सिंड्रेलाची गोष्ट - भाग २

ही कथा परिकथेत रमणाऱ्या एक मुलीची आहे.

क्रमशः


विलास रावांनी लग्नाच्या आधी सुद्धा सुमित्राला हे लग्न करण्या मागचा त्यांचा हेतू स्पष्ट सांगितला होता. लग्नाच्या अगदी पहिल्याच रात्री सुद्धा त्यांनी हे पुन्हा एकदा त्यांनी सुमित्राला ठणकावून सांगितले की तू माझी बायको नंतर आधी माझ्या मुलींची आई हो, ह्या घराची गृह लक्ष्मी आणि माझ्या आईचा आधार हो. तुला या घरात कधीच कसली कमी पडू देणार नाही मी. तुझ्या आई बाबांना ही कधी काही कमी पडू देणार नाही. फक्त माझ्या विसकटलेल्या घराची घडी बसव.. अजून मला काहीच नको.


मैथिली आता दहा वर्षांची तर चैताली चार वर्षांची होती. आता घरात विलास राव, सुमित्रा, आजी, मैथिली आणि चैताली होत्या. विलास रावांच ते ठाण्यातलं दोन बेडरूम , हॉल, किचनच घर म्हणजे एका खोपट्यात राहणाऱ्या सुमित्रासाठी राजमहलाच होता. त्यातच विलास राव सरकारी नोकरीत कारकून होते. गडगंज श्रीमंत नसले तरी घरात हवं ते सुख होत. साधन होती. पुरेसा पैसा होता. इतकी वर्ष आई बाबांसाठी , स्वतः च्या घरासाठी झटणारी सुमित्रा बदलली होती.सुमित्रा अनेक स्वप्न डोळ्यात घेऊन त्या घरात आली होती. आता तिला स्वतः साठी जगायचे होते. ती मनाने वाईट नव्हती. पण आता ती या वैभवाला भुलली होती. तिला आता सर्व काही हवं होत. मी कितीही माया केली तर ह्या मुली माझ्या थोडीच आहेत. त्या मला आई म्हणून का स्विकारतील.. मग मी पण का माझी मेहनत वाया घालवू त्यांना घडवण्यासाठी... असा विचार ती करू लागली. मुलींना खायला प्यापला काय हवं नको ते बघणं एवढंच तिचं काम आहे हे तिने मनोमन गृहीत धरलं. 


मैथिली मोठी होती. त्यामुळे तिच्यासाठी सुमित्राला लगेच आई म्हणून स्विकारणे कठीण होते, पण चैतालीसाठी सुमित्रा हीच तिची आई होती. चैताली प्रत्येक गोष्टीसाठी सुमित्रावर अवलंबून होती. सुमित्राला मात्र हे आवडत नसे. कधी कधी त्यांच्या खोलीत झोपणं , सारख आई बाबा करत सुमित्रा आणि विलास रावांच्या पाठी लागण, जेवण भरवायला सांगणं.. अजून बरच काही जे कुठलही लहान मूल आई बाबांकडून अपेक्षा करेल अशाच गोष्टी चैतालीला ही अपेक्षित होत्या.. सासूबाई आणि विलास रावांसमोर सुमित्रा चैतालीचे हट्ट पुरवी पण त्यांच्या मागे मात्र तिला ओरडत असे, तिच्या कडे दुर्लक्ष करत असे.


**********


एक वर्ष असच सरल. आता सुमित्राला वेध लागले होते स्वतःच्या बाळाचे. मला पण स्वतःच मुल हवं आहे म्हणून ती विलास रावांकडे हट्ट करू लागली होती. तिची मागणी अयोग्य नाही. कुठल्याही स्त्रीला आईपण अनुभवायचा पूर्ण अधिकार आहे हे विलास राव जाणून होते. पण सुमित्राला स्वतः च मुल झाल्यावर तिने मैथिली आणि चैतालीकडे दुर्लक्ष केले तर... त्यांचा छळ केला तर असा विचार त्यांच्या मनात येत होता. पण सुमित्राने ती किती चांगली आहे.. तिला दोन्ही मुलींची किती काळजी आहे. कितीही काहीही झालं तरी मैथिली आणि चैताली तिच्यासाठी महत्त्वाच्या आहेत... वैगरे वगैरे नाटक खूप उत्तम रित्या विलास रावांसमोर केलं... शेवटी विलास राव तिच्या मागणी पुढे झुकले. 


इथे मैथिली मनाने तिच्या बाबांपासून दूर जात होती. शाळा, शिकवणी, भरतनाट्यमचे क्लास, आणि नंतर तिची आवडती पुस्तक यात तिने स्वतः ला मग्न करून घेतले होते. वेगवेगळी पुस्तक वाचण्याची तिला आवड होतीच सोबतच आजी कडून रोज गोष्टी ऐकायला ही तिला आवडत असे. त्यातलीच तिची सगळ्यात आवडती गोष्ट होती ती म्हणजे सिंड्रेलाची.. सिंड्रेलाची सावत्र आई, तिला होणारा त्रास, मग तिला भेटलेली परी, परीची जादू, राजकुमार, आणि मग हॅपी इंडिंग... हे सारं तिला खूप आवडे. तिला तिचं आयुष्य ही सिंड्रेला सारख वाटे... खरंच कधी तरी परी येईल.. राजकुमार येईल आणि सारं छान होईल असे तिला मनापासून वाटे.. ती जेव्हा ही उदास असे तेव्हा रात्री आजीच्या कुशीत शिरून आजीला सिंड्रेलाची गोष्ट सांगायला लावे. विलास रावांना सुद्धा मैथिली त्यांच्या पासून लांब जाते आहे याची जाणीव होती. पण ती खुश होती ,तिच्या दिनक्रमात बिझी होती यामुळे ते या कालावधीत कधीच तिच्याशी याविषयी बोलायला गेले नाही. 


