सिंड्रेलाची गोष्ट - भाग १

ही गोष्ट आहे परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची.
साल - २००८

**********

समोरून एक राजबिंडा, पिळदार शरीरयष्टी असलेला, चेहऱ्यावर तेज असलेला तरुण, अर्थातच राजकुमार तिच्या जवळ येऊन गुढघ्यावर बसून तिला म्हणाला, 
" माझ्यासोबत येशील का? "

ती बावरली.. गांगरली.. 

इतक्यातच घड्याळात बाराचे टोले पडले. तिच्या लक्षात आले आता परीची जादू संपणार. मला जाव लागेल. ती त्या राजकुमाराच्या प्रश्नाचे उत्तर न देताच त्याच्या पासून दूर जाऊ लागली...

आणि.... आणि ७ वाजताचा अलार्म झाला आणि मैथिली वैतागत उठली. 

कोणी राजकुमार नव्हता ना कोणी परी. नेहमीप्रमाणे मैथिलीला स्वप्न पडले होते. त्या राजकुमाराचा विचार करत ती अंथरुणात लोळत पडली होती. स्वतः वरच हसत होती ती. लहानपणापासूनच सिंड्रेलाची गोष्ट तिला खूप आवडायची. ती नेहमी सिंड्रेलाच्या जागी स्वतः ला बघायची. 

नुकतीच १७ वर्षांची झाली होती. वयात आलेल्या प्रत्येक मुलीप्रमाणे ती पण गोड गुलाबी स्वप्नात हरवून जायची. एखाद्या प्रांताची राजकुमारीच वाटेल अशीच होती मैथिली. रेशमी मुलायम पिंगट केस, गोरीपान काया, पाणीदार भूरके डोळे फार बोलके वाटायचे. त्यात ती काजळ लाऊन त्यांची शोभा अजुन वाढवायची. गुलाबी ओठ कोणाच्याही ह्दयाचा ठाव घ्यायचे. 

ती अंथरुणात अशीच लोळत पडली होती. का सकाळ झाली...? का स्वप्न अर्धवट राहील...? पुन्हा झोपून पाहू का...? पुन्हा येईल का तो राजकुमार...? असे काहीसे प्रश्न तिच्या मनात रेंगाळत होते... इतक्यात तिच्या खोलीचा दरवाजा वाजला..

" कोण आहे..? " मैथिलीने विचारले.

" मी आहे ...उठा आता.. सकाळ झाली.. कॉलेजला जायचं आहे ना आज.. विसरलीस वाटत.." बाहेरून आवाज आला..

" अरे हो... विसरलेच.. सध्या कोचिंग क्लासेसचा एवढा अभ्यास सुरू आहे की लक्षातच नाही राहील." मैथिली स्वतःशीच पुटपुटत उठली.. आणि तिने दरवाजा उघडला. 

आई उभी होती दारात. दरवाजा उघडताच आई आत आली. तिच्या हातात कपड्यांनी भरलेली बादली होती.

" आवरा आता लवकर... सर्व आयत करून ठेवलं आहे .. गिळा आणि निघा.. मी आहे इथे राबायला.." आई म्हणाली.

" झाली माझ्या सकाळची शुभ सुरुवात.." मैथिली तोंडातल्या तोंडात पुटपुटली..

" तुझे हे पुटपुटन कळत हा मला.." आई म्हणाली.

"कळत ना... मग का ग रोज तू हे असच करते.. सकाळी सकाळी तुझा मूड का खराब असतो रोज...?" मैथिली म्हणाली.

" रोज असतो का...? आजच वैतागले मी..." आई म्हणाली.

"बरं बाई ... तू म्हणशील तसं.. आज खराब आहे .. काय झालं आज अस वेगळं..?" मैथिलीने विचारेल.

" बाई आली नाही आहे आज.. सर्व मलाच आवरायचं आहे.." आई म्हणाली.. 

" अरे बापरे... अस झालं आहे का... मी काय मदत करू ते सांग. कॉलेजला निघायच्या आधी जे जे करता येईल ते करून देते.." मैथिली म्हणाली.

