सिंड्रेलाची गोष्ट - भाग ३

ही कथा आहे परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची.
क्रमशः

आजी आता पूर्णवेळ घरीच असायच्या... सुमित्राच्या वागण्यावर त्यांचं बारीक लक्ष होत. सुमित्रा सुद्धा हुशार..ती वेळ बघून वागायला लागली होती. काही दिवस असेच गेले. आजींना काहीच वावगं वाटत नव्हतं.. सर्व ठीक आहे.. सुमित्रा मुलींशी नीटच वागते.. भाटे काकूंना काही तरी गैरसमज झाला असेल अशी आजींची धारणा झाली. फक्त एकदा खातर जमा करण्यासाठी म्हणून आजींनी या वेळी मैथिलीला सुमित्रा बद्दल विचारले... रात्री नेहमी प्रमाणे आजी मैथिली आणि चैतालीला गोष्ट सांगत होत्या.. चैताली गोष्ट ऐकता ऐकता झोपी गेली. मैथिली आज शाळेत काय काय झालं ते आजींना सांगत होती.. आजींनी मैथिलीच्या केसात हात फिरवत तिला विचारले...

" मैथिली अगं तू सर्व काही सांगते मला.. पण कधी तुझ्या या नवीन आई बद्दल काहीच बोलली नाहीस.. " आजी मैथिलीला म्हणाल्या .

मैथिली थोडी गोंधळली.. आणि म्हणाली..," काय सांगू आजी.. सांगण्यासारख काहीच नाही.." 

" बाळा.. तुला माझी शप्पत आहे.. काही लपवत असशील तर सांग.. " आजींनी मैथिलीचा गोंधळ टिपला.. आणि न राहवून त्या तिला म्हणाल्या.. भाटे काकूंनी जे सांगितलं ते त्यांनी मैथिलीला सांगितलं.. बघ हे असं आहे.. त्यामुळे तू मला स्पष्ट काय ते सांग... 

मैथिलीला रडूच आलं.. " आजी का गं आई गेली आम्हाला सोडून.. आम्ही वाईट आहोत का... आमच्या नशिबी का आली सावत्र आई..." मैथिली बोलत होती.. प्रत्येक वाक्या गणीक आजी अधीर होतं होत्या..

" बाळा ,सुमित्राने काही केलं आहे..?" आजींनी विचारले.

" आजी त्यांचं लग्न झाल्यावर तूच मला म्हणाली होतीस ना.. तिला कुठे बाहेर जायचं असेल तर तू तिच्या सोबत जात जा.. ती नवीन आहे.. तिला इकडच्या गोष्टी कळणार नाहीत.. मी तेच केलं.. मी जेव्हा पहिल्याच दिवशी तिच्या सोबत गेले होते बाजारात.. तेव्हा ती मला म्हणाली... मला घराबाहेर आई म्हणू नको.. तुझ्या एवढ्या मोठ्या मुलीची आई थोडीच शोभते मी. आताच लग्न झालं आहे माझं.. लोक काय म्हणतील.. मला लाज वाटते.. तर प्लिज मला सर्वांसमोर आई म्हणू नको.. आजी तिला इथे ही आसपास लोकं ओळखतात.. कसे ते मला माहित नाही.. कदाचित ती पूर्वी घरकामासाठी येत असावी.. पण बाजारात गेल्यावर तिच्या ओळखीचे बरेच लोकं भेटायचे, तेव्हा ती माझी ओळख शेजारची मुलगी म्हणून करून द्यायची.. आजी मला खूप वाईट वाटायचं.. तू आणि बाबा असल्यावर ती खूप वेगळी असते.. छान वागते.. पण तुम्ही नसताना खूप वेगळी वागते. बाबांना हिशोब सांगताना पण ती बरेचदा पैसे इकडे तिकडे करते. थोडे वाढवून भाव सांगते. माझ्या साठी आणि चैतालीसाठी अमुक अमुक गोष्ट हवी आहे म्हणून पैसे घेते पण आमच्यासाठी ती काही घेतच नाही. मी तिला एकदा म्हटल की खोटं का बोलते..? बाबांना मुद्दामून खर्च करायला का लावते..? जर तुला पैसे हवे असतील तर बाबांना तस सांग, बाबा नाही म्हणणार नाहीत तुला. ते देतील. तेव्हा तिने मला बजावलं की मी हे कोणालाही सांगितलं तर ती बाबांना कायमच सोडून तिच्या घरी जाईल. " बोलता बोलता मैथिलीचा आवाज जड झाला..

" अगं बाळा हे मला तरी येणून सांगायचं ना तू... का नाही सांगितलं...? मी विलासच्या कानावर घातलं असतं.. अगं का हे सहन केले तू? आपल्या न कळतं ती चैतालीशी कशी वागत असेल काय माहीत..." आजी म्हणाल्या..

" आजी तूच म्हणाली होतीस ना बाबांना आधार हवा आहे म्हणून... आम्ही मुली आहोत , आम्ही लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार . मग बाबांकडे कोण बघणार... त्यांना आणि या घराला गरज आहे. ती जर घर सोडून गेली तर बाबा दुःखी झाले असते. त्यांना त्रास झाला असता..मग मी काय म्हणून सांगू त्यांना.. आणि सावत्र आई कशा असतात त्याचे किस्से मी ऐकले आहेत. वाचले आहेत.. निदान ही तशी तरी वागत नाही " मैथिली रडरडत आजीला म्हणाली..

