सिंड्रेलाची गोष्ट - भाग १८

ही कथा परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः

सुमित्रा विलास रावांच्या पाठी धावत धावत खाली गेली. मैथिली आणि चैताली दोघी पण हे सर्व पाहून गोंधळल्या. आपण सर्व सांगून चूकीचे केले का बरोबर हेच त्यांना कळतं नव्हतं.

**********
" दिदा आता काय करायचं..? बाबा असे कुठे गेले असतील..? ते येतील ना परत..? " म्हणत चैताली रडू लागली.

" तू रडू नकोस प्लीज.. येतील बाबा.. बाबा जे काही करतील ते विचार करून करतील.." मैथिली चैतालीला समजावत होती.

मैथिलीला सुद्धा मनोमन भीती वाटत होती. पण चैतालीला ती तसं दाखवत नव्हती. काहीही झालं तरी बाबा चूकच काही करणार नाहीत, त्यांना आपली काळजी आहे हे तिला माहित होतं, पण सोबतच घरात होणाऱ्या गोष्टी या तिच्याही कल्पनेच्या पलिकडील होत्या. त्यामुळे तिचाही गोंधळ झाला होता. पण लगेच कोणाला काही सांगणं किंवा कोणाची मदत मागणं तिला चूकच वाटत होत, कारण प्रकरणच तसं संवेदनशील होतं. थोडा वेळ थांबू, वाट पाहू, पण बाबा आले नाहीत तर निशा मावशीला बोलवून घ्यायचे हे तिने मनोमन ठरवले होते. पण त्या बद्दल ती चैतालीला काहीच बोलली नाही.

**********
अर्धा तास झाला तरी विलास राव आणि सुमित्राचा काहीच अतापता नव्हता. चैताली रडवेली झाली होती. मैथिली काय करावे हेच सुचत नव्हते. ती फोन जवळ गेली. रिसिवर हातात घेतला. निशा मावशीचा नंबर डायल करणार तितक्यात तिला आजी आजोबा म्हणजेच सुमित्राच्या आई बाबांची आठवण झाली. तिने लगेच फोन नंबर असलेली डायरी काढली. त्यात सुमित्राच्या आई बाबांच्या शेजाऱ्यांच्या नंबर होता. तो तिने डायल केला. शेजारी फोन करून त्यांना फोन वर बोलवले. सुमित्राचे बाबा फोन वर आले. ' आजोबा प्लिज घरी या. जसे असाल तसे या.. आम्हाला तुमची गरज आहे. फोन वर काहीच सांगू शकत नाही. काही विचारू देखील नका. प्लिज घरी या.." असे म्हणून मैथिलीने फोन ठेवला. ते पुढे काय बोलत आहेत हे देखील तिने ऐकून घेतले नाही.

**********

सुमित्राच्या बाबांनी सुमित्राच्या आईला फोन कॉल बद्दल सांगितले. आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
"चला आपण लगेच जाऊ."आई म्हणाली.

"अगं पण नक्की काय झालं असेल.. तुला काही अंदाज तरी आहे का..?" बाबांनी विचारले.

" अंदाज आहे.. थोडाफार.. पण चला आता तिथे. आपण विचार करत बसायची वेळ नाही आहे ही. मैथिलीचा फोन होता. म्हणजे नक्कीच मुलींना आपली खूप गरज असणार.. चला तुम्ही.. " असे म्हणत आईने आवरायला घेतलं. पुढच्या दहा मिनिटांत ते दोघं विलास रावांच्या घरी जायला निघाले.

**********

दारावरची बेल वाजली. मैथिली आणि चैताली आशेने दरवाजा पाशी गेल्या. दरवाजा उघडला तर सुमित्राचे आई बाबा होते. दोघी थोड्या निराश झाल्या. पण आजी आजोबांना बघुन त्यांना थोडं हायस वाटलं. चैतालीने लगेच सुमित्राच्या आईला मीठी मारली. ती तिथेच खूप मोठं मोठ्याने रडू लागली.

" चैताली प्लिज शांत हो. त्यांना आत येऊ दे आधी." असे म्हणत मैथिलीने त्या दोघांना आत घेतले. आणि दरवाजा बंद केला.

"काय झालं.. सुमित्रा कुठे आहे. विलास राव कुठे आहेत.", सुमित्राच्या बाबांनी मैथिलीला विचारले.

इतका वेळ संयम ठेऊन असलेली मैथिली सुद्धा आता रडू लागली.. "आजोबा सॉरी.. तुम्हाला असं घाई घाईत बोलवून घेतलं.."

तिला रडताना पाहून सुमित्राच्या आई बाबांना खूपच वाईट वाटलं.. सोबतच त्यांची काळजी आणि नक्की काय झालं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता अजून वाढली.

"अगं बाळा माफी काय मागते.. असं रडू नकोस.. ये इथे शांत बस." असे म्हणत आजोबांनी तिला शांत बसवलं. त्यांनी सर्वांनी साठी पाणी आणलं. मैथिलीला शांत करत आजोबांनी तिला विचारलं.. "आता नीट सांगशील काय झालं आहे ते…"

मैथिलीच पाणी पिऊन झालं. पाण्याचा ग्लास बाजूला ठेवून, तिने दीर्घ श्वास घेतला आणि ती बोलू लागली. झालेला सर्व प्रकार तिने आजी आजोबांना म्हणजेच सुमित्राच्या आई बाबांना सांगितला. सर्व काही ऐकून आजीच्या डोळ्यात पाणी तरळल. आजोबा आवक झाले . आजीला सुमित्राच्या या विचात्र वागण्याची, तिच्या डोक्यात सुरू असलेल्या विचारांची थोडी तरी जाणीव होती. पण हे जुनं प्रकरण अशा प्रकारे बाहेर येईल आणि हे असं सर्व काही त्यांच्या नकळत सुरू असेल , सुमित्रा मुलींना एवढा त्रास देईल , याची त्यांना कल्पना नव्हती. तर आजोबंसाठी तर हे सारं काही पूर्णपणे नवीनच होत. आधी तर आपण काही तरी चुकीचं ऐकतोय असंच त्यांना वाटलं. त्यांनी दोन वेळा आजीना विचारलं, 'हे जे सर्व आपण ऐकतोय, बघतोय हे खरं आहे का.. की मी स्वप्न बघतोय..' हे सर्व असं अचानक कळल्यावर आजोबांची काय अवस्था झाली असेल हे आजी पूर्णपणे समजून होत्या. त्यांनी आजोबांना धीर दिला.. 'ही वेळ आपण खचून जाण्याची नाहीये तर आपण खंबीर पणे मुलींना सावरण्याची आहे.' हे त्यांनी आजोबांना समजावलं..

" आजी आजोबा.. आम्हाला खरंच माफ करा. खरंतर आपलं असं सख्ख नातं नाही आहे. सुमित्रा आई तुमची मुलगी. तिच्यासोबत काही वाईट करायचं, तिला त्रास द्यायचा आमचा हेतू नव्हता. आम्ही खूप वाट पाहिली. पण गोष्टी बिघडतच चालल्या होत्या. आणि आता प्रसंग ही असा आला की आम्हाला बाबांना सर्व काही सांगावं लागलं. आम्हा दोघींना सुद्धा कळतं नाहीये आम्ही चुकीचं केलं की बरोबर…आता इथून पुढे काय होईल तेही माहित नाही आहे. आता काय करायचं.. कोणाशी बोलायच तेही कळतं नव्हतं. म्हणून तुम्हाला कॉल केला. " एवढे बोलून मैथिली पुन्हा रडू लागली

" अगं बाळा तू का रडते आहेस. चूक तुम्हा दोघींची नाहीये..यात जर कोणी चुकलं असेल तर ती सुमित्रा आहे. तुम्ही तर खूप वेळ तिला सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला. एवढ्या लहान वयात सुद्धा तुम्ही तुमच्या पेक्षा मोठ्यांना समजून घेतलं.. मी सुद्धा या सर्वात खूप चुकले. सुमित्राच्या विचारांबद्दल मला कळलं होतं. मीच पुढाकार घेऊन विलास रावांना सर्व सांगायला हवं होतं. पण मी पण माझ्या स्वार्था पोटी गप्प बसले. मुलीचा संसार तुटेल या भीतीने काही बोलले नाही. बघ्याची भुमिका घेतली.. चुकलं माझं.. खूप मोठी चूक केली. त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागली. आम्ही सख्खे नसूनही तुम्ही लेकरांनी आमच्यावर सख्या आजी आजोबा सारखं प्रेम केलं .. मी दुष्ट निघाले. मी हे सर्व न सांगून सावत्र पणाच केला. पण अगदी खरं सांगते, राहुल प्रकरणाबद्दल आता काही सुरू आहे याची मला कल्पना सुद्धा नव्हती. " आजी म्हणाली.

" तुला माहित होत हे सर्व..? " आजोबांनी आजीला विचारले.

" सर्व नाही.. पण तिच्या डोक्यात काय सुरू आहे याची कल्पना होती. तिने मनाने मुलींचा स्वीकार केला नाही हे माहीत होत.." आजी म्हणाली.

" मला का काही बोलली नाहीस तू..? " आजोबा वैतागून म्हणाले.

" अहो.. ही वेळ नाहीये हे सर्व बोलायची.. आता आपल्याला या प्रसंगाला कसं सामोरं जायचं ते ठरवलं पाहिजे. या दोन निष्पाप लेकरांना धीर दिला पाहिजे.." आजी म्हणाली.

आजोबा आजी वर वैतागले होतेच. पण आता या क्षणी आजी जे बोलत होती ते त्यांना पटलं होत. " तू मुलींसोबत थांब…मी खाली जातो. कोणी तरी त्यांना जाताना पाहिलं असेल. कुठल्या दिशेने गेले ते बघतो.. मी त्या दिशेने निघतो. थोड्या थोड्या वेळाने इथे पी सी ओ वरून फोन करतो. जी काही माहिती मिळेल ती तुला कळवतो.ते इथे आले तर तू मला कळव. तीन तासात काही कळलं नाही तर पोलिसात जाऊ आपण.. आता सध्या तरी आपण हेच करू शकतो." आजोबा म्हणाले.

" मी पण येते तुमच्या सोबत. " मैथिली म्हणाली.

" नको बाळा. तू इथेच थांब. आणि थोडंसं काहीतरी खाऊन घ्या दोघी पण. मी येतो.." असं बोलून आजोबा दरवाजाच्या दिशेने निघाले. त्यांनी दरवाजा उघडला , तोच समोर सुमित्रा दरात उभी होती.

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.🎭 Series Post

View all