सिंड्रेलाची गोष्ट - भाग २०

ही कथा परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः

मैथिलीने फोन ठेवला. आणि रजनीश काका काय म्हणाले ते सर्वांना सांगितलं.. हे ऐकताच चैताली म्हणाली.. " दिदा प्लिज आपण जाऊ ना त्यांच्या घरी. बाबांना आताच घेऊन येऊ. किंवा आपण तिथे राहू आज बाबांसोबत.. "

" चैताली प्लिज नको.. काका म्हणताहेत ते ऐकुया आपण .. आज रात्रीचा फक्त प्रश्न आहे. बाबा बरे आहेत आणि सुरक्षित ठिकाणी आहेत हे पुरेस आहे या क्षणी. त्यांची मनस्थिती ठीक नाही आहे. त्यांना गरज आहे त्यांच्या मित्रांची . त्यांना आज तिथेच राहू दे. आणि काका म्हणाले उद्या येत आहेत ना ते सर्व… आपण ऐकुया. मी रिक्वेस्ट करते .." मैथिली म्हणाली.

" ह्मममममम.. बरोबर आहे.. " चैताली थोड नाराज होऊन म्हणाली.

" आजी आजोबा.. प्लिज आज थांबा इथेच. आम्हाला तुमची गरज आहे. " मैथिली आजी आजोबा म्हणजेच सुमित्राच्या आई बाबांना म्हणाली.

" बाळा आता नको. उद्या येतो आम्ही सकाळी. आम्हाला इथे नाही थांबता येणार." आजी म्हणाली.

" जाऊ देत त्यांना. मी आहे इथेच. काही गरज नाही त्यांनी थांबवायची." सुमित्रा म्हणाली.

" हे घर जितकं तुझं आहे ना तितकच आमचं सुध्दा आहे. आम्हाला ते हवे आहेत इथे . " मैथिली म्हणाली.

" आणि हो तुला काही प्रोब्लेम असेल तर तू जाऊ शकते इथून." चैताली मध्येच बोलली.

" चैताली.. नको ना.. " मैथिली वैतागून म्हणाली.

" तुला मी बघतेच.. तुझ्या आईने वेळीच तुला शिस्त लावली असती ना तर ही अशी चुरूचुरू मोठ्या माणसांना उलट बोलली नसतीस.." सुमित्रा दात ओठ खात म्हणाली.

" शिस्त लावायलाच तुला या घरात आणलं होत विलास रावांनी. प्रेम द्यायला आणलं होतं तुला.. मुलींचा सांभाळ करायला आणलं होतं त्यांनी तुला. राहिला प्रश्न चैतालीला शिस्त लावायचा तर तिला तिच्या आईचा चेहरा सुद्धा आठवत नसेल ग…. तू जर तिला प्रेम दिलं असतं तर आज ती तुलाच तिची खरी आई समजत असती. पण नाही.. तुला ते करताच आलं नाही. आणि मुळात तुला या सर्व गोष्टींवर बोलण्याचा काहीच अधिकार नाही . तिच्या आईचा उध्दार करण्याआधी तू स्वतः तुझ्या आई वडिलांचे वाभाडे काढले आहेस ते बघ.. " सुमित्राचे बाबा म्हणाले.

" तुम्हाला का कळतं नाही. का तुम्हाला या मुलींचा एवढा पुळका येतो. आज पण जे सर्व झालं आहे ते या दोघीं मुळेच झालं आहे. आणि मी काहीही चुकीचं केलं नाही.." सुमित्रा म्हणाली.

" जाऊ देत हो.. हिच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही.. झोपलेल्या व्यक्तीला झोपेतून उठवता येतं पण ज्याने झोपेचं सोंग घेतलं आहे त्या व्यक्तीला कसं उठवणार आपण.." आई बाबांना उद्देशून म्हणाली.

" आजी आजोबा.. मी रिक्वेस्ट करते.. हात जोडते.. आजची रात्र तरी सुमित्रा आई सोबत आम्हा दोघींना घरात राहता नाही येणार.. आम्हाला तुमचा आधार वाटतो. मला माहित आहे इथे तुमचा खूप अपमान झाला आहे .. पण प्लिज आमच्या साठी आजची रात्र इथे राहाल का..? " मैथिलीने हात जोडून सुमित्राच्या आई बाबांना विचारले.

" बाळा असं नको करू.. आम्ही थांबतो. आता चर्चा, विचार विनिमय पुरे झाले. " सुमित्राचे बाबा म्हणाले. आणि त्यांनी सुमित्राच्या आईला डोळ्यांनी शांत राहायचा आणि त्यांचं म्हणणं ऐकण्याचा इशारा केला.

हे पाहून सुमित्रा रागाने तिच्या खोलीत निघून गेली.

" हो.. थांबुया.. चला मी पटकन काही तरी खायला करते तुम्हा सगळ्यांसाठी.." सुमित्राची आई साडीचा पदर खोचून म्हणाली.

" मी पण तुला मदत करतो. मुलींनो चला तुम्ही फ्रेश व्हा. रडून रडून काय अवस्था केली आहे बघा तुम्ही स्वतः ची .. " सुमित्राचे बाबा म्हणाले.

" हो.. आम्ही येतो फ्रेश होऊन.. चल चैताली.."असे बोलून मैथिली चैतालीला घेऊन खोलीत गेली.

