद्धा गेली. बेडरुमचा दरवाजा आतून बंद नसल्यामुळे ते दोघंही आत शिरले. आत पाहतात तर काय... आजी जमिनीवर निपचित पडून होत्या. आणि मैथिली रडून रडून बेहाल झाली होती. या सर्वात चैताली सुद्धा बेडवर उठून बसली होती आणि रडू लागली होती...
विलास रावांनी मैथिलीला विचारले ," काय झालं...? आजी कधी पासून अशी आहे...? "
" माहित नाही बाबा.. मी उठले तेव्हा पाहिलं.." मैथिली रडत रडत म्हणाली..
" ठीक आहे.. तू रडू नको.. मी बघतो." विलास राव मैथिलीला म्हणाले.
विलास राव सुमित्राला म्हणाले, " तू आधी चैताली कडे जा.."
सुमित्रा सुद्धा गोंधळली होती... काय करावे ,काय नाही कळतं नव्हते.. पण विलास राव म्हणाले तसं ती पटकन चैताली कडे गेली.. आणि तिने तिला जवळ घेतलं..
विलास रावांनी लगेच फॅमिली डॉक्टरला फोन लावला.. घडलेली घटना सांगितली. डॉक्टरांनी त्यांना त्वरित हॉस्पिटल मध्ये आजींना दाखल करायला सांगितले. हे ऐकताच विलास रावांनी क्षणाचाही विलंब न करता शेजाऱ्यांच्या दरवाजा ठोठावला.. शेजारच्या रमेश आणि आनंदच्या मदतीने विलास राव आजींना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले.
परिस्थिती खूप गंभीर होती. चैतालीला काही विशेष कळतं नव्हते. पण आजीला काहीतरी भयानक झाले आहे , एवढे तिच्या लक्षात आले होते. त्यामुळे ती रडत होती. मैथिली देवासमोर हात जोडून बसली होती. आईच्या वेळेला सुद्धा तिने अशीच काहीशी परिस्थिती अनुभवली होती. त्यामुळे ती पुरती घाबरून गेली होती.
" देवा , मी तुझ्या कडे या पुढे कधीच काही मागणार नाही ... पण तू माझ्या आजीला बरे कर... मला आजी हवी आहे. आम्हाला तिची गरज आहे.. आजी नसली तर आम्ही काय करू..? आता तर सर्व छान होणार होतं.. आजी म्हणाली होती.. " मैथिली देवाचा धावा करत होती.
सुमित्रा सुद्धा घडलेल्या प्रकरा मुळे घाबरली होती. ' देवा काही विपरीत घडवून आणू नकोस,' अशी तिने मनोमन प्रार्थना केली. ही वेळ बिथरण्याची नाही.. मुलींना आपण सांभाळलं पाहिजे. ही जाण तिला होती. त्यामुळे तिने आधी चैतालीला शांत केले..
" आजीला काहीच झाले नाही. बाबा आजीला घेऊन येतील. तू रडू नको. आपण की नाही अंघोळ करून घेऊ.. नाश्ता करू.. म्हणजे आजी घरी आली की तुला आजी सोबत खेळता येईल ना... " असे म्हणत सुमित्राने चैतालीची समजूत काढली. तिने चैतालीला उचलून घेतले आणि ती चैतालीच आवरायला निघाली.
जाता जाता मैथिलीला म्हणाली , " तू पण तुझं आवरून घे जा..."
थोड्या वेळाने सुमित्रा परत आली तेव्हा सुद्धा मैथिली देवासमोर हात जोडून बसली होती. सुमित्रा मैथिली जवळ गेली..
तिच्या केसातुन हात फिरवत म्हणाली,
" बाळा.. मला माहित आहे, तुला आजीची खूप काळजी वाटते आहे.. पण तू अशी काहीही न खाता पिता बसून राहिलीस तर कसं होईल. चैताली सुद्धा काही खाणार नाही. आणि बाबा गेले आहेत ना आजीला मोठ्या डॉक्टर कडे घेऊन , मग आजी बरी होऊन येईल घरी. कदाचित काही दिवस आजीला ऍडमिट करावं लागेल , पण आजी येईल. तू काळजी करू नकोस. "
" आजी आल्या शिवाय मी नाही उठणार इथून.. मी कुठेच नाही जाणार.." मैथिली हुंदके देत म्हणाली.
" अगं असं करून कसं चालेल... स्वतः साठी नाही.. पण चैतालीचा विचार कर.. तुझ्या असं वागण्याने तू आजारी पडशीलच आणि चैताली सुद्धा आजारी पडेल.. चालेल का तुला? तुला सुद्धा माहित आहे तुझ्याशिवाय ती खाणार नाही.. तुला तिला सुद्धा उपाशी ठेवायचं आहे का...? " सुमित्रा मैथिलीला म्हणाली..
" नाही... पण... " मैथिली बोलत होती.. इतक्यात सुमित्राने तिला मध्येच टोकले आणि म्हणाली..." पण बिन काही नाही.. उठ आता.." असे म्हणत तिने मैथिलीचा हात धरत तिला तिच्या जागे वरून उठवले.
" जा ब्रश करून ये.. मी नाश्ता देते.. आणि आता रडू नको..." सुमित्रा मैथिलीला म्हणाली.
" दीदी.. ये ना लवकर... भुकू लागली आहे मला खूप.." चैताली मैथिलीला म्हणाली.
चैताली कडे पाहत मैथिलीने तिचे डोळे लगेच पुसले.. " मी लगेच येते.. "असे म्हणत ती वॉश रूम मध्ये गेली..
आजी येणार.. आजीला काहीच होणार नाही.. असे ती स्वतःशीच पुटपुटत होती..
**********
क्रमशः
( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )
फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा