क्रमशः
" बाबा… " विलास राव त्यांना पडताना पाहून ओरडले आणि त्यांच्या दिशेने त्यांना सावरायला गेले.
विलासरावांनी त्यांना बेड वर ठेवले.
" सुमित्रा डॉक्टरांना बोलावं. अशी बघत काय बसली आहेस.." विलासराव सुमित्राला म्हणाले.
सुमित्रा पुरती गोंधळली होती. विलासराव काय बोलत आहेत हे तिच्या कानांपर्यंत तर जात होतं , पण तिला काही सुचत नव्हतं. ती तशीच तिथेच घुटमळत होती. ते पाहून विलास राव स्वतः च बाहेर जाऊन डॉक्टरांना घेऊन आले.
" तुम्ही दोघे सुध्दा बाहेर जा.. प्लिज " डॉक्टर आणि नर्सेस आत येता येता विलासराव आणि सुमित्राला म्हणाले.
विलासराव सुमित्राला घेऊन बाहेर गेले. सुमित्रा गोंधळली होती. काय सुरू आहे हेच तिला कळतं नव्हतं. विलासराव सुद्धा रूमच्या बाहेर फेऱ्या मारत होते. डॉक्टर्स नर्सेस आत बाहेर करत होते. धावपळ सुरू होती. पण कोणी काही सांगत नव्हतं. थोड्या वेळाने सुमित्राच्या बाबांना आय सी सी यू मध्ये नेण्यात आले. साधारण दोन तासांनी डॉक्टर बाहेर आले.
" सदाशिव जाधव सोबत कोण आहे..? " बाहेर आलेल्या डॉक्टरने विचारले.
" मी.. त्यांचा जावई आहे.." विलासराव पुढे जात म्हणाले.
" आय एम सॉरी.. त्यांना आम्ही वाचवू नाही शकलो.." डॉक्टर म्हणाले.
" काय..? अहो असं कसं शक्य आहे.. ते बरे होते ना.. तुम्ही सांगितलं होतं तसं.. स्टेबल होते.. आता काय झालं..? असं कसं..?" विलासराव म्हणाले.
" त्यांना हार्ट अटॅक आला.. आम्ही प्रयत्न केले पण.. " डॉक्टर बोलता बोलता थांबले.
विलास रावांनी सुमित्रा कडे पाहिले. ती जागीच बसून होती. डोळ्यातून अश्रु पघळत होते. पण चेहऱ्यावर कसलेच भाग नव्हते. ती जागी स्थब्ध झाली होती. विलासरावांना सुद्धा काही सुचत नव्हते. सुमित्राची आई जाऊन तीन दिवसचं झाले होते आणि आता बाबा.. तिला काय बोलावं, तिची कशी समजूत काढावी.. काहीच कळत नव्हतं.. ते तसेच निघाले आणि हॉस्पिटल मधल्या पी सी ओ वरून त्यांनी रजनीश आणि निशाला बोलवून घेतले.
**********
हॉस्पिटल मध्ये फॉर्मलिटी करण्यात तीन तास तसेच निघून गेले. सुमित्रा तशीच होती. कोणाशी काही बोलत नव्हती . चेहऱ्यावर काही भाव नाही. फक्त डोळ्यातून अश्रू ओघळत होते. निशाने तिच्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला पण ती काहीच बोलली नाही.. सर्व फॉर्मालिटी झाल्यावर सुमित्राच्या बाबांचं पार्थिव विलासरावांना सोपवण्यात आले. सुमित्राच्या माहेरी अंत्ययात्रेची तयारी झाली करण्यात आली, त्यांचे जे कोणी नातेवाईक होते त्यांना बोलावण्यात आले… सगळ्यांसाठीच हा एक धक्का होता. सुमित्राचे आई बाबा वयस्कर होते. पण त्यांचं असं जाणं सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेल. सुमित्राच्या बाबांनाही विलासरावांनी अग्नी दिला. मैथिली आणि चैताली ही खूप दुःखी होत्या. पुढे काय होणार होतं याची कल्पना कोणालाच नव्हती, पण त्या दोघांच्या जाण्याने पुन्हा एकदा आपल्या हक्काचं, मायेचं आपण कोणीतरी गमावून बसलो आहोत ही भावना मैथिलीच्या मनात होती. ' देव असा निष्ठुर कसा होऊ शकतो , नेहमीच असं कसं होतं..' असे सर्व विचार मैथिलीच्या मनात सुरू होते. चैतालीला सुद्धा खूप वाईट वाटत होतं.