**********

खोलीत गेल्यावर मैथिली कपाटाच्या दिशेने गेली.. " चैताली मी कपडे काढून ठेवते तुझे. कपडे पण बदल. छान फ्रेश होऊन ये तू. एक काम कर हवं तर अंघोळच कर. तू आलीस की मी जाते.." मैथिली बडबड करत होती… चैतालीने मागून येऊन तिला मीठी मारली.. काही क्षण दोघी पण तशाच थांबल्या.. चैतालीला रडू येतच होत मैथिलीच्या डोळ्यातून अश्रू घरांगळू लागले. मुसुमुसू रडणाऱ्या दोघी ही आता हुंदके देत एकमेकींना मिठी मारून मोठं मोठ्याने रडू लागल्या..

**********

सुमित्राचे आई बाबा दोघं मिळून मुलींसाठी जेवण बनवत होते.. दोघांच्याही मनात बरंच काही सुरू होतं. पण दोघंही एकमेकांशी काहीच बोलत नव्हते. झालेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टी साठी ते मनोमन स्वतः ला दोषी मानत होते.

*********

इथे सुमित्रा खोलीत एका कोपऱ्यात बसून रडत होती. 'मी काहीच केलं नाही.. मी चुकीची नाही आहे. मी दोषी नाही आहे. प्रत्येक सुखावर माझा पण अधिकार आहे. मी का दुःख सहन करायचे,' असे काही तरी स्वतः शीच बडबडत होती. जे काही झालं किंवा घडत होतं त्यात दुसऱ्यांचा दोष आहे असंच काहीस झालं होतं तिचं.

**********

मुलींना खाऊ पिऊ घालून सुमित्राच्या आई ने त्या दोघींना झोपवलं होतं. दोघी पण लगेचच झोपल्या. दिवसभर जे झालं होतं त्यामुळे खूप थकल्या होत्या. सुमित्राला सुद्धा जेवणासाठी बोलावलं पण तिने नकार दिला. आईने सुद्धा तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही.

रजनीशचा विचारपूस करायला फोन आला. मुली जेवून झोपल्या आहेत हे ऐकून ते सुद्धा थोडे रिलॅक्स झाले.

" तुम्हा दोघांचे खूप आभार बाबा.. तुम्ही तिथे नसता मुलींसोबत तर परिस्थिती बिकट झाली असती. " रजनीश फोन वर सुमित्राच्या बाबांना म्हणाले.

" अहो.. आभार काय. खरं तर आम्हीच गुन्हेगार आहोत या मुलींचे.. काय करू कळतं नाही. मुलींची पण कमाल आहे.. आमचं काहीही रक्ताच नातं नसतानाही आमच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. या कठीण प्रसंगी आम्हाला बोलवून घेतलं. आम्हाला इथे थांबायची विनंती केली. आमची मुलगी आमचा अपमान करत होती आणि या दोघी त्याबद्दल दिलगीर होत्या.. त्यांचं वय आणि त्यांची समज .. खरंच काय बोलू मी.. आम्ही कुठे पाप केलं म्हणून आमच्या पोटी ही अशी पोरं आली, असं म्हणून त्रागा करू की कुठलं पुण्य केलं की या दोन गोड मुली नाती म्हणून मिळाल्या.. काही कळतं नाही. या उतार वयात अजून काय काय पाहावं लागणार आहे काय माहित. तुम्ही आभार नका मानू .. आम्ही फक्त आमच्या कडून अनवधानाने झालेल्या चुकांचे प्रयच्छित करतो आहे. " सुमित्राचे बाबा म्हणाले.

" बाबा .. तुम्ही नका विचार करू इतका.. खरंतर तुमची काहीच चूक नाही आहे यात.. खरंतर हा तुमच्या मनाचा मोठे पणा आहे, तुमच्या मुलीची बाजू घ्यायची सोडून तुम्ही मैथिली आणि चैतालीचा विचार करतं आहात. मुली ठीक आहेत ना.. बस अजून काय हवं.. " रजनीश म्हणाले.

" मुली ठीक आहेत.. विलास राव बरे आहेत ना..?" बाबांनी विचारले.

" खूप डिस्टर्ब आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदा मी असं पाहिलं आहे त्याला.. उद्या भेटल्यावर बघालच तुम्ही. आपल्याला खूप सांभाळून घ्यावं लागणार आहे. विषय नाजूक आहे. मुली कितीही समजूतदार असल्या तरी त्यांच्यासाठी त्यांच्या या वयात हे सर्व जरा जास्तच आहे. उद्या भेटू.. " रजनीश म्हणाले.

" हो .. चालेल.. ठेवतो फोन.. " बाबा म्हणाले आणि दोघांनी फोन ठेवला..

**********

दुसरा दिवस उजाडला. मैथिली आणि चैताली लवकरच उठल्या आणि तयार होऊन बसल्या.. बाबांची आतुरतेने वाट पाहत बसल्या होत्या.

' कुठल्याही परिस्थीत बाबा घरात यावे, घरात पूर्वी सारखं आनंद परत यावा आणि सुमित्रा आई पुन्हा इथे राहू नये ',असे चैतालीला मनोमन वाटत होते.

तर' सर्व काही नीट व्हावं. सुमित्रा आईने आत तरी स्वतःला बदलाव, घरात आनंद, सुख , समाधान परत यावं ', अशी मैथिलीची ईच्छा होती..

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

🎭 Series Post

View all