सिंड्रेलाची गोष्ट - भाग १५

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः

मैथिली तिच्या खोलीत आली. विलास राव आणि सुमित्रा मध्ये सुरू असलेलं संभाषण तिने बऱ्यापैकी ऐकलं होतं. नक्की काय झालं असेल हा विचार तिच्या मनात सुरू होताच, पण सोबतच आता आपण कुठल्याही प्रकारचा त्रास स्वतःला आणि चैतालीला होऊ द्यायचा नाही हे तिने मनोमन ठरवलं होतं. निशा मावशीशी बोलल्या मुळे तिला पुन्हा हुरूप आलं होतं. तिला आज शांत झोप लागली. तर दुसरी कडे सुमित्रा आणि विलास राव यांच्या मध्ये अबोला होता. दुसऱ्या दिवशी सुमित्राचे टेस्ट रिपोर्ट्स आले, आणि ती गरोदर नसल्याची शंभर टक्के खात्री झाली. 


**********


सुमित्रा आणि विलास राव ठरल्या प्रमाणे डॉक्टर कडे गेले. गर्भधारणा होण्यासाठी आधी पाळी येणं गरजेचं आहे, तीन महिने पाळी का आली नाही हे तपासून पाहिले पाहिजे हे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. उरलेल्या टेस्ट झाल्यानंतर पाळी येण्यासाठी सुमित्राला काही औषध दिली. 


**********


दिवस जात होते. सुमित्राच विचित्र वागणं वाढत चाललं होत.अशा वागण्याची विलास रावांना सवय नव्हती. कधी त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात सुद्धा न बोलणारी सुमित्रा आता अरेरावी करू लागली होती. त्यांना उद्धट उत्तर देऊ लागली होती. जे झालं त्याच खापर ती त्यांच्यावरच टाकत होती. 'ती खूप दुखावली गेली आहे ', असे मानून विलास राव जास्त काही बोलत नसत. हळू हळू शेजारी सुद्धा चर्चा करू लागले होते. सुमित्रा गरोदर आहे ,हे एवढंच त्यांना माहीत होतं. त्यापुढे काय झालं याची त्यांना कल्पना नव्हती. एव्हाना तिचं पोट दिसायला हवं होतं, पण तसं काहीच झालं नाही ,त्यामुळे शेजारी गुजबुज व्हायला लागली होती. लोकांची दया आणि सिंपती कशी मिळवायची हे सुमित्राला चांगलच माहित होतं. आपण गरोदर नाही हे कळल्यावर लोक आपल्यावर हसतील म्हणून मग खोटंच बोलायचं हे तिने मनाशी पक्कं केलं होतं. 


**********


एकदा घरी काही तरी मागायला आलेल्या सावंत काकुंसमोर तिने रडायलाच सुरुवात केली.. " काय झालं सुमित्रा…" गोंधळून काकू म्हणाल्या..


" काही नाही.. असंच तुम्हाला पाहिलं आणि आईची आठवण आली.." सुमित्रा म्हणाली.


" अगं होतं असं.. खासकरून या दिवसात येते आईची आठवण.. पण असं रडू नकोस.. बाळावर परिणाम होईल. या दिवसात कसं बाईने हसत राहायला हवं.. " काकू म्हणाल्या.


" काकू.. काय सांगू मी तुम्हाला.." सुमित्रा अजून मोठं मोठ्याने रडू लागली..


" काय झालं…? तू शांत हो.. इथे ये .. इथे बसं आधी.." काकू सुमित्राला घेऊन हॉल मधल्या सोफ्यावर बसल्या.


" सांग आता काय झालं आहे.." काकू म्हणाल्या.


" काकू माझ बाळं या जगात येण्याआधीच गेलं हो.. " सुमित्रा म्हणाली.


" काय.. ? काय बोलतेस..? कसं झालं हे सर्व..? कधी झालं..? खरंतर एव्हाना तुझं पोट दिसायला हवं होतं.. सोसायटी मधल्या बायका सुद्धा म्हणत होत्या तसं.. पण मला असं वाटलं, असतं काही काहींचं असं.. नाही दिसत पोट लवकर…" काकू म्हणाल्या.


" कसं झालं ,काय झालं ,काहीच माहीत नाही.. डॉक्टर कडे चेककप साठी गेलो तेव्हा कळलं..काकू माझं बाळ.." असं म्हणत सुमित्रा रडू लागली..


काकूंनी तिला जवळ घेतलं.. शांत केलं.. समजावलं.. आणि त्या त्यांच्या घरी निघून गेल्या.. त्या जाताच सुमित्रा खुश झाली.. आता या सर्वांना सांगणार.. बसं , झालं माझं काम म्हणत ती आनंद साजरा करू लागली.. सुमित्राला वाटलं होतं अगदी तसचं, काकूं कडून ही बातमी खरे वहिनींना कळली. खरे वाहिनींकडून अजून पुढे गेली.. असं करत करत पूर्ण सोसायटी मध्ये ही बातमी पसरली. सर्वांना सुमित्राची दया येऊ लागली. विलास रावांकडे सुद्धा सगळे दयेने पाहू लागले. ' झालं ते वाईट झालं ', म्हणत येता जाता लोक त्यांचं सांत्वन करू लागले.. पण लोकं असे का वागतात हे काही त्यांना कळलेच नाही.. ते सुमित्राशी या विषयावर बोलले. पण तिने काही त्यांना नीट उत्तर दिले नाही. मैथिली आणि चैतालीशी या बद्दल काय बोलणार म्हणून मग त्यांनी त्या दोघींना काही विचारले नाही. 