" मैथिली अगं बाळा.. फक्त बाबांसाठी नाही तर तुमच्यासाठी पण आई हवी होती मला या घरात.. चुकलं माझं.. मीच लक्ष द्यायला हवं होतं.. हे बघ ती अजून वाईट वागत नाही ते ठीक आहे.. पण अगं माझी थोडीच वर्ष उरली आहेत आता.. मी असते सतत घरात त्यामुळे कदाचित ती अजून काही चुकीचं वागली नसेल. किंवा अजून तिला या घरात येऊन जास्त काळ झाला नाही आहे म्हणून ही वागली नसेल.. पण तिने आता पर्यंत जे काही केलं आहे त्या वरून तिचे इरादे नेक नाहीत एवढं मात्र नक्की... बाळा मी अजून किती काळ असणार आहे हे त्या परमेश्वरालाच माहीत.. पण एक गोष्ट लक्षात ठेव... तुला तुझ्यासाठी आणि चैतालीसाठी खंबीर व्हायला हवं.. चांगल्याशी चांगल तर वाईटाशी वाईट वागायला हवं.. घरात वाद नको पण, सर्वजण सर्वांशी योग्य वागले पाहिजेत. जो चुकतो आहे त्याला वेळीच आवरलं पाहिजे.. " आजी मैथिलीला जवळ घेऊन समजावत होत्या.

" आजी बाबा दुखावले गेले तर ... मला फार काळजी वाटते त्यांची.. मला सतत धाकधूक असते.. मला माहित आहे बाबांना आईची किती आठवण येते .. मधल्या दोन वर्षात आम्हाला सांभाळताना त्यांना किती त्रास झाला.. म्हणून मग सुमित्रा आईला काही बोलत नाही. .." मैथिली म्हणाली.

" तुझ्या बाबांना सत्य परिस्तिथी माहीत असली पाहिजे. कोणीच विरोध करत नाही हे पाहून तिने अजून काही केलं तर.. तुमच्या विरुद्ध कान भरले तर . हे बघ खूप गोष्टी आहेत... बाबांना कधी दुखवू नको, पण त्यांना सत्य नेहमी माहीत असलं पाहिजे ना... आणि बाळा चैतालीचा सुद्धा विचार कर. किती लहान आहे ती. तिच्या मनावर किती वाईट परिणाम होईल या सर्व गोष्टींचा. तू काळजी नको करू आता.. मी आहे. मी बोलेन उद्या बाबांशी. सुमित्राशी सुद्धा बोलेन. होईल सर्व नीट. तू फक्त एक लक्षात ठेव.. चांगल्या माणसांशी चांगल वागायचं.. पण जर कोणी आपल्याला वाईट वागणूक देत असेल तर ते सहन नाही करायचं. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो.. कधी कधी आपण काहीच बोलत नाही म्हणून ही माणसं आपला गैर फायदा घेतात. तस कधीच होऊ देऊ नको. चैतालीची जबाबदारी तुझ्या वर आहे , निदान तिला नीट कळे पर्यंत हे नेहमी लक्षात ठेव." आजी म्हणाली.

" हो आजी.. तू म्हणतेस तसच वागेन मी आता.." मैथिली म्हणाली.आणि आजीला मिठी मारून रडू लागली.

आजीने तिच्या पाठीवरून हात फिरवला.. तिला गप्प केले.." चल आता झोपुया.. उद्या पासून सर्व छान होणार आहे.. हस पाहू आता.."आजी म्हणाली..

" आजी... सिंड्रेलाची गोष्ट सांग ना.." डोळे पुसत ,हसत हसत मैथिली आजीला म्हणाली..

" परत सिंड्रेला...? अगं दुसरी सांगते.." आजी म्हणाली.

" नाही.. नको.. सिंड्रेलाच.." मैथिली म्हणाली..

" का एवढी आवडते या मुलीला ही सिंड्रेला, काय माहित.." आजी स्वतःशी पुटपुटली.

आजीने सिंड्रेलाची गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट ऐकता ऐकता आजीच्या मांडीवर डोकं ठेऊन मैथिली निश्चिंत होऊन झोपी गेली.

**********

मैथिलीचे डोकं मांडीवरून खाली ठेवून आजी जागेवरून उठल्या. आजींना खूप अपराध्या सारख वाटत होतं. माझ्या मुलाच्या सुखासाठी मी या निष्पाप जीवांचा बळी पाडला का..? काय झालं असतं जर विलासच दुसरं लग्न न लावता मी घराचा ताबा घेतला असता..? घरात कामाला चार माणसं घेऊन कामं करून घेतली असती, तर जमलं असतं का मला...? नाही नाही... मी अशी किती वर्ष जगणार आहे.. कामाचं ठीक आहे.. पण विलासला सुद्धा गरज होतीच ना आधाराची.. इतर गरजाही असतातच ना.. कधी चुकून विलास त्या गरजा पूर्ण करण्यासाठी चुकीच्या मार्गाने गेला असता तर, ही पण काळजी होतीच ना.. ह्या मुलींसाठी पण आईचा धाक हवा होता ना.. सुमित्राला परखण्यात चूक झाली का..? पण मैथिली जसं म्हणाली, काही सावत्र आया खूप वाईट असतात.. सुमित्रा तशी तरी नाही.. पण काही खूप चांगल्याही असतात.. सुमित्रा तशीही नाही.. आजींच्या डोक्यात हे सर्व विचार चक्र सुरू होते..अशातच आजींची नजर समोरच्या भिंतीवर असलेल्या अनुराधाच्या फोटो कडे गेली.. अनुराधा म्हणजे मैथिलीची आई.. आजींना अश्रू अनावर झाले.. 

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

🎭 Series Post

View all