अंत्यविधी झाला.. हळू हळू सर्वजण आपापल्या घरी जाऊ लागले. पुढचे कार्यविधी विलासरावांच्या घरी होतील असे आलेल्या सर्व नातेवाईकांना सांगून विलासराव आणि सुमित्रा सुद्धा घरी जायला निघाले. सुमित्राच्या माहेरी राहण्यासारखी परिस्थीती नव्हती, त्यामुळे तिथे त्यांना राहणं जमलं नाही.
" मुलींना आम्ही घेऊन जातो , अशा परिस्थितीत त्यांनी तिथे घरी राहणं योग्य नाही. त्यांच्या अभ्यासाच अजून नुकसान नको व्हायला. रजनीश येऊन मुलींचं सामना घेऊन जातील , तेवढं फक्त तुम्ही काढून ठेवा." निशा विलास रावांना म्हणाली आणि मुलींना घेऊन निघाली. चैतालीला सुद्धा घरी जायची बिलकुल ईच्छा नव्हतीच. ती अगदी आनंदाने तयार झाली तर सुमित्रा आईला आपली गरज आहे आपण असे जाणं योग्य नाही म्हणून मैथिली जायला तयार नव्हती. बरीच समजूत काढल्यावर ती निशा सोबत गेली.
**********
विलासराव चिंतेत होते. कारण बाबा गेल्याच कळल्यापासून सुमित्रा काहीच बोलली नव्हती. शेजाऱ्यांनी जेवणं आणून दिले होते त्यालाही तिने हात लावला नव्हता. विलासरावांनी सुद्धा तिला काही विचारले नाही.. तिच्यावर एकावर एक आघात झाले होते. तिची मनस्थिती ठीक नव्हती हे ते जाणून होते. थोडा वेळ तिला एकटं सोडण गरजेचं होतं. आणि म्हणूनच त्यांनी तिला तिचा वेळा दिला..
***********
मैथिली आणि चैतालीचा मोठं मोठ्याने रडण्याचा आवाज येऊ लागला… हॉल मध्ये सोफ्यावर झोपलेले विलासराव घाबरून जागे झाले. त्यांना प्रचंड घाम आला होता..टन टन टन टन टन टन टन टन टन टन टन टन.. घड्याळात रात्री बाराच्या ठोले पडले .. विलास रावांनी आसपास नजर फिरवली. आपल्याला स्वप्न पडल्याचे त्यांच्या लक्षात आले..
'नशीब स्वप्नच होते.. 'ते स्वतःशीच पुटपुटले .
' पण हे सत्यात कधीही उतरू शकत.. सुमित्रा जर या घरात राहिली तर हे होऊ शकतं.. माझ्या मुली अशाच नेहमी रडत राहतील…' पटकन हा विचार त्यांच्या मनात आला.
या दिवसात जे काही झालं ते सर्व एकीकडे.. पण त्यांना सुमित्रा सोबत संसार करायची नव्हती.. त्यांना तिला सोडचिठ्ठी द्यायचीच होती.. पण आता काय करणार..? आता परिस्थिती पूर्वी पेक्षा बिकट होती.. या विचारांनी ते अस्वस्थ झाले.. एका जागी त्यांना स्वस्थ बसवे ना.. ते इथून तिथून फेऱ्या मारू लागले.. ती रात्र अशीच गेली.
**********
दुसऱ्या दिवशी पासून सुमित्रा थोडी नॉर्मल झाली होती. घरात सतत कोणी ना कोणी भेटायला येतंच होतं.. त्यामुळे वेळ जात होता.. सोफ्यावर झोपणं विलासरावांना जमत नव्हतं , त्यामुळे ते दोन दिवसांनी परत स्वतःच्या रूम मध्ये झोपायला गेले. पण तिथे जाऊन देखील त्यांनी सुमित्रा सोबत अंतर ठेवले.