**********


सोसायटी मधल्या बायकांनी रविवारी एकत्रित पण विलास राव आणि सुमित्राला येऊन भेटायचे ठरवले. 'जे झालं ते वाईट झालं, आपण सर्वांनी जाऊन त्यांना धीर देऊ ', असं बायकांनी ठरवलं.


**********


रविवारचा दिवस उजाडला. संध्याकाळी पाचच्या सुमारास विलास राव चहा पित पेपर वाचत बसेल होते. दाराची बेल वाजली. सुमित्रा तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडला तर समोर सोसायटी मधल्या जवळपास पंधरा एक बायका समोर उभ्या होत्या. त्यांना पाहून सुमित्रा विलास रावांना म्हणाली, " अहो, हे बघा कोण आलं आहे.." 


त्यांना असं आलेलं पाहून सुमित्रा सुद्धा गोंधळली होती. तिने त्यांना आत बोलावले. विलास राव सुद्धा त्यांच्या जागेवरून उठून बायकांना बसायची सोय करू लागले.


" काय घेणार तुम्ही सर्व..? चहा की लिंबू सरबत..?? " सुमित्राने विचारले.


" अगं काही नको.. तुलाच तर भेटायला आलो आहोत आम्ही सर्व.. आणि अशा वेळेला चहा पाणी घेत का कोणी.. तू ये , इथे बस.." सावंत काकू म्हणाल्या.


" काय झालं आहे..? तुम्ही सर्व इथे अचानक कश्या?? काही सण समारंभ साजरा करायचा आहे का सोसायटी मध्ये..? " विलास राव म्हणाले.


" अहो काहीतरीच काय म्हणता.. तुम्हा दोघांना खास भेटायला आलो आहोत आम्ही. सण समारंभच इथे बोलायला तरी येऊ का सध्या आम्ही… एवढा वाईट प्रसंग घडला तुमच्या बाबतीत.. आणि आम्ही हे असं सर्व बोलायला इथे येऊ का… " खरे वहिनी म्हणाल्या.


" कुठला वाईट प्रसंग? काय बोलतय तुम्ही..? " विलास राव म्हणाले


सुमित्राच्या लक्षात आले ते सर्व काय बोलताहेत ते.. हुशारीने ती लगेच पुढे आली.. आणि विलास रावांना बाजूला सारत म्हणाली.." बरं झालं तुम्ही आलात.. खूप वाटतं हो ,आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी कोणीतरी असावं, कोणाशी तरी बोलावं. घरात आम्ही दोघच मोठे. मुलींना काय सांगणार आमचं दुःख.. तुम्ही आपुलकीने आलात ते बरं झालं.." सुमित्रा सरवासारव करत म्हणाली. आणि जागा करून त्या बायकांच्या मध्ये जाऊन बसली.


विलास राव बाजूला झाले. त्यांना हे सर्व काय सुरू आहे ते कळतच नव्हते. हळू हळू एक एक करून बायका बोलू लागल्या. काही विचारू लागल्या.. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सुमित्रा देऊ लागली. त्यांचं बोलणं ऐकल्यावर विलास रावांच्या लक्षात येऊ लागलं की नक्की काय झालं आहे. त्यांना त्यांच्या कानावर आणि डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सुमित्रा रडत होती. जे घडलच नाही अशा गोष्टीचा शोक व्यक्त करत होती. ती किती बिचारी आहे , तीचा गर्भपात झाल्यामुळे तिची मानसिक स्थिती किती वाईट आहे. शारीरिक दृष्ट्या ती किती कमजोर झाली आहे , हे ती सर्वांना सांगत होती. विलास रावांना तिचा हा खोटे पणा सहन होत नव्हता. पण आता एवढ्या बायकांसमोर ते तरी काय बोलणार होते. सुमित्राच नाटकी वागणं पाहून ते हादरून गेले होते. मैथिली आणि चैताली सुद्धा इतक्यातच त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या.. त्या दोघी सुद्धा एवढ्या लोकांना घरात पाहून गोंधळल्या. विलास रावांनी दोघींनाही नजरेने एक कोपऱ्यात जाऊन शांत बसण्यास सांगितले. त्या प्रमाणे त्या दोघी सुद्धा एका कोपऱ्यात जाऊन बसल्या.. बायका मध्ये मध्ये विलास रावांना सुद्धा काही ना काही बोलत होत्या, विचारत होत्या. त्यावर ते फक्त मान हलवत होते. मूक प्रतिसाद देत होते. मनोमन ते त्या सर्व जाण्याची वाट पाहत होते. कधी एकदा या सर्व घराबाहेर जातात आणि सुमित्राला खडासवून विचारतो आहे असं त्यांना झालं होतं.


***********

क्रमशः


( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )


फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )


डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.🎭 Series Post

View all