सिंड्रेलाची गोष्ट - भाग १६

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.
क्रमशः

जवळपास तास दीड गप्पा मारून ,सुमित्राच सांत्वन करून सर्व बायका निघाल्या. निघताना विलास रावांना सुमित्राची काळजी कशी घेतली पाहिजे ,आता काय काय केलं पाहिजे हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. विलास राव सुद्धा शांत पणे सर्व ऐकत होते. त्यांना त्या बायकांना काहीही प्रतिसाद द्यायचा नव्हता. त्या गेल्या. लगेच विलास रावांनी दरवाजा लावला.. सुमित्राला चांगलंच माहित होतं आता तिला बोलणी ऐकावी लागणार आहेत. पण ती सुद्धा तयार होती. दरवाजा लावताच विलास राव सुमित्राच्या दिशेने वळले. आणि म्हणाले., " काय प्रकार होता हा..? " 

" तुम्हाला सुद्धा माहित आहे काय झालं ते.." सुमित्रा म्हणाली.

" हे बघ एकतर कोड्यात बोलू नको. नाटकं तर मुळीच करू नको. मला हे जे काही तू केलं आहेस ते अजिबात पटलेलं नाही. खोट का बोललीस तू..? काय गरज होती.? किती तो ड्रामा..? का..? कशासाठी..? " विलास राव संतप्त होऊन म्हणाले.

" मला होती गरज.. मला वाटलं म्हणून मी हे केलं.. प्लिज समजून घ्या.. जर त्यांना कळलं असतं की मी गरोदर नव्हते तर याच बायका माझ्यावर हसल्या असत्या. टोमणे मारले असते. आयुष्य भर येताजाता मला त्या बोलल्या असत्या.. पण माझा गर्भपात झाला हे कळल्यावर मात्र त्या मला धीर द्यायला आल्या.. त्यांना माझी काळजी वाटली.. मला आयुष्य भरासाठी माझं हस करून घ्यायचं नव्हतं. म्हणून मी हे केलं. यात काही वाईट हेतू नव्हता. प्लिज समजून घ्या." सुमित्रा म्हणाली.

" नाही.. मी जे समजून नाही घेऊ शकत. खोटं हे खोटंच असतं. तुला काहीही कन्फर्म न करता सगळी कडे सांगायची गरज काय होती. काय घाई झाली होती तुला..? असेही पहिले तीन महिने पूर्ण होण्या आधी सांगत नाहीत ना.. डॉक्टर सुद्धा तसा सल्ला देतात.. मग.. का केलं तू हे.. आणि केलं ते केलं.. त्यावरून खोटं सुद्धा बोललीस.. आता त्या बायका आल्यावर त्यांच्यासमोर एवढं नाटकं.. एवढी रडारड.. अगं काही क्षण मला सुद्धा वाटलं खरंच तुझा गर्भपात झाला आहे. एवढं छान नाटक केलं तू.. तुझं नाटकं पाहून मी चक्रावून गेलो आहे. कुठली सुमित्रा खरी, कुठली खोटी तेच मला कळेना झालं आहे. एक खोटं लपवायला आता तू अजून खोटं बोलशील.. आता जर मी त्या बायकांसामोर सर्व खरं सांगितलं असतं तर काय बाकी राहील असतं तुझं.. काय झालं असतं विचार केला आहेस कधी..? " विलास राव म्हणाले.

" तुम्ही असं करणार नाही माझ्या सोबत हे मला माहित आहे.. " सुमित्रा म्हणाली

" छान.. अतिउत्तम.. म्हणजे माझ्या चांगुलपणाचा.. साधेपणाच असा फायदा घेते आहेस तू..?" विलास राव म्हणाले.

" आता पुरे झालं.. झालं ते झालं.. सोडून द्या ना विषय.. मुली सुद्धा आहेत इथे.. त्यांच्या समोर का हे सर्व.. जाऊ दे ना.. प्लिज.." सुमित्रा अगदी लडिवाळ पणे म्हणाली.

" तुला जराही काही वाटत नाही का.. ? आणि मला हे मुलींसमोरच बोलायचं आहे.. त्यांना ही कळू दे, खोटं बोलल्यावर काय होत ते.. " विलास राव म्हणाले

" तुम्ही दोघी आत जा.. प्लिज.." सुमित्रा मैथिली आणि चैताली कडे पाहून म्हणाली.

" नाही .. आम्ही कुठेच जाणार नाही.. आम्हाला जाणून घ्यायचं आहे काय झालं आहे ते नक्की.." मैथिली म्हणाली

" हो.. हो.. आम्ही नाही जाणार.. " चैताली सुद्धा म्हणाली.

" वा.. म्हणजे आता तुम्ही माझं नाही ऐकणार.. एवढी हिम्मत तुमची.. " असे म्हणत सुमित्राने तिथे जवळ असलेला टीव्हीचा रिमोट उचलला आणि मैथिलीच्या दिशेने फेकला.. मैथिली लगेच बाजूला झाली..नाहीतर तो नक्कीच तिच्या डोक्याला लागला असता. हे दृश्य पाहून विलास राव अजूनच आश्चर्य चकित झाले.. सुमित्रा काय करते आहे , ती वेडी झाली आहे असेच त्यांना काही क्षणासाठी वाटले..

" अगं काय हा मूर्ख पणा .. हे असं करत का कोणी.." विलास राव रागात म्हणाले.

" बाबा.. तुम्ही हे आज पाहिलं.. गेले काही वर्ष आमच्या सोबत हे होतं आहे.. ही असंच वागते.. तुम्ही नसल्यावर.. " चैताली म्हणाली.