**********
सुमित्रा आता खूप बरी होती. तिच्या आई वडिलांचं सर्व कार्यविधी झाले… मैथिली आणि चैताली अजूनही निशाच्या घरीच होत्या. मुली तिथे रमल्या होत्याच पण सोबतच निशा आणि रजनीशची सुद्धा त्यांना घरी सोडायची ईच्छा नव्हती. मुलींमुळे घराला घरपण आल्या सारखं त्यांना वाटतं होतं. त्यांच्या हातात असतं तर त्यांनी मुलींना कधीच परत जाऊ दिलं नसतं. स्वतः कडेच ठेवून घेतलं असतं. पण सत्य परिस्थितीची त्या दोघांना पण जाणं होती. त्यामुळे सध्या हातात असलेल्या दिवसात आपण आयुष्य भराचा आनंद आणि समाधान गोळा करायचे असे त्या दोघांनी ठरवले होते. मुलींचा अभ्यास घेण्यापासून ते त्यांना फिरायला नेण्यापर्यंत, त्यांच्यासाठी टिफीन बनवणं, वेग वेगळ्या गोष्टी खायला घालणं. त्यांना गोष्टी सांगणं, त्यांच्यासोबत त्यांच्या आवडीचे कार्टून बघणं.. अगदी सर्वच गोष्टी ते दोघं आवडीने करत होते.
**********
सुमित्रा आता बरी होती. पण तिच्याशी आता घटस्फोट बद्दल बोलणे योग्य नाही. अजून पंधरा दिवस थांबून बघू असे विलास रावांनी ठरविले होते.
रात्रीचे जेवण झाले. जेवल्यानंतर थोड्यावेळाने विलासरावांना डोकं थोडं जड झाल्यासारखं वाटतं होतं. त्यांना जेवल्यानंतर शतपावली करतानाही खूप वेगळं वाटतं होत. त्यामुळे जास्त वेळ न दवडता ते त्यांच्या बेडरूम मध्ये गेले. बेडरूम मध्ये जाताच त्यांना जे दिसलं ते त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे होत.
बेडरूम मध्ये सुहासिक मेणबत्या सर्वत्र लावलेल्या होत्या.बेडरूम मध्ये लाईट बंद होती. त्या मेणबत्यांमुळे सगळी कडे छान सुगंध पसरला होताच पण त्याचं बरोबर मंद असा प्रकाशही पसरला होता. विलासराव सुमित्राला शोधू लागले. कारण झोप येतेय सांगून ती लवकर बेडरूम मध्ये आली होती. पण ती त्यांना कुठेच दिसत नव्हती. सोबतच त्यांना आसपासच्या गोष्टी थोड्या फिरत असल्या सारखा भास होत होता. डोकं अजून जड झाल्यासारखं वाटतं होतं. ते तिला बघायला थोड बेडरूम मध्ये आत आले तोच बेडरूमचा दरवाजा बंद झाल्याचा त्यांना आवाज झाला. त्यांनी पाठी वळून पाहिले तर सुमित्रा.. पिवळ्या रंगाच्या पारदर्शक गाऊन मध्ये उभी होती. मोकळे केस.. चेहर्यावर हलकासा मेकअप. ओठावर गुलाबी रंगाची लिपस्टिक.. शरीराचे उभार अगदी नजरेतील भरतील असे ते पारदर्शक कपडे.. तिला तसे पाहून विलासराव गडबडले.. सुमित्रा हळू हळू त्यांच्या दिशेने येऊ लागली..
" सुमित्रा हे काय आहे.. मला एकतर काहीतरी होतं आहे.. कळतं नाही आहे.. आणि तू हे.."
त्यांचं बोलणं पूर्ण होईपर्यंत सुमित्रा त्यांच्या जवळ आली आणि तिने त्यांच्या ओठांवर स्वतः चे ओठ ठेवले. विलासरावांनी तिला स्वतः पासून दूर करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. चुंबन घेताना तिच्या हातांचा त्यांच्या शरीरावर सर्वत्र होणारा स्पर्श त्यांना सुखावत होता.. त्यांनाही तो हवाहवासा वाटत होता. त्यांना तिला स्वतः पासून वेगळे करता आले नाही. आणि पाण्यात रंग जसा एक होऊन जातो तसे ते दोघं त्या क्षणी एकमेकांमध्ये समरस झाले.
क्रमशः
( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )
फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.