आजी त्यांच्या प्रवचन आणि देवपुजेत मग्न असायच्या. आजी फक्त दोन तास प्रवचनसाठी घराबाहेर जात नाहीतर पूर्ण वेळ त्या घरात असतं त्यामुळे सुमित्राला त्यांची भीती होतीच. त्यांच्यामुळे मुलींसोबत वेडवाकड वागण्याचा, त्यांना काही इजा करण्याचा विचार सुद्धा तिच्या मनात आला नाही. फक्त जेव्हाही तिला संधी मिळे तेव्हा ती चैतालीवर डाफरत असे जेणेकरून चैताली आई बाबा करून त्यांच्या पाठी फिरणार नाही आणि तिला विलास रावांसोबत जास्तीत जास्त एकांत वेळ मिळेल. चैताली मात्र यात गोंधळली होती. सुमित्राच क्षणा क्षणाला बदलणारं वागणं त्या छोट्या जीवाला गोंधळून टाकणार होत. ती खूप शांत शांत राहत असे. तिच्या शांत राहण्याने आजी संभ्रमात पडल्या होत्या. नक्की कुठे चुकतं आहे ते त्यांना कळत नव्हत. आजींना हळू हळू सुमित्रावर थोडा संशय येऊ लागला होता. पण त्यांच्याकडे पुरावा नव्हता. 


त्यांनी चैतालीला खूप वेळा विचारून पाहील " आई तुला मारते का..? " 


पण चैताली त्याचं उत्तर नेहमी नाहीच देत असे. चैताली इतकी लहान होती की सुमित्राच वागणं तिलाच कळत नव्हत त्यामुळे ती आजीला तरी काय सांगणार.. घरात दोघीच असल्यावर चैतालीने कितीही आवाज दिला तरी सुमित्रा तिच्याकडे लक्ष देत नसे. तिने काही खायल मागितल तर खाऊ देत नसे. स्वतःच्या खोलीत जाऊन झोपू राही. पण हेच सर्व असताना पूर्ण लक्ष चैतालीकडे देई. त्यामुळे ते बालमन कोड्यात पडलं होत. सावत्र आई, दुसरी आई, खरी आई या सर्व गोष्टी समजण्याच्या पलीकडे होत तिच्या... 


आजी चैतालीच्या चिंतेत असताना अशातच एकदा त्यांना प्रवचनावरून येताना शेजारच्या काकू भेटल्या.. 


आजी प्रवाचनावरून येताना शेजारच्या भाटे काकूंनी त्यांना गाठलं.. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर काकू आजींना म्हणाल्या.. " आजी घरी सर्व ठीक ना...?"


काकूंच्या बोलण्यातला रोख आजींना कळत होता.. " हो ग.. का..? काय झालं..? "


" आजी खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होत.. पण योग्य वेळ कुठली तेच कळत नव्हत.." काकू म्हणाल्या..


" काय झालं आहे नक्की...? सांग आधी.." आजी म्हणाल्या.


" चैताली हल्ली खूप शांत असते. पूर्वी सारखी खेळायला येत नाही. काही दंगा मस्ती करत नाही. खरतर तुमच्या घरतला इश्यू आहे पण राहवत नाही म्हणून सांगते , तुम्ही घरात नसताना तुमच्या घरातून मोठं मोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो.." काकुंच बोलणं मध्येच थांबवत आजी म्हणाल्या.. " म्हणजे सुमित्रा... "


" हो आजी सुमित्रा चैताली वर ओरडत असते. तुम्ही तुमच्या मजल्यावरच्या अजून लोकांना विचारू शकता.. अहो मुलांना ओरडणं गैर नाही.. पण हे रोज होत.. चैतालीचा रडण्याचा आवाज सुद्धा रोज येतो.. काही तरी चुकीचं होत आहे अस वाटल म्हणून तुमच्या कानावर घालेन म्हटल.." काकू म्हणाल्या..


" चुगली करण्याऱ्यातली मी नाही ... पण आपले.." काकू बोलत होत्या.. आणि आजींनी त्यांना थांबवलं..


" अगं तू मला कुठलंही स्पष्टी करणं नको देऊ.. मी ओळखते ना तुला.. खरं सांगू तर चैतालीचा वागण्यातला हा फरक मी गेले कित्येक दिवस पाहते आहे.. मला सुद्धा काहीतरी गडबड वाटते आहे... मी लक्ष देते.. तुझे खूप खूप आभार.." असे म्हणून आजी घराकडे निघाल्या.


आता कुठेच जायचे नाही.. पूर्ण वेळ घरातच थांबायचे हे आजींनी ठरवले.


इथे बरेच प्रयत्न करूनही सुमित्रला दिवस जात नव्हते. त्यामुळे ती खूप अस्वस्थ होती.


क्रमशः


( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )


फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )


डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.
🎭 Series Post

View all