" नको गं बाई... तू नको काही करू.. तुला कॉलेजला जायच्या आधी काम लावलं तर तुझ्या बाबांना वाटेल मी तुला छळते.. शेजारचेपण लगेच बोलतील.." आई म्हणाली..

"आई एका छोट्याश्या गोष्टी बद्दल बाबा का काही बोलतील... आणि यात शेजारचे कुठून आले गं.. का नेहमी छोट्या गोष्टी एवढ्या मोठ्या करतेस..? " मैथिली म्हणाली..

" हो गं ... बरोबर म्हणालीस तू.. मीच नेहमी अती करते.. सावत्र आहे ना... त्यात मला कुठे मुलं झालं.. मी तर वांझोटी... मला कसं कळणार मुलांशी कसं वागायचं... मी नेहमीच छोट्या गोष्टी वाढवते.. तुला त्रास देते.. सर्वांना त्रास देते.." आई एकटी बडबडत बसली होती..

" आई प्लिज पुरे आता... तुला योग्य वाटतं ते कर.. मी आवरते आणि निघते.. " मैथिली वैतागून म्हणाली.

" आता तू एवढं म्हणतेस आहेस तर पटकन हे कपडे वाळत घालून घे ना... आणि कचरापण काढून घेतला तर चालेल मला.." आई म्हणाली.

" ओक.. करते मी.. आधीच नीट सांगितलं असतं तर कपडे वाळत घालून झाले सुद्धा असते... जाऊ दे... मला पटकन आवरू दे आता.. " मैथिली थोड वैतागून म्हणाली..

" म्हणजे बघ हा... तुला जमत असेल तर कर.. नाही तर उशीर होत असेल तर राहू दे.. परत हे..." आई बोलत होती.. इतक्यात मैथिलीने तिला मध्येच अडवले..

" आई प्लिज ... परत नको.. तू जा.. मी कपडे वाळत घालून येते.." मैथिली आईला म्हणाली..

आई मैथिलीच्या खोलीतून निघाली. मैथिलीने घड्याळाकडे पाहिले .. घड्याळात आठ वाजले होते. नऊ पर्यंत तिला काहीही करून घरातून निघावे लागणार होते.आधीच तिच्या लोळत बसण्यामुळे तिला उठायला उशीर झाला होता. आणि आता कपडे वाळत घालण, केर काढण .. आणि अजून तिला निघण्यापूर्वी काय काय करावं लागणार होत हे तिलाच ठाउक नव्हत..

**********
तर अश्या ह्या मैथिलीची गोष्ट आहे ही. मैथिली आणि तिच्या आई मधलं हे संभाषण तर आपण पाहिलं.. पण त्यांचं नातं नक्की कसं आहे हे जाणून घेण्यासाठी जरा भूतकाळात डोकाऊया...

मैथिली लहान होती तेव्हा तिच्या आईला देवाज्ञा झाली. मैथिली आणि चैताली अशा दोन लेकींना विलास रावांच्या म्हणजेच मैथिलीच्या बाबांच्या कुशीत सोडून त्यांची आई देवाघरी गेली. मैथिली मोठी, तर चैताली लहान. आई गेली तेव्हा मैथिली सात वर्षांची होती तर चैताली एक वर्षाची. विलास रावांनी दुसर लग्न करावं अशी घरातल्या सर्वांचीच इच्छा होती. पण विलास राव काही या गोष्टीसाठी तयार नव्हते. 

दोन वर्ष निघून गेल्यावर त्यांना जाणीव झाली घराला एका स्त्रीची गरज आहे तर मुलींना समजून घ्यायला आईची. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी तो अपूर्णच होता. पण घरात त्यांची बायको म्हणून येणारी मुलींची आई होऊ शकेल का...? या सर्व गोष्टींचा मुलींवर विपरीत परिणाम झाला तर..? असेही प्रश्न त्यांच्या मनात होते. 

