सिंड्रेलाची गोष्ट - भाग १९

ही कथा परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः

सुमित्राला दारात पाहताच मैथिली आणि चैताली दोघीही दरवाजाच्या दिशेने धावतच गेल्या. दोघींनी बाहेर डोकावून पाहिले. पण त्यांना विलासराव कुठेच दिसले नाही. मैथिली सुमित्रा कडे वळली आणि तिने विचारले, " बाबा कुठे आहेत? काय झालं ? तू एकटीच कशी? "

सुमित्रा काहीच बोलली नाही..

"सांग ना बाबा कुठे आहेत..?" चैताली वैतागून म्हणाली.

तरीही सुमित्रा काहीच बोलली नाही. ती तशीच किचनच्या दिशेने निघाली. तिच्या पाठोपाठ तिचे आई बाबा, मैथिली आणि चैताली निघाल्या.." सुमित्रा अगं काही तरी बोल.. विलास राव कुठे आहेत…?" सुमित्राच्या बाबांनी विचारले.

सुमित्राने तरीही उत्तर नाही दिले. तिने फ्रिज मधून पाण्याची बॉटल काढली आणि ती पाणी पिऊ लागली. सुमित्राच वागणं बघुन सुमित्राची आई भलतीच चिडली. न राहून तिने सुमित्राच्या कानशिलात लगावली. कोणालाच हे अपेक्षित नव्हतं. सुमित्रा डोळे विस्फारून आई कडे बघू लागली. काही क्षणांसाठी तर सुमित्राचा कानच बंद झाला होता. पाण्याची बॉटल दुसरी कडे जाऊन पडली आणि फुटली होती. किचन मध्ये आणि सुमित्राच्या कपड्यांवर पाणी पडले होते. "बोल आता.. नाही तर अजून मारेन.. खरंतर हे आधीच करायला हवं होत. "आई म्हणाली.

" तुला कोणी बोलावलं इथे.. इथे परत पाऊल ठेवणार नाही असं मोठ्या तोऱ्यात बोलून गेली होतीस ना.. मग का आलीस परत.." सुमित्रा आईला म्हणाली.

" काय बोलतेस सुमित्रा.. आईशी असं बोलतेस. अग लाज नाही वाटत का..? प्रसंग काय आहे.. तुझं काय सुरू आहे… आम्ही काय विचारतोय त्याचं उत्तर दे आधी.." बाबा म्हणाले.

" तुम्ही कोण विचारणारे.. !! हे माझं घर आहे.. आणि हा आमचा घरगुती प्रश्न आहे.. तुम्ही यात काही बोलायचं नाही.. तुम्हाला तो अधिकारच नाहीये.. " सुमित्रा म्हणाली.

" ही ना अशी नाही ऐकणार.. " असे म्हणत आई पुन्हा सुमित्राच्या अंगावर धावून जाणार तोच बाबांनी तिला अडवले..

" थांब.. कृपया हे सर्व असं नको वागुया आपण.. लहान मुलं आहेत.. त्यांच्यावर या गोष्टीचा काय परिणाम होतोय त्याचा तरी विचार करा.. आणि सुमित्रा बाकी सगळं सोड .. पण अग मुलींना तरी सांग त्याचा बाप कुठे आहे ते.. काय झालं तुमच्यात खाली गेल्यावर.. प्लिज बोल आता तरी.." बाबा म्हणाले.

सुमित्रा तरीही काहीच बोलली नाही..

" पुरे झालं आता.. आजी आजोबा आपण पोलिसात तक्रार करूया.. " मैथिली म्हणाली.

" हो अगदी बरोबर आहे.. झालेला सर्व प्रकार सांगू.. हिला पोलिस आत टाकतील ना तेव्हा डोकं ठिकाणावर येईल.." आई म्हणाली.

" पोलिस मला का काही करतील.. मी तर काहीच केलं नाही.." सुमित्रा म्हणाली.

