Login

सिंड्रेलाची गोष्ट - भाग २३

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः

सुमित्रा खाली पडली तसेच मैथिली आणि चैताली तिच्या दिशेने धावत गेल्या.

" आई .. आई उठ ना.." मैथिली अगदी कळवळून म्हणाली.

विलास राव सुद्धा सुमित्राच्या दिशेने गेले. त्यांनी थोडं पाणी तिच्या तोंडावर शिंपडले .. तिला आवाज दिला.. ती थोडी शुद्धीत आली.. तिला नीट उठवून बसवलं. तिला पाणी पाजलं..

" आई बाबा.. काय झालं असेल..," सुमित्रा म्हणाली.

" हे बघ इथे बसून आपल्याला काहीच कळणार नाही.. आपल्याला तिथे जावं लागेल.. काय झालं ते पाहावं लागेल. असं कोलमडून चालणार नाही. चल.. त्यांना आपली गरज आहे.." विलास राव म्हणाले.

" हो. चला.." सुमित्रा आधार घेत उठून उभी राहत म्हणाली.

" बाबा… आम्ही पण येतो.." मैथिली आणि चैताली दोघी एकदम म्हणाल्या.

" नको बाळा.." विलास राव म्हणाले.

" प्लिज बाबा… प्लिज.." मैथिली म्हणाली.

थोडा विचार करून विलास रावांनी त्यांना सोबत यायची परवानगी दिली. सर्व जण निघाले.

*********

" नमस्कार.. मी विलासराव जगताप.. मला फोन आला होता.. माझे सासू सासरे.. म्हणजे रुक्मिणी आणि सदाशिव जाधव यांचा अपघात झाला आहे. त्यांना या हॉस्पिटल मध्ये दाखल केलं असल्याचा फोन आला होता. मला प्लिज सांगाल का ते कुठे आहेत..?" विलास रावांनी हॉस्पिटलच्या रिसेप्शन वर विचारले.

" साधारण वय सांगाल का..? अक्सिडेंटच्या चार केसेस आल्या आहेत. ओळख पटली नाही आहे अजून त्यांची.." रिसेप्शन वरची स्त्री म्हणाली.

" हो.. ६३ आणि ६९ वय आहे त्यांचं.." सुमित्रा म्हणाली.

" तुम्ही दुसऱ्या मजल्यावर जा.." ती स्त्री म्हणाली.

सर्व अगदी धावतच दुसऱ्या मजल्यावर गेले. इथे तिथे शोधू लागले. विलास राव तिथे कोणाला विचारणार इतक्यात त्यांना पाहून एक मुलगा त्यांच्या जवळ आला.

" तुम्ही विलास राव जग.." मुलगा पूर्ण बोलेपर्यंत विलास रावच म्हणाले.

" हो मीच विलास राव जगताप.. तुम्हीच कॉल केला होता का.. ?" विलास रावांनी विचारले.

" हो मी शरद.. हे माझे मित्र.." तो मुलगा बाजूला उभे असलेल्या अजून तीन मुलांकडे बोट दाखवत म्हणाला.

" कसे आहेत आई बाबा.?. कुठे आहेत..?" सुमित्राने विचारले.

" तुम्ही प्लिज जरा बाजूला येता का..? " शरद विलास रावांना म्हणाला.

" हो.. चला.. " विलास राव म्हणाले.

" नाही… प्लिज इथेच बोला.. काय झालं आहे.." सुमित्रा म्हणाली.

" ठीक आहे .. तुम्ही इथेच बोला.. जे काही आहे ते.. पटकन सांगा.." विलास राव म्हणाले.

" त्यांना खूप लागलं आहे. खूप रक्तस्त्राव झाला होता जेव्हा आम्ही त्यांना इथे आणलं. दोघंही बेशुद्ध होते. डॉक्टर त्यांना घेऊन गेले आहेत आत.. एकदा येऊन म्हणाले परिस्थीती खूप गंभीर आहे.. त्यांच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. " शरद म्हणाला

ते ऐकून सुमित्रा खूप रडू लागली. तिला असं रडताना पाहून मैथिली आणि चैताली दोघीही तिच्या जवळ गेल्या. दोघींनीही तिचा हात पकडला.

" बाबा तुम्ही जाऊन बघा ना …" मैथिली विलास रावांना म्हणाली.

विलासरावांनी होकारार्थी मान हलवली आणि ते पुढे गेले.

मैथिली आणि चैतालीने तिथेच असलेल्या बेंच वर सुमित्राला बसवलं. चैतालीने तिचे अश्रु पुसले. मैथिली तिच्यासाठी पाणी घेऊन आली.