शेवटी छोट्या मैथिलीला तिच्या आजीने समजावलं.." बाळा आता तूच तुझ्या बाबांशी बोल.. त्यांना समजावं की त्यांनी दुसरं लग्न करणं गरजेचं आहे..तुम्ही दोघी मुली.. एकदा वय झालं की आपापल्या संसारात रमणार. पण तुमचे बाबा एकटेच राहणार..त्यांना नको का आधार कोणाचा. आणि त्यांनी दुसरं लग्न केलच तर तुम्हालाही आई मिळेच ना.. काही गोष्टी मार्गी लागतील.. बाळा तूच आता बाबांशी बोल.."

हे सर्व समजायला मैथिली खूप लहान होती. आजी तिला काय सांगते आहे हे काहीच तिला नीटसं कळत नव्हतं. पण आपल्यामुळे आपल्या बाबांना काही त्रास व्हायला नको हे एवढं तिला माहीत होत.. शेवटी नऊ वर्षांची मैथिली बाबांसमोर त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेली..
रडत रडत बाबांना म्हणाली," बाबा तुम्ही दुसरं लग्न करा ना.. आम्हाला आई हवी आहे.." 

मैथिलीच्या तोंडून हे असं ऐकून आणि तिला रडताना पाहून विलासराव पण भाऊक झाले.. खरंच मुलींना आईची गरज आहे.. आपल्याला योग्य मार्ग काढला पाहिजे याची त्यांना जाणीव झाली. विलास रावांनी \" मी लग्नासाठी तयार आहे \", असे त्यांच्या आईला कळवले.. बस मग .. वधू शोधण्याची मोहीम सुरू झाली. या सर्व प्रक्रियेत वर्ष गेलं.. कारण स्थळं अनेक येत होती. पण विलास राव बायको नाही तर आपल्या मुलींसाठी आई शोधायला निघाले होते. अशातच सुमित्रा बद्दल एका ओळखीच्या गृहस्थ कडून कळले. 

सुमित्रा... लग्नाचं वय तर कधीच निघून गेलेले.. दिसायलाही सर्व साधारण. तिच्या घराची परिस्थिती अगदी बेताची. एका वेळच्या जेवणाची ही आबाळ होती. सुमित्राच शिक्षण अगदी जेमतेम. घरकाम करून आई बाबांचा सांभाळ करत होती. आई बाबांची एकटीच लेक उरली होती . एक मोठा भाऊ होता पण तो दारूच्या इतका आहारी गेला की त्या दारूनेच त्याचा घात केला. आता उरले होते ते फक्त सुमित्रा आणि तिचे म्हातारे आई बाबा. जिथे एक वेळच जेवणं मिळत नाही तिथे तिच्या लग्नाचा विचार तरी ते कसे करणार... सुमित्राला खूप वेळा शेजारी पाजारी, आप्तेष्ट यांनी , \"कोणाचा तरी हात धरून पळून जा \", असे ही सांगितले.. पण ती ठाम होती. \" माझे जे काही होईल ते इथेच होईल. नशिबात असेल तर होईल लग्न नाहीतर आजिवन आई बाबांची सेवा करेन पण असा मार्ग नाही निवडणार \". 

सुमित्राची चौकशी केल्यानंतर विलास रावांना तिच्या बद्दलच्या या गोष्टी कळल्या. विलास रावांना हेच नेमकं आवडलं. जी मुलगी स्वतःच्या आई बाबांना निस्वार्थी वृत्तीने सांभाळते ती आपल घर ही सांभाळेल. मुलींना माया देईल. गरीब परिस्थितीतून आली आहे तर पैशांची , वस्तूंची जाणीव असेल. सुमित्रा हीच योग्य व्यक्ती वाटली त्यांना त्यांच्या मुलींचा सांभाळ करण्यासाठी. अगदी साध्या पद्धतीने सुमित्रा आणि विलास रावांच लग्न झालं.आणि घरात आली मैथिली आणि चैतालीची दुसरी आई... 


क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

🎭 Series Post

View all