" हो बाबा.. खूपदा तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आम्ही पण तुमच्या कडे आमच्या साठी वेळ नव्हता. " मैथिली म्हणाली.

" बाबा ही सर्वांना असं सांगत होती की, तुम्हाला मुलगा हवा आहे म्हणून तुम्ही हा चान्स घेतला.. आणि तिला मुलगा होणार आहे.. बाबा दीदा आणि मी, तुम्हाला नकोशा झालो आहोत का..? " चैताली म्हणाली.

" नाही बाळा.. असं काहीच नाही.. असंच कधीच नव्हतं.." विलास राव म्हणाले.

" सुमित्रा हा काय प्रकार आहे.. ? मलाच आज अपराध्या सारखं वाटतं आहे माझ्या मुलींसमोर.." विलास राव म्हणाले.

" बसं झाल हा तुमचं आता.. मी काही एवढा मोठा गुन्हा केला नाही.. एक मुलं देऊ शकत नाही तुम्ही मला.. आणि मलाच बोलतय. तुमच्यामुळे ही अवस्था झाली आहे माझी.. किती राबायच मी एकटीने.. किती करायचं.. काय अपेक्षा होती माझी.. फक्त माझं हक्काचं मुलं.. एवढंच ना.. तेही देऊ शकत नाही तुम्ही…" सुमित्रा काही तरी बडबडत होती.

" तू काय बोलते आहेस हे तुला तरी कळतं आहे का..? इथे मुद्दा काय सुरू आहे आणि तू हे काय बोलते आहेस… आणि मी तुला मुलं देऊ शकत नाही , हे कुठून आलं या सर्वात.. माझा काय दोष ..? आणि माझ्यात काही ही कमतरता नाही हे सिद्ध केलं आहे मी.. या दोन मुली आहेत मला.. " विलास राव म्हणाले.

" म्हणजे मग माझ्यात कमतरता आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला..? " सुमित्राने विचारलं.

" सुमित्रा.. हे बघ मुळ मुद्दा बाजूला राहतो आहे .. खूप बालिश गोष्ट सुरू आहे ही..एक छोटीशी गोष्ट होती.. तिच्या साठी तू एवढं मोठं खोटं बोललीस.. एवढं नाटकं केलं.. मी त्या बद्दल तुझ्याशी बोलतो आहे.. आणि तू हे …" विलास राव बोलत होते, पण सुमित्राने त्यांना मध्येच रोखले.

" नाही आधी उत्तर द्या..तुम्हाला काय म्हणायचं आहे.. दोष माझ्यात आहे. ?" सुमित्राने विचारले.

" सुमित्रा बास कर आता… हात जोडतो.." विलास राव म्हणाले.

" तुम्हीच सुरुवात केली.. मी बोलत होते.. एवढं काही केलेलं नाही मी.." सुमित्रा म्हणाली.

" काय करू ह्या बाईचं.. तुझ खोटं तर बाजूलाच राहील , आज जे तू माझ्या मुलींशी वागली आहेस ते पाहून तर मला वाटू लागलं आहे , मी चूक केली तुझ्याशी लग्न करून.. माझ्यापाठी तू ह्यांना किती त्रास दिला असशील हे त्या परमेश्वरालाच माहित.. मी चुकलो.. मी तुझ्यावर विश्वास ठेवून चूक केली…" विलास राव म्हणाले. आणि हतबल होऊन जवळच असलेल्या खुर्ची वर बसले.

" बाबा हिने तुम्हाला खूप फसवल आहे . ही कुठल्यातरी माणसाला सुद्धा भेटते…" चैताली बोलली.. ती पुढे बोलणार तोच मैथिलीने तिच्या तोंडावर हात ठेवला . 

" बाबा आम्ही जातो.." असं म्हणत ती चैतालीचा हात पकडून तिला तिथून घेऊन जाऊ लागली.

" थांब.. थांब मैथिली.. मला पूर्ण ऐकायचं आहे . काय म्हणाली चैताली ते नीट ऐकायचं आहे.. आज काय ते एकदाच कळू दे .." विलास राव म्हणाले..

" नाही बाबा.. तसं काहीच नाही आहे.. ती काहीही बोलते.." मैथिली म्हणाली.

" नाही बाबा.. ही सुमित्रा आई एका माणसाला भेटते बागेत.. दीदाला पण माहित आहे हे सर्व.. शाळेत तिला त्यावरूनच मुली चिडवत होत्या.. तिने म्हणूनच त्या मुलीला मारलं होतं.. " चैताली मैथिलीने पकडलेला हात सोडवत, विलास रावांकडे येत म्हणाली.

" ओ माय गॉड.. अजून काय काय लपवून ठेवलं आहेस तू सुमित्रा… कोण आहेस तू नक्की.. ? ओळखतो का तुला मी.. ? काय म्हणतेय चैताली.. ? काय आहे हे..?" विलास राव सुमित्राच्या दिशेने रागात जात म्हणाले..

" खोटं बोलत आहेत तुमच्या मुली.. खोटारड्या आहेत त्या.. त्यांना नको आहे मी या घरात म्हणून हे सर्व करत आहे त्या.. ह्या मैथिलीनेच चैतालीला भडकावल आहे माझ्या विरूद्ध.. हीच कारणीभूत आहे. " सुमित्रा बोलत होती आणि तोच विलास रावांनी तिच्या कानशिलात लगावली.

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


🎭 Series Post

View all