डॉक्टर ओटी मधून बाहेर आले..

" पेशंटचे नातेवाईक आले आहेत का..? " डॉक्टरांनी विचारले .

" हो मी आहे. मी विलासराव जगताप.. त्यांचा जावई.." विलासराव म्हणाले.

डॉक्टर बाहेर आलेले पाहून सुमित्रा सुद्धा उठून विलास रावांजवळ गेली.

" आय एम सॉरी.. पण आम्ही तुमच्या सासूबाईंना वाचवू नाही शकलो.." डॉक्टर म्हणाले


" काय..? " सुमित्रा जवळ जवळ किंचाळलीच.

" आम्ही पेशंटला वाचवू नाही शकलो.." डॉक्टर पुन्हा म्हणाले..

" नाही… असं कसं होऊ शकत.. " सुमित्रा रडत म्हणाली.

मैथिली आणि चैताली पण हे ऐकून रडू लागल्या.. पण त्या दोघींना जाणीव होती की त्यांच्या पेक्षा आता सुमित्राच दुःख मोठं आहे.. त्या सुमित्रा पाशी गेल्या.. तिला शांत करू लागल्या..

" डॉक्टर माझे सासरे.. ते कसे आहेत..? कुठे आहेत..? " विलासरावांनी विचारले.

" त्यांची परिस्तिथी सुद्धा गंभीर आहे. खूप रक्तस्त्राव झाला आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत. ही अपघाताची केस असल्यामुळे पोलिस केस सुद्धा झाली आहे.. तुम्ही खाली जाऊन रिसेप्शन वर बोलून घ्या. " डॉक्टर म्हणाले.

" डॉक्टर माझे सासरे..!!" विलास राव बोलता बोलता थांबले.

" हे बघा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. " डॉक्टर म्हणाले आणि ते आत निघून गेले.

विलास राव सुमित्रा जवळ गेले.. सुमित्राच्या खांद्यावर हात ठेवून तिला ते म्हणाले." आय एम सॉरी.. मी काही करू शकलो नाही.. जे झालं ते खूप वाईट आहे. पण धीराने तोंड द्यावे लागेल… बाबांसाठी प्रार्थना करूया.."
एवढं बोलून ते खाली निघून गेले.

**********

विलासरावांनी निशा आणि रजनीशला सुद्धा बोलवून घेतले. ते सुद्धा तडकाफडकी हॉस्पिटलला निघून आले. काही तासांनंतर सुमित्राच्या आईचे पार्थिव त्यांच्या ताब्यात देण्यात आले. जड अंःकरणाने त्यांचे क्रियाकर्म आटपून सर्व पुन्हा हॉस्पिटलला आले. कोणीच काही खाल्ले नव्हते. कोणाची काही खायची ईच्छा देखील नव्हती. खूप फोर्स करून निशा मैथिली आणि चैतालीला तिच्या घरी घेऊन गेली. आणि जाताना या सर्वांना हॉस्पिटल मध्ये काही तरी खाऊन घ्या म्हणून समजावून केली.

**********

दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राचे बाबा ,'आता स्टेबल असल्याचे' डॉक्टरांनी सांगितले. पण ते अजूनही बेशुद्ध होते. त्यामुळे ते शुध्दीवर येईपर्यंत त्यांना आय सी यू मध्येच ठेवणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ते ऐकताच सुमित्राने बसल्या जागीच हात जोडून देवाचे आभार मानले. बाबांना लांबून बघण्याची परवानगी घेऊन , आय सी यू च्या काचेच्या दरवाजा मधून ती दूरवर असलेल्या तिच्या बाबांना न्याहाळू लागली. त्या दोघांमध्ये फक्त काचेचा दरवाजा आणि काही पावलांच अंतर होतं.. पण तिला आज ते खूप जास्त वाटत होतं. त्यांना तशा अवस्थेत पाहून तिचा जीव तीळ तीळ तुटत होता.. सोबतच ते शुध्दीवर आल्यावर आई बद्दल विचारणार तेव्हा त्यांना कसं सामोरं जायचं हे ही तिला सुचत नव्हतं.

रजनीशने विलासराव आणि सुमित्राला बळजबरीने घरी पाठवलं.' मी आहे .. तुम्ही फ्रेश होऊन या.. ' असे सांगून त्याने त्यांना घरी धाडलं.