" तूच जबाबदार आहेस या सर्वांसाठी.. आणि आता तू काही सांगत देखील नाही आहेस. नक्कीच पोलिस तुला अद्दल घडवतील. तुला गरज आहे त्याची.. चला आपण पोलिसात तक्रार करूयाच.. " बाबा म्हणाले.

" थांबा.. काही झालं नाही.. ते माझ्याशी काहीच बोलले नाहीत. खूप गयावया केली मी.. पण ते काही ऐकले नाहीत. ते गाडी घेऊन गेले कुठे तरी. जाताना हे ही बोलून गेले की ,' घाबरु नकोस मी काही स्वतः च बरं वाईट करून घेणार नाही.. मला माझ्या मुलींची चिंता आहे. ' एवढं बोलून ते गेले निघून.." सुमित्रा म्हणाली.

" मग तू कुठे होतीस.. ? आम्ही आलो तेव्हा तू खाली दिसली नाहीस.. " बाबांनी विचारले.

" मी नव्हते इथे.. " सुमित्रा म्हणाली.

" तेच विचारतोय आम्ही कुठे गेली होतीस तू..? " आईने विचारले.

" मी राहुलला भेटायला गेले होते. " सुमित्रा म्हणाली.

" काय करू तुझं.. या वेळी सुद्धा तुला हे सुचतंय.. अगं काय आहे तुझ्या मनात.. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग .. " आई म्हणाली.

" तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये. मी त्या राहुलला आता शेवटची ताकीद द्यायला गेले होते. " सुमित्रा म्हणाली.

" तुझा काहीच भरवसा नाही.. तुझ्यावर आमचा विश्वास सुद्धा राहिला नाही.. तू कधी काय करशील.. काय कारस्थान रचशिल त्याचा काही नेम नाही.." आई म्हणाली.

" मी काही कारस्थान रचले नाही आहे.. मी खरं बोलतेय.. ह्या.. ह्या.. दोघींनी वाट लावली सर्व गोष्टींची.. मी सांभाळून घेतलं असतं.. वेळ आली की सांगितलं असतं सर्व.. पण या दोघींना मध्ये पडायचं होत.. सर्व गोष्टींची वाट लावली.. जर आज यांचं काही झालं ना तर त्याला सुद्धा या दोघीच जबाबदार असतील.. मी काहीच चूकच केलं नाहीये.. " सुमित्रा बोलत होती.

" बस झालं सुमित्रा .. आता पुरे कर.. नाहीतर मीच मुस्काटात लावेन तुझ्या.. तुझ्या आईला अडवल मी.. पण मलाच आता माझा संयम सुटेल अस वाटतंय. तू अशी नव्हतीस कधीच.. काय झालं आहे तुला.. आमची लेक जिने आमची इतकी काळजी घेतली ती अशी वागू शकते ह्या विश्वास बसत नाहीये.. का वागते आहेस तू हे असं.. भानावर ये.. नाहीतर खूप उशीर होईल.. " बाबा म्हणाले.

" मी काहीच चुकीचं केलं नाहीये बाबा.. किती वेळा सांगू.. " सुमित्रा म्हणाली.

" चूक बरोबर करायची वेळ नाहीये आता.. विलास रावांना शोधायला गेलं पाहिजे.. ते किती ही बोलले असले.. ते कितीही खमके असले तरी माणूसच आहेत ना.. ते आता कुठल्या मनस्थितीत असतील याचा आपण फक्त अंदाज बांधू शकतो.. ते काय करतील याची आपल्याला काहीच कल्पना नाहीये.. मला वाटतं आपण पोलिसात जाऊया.." आई म्हणाली.

" हो.. मला पण तेच वाटतंय.. आता बाबांना शोधणं गरजेचं आहे.. " मैथिली म्हणाली.

" नाही.. नको.. पोलिस मला पकडतील.. मला दोषी ठरवतील.. नको.. " सुमित्रा म्हणाली.

