सिंड्रेलाची गोष्ट - भाग २१

ही कथा परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः

दाराची बेल वाजली. दोन्ही मुली धावत दरवाजा कडे गेल्या. चैतालीने दरवाजा उघडला. समोर विलास राव मान खाली घालून उभे होते. पाठी रजनीश आणि निशा सुद्धा उभे होते. चैतालीने विलास रावांना मिठी मारली. मैथिलीच्या डोळ्यात अश्रू तरळले. मैथिलीने विलास रावांचा हात पकडला आणि त्यांना घरात आणले. पाठून रजनीश आणि निशा पण आत आले. सगळे सोफ्यावर बसले. सुमित्राच्या आईने सर्वांसाठी पाणी आणले. सुमित्रा सुद्धा तिच्या खोलीतून बाहेर आली. सर्वांच्या मनात बरंच काही सुरू होतं, पण कोणी बोलायचं , कुठून सुरुवात करायची हे कोणालाच कळतं नव्हतं. शेवटी चैतालीच विलास रावांना म्हणाली, " बाबा कुठे गेला होता तुम्ही आम्हाला सोडून..? तुम्हाला आमची जराही आठवण नाही आली का..?"

" बाबा बोला ना.. तुमचं बोलणं खूप गरजेचं आहे आमच्यासाठी.." मैथिली म्हणाली.

" तुम्ही आधी आत चला.. मला बोलायचं आहे तुमच्याशी.. आपलं बोलणं जास्त गरजेचं आहे .. " सुमित्रा विलास रावांपुढे येत म्हणाली.

" तू एक शब्द बोलू नको…" विलास राव सुमित्राला बघुन रागाने लालबुंद झाले आणि म्हणाले.

" अरे शांत बसा.. सुमित्रा वहिनी प्लिज आता शांत बसा तुम्ही.. तो काय म्हणतो आहे ते ऐकून घ्या. तुम्हालाच काय तर आम्हाला ही काही प्रश्न आहेत.. आणि मुलींसाठी आम्हाला सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं विलास कडून हवी आहेत.." रजनीश म्हणाले.

" हो भावजी.. काल आम्ही तुम्हाला काही विचारलं नाही.. तुम्ही नशेत काही बोलत होतात त्यावरून साधारण आम्हाला अंदाज आला आहे परिस्थीतीचा. पण या आधीही प्रसंग कितीही वाईट असला तरी आम्ही तुम्हाला अशा वाईट अवस्थेत पाहिले नाही.. तुमच्या मनात काय सुरु आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आम्हाला मुलींची काळजी वाटते.. पुन्हा त्या दोघींना त्रास नको.. किती सहन करावं लागतंय त्यांना .." निशा म्हणाली.

" माझं मलाच कळेनासं झालं आहे. खरंतर मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. पण जे काही काल झालं, जे काही मी ऐकलं.. जे काही मी काल समजू शकलो त्यावरून मला एवढं कळलं की गेल्या काही वर्षात माझी फक्त फसवणूक झाली आहे. त्यामुळे मला नक्की काय रिॲक्ट करावं तेच समजत नव्हतं. जे सुचलं ते केलं.. मुलींचा विचार होताच मनात .. पण या वेळी स्वतः ची झालेली अवहेलना, फसवणुकीची भावना मुलींच्या काळजी पेक्षा अधिक झाली. मला खरंच माफ करा.. मी नसताना माझ्या मुलींसाठी तुम्ही सर्व धावत आलात, त्याबद्दल आयुष्यभर मी तुमचा ऋणी राहीन. " विलास राव बोलता बोलता रडू लागले..

" विलास राव.. असे खचून नका जाऊ. आम्ही गुन्हेगार आहोत तुमचे.. आम्हीच कुठे तरी कमी पडलो म्हणून तुमची फसवणूक झाली.. आमच्या मुलीलाही अशी थेर करावीशी वाटली.." सुमित्राचे बाबा म्हणाले.

" बाबा.. थेर वैगरे मला माहित नाही.. पण माझ्या घरात ती माझ्या मुलींशी जे वागत होती त्याने मी जास्त दुखावलेला आहे. मलाच कळलं नाही.. मीच माझ्या मुलींना आधार देण्यात कमी पडलो. आता हेच बघा ना, तुम्ही सुमित्राचे आई बाबा असताना माझ्या मुलींसाठी इथे आलात. माझ्या मुलींची बाजू तुम्हाला कळते, तुम्ही ती मांडतय. हे निशा आणि रजनीश.. मधे मैथिली अस्वस्थ होती तेव्हा यांनी तिला आधार दिला.. यांनी समजून घेतल तिला.. आणि मी.. तिचा बाबा असूनही .. एका घरात आम्ही राहत असून ही त्यावेळी मी तिला गुन्हेगार मानत होतो.. तिची बाजून ऐकून घ्यायचं प्रयत्न देखील नाही केला…मेल्यावर काय तोंड दाखवणार मी ह्यांच्या आईला, माझ्या आईला.." विलासराव म्हणाले.

" मरायच्या गोष्टी काय करत आहात. अशी पण वेळ कुठे निघून गेली आहे. मधल्या वेळेत जे झालं ते झालं.. पण अजूनही गोष्टी तुमच्या हातात आहेत. तुम्ही सावरू शकता सर्व. जे झालं ते विसरून जा.. अगदी कालची रात्र सुद्धा. विसरता येत नसले तर बाजूला ठेवा.. पण आता स्वतःला आणि घराला सावरा. " निशा म्हणाली.

" सर्वांचं ऐकून घेतलं तुम्ही.. माझं सुद्धा ऐका ना.. मी चुकले नाही आहे. मी काहीच चुकीचं केलं नाही.. मी तर.. " सुमित्रा बोलत होती तिला मध्ये विलासरावांनी अडवले , आणि ते म्हणाले.." सुमित्रा प्लिज तू आता काहीही बोलू नकोस.. आपण बोलू नंतर.."

" आम्ही सुद्धा निघतो आता.. काही मदत लागली तर फोन करा आम्हाला.. " रजनीश म्हणाले.

" अहो थांबा .. चहा तरी घेऊन जा.." सुमित्राची आई म्हणाली.

" आता नको.. नंतर येऊ आम्ही.." निशा म्हणाली.

आणि दोघं ही सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले.

" विलासराव आता आम्ही सुद्धा निघतो.. तुमची इच्छा असेल आणि परवानगी असेल तर आम्ही सुमित्राला इथून घेऊन जातो.." सुमित्राचे बाबा म्हणाले.

" नाही.. मी कुठे ही जाणार नाही. माझं घर आहे. ज्यांना त्रास होत असेल त्यांनी जावं.. मी नाही जाणार. " असे म्हणून सुमित्रा तिच्या खोलीत निघून गेली.

" आई बाबा.. तुम्ही काही काळजी नका करू.. मी घेईन सांभाळून.. काल जे झालं ते पुन्हा नाही होणार.." विलासराव म्हणाले.

" ठीक आहे.. जसं तुम्ही म्हणाल. पण काहीही झालं तरी तडकाफडकी निर्णय घेऊ नका.. मुलींचा विचार करा. " सुमित्राची आई म्हणाली.

सर्वांचा निरोप घेऊन ते सुद्धा निघाले. निघताना दोघी मुलींनी त्यांना घट्ट मिठी मारली. त्या दोघांनाही भरून आलं. 'काहीही झालं तरी आजी आजोबा तुमच्या सोबत आहेत', हे आश्वासन देऊन ते दोघं निघाले.

" मुलींनो आता काही काळजी करू नका.. मी आहे.. पण प्लिज माझ्या पासून काही लपवू नका.. मला सांगा..काल जे झालं, या आधी तुम्हाला जे काही सोसावं लागलं, त्यासाठी मी मनापासून कान पकडून तुमची माफी मागतो. या पुढे असे होणार नाही. मला माफ करा.. मला माफ करा.." विलास राव म्हणाले.