**********

विलासराव आणि सुमित्रा घरी आले. घरी आल्यावर विलास रावांनी निशाच्या घरी फोन लावून मैथिली आणि चैतालीची विचारपूस केली. त्या दोघी खाऊन झोपी गेल्या होत्या. त्यांची खबरबात कळल्यावर विलासराव सुमित्रा कडे वळले. सुमित्रा हतबल होऊन सोफ्यावर बसली होती. विलास राव तिच्या जवळ गेले. तिला पाणी दिलं. विलासरावांना पाहताच ती ओक्साबोक्शी रडू लागली. विलासराव काहीही न बोलता तिच्याजवळ बसून राहिले. त्यांनाही ठाऊक होतं की ही वेळ काहीही बोलायची, समजवायची नाही आहे. तिचं मोकळं होणं देखील गरजेचं होत.

थोड्यावेळाने दोघं फ्रेश होऊन, घरातच जे फ्रिज मध्ये होतं ते खाऊन पुन्हा हॉस्पिटलला गेले. तिथे गेल्यावर त्यांनी रजनीशला घरी पाठवले.

सुमित्रा चे बाबा ४८ तास बेशुद्ध अवस्थेतच होते. ते जेव्हा शुध्दीवर आले तेव्हा त्यांनी त्यांच्या बायकोची विचारपूस केली.. डॉक्टर आणि नर्सेस ने उत्तर देणं टाळलं. ' त्यांना एवढ्यात काही सांगू नका ', हे डॉक्टरांनी सुमित्रा आणि विलास रावांना बजावलं.. शुद्धीत आल्यावर सुद्धा २४ तास त्यांना आय सी यू मध्येच ठेवण्यात आले. तिथे सुमित्रा आणि विलास रावांना केवळ दहा मिनिटं भेटण्याची परवानगी देण्यात आली. विलास रावांना आणि सुमित्रा कडे सुद्धा त्यांनी त्यांच्या बायको बद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी ही उत्तर देणं टाळलं. २४ तासांनंतर त्यांना रिकवरी रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलं..

त्यांना रिकवरी मध्ये शिफ्ट केल्यामुळे आणि ते स्टेबल असल्यामुळे सुमित्रा खुश तर होती. पण आई बद्दल त्यांना कसं सांगायचं हे तिला कळतं नव्हतं. त्यामुळे त्यांना सामोरं जायची तिची तयारी नव्हती.

**********
" जावई बापू माझी रुक्मिणी कुठे आहे..? तुम्ही सगळे मिळून काहीतरी लपवत आहात माझ्या पासून.. ती ठीक आहे ना..? " विलास राव आणि सुमित्रा, सुमित्राच्या बाबांना भेटायला गेले असता त्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारलं.

दोघांकडे काहीच उत्तरं नव्हतं..

" का बोलत नाही आहात तुम्ही.. ? मला कळतंय सर्व.. मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे.. खरं सांगा.." सुमित्राच्या बाबांनी विचारले.

" बाबा अहो आई ठीक आहेत.. त्यांना दुसरी कडे ठेवलं आहे.. तुम्ही आराम करा. त्याही आराम करत आहेत. तुम्ही काही काळजी नका करू.." विलासराव म्हणाले .

" नाही.. मला आता भेटायचं आहे तिला.. चला मला घेऊन.." सुमित्राचे बाबा म्हणाले.

" बाबा ऐका ना.. " सुमित्रा म्हणाली.

" तू लांब हो.. तू नको येऊ जवळ.. तुझी तर सावली पण पडू देणार नाही मी आता तिच्यावर.. खूप त्रास दिला आहेस तू तिला.." सुमित्राचे बाबा म्हणाले.

" बाबा तुम्हाला जास्त बोलायला नाही सांगितलं आहे डॉक्टरांनी.. प्लिज ऐका आमचं.. आपण जाऊ नंतर.. एवढा त्रागा करून नका घेऊ.." विलास राव म्हणाले.

" विलासराव खरं सांगा.. तुम्हाला शपथ आहे माझी..माझी रुक्मिणी.. गेली का..? " सुमित्राचे बाबा अगदी केविलवाणे होऊन म्हणाले.

विलास राव त्यांच्या पुढे काहीच बोलू शकले नाहीत. ते फक्त मान खाली घालून उभे राहिले..

त्यांना तसं पाहून.. सुमित्राच्या बाबांनी त्यांच्या सामोरं हात जोडले.. "मला माफ करा विलासराव..", असे ते अगदी त्रासलेल्या स्वरात म्हणाले.. बेड वरून उठण्याचा ते प्रयत्न करू लागले आणि इतक्यात ते तिथेच कोसळून पडले.

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )