सिंड्रेलाची गोष्ट - भाग १३

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः

विलास राव , सुमित्रा, मैथिली आणि चैताली… चौघही आता चार टोकांवर उभे होते. गैरसमज, राग, तिरस्कार, आक्रोश अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी चौघांच्याही मनात वास करत होत्या. चौघांपैकी कोणीही यातून बाहेर यायला तयार नव्हते. दिवसेंदिवस ते नकारात्मकतेच्या दलदलीत रुतत जात होते. 

सुमित्राला तीन महिने पाळी आली नव्हती. तिने कुठल्याही प्रकारची टेस्ट न करता , डॉक्टरशी न बोलता स्वतः च घोषित करून टाकलं होतं, की तिला दिवस गेले आहेत. शेजारी पाजारी सर्वांना सांगायला ही सुरुवात केली होती तिने. चैताली आणि मैथिली पासून मात्र तिने हे जाणीव पुर्वक लपवलं होतं. ' मला मुलगाच होणार.. मी या घराला वारस देणार.. माझा मुलगा आला की हे घर, विलास राव फक्त आणि फक्त माझेच असणार.. या घरावर , संपत्ती वर फक्त माझा आणि माझ्या मुलाचा अधिकार असणार.. मला हवं तसं, हवे ते मी करणार.. नोकर चाकर ठेवणार.. अगदी प्रत्येक कामासाठी.. मी राणी सारखी जगणार.. मुलगा आला की विलास रावांचा आपसूकच मुलींकडचा कल कमी होईल.. मग बस.. खऱ्या अर्थाने आमचा संसार सुरू होणार..' अशा दिवा स्वप्नांमध्ये सुमित्रा गढून गेली होती. तर विलास राव आसपास घडणाऱ्या गोष्टींमुळे गोंधळून गेले होते.. मैथिलीच्या वागण्याचा त्यांना त्रास होत होता. सुमित्राला अशा अवस्थेत ती त्रास देते आहे हा विचार करून त्यांना तीचा राग येत होता.. ' सुमित्रा सावत्र आई असून सुद्धा किती जपते मुलींना आणि या दोघी तिलाच त्रास देतात त्यामुळे आपण तरी तिला जपले पाहिजे.. तिला हवं नको ते दिलं पाहिजे ' , तिची काळजी घेतली पाहिजे .. हे विचार विलास रावांच्या मनात सुरू होते. मैथिली सर्व काही संपल्या सारखं वागत होती. सुमित्रा कोणाला भेटते ते जाणून घेणं तिला गरजेचं वाटत होतं. त्यातच सुमित्राच्या प्रेग्नंसी बद्दल ऐकून ती हताश झाली. आपल्या आयुष्यात सुरू असलेल्या वाईट गोष्टींसाठी आपले बाबाच जास्त कारणी भूत आहेत असा तिने समज करून घेतला होता. चैताली साठी तिची दिदा सर्व काही होती. बाबांकडे तिच्यासाठी वेळ नव्हता. सुमित्राला ती आई नाही तर चेटकीण समजायची.. आता घरात बाळ आल्यावर तर आपल्या बाबांसाठी आपण परके होणार. बाबांना आपण नको आहोत म्हणून ते दुसरं बाळ घेऊन घेणार आहेत , असा तिचा समज होता.

**********

दोन दिवस घरात शांतताच होती. कोणी कोणाशी विशेष काही बोलतं नव्हतं. मैथिलीला दोन दिवस शाळेत सुद्धा जाऊ दिलं नाही विलास रावांनी. स्वतः ही पूर्ण वेळ घरी होते. पण या वेळात तिच्याशी बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. तिनेही तिची बाजू समजावून सांगितली नाही. गैरसमजच्या डोहात ते दोघेही वाहत चालले होते. त्यांच्यातल अंतर वाढत चाललं होतं.

***********

" सुमित्रा आज मी लवकर येईन घरी.. आपण मग डॉक्टर कडे जाऊन येऊ.." विलास राव सुमित्राला म्हणाले.


" अहो कशाला..? तुम्हाला बरं वाटत नाही आहे का..? " सुमित्राने विचारले..


" अगं माझ्यासाठी नाही.. तुझ्यासाठी.. आपण डॉक्टर कडे जाऊन एकदा कन्फर्म करून घेऊया ना.. " विलास राव म्हणाले.


" म्हणजे मी खोटं बोलतेय असं म्हणायचं आहे का तुम्हाला..?" सुमित्राने विचारले.


" काही तरीच काय… तू का खोटं बोलशील.. आपण डॉक्टर कडे जाऊ. कन्फर्म करू.. काही टेस्ट असतील तर ते सुद्धा करून घेऊ. औषधं घ्यावी लागतील तर ती सुरू करता येतील. तुला असेही पाळीचा प्रोब्लेम आहे.. आपलं लग्न झाल्यापासून मी पाहतोय. वेळेत येत नाही कधीच. या वेळी पण तसं काही असलं तर.. उगीच शंकेला वाव नको. आणि एकदा कन्फर्म झालं की सर्वांना सांगता सुद्धा येईल ना.." विलास राव म्हणाले.