" बाबा पुरे झालं आता…" मैथिली विलास रावांचा हात पकडून म्हणाली.

" चला आता खेळायला जा.. किंवा तुम्हाला जे हवं ते करा.. अशा उदास होऊन घरात बसू नका.. " विलास राव म्हणाले.

" हो.. आम्ही आमच्या खोलीत जातो.. आमचा होमवर्क पण बाकी आहे. " मैथिली म्हणाली. आणि चैतालीला घेऊन निघाली.

**********

विलास राव बराच वेळ हॉल मध्येच बसले होते.. सुमित्राच तोंड बघायची पण त्यांची ईच्छा नव्हती. आता या सर्वावर घटस्फोट हाच एक उपाय आहे हे त्यांच्या मनात सुरू होतं. काहीतरी मनात ठरवून ते जागे वरून उठले आणि खोलीत गेले. खोलीत जाताच सुमित्राने त्यांना मिठी मारली.. खूप वेगळ्याच पद्धतीने ती तिचे हात त्यांच्या शरीरावरून फिरू लागले. सुमित्राच असं वागणं त्यांना अपेक्षित नव्हतं. ते गडबडले आणि तिला झिडकारले.. स्वतः पासून वेगळे केले..

" का.. काय झालं.. याचं मिठीत तुम्हाला आवडायचं.. माझा स्पर्श तुम्हा हवाहवासा वाटायचा.. आणि आता.." सुमित्रा बोलत होती..

" तू वेडी आहेस का ग… काय सुरू आहे घरात.. तू काय करून ठेवलं आहेस.. मुळात हे जे काही घडतंय त्याची जबाबदार तूच आहेस.. तरी.. शी.. किळस येते मला तुझी." विलासराव म्हणाले.

" मी सांगितलं तुम्हाला मी चुकले नाही आहे. माझा भुतकाळ जरी वाईट असला तरी त्याचा माझ्या भविष्याशी काही संबंध नाही. " सुमित्रा म्हणाली.

" खरंच..? भुतकाळ बाजूला ठेवू.. माझ्या मुलींशी जे वागलीस त्याचं काय..? " विलासरावांनी विचारले.

" मी काहीच चुकीचं केलं नाही .. त्यांची लायकी तिचं आहे.." सुमित्रा म्हणाली.

" सुमित्रा.. " असे म्हणत विलास रावांनी सुमित्रा वर हात उगारला. ते तिच्या कानशिलात लावणार इतक्यात फोन वाजू लागला.. दोघंही थबकले.. विलास राव बाहेर आले आणि त्यांनी फोन घेतला.

" हॅलो.. " विलासराव म्हणाले.

" हॅलो.. मी डॉक्टर परांजपे बोलते आहे.. विलासराव आहेत का..?" समोरची व्यकी म्हणाली.

" हो.. मी बोलतोय.. बोला ना डॉक्टर .." विलास राव म्हणाले.

" नमस्कार.. सुमित्रा कशा आहेत..? " डॉक्टरांनी विचारले.

" ती ठीक आहे डॉक्टर.. का काही झालं आहे का..? " विलासरावांनी विचारले.

" त्यांच्या काही टेस्ट केल्या होत्या.. रूटीन ब्लड टेस्ट, काही स्कॅन.. त्याबद्दलच बोलायचं होतं.. तुम्ही त्यांना घेऊन क्लिनिकला या.. तिथेच नीट बोलता येईल.. " डॉक्टर म्हणाल्या.

" डॉक्टर काही घाबरण्यासारख…? तिच्या जीवाला..??" विलास राव बोलता बोलता थांबले..

" नाही नाही.. तसं काही नाही.. पण महत्वाचं आहे.. म्हणूनच भेटून बोलू.. " डॉक्टर म्हणाल्या.

" ठीक आहे.. आजची अपॉइंटमेंट मिळेल का..? " विलासरावांनी विचारले.

" हो चालेल. संध्याकाळी ६ ला या.." डॉक्टर म्हणाल्या आणि त्यांनी फोन ठेवला.

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.🎭 Series Post

View all