" ही बघ आता पण स्वतः चा विचार करते.. दीदा ही कधीच आपली आई होऊ नाही शकत.. आपलीच काय तर ही कोणाचीच आई होऊ नाही शकत. तू नेहमी हिच्या बाजूने खूप विचार केलास ना.. बघ हिने काय करून ठेवलं आहे.. आपण जाऊयाच पोलिसात.." चैताली म्हणाली.

एकमेकांशी थोडा विचार विनिमय करून सुमित्राचे आई , बाबा, मैथिली आणि चैताली पोलिस स्टेशनला जायला निघाले.

इतक्यात घरातला फोन वाजू लागला. सगळेच त्या दिशेने वळले. मैथिली फोन जवळ गेली. पण काही वाईट बातमी असली तर.. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिचा हात फोनच्या रिसिव्हर पर्यंत जाऊन थांबला. फोन वाजताच होता. मैथिलीची अवस्था पाहून चैताली धावत फोन जवळ गेली आणि तिने पटकन फोन उचलला.

" हॅलो.. कोण बोलतंय..?" चैतालीने विचारले.

" हॅलो.. बाळा चैताली तू आहेस का..? मी रजनीश बोलतोय.. मैथिली आहे का जवळ.. तिला फोन देतेस का..?" समोरून रजनीश म्हणाले.

" दीदा रजनीश काकांचा फोन आहे.. बोलतेस का..?" चैताली ने मैथिली ला विचारले.

" हम्ममम.. बोलते.." असे म्हणत मैथिलीने फोन घेतला.

" हॅलो.. काका.. बोला ना.." मैथिली फोन वर बोलली.

" बाळा आता मी काय सांगतो ते नीट ऐक.. बाबा इथे माझ्या घरी आहेत.. घरी नक्की काय झालं ते काही मला कळलं नाही.. पण ते खूप अस्वस्थ आहेत. सध्या त्यांना मी घरी नाही आणू शकत. उद्या मी आणि निशा मावशी दोघंही येऊ त्यांना घेऊन. " रजनीशने सांगितलं.

" बाबा कसे आहेत.. ? मी येऊ का तिथे..? ते तुम्हाला कुठे भेटले..? काही झालं आहे का त्यांना..? त्यांना आता का नाही आणू शकत तुम्ही घरी..? काही झालं आहे का..? " मैथिलीने प्रश्नांचा भडिमार सुरू केला..

" ऐक.. ऐक .. मैथिली .. ते सुखरूप आहेत.. पण ते आता नशेत आहेत.. ते मला कसे भेटले.. कुठे भेटले.. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो मी तुला.. पण भेटून देतो.. आज बाबांना इथेच राहू देत.. उद्या येतो आम्ही.. फक्त तो पर्यंत शहाण्या मुली सारखं स्वतः ची आणि चैतालीची काळजी घे.. जेवून घ्या आणि आराम करा.. " रजनीश म्हणाले.

" पण काका..! " मैथिली काहीतरी बोलणार तोच रजनीश पुन्हा म्हणाले, " पण नाही आणि बिन नाही.. मी सांगितलं ते कर.. मला एक सांग सुमित्रा घरी आहे का..? " रजनीशने विचारले.

" हो आहे.. " मैथिली म्हणाली.

" ठीक आहे.. काही काळजी करू नको.. तुला हवं तर निशा मावशीला मी आता तिथे पाठवतो.. ती आज थांबेल तुमच्या सोबत.." रजनीश म्हणाले.

" नको… आजी आजोबा आले आहेत. त्यांना मी बोलवून घेतल होत. " मैथिली म्हणाली.

" बरं ठीक आहे.. भेटू उद्या.. पण स्वतः ची काळजी घे.. आणि चैताली कडे ही लक्ष दे.." असे बोलून रजनीश ने फोन ठेवला..

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


🎭 Series Post

View all