" मला माहित आहे.. या वेळी नक्कीच गोड बातमी आहे.. माझा विश्वास आहे.." सुमित्रा म्हणाली.


" तू म्हणतेस तसंच असेल. पण माझा मुद्दा समजून घे.. आता यावर मला चर्चा नको आहे..चल निघतो मी. काळजी घे." असं बोलून विलास राव निघाले.


**********


दोन दिवसांनंतर मैथिली शाळेत आली होती. वर्ग शिक्षिकेसाठी, प्रिन्सिपल मॅडम साठी आणि त्या मुली साठी लेखी माफीनामा हातात घेऊनच ती आली होती.

मैथिलीला तिच्या वर्गात जायला कसतरीच वाटतं होतं. तिने वर्गात पाऊल ठेवलं तसं सर्वजण तिच्या कडे पाहू लागले.. तिला खूप अपराध्या सारखं वाटतं होतं. तिला माहित होतं तिने मोठी चूक केली आहे. पण त्या वेळी तिला तेच योग्य वाटतं होतं. जे केलं आहे त्याला सामोरं तर जावं लागणार होतं.. ती जाऊन तिच्या बेंच वर बसली. तर तिच्या बाजूला बसणाऱ्या तिच्या मैत्रिणीने , तन्वीने जागा बदलली. " तन्वी, थांब.. कुठे जाते आहेस..? " मैथिलीने विचारले.


" मला तुझ्या बाजूला नाही बसायचे. " तन्वी म्हणाली.


" का..? " मैथिलीने विचारले.


" आईने सांगितलं आहे.. तुझा काही भरवसा नाही.. राग आला तर मला सुद्धा मारशील तू.." तन्वी म्हणाली.


" तन्वी.. मी असं का करेन.." मैथिली म्हणाली.


" मला नाही माहित.." तन्वी बोलली आणि निघाली.


" थांब.. तू नको जाऊस.. मी जाते मागे.. मागच्या बेंच वर कोणी नाही बसत , मी जाते तिथे.." मैथिली म्हणाली आणि निघाली.


**********


तीन महिन्यांच्या सुट्टी नंतर पाटील बाई, म्हणजे मराठी विषयाच्या मैथिलीच्या आवडत्या शिक्षिका दोन दिवसांपूर्वीच पुन्हा रुजू झाल्या होत्या. मैथिली सुद्धा त्यांना खूप आवडे. शाळेत आल्या आल्याचं त्यांना मैथिली बद्दल कळलं होत. त्या मैथिलीच्या शिक्षिका तर होत्याच त्या सोबत पाटील बाईंची तिच्या दिवंगत आईची चांगली मैत्री होती. त्यामुळे मैथिली त्यांच्या सोबत खूप कंफर्टेबल होती. आजी गेल्या नंतर मनातल्या सर्वच नाही पण बऱ्याच गोष्टी ती त्यांच्याशी शेअर करत असे. त्यांच्या घरी अधून मधून जात असे. त्यांना सुद्धा तिच्या घरच्या परिस्तिथीचा अंदाज होता. शाळेत घडलेला प्रकार ऐकून त्यांनाही अंदाज आला , नक्कीच काही तरी मोठं घडलं असणार , त्यामुळे ही अशी वागली.. 


मराठीच्या तासाला पाटील बाई वर्गात गेल्या.. त्यांना खूप दिवसांनी पाहून सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना पाहून मैथिली सुद्धा खूप खुश झाली.. खूप दिवसांनी तिला असा आनंद झाला होता. 


मैथिलीला असं पाठच्या बेंच वर आणि एकटं बसलेलं त्यांनी पाहिलं. मैथिलीशी लवकरात लवकर बोललं पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला . त्यांनी त्यांचा तास संपवला. आणि निघताना मैथिलीला मधल्या सुट्टीत येऊन भेटायला सांगितले.


मधल्या सुट्टीत मैथिली त्यांना भेटली. त्यांनी तिला जवळ घेतले. काहीच न बोलता घाबरलेले कोकरू जसं त्याच्या आईच्या कुशीत शिरत तसं मैथिली त्यांच्या जवळ गेली. तिला खूप रडू आलं. काही क्षण पाटील बाईंनी तिला व्यक्त होऊ सुद्धा दिलं. मग तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, " बाळा आपण शाळेत आहोत.. भानावर ये.." 


" हो.. बाई.. सॉरी.." असं म्हणत, डोळे पुसत ती त्यांच्या कुशीतून बाजूला झाली..


" हे बघ आता इथे काही नीट बोलता येणार नाही.. शाळा सुटल्यावर घरी चल माझ्या.. मी तुझ्या घरी फोन करून सांगते.. काही काळजी करू नकोस.. मी सोडायला सुद्धा येईन.. मी आता तुला इथे हेच सांगायला बोलावलं आहे की, काहीही झालं तर खचू नकोस, स्वतः ला एकटं समजू नकोस. मी आहे तुझ्या सोबत.. अँड आय ट्रस्ट यू..सो डोन्ट वरी.." पाटील बाई म्हणाल्या..


" थँक्यू मावशी.. सॉरी बाई.." मैथिली म्हणाली.


पाटील बाईंच्या येण्याने मैथिली ला खूप मोठा आधार मिळाला होता.


**********


ठरल्या प्रमाणे सुमित्रा आणि विलास राव डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांना सुमित्राला तपासले.. आणि त्या सुमित्रा सोबत बाहेर आल्या..


" डॉक्टर सांगा यांना लवकर.. गोड बातमी बद्दल.." सुमित्रा लाजत म्हणाली.


" सुमित्रा आधी बसा तुम्ही.. आणि मी काय सांगते आहे ते नीट ऐकून घ्या.." डॉक्टर मॅडम म्हणाल्या. 


" काय झालं डॉक्टर…? " विलास रावांनी विचारले..


" सो.. सुमित्राला दिवस गेलेले नाही आहेत.. नेहमी प्रमाणे पाळी आली नसल्याचा अंदाज आहे. तरी तुमच्या खात्री साठी आपण काही टेस्ट सुद्धा करून घेऊ.. उद्या पर्यंत रिपोर्ट येतील.." डॉक्टर म्हणाल्या.


" नाही.. असं नाही होऊ शकत.. नाही होऊ शकत.. मला खात्री आहे .. मी आई होणार आहे.. मला दिवस गेले आहेत.." सुमित्रा बडबडू लागली.. 


" सुमित्रा शांत हो.. प्लिज.. डॉक्टर काय म्हणताहेत ते ऐकून घे.. आपण टेस्ट सुद्धा करू.." विलास राव म्हणाले..


" मी ब्लड घ्यायला सांगते.. रिपोर्ट आले की कॉल करते तुम्हाला.. उद्या या तुम्ही भेटायला.. सुमित्राला जपा.." डॉक्टर म्हणाल्या..


विलास राव आणि सुमित्रा बाहेर आले .. कार मध्ये बसले.. विलास राव शांतच होते. नेमकं काय बोलावं सुमित्राशी याची विचार करत होते. हताश होऊनच सुमित्रा तिथून बाहेर पडली. सुन्न झाली होती ती. आसपास कोण काय बोलत आहे.. काय सुरू आहे हे कसलंच भान नव्हतं तिला.. कार बिल्डिंग खाली आली तरी सुमित्राला भान नव्हतं..


" सुमित्रा.. सुमित्रा…" विलास रावांनी सुमित्राला हलवले 


" हा.. पोहोचलो आपण.. " सुमित्रा भानावर येऊन म्हणाली.


" हे बघ.. आता अपसेट नको होवू नको.. मी तुला आधी सुद्धा हे सांगितलं होतं, एकदा कन्फर्म करूया.. पण तू ऐकलं नाहीस माझं.. असो.. काही बिघडलेले नाही. डॉक्टरांचा नीट सल्ला घेऊ. ते म्हणतील तसचं करू.." विलास राव म्हणाले.


" नाही.. असं नाही होऊ शकत.. आणि उद्या टेस्टचे रिपोर्ट्स येतील ना.. ते येण्याआधीच आपण कसं म्हणू शकतो.. नकारात्मक विचार नको.. सर्व ठीक होईल.." सुमित्रा म्हणाली.


" अगं फॉर्मालिटी म्हणून टेस्ट म्हणाल्या डॉक्टर.. जर त्यांना यात डाऊट असता तर त्यांनी आपल्याला आधी सांगितलच नसतं.. सो तू आता हा विचार सोडून दे. जे होते ते चांगल्या साठीच होतं.. यातूनही काही तरी चांगलं होईल. " विलास राव बोलले.


" नाही.. असं नाहीच होऊ शकत.. माझी स्वप्न अशी नाही तुटू शकतं.. आणि .. आणि मी सर्वांना काय सांगू.." सुमित्रा स्वतः शीचं बडबडत होती.


" म्हणजे.. सर्वांना म्हणजे.. प्लिज आता असं नको म्हणू की तू आधीच सर्वांना सांगून मोकळी झाली आहेस.." विलास राव थोड्या चढ्या आवाजात म्हणाले.


सुमित्रा काहीच न बोलता मान खाली घालून तशीच रडत बसली .


**********


क्रमशः


( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )


फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )


डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

🎭 Series Post

View all